‘ध्वनिसौंदर्य’ या सदरातील ८ फेब्रुवारीच्या अंकातील ‘नादयोग’ हा लेख आवडला. तसेच मागील दोन्ही लेख आवडले. ध्वनी हा तसा दुर्लक्षित, संवेदनशील, अन्न, जल, वायू आदी प्रदूषणांच्या तुलनेत अगदीच मागच्या रांगेतील. या विषयास लेखमालेत ‘मानाने’ स्थान दिल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे खरंच आभार!सर्वत्र बोकाळलेले बेशिस्त वातावरण, मोबाइलमुळे सामंजस्य भूमिकेच्या झालेल्या चिंध्या, यश-आनंद साजरा करण्याचा एकमेव मार्ग वाजवण्या -बडवण्यातून जातो, हा भाबडा (?)आशावाद, शहाण्या समजल्या जाणाऱ्या लोकांमधूनही वाढू लागलाय. इमारतीमधील मित्रांस बोलावण्यास हॉर्नने दिलेली हाकाटी असो वा बेगडी राजकारण्यांचे त्यांची प्रार्थना उघड्यावर तर आमचीही श्रद्धा रस्त्यावर, असे अनैतिक आवाहन, शांततेची फरपट चालूच आहे. लेखांत सहजसाध्य ते कष्टदायी अशा विविध प्रयत्नांचे अनेक पदर लेखिका तृप्ती चावरेंनी वाचकांसाठी लिहिले आहेत. तेव्हा, ‘काय व कसं ऐकू या’ या नादमय आवाहनास कानांत साठवूया!- विजय भोसले, घणसोली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदर दुणावला

८ फेब्रुवारीच्या अंकातील ‘पालकत्वाचा संस्कार रुजवण्याची गोष्ट… ’ हा लेख खूप छान आहे. सुप्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांच्याबद्दल असलेला आदर आणखी दुणावला. मुले आपल्या कृतीतून शिकत असतातच पण आपणही त्यांच्याकडून कळत-नकळत शिकत असतो हे खरे आहे. खूप खूप धन्यवाद.- डॉ. प्रीती शिंदे

ताराबाईंच्या विचारांची सुयोग्य दखल

‘स्त्री चळवळीतील स्त्री’ (८ फेब्रुवारी) या सदरात वंदना बोकील कुलकर्णी यांचा ‘स्त्री चळवळीसाठी पोषक अवकाश!’ हा लेख ताराबाईंच्या ‘स्त्री-पुरुष तुलना’ निबंधाचा नव्याने अर्थनिर्णय करणारा वाटला. ताराबाईंच्या मताचे आजच्या स्त्रीवादी विचार चळवळीशी असलेले नाते सांगणारा तरीही ताराबाईंचे विचार व त्याची कालापलीकडे झेप घेण्याची ताकद अगदी वस्तुनिष्ठ पद्धतीने लेखातून मांडली असल्यामुळे एकाच वेळी ताराबाईंचे महत्त्व सांगून त्यांच्या विचाराची सुयोग्य दखल घेतल्याचे समाधान लेख वाचून प्राप्त झाले. ‘१८८२मधलं हे पुस्तक स.ग. मालशे यांनी १९७५ मध्ये संपादित करून प्रकाशित करेपर्यंत कोणालाच याविषयी माहिती नव्हती…’ हे वाचून भारतीय पितृसत्ताक क्रोनोलॉजी कशी कार्य करते याचेही वैषम्य वाटले. महात्मा फुलेंनी ताराबाईंच्या या विचाराचा ‘सत्सार’मधून केलेला गौरव त्यांचे कालातीत असणे सुचवणारा ठरला व उत्तरोत्तर ठरत राहील याविषयी तिळमात्र शंका नाही.- प्रा. डॉ. सखाराम कदम, परभणी</p>

आईवडिलांची माया देण्याचं महान काम

२९ जानेवारीच्या अंकातील तुषार कुलकर्णी यांचा ‘उंच तिचं अस्तित्व…’ हा लेख वाचला. मी आणि आमचं कुटुंब प्राण्यांवर प्रेम करणारे आहोत. त्यामुळे तुषार कुलकर्णी यांनी जिराफ ‘पारिजात’ हिच्या संगोपनासाठी जी मेहनत घेतली आहे. त्याबद्दल बोलायला शब्द अपुरे वाटत आहेत. केवढे साम्य आहे माणूस आणि प्राण्यांच्या जीवनात!. जेव्हा एखादे बाळ जन्मत: आईशिवाय जगायला लागते तेव्हा केवढे कठीण असते, पण पारिजातला आई-वडिलांची माया देण्याचं महान काम तुषार कुलकर्णी करीत आहेत, याचा अभिमान वाटला. तिच्या आहाराची खूपच शास्त्रशुद्ध काळजी घेतली जात आहे. कधी कधी आपल्याकडूनही आपल्या मुलांची एवढी काळजी घेतली जात नसावी. तुषार कुलकर्णी आणि त्यांच्या टीमने जे पारिजातसाठी केले आहे ते नक्कीच त्यांच्यासाठी अविस्मरणीय असेल.

८ फेब्रुवारीच्या अंकातील ‘पालकत्वाचा संस्कार रुजवण्याची गोष्ट… ’ या लेखात सुधा मूर्ती यांनी त्यांच्या लेकीला जे दिले आहे आणि ते ती तिच्या मुलींना देऊ इच्छिते याला पालकत्वाचे संस्कार म्हणायला हरकत नाही. पुस्तकांच्या विश्वात रमायला शिकल्याने आणि त्यावर त्या मायलेकींनी चर्चा करून जे विश्व समृद्ध केले आहे, त्याला तोड नाही. त्यांची लेक इतक्या प्रगत संपन्न देशात रहात आहे. सुधा मूर्ती या खूप साऱ्या क्षेत्रात यशस्वी आणि नामवंत व्यक्ती आहेत, पण त्यांच्या लेकीचे म्हणणे की ‘जेव्हा जेव्हा तू मला हवी होतीस तेव्हा तेव्हा तू होतीस, हा आयुष्याचा समतोल ज्या पालकांना जमला त्यांना पालकत्व समजले’ असे म्हणायला हरकत नाही. गोष्टीरूपाने केलेले संस्कार हात धरून शिकवण्यापेक्षा जास्त मोलाचे असतात. आयुष्याकडून सतत शिकणे खरंच गरजेचे आहे आणि ते जेव्हा थांबते तेव्हा आयुष्य थांबते हे आपण आपल्या मुलांना जाणवून दिले की त्यांनाही ते कळू लागते. सुधा मूर्तींच्या घरातील मिळालेले संस्कार त्यांनी त्यांच्या मुलीमध्ये रुजविले आहेत. त्या सर्वांची स्वत:च्या आवडीच्या विषयाची स्वतंत्र ग्रंथालये आहेत मग त्या सर्वांचे आयुष्य संस्कारक्षम असणारच आहे. आजचे किती पालक मुलांना पुस्तके भेट देतात, ऑफिसमधून आल्यानंतर किती पालक मुलांच्या दिनक्रमाचा आढावा घेण्यासाठी वेळ काढू शकतात, किती कुटुंबे लहानपणापासून मुलांना टीव्ही किंवा मोबाइलची कार्टून न दाखविता गोष्ट सांगून जेवू घालू शकतात, पालकच इतके मोबाइलमध्ये, टीव्हीमध्ये व्यग्र असतात, तर मुलांवर काय वेगळे संस्कार करू शकतात. दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याची कणव ही आपल्या कृतीतून मुलांमध्ये उतरते. आपण आजकाल मुलांवर आपल्या इच्छा लादतो. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे मुले त्यांच्या आजी-आजोबांकडून मिळणाऱ्या संस्कारांना पारखी झाली आहेत.- नीता शेरे, दहिसर