एका सुंदर वेष्टनात गुंडाळलेल्या आकर्षक भेटवस्तूसारखं होतं माझं आयुष्य २००१ मध्ये. अभियांत्रिकीची पदवी आणि भारतातल्या सर्वोच्च तीन कंपन्यांपैकी दोन कंपन्यांची ‘ऑफर लेटर्स’ माझ्या हातात होती. साहजिकच भविष्याबद्दल मी प्रचंड आशावादी होतो. पण जगात मात्र त्या वेळी वेगळीच उलथापालथ घडत होती. त्या वर्षाच्या सुरुवातीलाच ‘डॉट कॉम बबल’चा स्फोट झाला होता. त्यामुळे सगळ्या जगालाच आर्थिक मंदीचा फटका बसला होता. भरीस भर म्हणजे अमेरिकेच्या ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’च्या इमारतींवर ९/११ ला झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण जागतिक बाजारपेठच कोलमडून पडली. अवघ्या काही महिन्यांमध्ये संपूर्ण अर्थव्यवस्था ढासळली आणि माझ्या हातात असलेल्या नोकरीच्या दोन्ही संधी वाळूप्रमाणे निसटून गेल्या. याऐवजी मी दुसरं काय करू शकतो, याचा साधा विचारही तोपर्यंत माझ्या मनाला शिवलेला नव्हता.
त्या वेळची परिस्थिती फारच बिकट होती, पण या सगळ्या गदारोळात एक गोष्ट मात्र मी समजून चुकलो होतो की, ही मंदी आणखी काही वर्षं तरी हटणार नाहीये. मग माझं मन केवळ एकाच गोष्टीवर केंद्रित झालं. ते म्हणजे परदेशातील एखाद्या विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळवणं. त्यापुढच्या चार महिन्यांमधला क्षणन् क्षण मी केवळ शिक्षणासाठी परदेशी जायची तयारी करण्यात घालवला. जागून काढलेल्या किती तरी रात्री तणावानं नव्हे, तर दृढनिश्चयानं भारलेल्या होत्या. त्या वेळी खरं तर मला तणावाची तितकीशी जाणीवच झाली नाही. तणाव नव्हताच म्हणून झाली नाही असं नसून माझं लक्ष फक्त आणि फक्त माझ्या ध्येयावरच केंद्रित असल्यानं इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष जायची शक्यताच नव्हती. आज मागे वळून बघताना लक्षात येतं, त्या काळाने मला एक फार अमूल्य गोष्ट शिकवली. ती म्हणजे, जे महत्त्वाचं आहे त्याकडेच फक्त तुमचं लक्ष एकवटलेलं असलं की मग ते विचलित करणाऱ्या गोष्टी आपोआपच धूसर होतात. माझी सगळी ऊर्जा माझ्या भविष्याकडे केंद्रित झाली होती, त्यामुळे तणाव आणि काळजी वगैरेंना थाराच नव्हता.
हेही वाचा…आजच्या पुरुषाचे ‘कर्तेपण’
या काळात घडलेल्या अशा अनेक गोष्टींमुळे जगाला मात्र तणावाने व्यापून टाकलेलं आहे. त्या काळात तो अस्तित्वातच नव्हता असं मुळीच नाहीये. ताणतणावाच्या बाबतीत संशोधन करणाऱ्या जुन्या संशोधकांपैकी हान्स सेली याने या तणावाच्या संकल्पनेची खरं तर खूप पूर्वी म्हणजे १९२०च्या सुमारास जगाला ओळख करून दिली. पण जशी ‘नावीन्य’ ही संकल्पना गेल्या काही वर्षांमध्येच जगाला माहीत झालीय, तशीच साधारण गेल्या दहा-एक वर्षांमध्येच तणावासंबंधी अधिक चर्चा होऊ लागलीय. तणाव जुनाच आहे, फक्त त्या बाबतीत बोलण्याच्या पद्धतीत कालानुरूप बदल झालाय. जीवनात तणाव असणं हे आपण व्यग्र असल्याचं किंवा ‘महत्त्वाचे’ असल्याचं निदर्शक मानलं जातंय… किंबहुना तणावग्रस्त असणं ही आधुनिक जीवनशैलीची ओळख मानली जाऊ लागलीय. पण असं असलं तरी तणावाचं आपल्या आयुष्यातलं अस्तित्व मात्र मी मुळीच नाकारत नाहीये. तणाव खरंच असतो आणि काही वेळा तर आपल्यावर अशी परिस्थिती येते की तिला बाजूला सारून पुढे जाणं अशक्य होऊन बसतं. स्वत:च्या मानसिक आरोग्याकडे लक्ष पुरवण्यासाठी २०२०च्या टोकियो ऑलिम्पिक्समधून माघार घेणारी सिमोन बाईल्स, तसंच आपल्या स्वास्थ्याकडे उत्तम लक्ष देता यावं यासाठी क्रिकेटमधून काही काळ सुट्टी घेणारा बेन स्टोक्स ही याचीच काही उदाहरणं. त्यांनी घेतलेले हे धाडसी निर्णय आपल्याला जाणीव करून देतात की जेव्हा तणाव अतिशय तीव्र स्वरूपाचा असतो, तेव्हा आपल्याला त्याला बाजूला सारून पुढे जाता येत नाही, तर त्या वेळी केवळ आपल्या हिताचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागतो.
रोजच्या धकाधकीत मात्र या तणावाचं बदललेलं रूप आपल्यापुढे येतं. आपण कसल्या ना कसल्या तणावात असणं हेच जणू समाजाला अभिप्रेत असतं. जर तुम्ही कोणत्याही तणावात नसाल तर ध्येय साध्य करण्यासाठीच्या तुमच्या प्रयत्नांबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं. तुम्ही पुरेसे प्रयत्न तरी करताय की नाही? अशीच शंका घेतली जाते. तणावग्रस्त असण्याला दिल्या गेलेल्या अनाठायी महत्त्वामुळे एक अशी संस्कृती निर्माण झालीय, ज्यात तणावग्रस्त असणं ही केवळ सक्ती नाही तर जाणीवपूर्वक तणावग्रस्त असण्याकडेच लोकांचा कलही आहे. २०२० मध्ये ‘द सेंटर ऑफ हीलिंग’ने केलेल्या अभ्यासातून असा निष्कर्ष समोर आला आहे की, करोनाची साथ सुरू झाल्यापासून ८८ टक्के भारतीय लोक तणावाचा सामना करत आहेत. करोनामुळे अनिश्चितता प्रचंड वाढली आणि लोकांच्या आयुष्याची अक्षरश: वाताहत झाली. ऑनलाइन वर्ग घेण्याची पद्धत रूढ झाली, तशा प्रत्येक सत्रात ‘विद्यार्थ्यांना ताण न देण्याच्या’ विनंतीवजा सूचना शिकवणाऱ्यांना दिल्या जाऊ लागल्या. खासगी विद्यापीठात शिकवणाऱ्या माझ्या पत्नीला याचा तत्काळ अनुभव आला.
हेही वाचा…सांधा बदलताना : जग हे आनंदशाळा
हे केवळ विद्यार्थ्यांच्याच बाबतीत घडत नाही. कोणत्याही वृत्तवाहिनीवर, समाजमाध्यमावर फेरफटका मारला तर नकारात्मकतेचा ओघ तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल. निरर्थक चिंता, उगाचच चाललेली धुसफुस, पूर्वग्रहदूषित विषारी दृष्टिकोन… जणू काही सगळं जग आपल्याला कायमचं अस्वस्थतेच्या खाईत लोटण्याच्याच मागे लागलंय. नकळतपणे आपलं आयुष्य व्यापून टाकणाऱ्या या गोंगाटामुळे आजूबाजूला काय चाललंय, ते नेमकं समजायला, त्यावर विचार करायला आणि कधी कधी तर श्वास घ्यायलासुद्धा जागा राहात नाही. सजगतेनं जगण्याचं सार हे सावधपणे आणि विचारपूर्वक निवड करण्यात सामावलं आहे. विशेषत: आपण आपलं लक्ष कोणत्या दिशेला वळवतो या बाबतीतली निवड करण्यातही ते सामावलं आहे. तणावाची आणि आपली सोबत तर जन्मभराची आहे, पण आपण त्याला कसा प्रतिसाद देतो, यावर सर्व काही अवलंबून आहे. तणाव, चिंता, काळजी या आपल्याला नको असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा शांती, प्रगती आणि समाधान या आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींवर आपण लक्ष केंद्रित करायला हवं. सजगतेनं जगताना गोंधळ आणि त्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रिया यापेक्षा स्पष्टतेनं आणि हेतूवर लक्ष केंद्रित करून जगण्याच्या मानसिकतेला प्राधान्य देणं गरजेचं आहे.
वैयक्तिक आयुष्यात जेव्हा एखादं वादळ उठलं, तेव्हा एका अत्यंत साध्या गोष्टीत मला मन:शांती गवसली. ती गोष्ट म्हणजे माझा श्वास. जोवर आपल्याला सक्तीने थांबण्याची वेळ येत नाही तोवर श्वासासारख्या मूलभूत गोष्टीकडे आपलं कसं दुर्लक्ष होत राहतं हे लक्षात घेण्यासारखं आहे. कठीण परिस्थितीला तोंड देताना मी ‘बॉक्स ब्रीदिंग’ या श्वासाच्या तंत्राचा सराव केला. यामध्ये आपण श्वास घेतो, रोखून ठेवतो, सोडतो आणि त्याच अवस्थेत तेवढाच काळ राहतो, पुन्हा श्वास घेतो. ही सर्व प्रक्रिया सम प्रमाणात करायची. श्वासाचा ताल आपल्या मनाला शांत करतो आणि त्याला इकडे तिकडे भरकटू न देता वर्तमानात जगायला शिकवतो. यामुळे समस्या थेट सुटत नाही परंतु तुमचं लक्ष गोंधळाकडून शांतीकडे वेधलं जातं. श्वासाच्या आणखी एका तंत्राचा मी सराव करतो, ते म्हणजे माझ्या श्वासापेक्षा उच्छ्वास मोठा असतो. उदाहरणार्थ, मी चार आकडे मोजत श्वास घेतो, पण सोडताना मात्र सहा आकडे मोजतो. हे अगदी ‘रिसेट’चं बटण दाबल्यासारखंच आहे. माझ्या शरीर आणि मनाच्या यंत्रणेला हे सांगण्याची ही एक पद्धत की बाहेरच्या जगात गोंधळ माजलेला असला, तरी तो सोडून देऊन आपण शांत, निवांत राहणं हे छान आहे. आपल्या शरीरात तणावाला तोंड देण्याची यंत्रणा नैसर्गिकरीत्याच विकसित झालेली असते, हे मी श्वसनाच्या व्यायामामुळे शिकलो. फक्त या यंत्रणेचा योग्य वापर करण्याची आठवण मात्र ठेवायला हवी.
साधारण याच काळात मनातला कचरा साफ करण्याचा एक नवीन दृष्टिकोन मला गवसला, तो म्हणजे आपल्या विचारांकडे केवळ माहिती म्हणून बघणं…! तुम्ही एका कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी मीटिंगमध्ये आहात अशी कल्पना करा. टेबलवर मोठ्या प्रमाणात माहितीपत्रकं ठेवलेली आहेत. त्यातली काही उपयुक्त तर काही कालबाह्य आहेत आणि काही माहिती तर चुकीची आहे. मग अशा वेळी आपण काय करतो? आपण त्यांची वर्गवारी करतो, प्राधान्यक्रम ठरवतो आणि ठरलेल्या योजनेवर पुढे काम करता येईल एवढ्याच माहितीवर लक्ष केंद्रित करतो. मग आपल्या विचारांच्या बाबतीतही हाच दृष्टिकोन राबवायला काय हरकत आहे?
हेही वाचा…स्वभाव-विभाव :परिपूर्णतेचा अट्टाहास
प्रत्येक विचाराकडे लक्ष द्यायची आवश्यकता नसते. काही विचार नुसताच गोंगाट करत असतात, तर काही विचार हे ‘अर्जंट’ या सदरात मोडणाऱ्या पण प्रत्यक्षात बिनमहत्त्वाच्या असलेल्या ई-मेल्सप्रमाणे असतात. जर याच पद्धतीनं आपल्या विचारांचं निरीक्षण केलं तर ज्याचा आपल्याला काहीही उपयोग नाही असं बरंच काही बाहेर काढायला आपण स्वत:ला सहज परवानगी देऊ. फ्रेडरिक नित्शेने हेच सूत्र फार छान शब्दात सांगितलंय, एका विचारात आणि अगदी एका शक्यतेतसुद्धा आपल्याला नेस्तनाबूत करण्याचं किंवा आपला कायापालट घडवून आणण्याचं सामर्थ्य असतं. मात्र खरा प्रश्न हा आहे की, आपला कायापालट घडवून आणण्यासाठी आपण कोणत्या विचारांचा अवलंब करतो?
तणाव हा एखाद्या आगंतुक पाहुण्यासारखा असतो, तो येतो आणि दीर्घकाळ मुक्काम ठोकून बसतो. सततच्या गोंगाटाने आणि लक्ष विचलित करणाऱ्या असंख्य गोष्टींनी भरलेल्या जगात वावरताना थांबणं आणि विचार करणं अवघड झालंय. साहजिकच यामुळे तणावात भरच पडतेय. पण सजगतेनं जीवन जगण्याच्या दृष्टिकोनामुळे स्वत:च्या मनावर ताबा कसा ठेवायचा, हा एक पर्याय आपल्यासमोर येतो.
२००१मधल्या त्या चार महिन्यांचा विचार करताना आता माझ्या लक्षात येतं की, तेव्हा मी फक्त तग धरण्यासाठी धडपडत नव्हतो, तर नकळतपणे सजगतेनं जगण्याचाच प्रयत्न करत होतो. कारण माझी प्रत्येक निवड, प्रत्येक कृती ही विशिष्ट ध्येयाने प्रेरित होती. लक्ष विचलित होण्याची शक्यताच नव्हती कारण जे सर्वात महत्त्वाचं आहे, त्यावरच माझं लक्ष केंद्रित होत होतं. ‘सजगतेनं जगणं’ हा तणावावरचा उपाय नाही, पण यामुळे दृष्टिकोनात बदल नक्कीच होतो. आपल्याला बाह्य परिस्थितीवर नेहमीच नियंत्रण ठेवता येत नाही, पण तिला आपण कसा प्रतिसाद देतोय यावर, मात्र नियंत्रण ठेवता येतं हे दृष्टिकोनात केलेल्या बदलामुळे आपल्याला उमगतं.
आता जेव्हा तुम्हाला ताणाचा दबाव वाढतोय, असं वाटेल, तेव्हा थांबा, श्वास घ्या, आणि स्वत:ला विचारा, ‘मला नक्की कोणत्या गोष्टीकडे लक्ष देण्याची आता गरज आहे?’ त्याकडे स्वत:चं लक्ष वेधा, मग त्या गोष्टीव्यतिरिक्त सर्व काही आपोआप धूसर होईल. इतक्या वर्षांत मीसुद्धा हेच शिकलो, जिकडे आपलं लक्ष जातं, तिकडेच आपली ऊर्जा प्रवाहित होते, आणि त्या प्रवाहातच आपल्या तणावावरचा उपाय दडलेला असतो.
sanket@sanketpai.com