‘रोजमर्रा की जिंदगी’मध्ये कुठे काही मजा असते! पण तरीही तोच वाफाळलेला वरणभात तूपलिंबू ‘कम्फर्ट फूड’ म्हणून खातोच आपण. कारण रोजच्या गोष्टींमध्ये ऊब आहे, सवय आहे, शांतता आहे, ठहराव आहे आणि म्हटलं तर सौंदर्य सगळ्यातच आहे. अशाच बाराही महिने आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या, असणाऱ्या, अधूनमधून डोकं वर काढणाऱ्या गोष्टी, माणसं, परिस्थितीबद्दलचं आणि त्यातही तत्त्वज्ञान शोधणारं हे सदर दर पंधरा दिवसांनी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आंबा हा फळांचा राजा असतो, हापूस आंब्यासारखं फळ जगात दुसरं कुठलंही नाही, वगैरे सगळं आपल्याला माहीतच आहे. वर्षभर आपण त्या केशरी, रसरशीत, गोड, ‘अ’ जीवनसत्त्वानं भरलेल्या फळाची आतुरतेनं वाट बघत असतो. सीझनमधले दीड-दोन महिने रतीब घातल्यासारखे आंबे घरी येत असतात. कुठून कुठून चांगले आंबे मिळवण्याचा खटाटोप सुरू असतो. ‘अमुक बाजारात उत्कृष्ट आंबा मिळतो’, ‘तमुककडच्या देवगड हापूससारखा आंबा मुंबईपुण्यात दुसरा कुठेही नाही’. जिथून जी माहिती मिळेल तिथून आंबा मिळवायची धडपड केली जाते. ‘आपल्यालाच कशी उत्तम आंब्याची पारख आहे,’ असा दृढ विश्वासही अनेकांना असतो. माझं ठरलेलं आहे, एकदा आंब्याची पेटी घरात आली की सीझन संपेपर्यंत खंड पडू द्यायचा नाही. यंदा भरल्या डोळ्यांनी सीझनच्या शेवटच्या आंब्याला निरोप दिला आणि मुकाट्याने कोपऱ्यावरच्या नेहमीच्या फळवाल्याकडे गेले.

रोजची सफरचंदं, केळी, डाळिंबं घेणं पुन्हा आलं. त्याच्या गाडीपाशी जवळच्याच ‘क्लब’मध्ये ‘जिम’ करून आलेले एक लब्धप्रतिष्ठित अंकल उभे होते. ‘भैया अॅपल कैसे दिये, इतका महंगा क्यू?’ वगैरे चर्चा सुरू होती. हे कधी संपेल याची वाट बघत मी थांबले. शेवटी बरीच चर्चा करून ‘जिमी अंकल’ अवघी दोन सफरचंद आणि चार केळी घेऊन आपल्या चकचकीत गाडीत बसून गेले. त्याबरोबर माझा फळवाला हसत म्हणाला, ‘देखा, आ गये औकात पे। एक्सपोर्ट क्वालिटी आम चले गये, अब केले का भी भाव करेंगे। फल तो ए भी अच्छाही है, लेकिन पूरा साल मिलता है ना!’ मी चमकले. एक अक्षरही न बोलता हवी ती फळं घेऊन, तो मागेल तितके पैसे देऊन घरी आले. शेवटी मला बारा महिने याच्याचकडून फळं घ्यायची आहेत. वर्षात दोन महिने येणाऱ्या आंब्याच्या मोहापायी रोजच्या माणसाला कुठे दुखवा! पण हिन्दी सिनेमातल्यासारखं अनपेक्षितपणे हा माणूस मोठं तत्त्वज्ञान सांगून गेला.

हंगाम बदलतात, पण बारा महिने तेरा काळ न बदलणारी एक गोष्ट म्हणजे मनुष्यस्वभाव! जगातली सर्वात सातत्यपूर्ण गोष्ट म्हणजे माणसाचे स्वभावगुणधर्म. वयाप्रमाणे, जडणघडणीनुसार, भौतिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीमुळे त्यात काही बदल होतात, पण मूळ भावना बदलत नाहीत. गुणसूत्र सेहेचाळीसच राहतात, रक्त लालच असतं. राग, लोभ, प्रेम, संशय, सगळं सगळ्यांमध्ये असतंच. संगीत रचना करताना जसा त्या त्या वाद्याचा फेडर वरखाली करतात तसा त्या भावनेचा फेडर वरखाली होतो. आई बाळावर रागावते तेव्हा तो फेडर थोडा खाली असतो, तीच आई नवऱ्यावर रागावते तेव्हा सर्वात वरच्या ठिकाणी असतो. पण राग ही भावना बाराही महिने मनात कुठेतरी असतेच.

अशाच बाराही महिने आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या, असणाऱ्या, अधूनमधून डोकं वर काढणाऱ्या गोष्टी, माणसं, परिस्थिती याबद्दल लिहिण्याचा विचार आहे, ‘बारमाही’ या सदरात. आमची सगळीकडे शाखा आहे, आम्ही सगळीकडे उपलब्ध आहोत, आमच्या आवृत्ती ठिकठिकाणी दिसतात, आम्ही जगावेगळे नाही. पण याचा आम्हाला काही खेदही नाही. कारण शेवटी रोजच्या जगण्याला सफरचंद आणि केळ्याचं शिकरणच लागतं. जे सहज उपलब्ध ते सामान्य, उल्लेखनीय असं त्यात काही नाही, अशी आपली मानसिकता ठरून गेलेली आहे. ‘रोजमर्रा की जिंदगी’मध्ये कुठे काही मजा असते! पण तरीही रोज तोच वाफाळलेला वरणभात तूपलिंबू ‘कम्फर्ट फूड’ म्हणून खातोच की आपण. रोजच्या गोष्टींमध्ये ऊब आहे, सवय आहे, शांतता आहे, ठहराव आहे आणि म्हटलं तर सौंदर्य सगळ्यातच आहे!

नवीन वर्ष सुरूही झालं. पण त्याआधी डिसेंबर सुरू झाल्याबरोबर वर्ष संपवताना ‘कुठे आणि कुणाबरोबर पार्टी करायची’ याचे विचार सुरू झाले. वर्षानुवर्षांचे ठरलेले ग्रुप्स, यंदा त्यात कमीजास्त झालेली माणसं, सगळ्याची यानिमित्ताने पुन्हा एक उजळणी झाली. ‘कॅलेंडरचं पान उलटणार बाकी काही नाही’ इथपासून ते ‘नवीन वर्षात नव्याने जोरदार…’पर्यंत उद्गार ऐकू आले. ‘यंदा अमुक एक गोष्ट नक्की होऊदे रे परमेश्वरा’ अशी साकडी घालून झाली. ‘जिम’च्या नव्या मेंबरशिपपेक्षाही त्यावरचे विनोद जास्त विकले गेले. हे वर्ष कसं गेलं, याचे फोटो ‘इन अ नटशेल’ नाहीतर ‘फोटो डम्प’मधून दिसले. ‘सरत्या वर्षाला निरोप देताना खूप काही कमावलं आणि जवळचं काहीतरी गमावलं’. ‘या काळाच्या अखंड चक्रातले आपण निव्वळ एक आरी आहोत’ वगैरे वाक्यं लिहिली गेली. हिशेब मांडले गेले, जमाखर्च काढले गेले, उरलेली बाकी घेऊन आपण नवीन वर्षात आलो, येणारच होतो, जाणार कुठे!

तसं बाह्य तर काहीच बदललं नव्हतं. निवडणुका झाल्या, आश्वासनं दिली गेली, सोन्याने डोळे पांढरे होतात म्हणताना चांदीचा भाव वधारला, एका खेळाडूबद्दल हळहळ वाटली, तर एकानं जग जिंकलं. लोकांना ठकवणारे अजून नवनवीन स्कॅम्स आले. रस्त्यांना खड्डे पडले, अपघात झाले, अवेळी पाऊस झाला, टीव्ही मालिका बंद आणि सुरू झाल्या, त्यांनाही तेवढीच नावं ठेवली गेली, थोडक्यात, जगात फार काही फरक पडला नाही. तरीही एक वर्ष संपून दुसरं सुरू झालं, म्हणून आपण जल्लोष केला.

कोणतीही गोष्ट सुरू होताना माणूस भाबड्या उत्साहात असतो, संपताना त्यातलं तत्त्वज्ञान बाहेर यायला लागतं. नव्यात आशा असते. काम असो किंवा नातं, ‘हे चांगलं होऊ नये, भरकटावं, यातून मनस्ताप व्हावा’ या भावनेनं कुठलीच गोष्ट कुणीच सुरू करत नाही त्यामुळे सुरुवात नेहमी छानच होते. पण वाजतगाजत सुरू केलेली गोष्ट जेव्हा कायमची होते, बारमाही होते, तेव्हा तिच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. आमची पिढी फार नशीबवान आहे. आम्ही तंत्रज्ञान आणि आर्थिक विकासाचा फार मोठा आलेख पाहिला. घरात टीव्ही नाहीच, पासून फोनवरचा टीव्हीसुद्धा पाहिला. तार पाहिली, निळी इनलँड पत्रं पाहिली आणि ‘ओके’चा शॉर्टफॉर्म करून ‘के’ लिहिण्याचा काळही पाहिला. तीन अंकी नाटकही पाहिलं आणि १३ सेकंदांचे रील्सही पाहिले. घरगुती व्यवसायांपासून अवाढव्य मॉल्सही पाहिले. सहज वेगळ्या देशात सुट्टीसाठी जाणं जगलो. त्याचबरोबर ग्लोबल झालो म्हणजे सुरक्षित झालोच असं नाही हेही पाहतो आहोत. माणसाची जागा यंत्राने घेतलेली गेल्या पिढीनंही पाहिली. आम्ही तर आता ‘माणूस आहे का यंत्र’ हेही कळणार नाही, अशा टप्प्यावर आलो आहोत. छापलेला फोटो खरा का खोटा माहीत नाही, फोनवरचा आवाज खरा की खोटा सांगता येत नाही, ही भीती अनुभवतो आहोत. म्हणायला जग जवळ आलंय, पण जवळची माणसं तितकी जवळ उरलेली नाहीयेत. या सगळ्यात मानवी भावना जास्त महत्त्वाच्या झाल्या आहेत. त्यातली शाश्वती अधिक गरजेची झाली आहे. जग कितीही बदललं तरी कुणाशी तरी छान मैत्री असावी, कधी कुणा जवळच्या माणसाला घट्ट मिठी मारावी या भावना कधी बदलणार नाहीत. आयुर्मान वाढलं तरी वयस्कर माणसांचे प्रश्न तसेच राहतील. श्रद्धास्थानं बदलतील, पण थकलीहरली मनं श्रद्धेचा आधार शोधतच राहतील. श्रीमंतीच्या व्याख्या बदलतील, गुंतवणुकीचे मार्ग बदलतील, पण आपलं आयुष्य आहे त्याहून अधिक आरामदायी व्हावं यासाठीची धडपड तीच राहील. मनोरंजनाचे मार्ग बदलतील पण, मन रमावं ही ऊर्मी कायमच राहील. मुलांना मोठं होताना बघून मनात दाटून येणारं कौतुक, चिंता आणि काहीशी अलिप्ततासुद्धा तशीच राहणार आहे. आपल्या बरोबरचं कुणीतरी अचानक जग सोडून गेलं की येणारी बेचैनीही राहणार आहे आणि हळूहळू एक एक पिढी पुढे पुढे जाते आहे हे बघून होणारी अपरिहार्यतेची, अनिवार्यतेची खिन्न जाणीवसुद्धा तशीच असणार आहे. प्रेमभंगाचं दु:ख राहील, फसवणुकीची बोच राहील, अपेक्षाभंगाची चीड राहील. ऋतू, हंगाम, स्थळ, काळ यांचा यावर काहीही परिणाम होणार नाही. ‘बारमाही’ असणाऱ्या या मनुष्य स्वभावाबद्दल या सदरात लिहिणार आहे. यात कुठेही साम्य आढळल्यास तो एक सार्वत्रिक अनुभव समजावा ही विनंती.

या सगळ्यात फक्त आमच्या मराठी नाटकांना, चित्रपटांना प्रेक्षकांची गर्दी आणि वर्तमानपत्रांना वाचकांमधले दर्दी, बारमाही लाभोत हो महाराजा…

godbolemugdha2@gmail.com