शनिवार, १९ एप्रिलच्या अंकातील मंगेश वाघ यांचा ‘एआय: भावनिक साथीदार’ हा अभ्यासपूर्ण लेख वाचला. यावरून एक गोष्ट ध्यानात आली की, मन मोकळं करण्यासाठी पूर्वी घरात आजी-आजोबा, आई-वडील, याशिवाय घरातील इतर ज्येष्ठ सदस्य होते. पण गेल्या तीन-चार दशकांत कुटुंबे विभक्त झाली. आणि ती विविध ठिकाणी विखुरली. परस्परातील संवाद कमी झाला, काही ठिकाणी तो पूर्णत: संपुष्टात आला. परिणामी दबलेलं, भरलेलं मन मोकळं करण्याच्या हक्काच्या जागा खूपच कमी झाल्या. अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीत ‘एआय’ची गरज निर्माण झाली असावी. पण बहुतांश लोक ‘आत्ममग्नता’ या मानसिक व्याधीच्या विळख्यातही सापडले आहेत. तेव्हा पालकांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. आणि याचा काटेकोर वापर केला पाहिजे.- अशोक आफळे, कोल्हापूर.
मुद्दे मनापासून पटले
१२ एप्रिलच्या अंकातील डॉ. राधिका टिपरे यांचा ‘परदेशायन…वाट अवघड वळणांची’ हा लेख वाचला. सगळे मुद्दे अगदी पटले. परदेशात लेकाकडे किंवा लेकीकडे वरचेवर दरवर्षी जाणे हा जणू एक रूटीनचाच भाग होऊन जातो. पण तिकडे गेल्यावर सुरुवातीचे ८-१० दिवस मस्त मजेत जातात. नंतर त्यांचे त्यांचे रूटीन सुरू झाले की, आपल्याला काय करावे, वेळ कसा घालवावा हा प्रश्नच पडतो. अमेरिकेत व्यवहाराची भाषा इंग्रजी असल्याने बाहेर गेल्यावर, इतरांशी थोडा तरी संवाद साधू शकतो पण युरोपीय देशांमध्ये ‘भाषा’ हा मोठा अडसर ठरतो. हाय-हॅलोच्या पुढे, संभाषणाची गाडी सरकतच नाही. इथे पावलोपावली भेटणारी, चार शब्द बोलणारी माणसे, दुतर्फा असलेली भरगच्च दुकाने, नको वाटणारा ट्रॅफिक तरी या सगळ्यातही असणारा जिवंतपणा, आणि तिकडे लांबच लांब मोकळे, एकाकी रस्ते, दुतर्फा फक्त झाडे, कडेला दुकाने नाहीतच, (विंडो शॉपिंगची मजा नाही.) बोलायला कोणी नाही, अशा त्या सुनसान निर्जीव रस्त्यावरून फिरणे नंतर कंटाळवाणे होऊ शकते. मुलांवरच अवलंबून राहावे लागते. तेथील घरांमध्ये दर वेळेला गेल्यावर इंडक्शन, बाथ टबमधील शॉवरचे नवे नवे प्रकार, नळाला लावलेले सेन्सर, फायर अलार्म, काही अत्याधुनिक सुविधा बघायला मिळतात. या सगळ्यांशी जुळवून घेणे सोपे नसतेच. शेवटी तात्पर्य काय, तर जोपर्यंत आपल्याला (शारीरिक आणि आर्थिक) शक्य होतंय, तोपर्यंत वर्षा-दोन वर्षांतून एकदा तिथे जाणे, तिथल्या सुविधा, नातवंडांचे सुख अनुभवणे आणि इथे परतल्यावर चवीचवीने त्या आठवणी चघळत राहणे हेच खरे!- स्मिता पोंक्षे, ठाणे</p>
चपखल शब्दात मांडलेली व्यथा
१२ एप्रिलच्या अंकातील ‘परदेशायन: वाट अवघड वळणांची’ हा लेख वाचला. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने तसेच स्वत:च्या प्रगतीसाठी परदेशात स्थायिक झालेल्या मुला, मुलींच्या पालकांची व्यथा तसेच त्यांच्या समस्या चपखल शब्दात या लेखात मांडण्यात आल्या आहेत. परदेशात कायमस्वरूपी स्थायिक झालेल्या मुला, मुलींना आपल्या आई, वडिलांबद्दल आत्मियता, काळजी नक्कीच वाटत असते. किंबहुना परदेशात स्थायिक झाल्यामुळे नाइलाजाने आपोआपच निर्माण झालेला दुरावा आत्मियता जास्त वाढवतो. मुलगी आमची युरोपमध्ये असते आणि मुलगा अमेरिकेत असतो. मुंबईत मात्र आम्ही दोघेच असतो. नव्या नवलाईने जाऊनही आलो. स्वच्छ, सुंदर सगळं पाहूनही आलो, पण ते सगळं तेवढंच, कारण काही म्हणा तिकडं जीव गुदमरतो.- अॅड. सुरेश पटवर्धन, कल्याण</p>
तंत्रज्ञानाने मुलींना दिली आयुष्याची दिशा
‘लग्न करायचं आहे, पण…’ हा १२ एप्रिलच्या अंकातील लेख वाचला. अगदी खरं आहे, लग्न करायचं की नाही हे ठरविण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आजकाल मुली आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या आहेत. त्या अजूनपर्यंत आई, आजी या सर्वांना रांधा-वाढा-उष्टी काढा या चक्रातून बाहेर पडणे किती कठीण झाले आहे हे पाहात आहेत.
त्यांना परदेशी जाऊन उच्चविद्याविभूषित होऊन लेखात म्हटल्याप्रमाणे समाजकेंद्री होण्यापेक्षा व्यक्तिकेंद्री जीवन आवडू लागले आहे. गाव, तालुका, जिल्हा, शहर सर्वत्र तंत्रज्ञानामुळे मुली आयुष्याची दिशा ठरविण्यासाठी आपले स्थान निर्माण करू लागल्या आहेत. त्यांचे विश्व खूप विस्तारले आहे. स्वत:चे मन मारून इतरांची मने राखीत त्यांना आता जगणे शक्य नाही.- नीता शेरे, दहिसर (पूर्व)