‘एक होतं गृहिणी विधेयक!’ (१४ डिसेंबर) लेख वाचला. या संकल्पनेचा मी हार्दिक पुरस्कर्ता आहे. मात्र या विधेयकाला ‘गृहिणीच्या कामाचं मोल’ किंवा ‘नवऱ्याकडून घरकामाचा पगार’ अशी रूक्ष नावे देण्याऐवजी ‘गृहिणी सन्मान धन’ असं एखादं छानसं समर्पक नाव द्यावं. लग्न ठरवतानाच या रकमेची बोली करून तिची नोंदही व्हावी. पतीच्या पगाराची किमान १० टक्के रक्कम, वार्षिक २ टक्के वृद्धीने तिच्या मृत्यूपर्यंत तिला मिळावी, असे त्याचे स्वरूप असावे. मुलगा किंवा मुलगी कमावते झाले तर त्यांचे लग्न होईपर्यंत आईचा व नंतर त्यावर त्यांच्या वैवाहिक जोडीदाराला हा हक्क मिळावा. इतकंच नव्हे तर काडीमोड घेण्यासाठी ‘नियमितपणे हे न दिले जाणे’ ही क्रूरता म्हणून एक कारण धरले जावे. ‘हाऊसवाइफ किंवा गृहिणी’ हा शब्द अलीकडे सहसा उपेक्षेनेच वापरला जातो. पण गृहिणीकडे स्वमर्जीने खर्च करण्यासाठी तिचा स्वत:चा असा निधी असलाच पाहिजे.- अॅड. एम आर सबनीस, अंधेरी (पूर्व)
पुुरुषांनी घरकाम करणे गैर नाही
‘आजच्या पुरुषाचे कर्तेपण’ आणि ‘एक होतं गृहिणी विधेयक’ हे दोन्ही ७ आणि १४ डिसेंबरच्या पुरवणीतील लेख वाचले. मध्यंतरी प्रसिद्ध मॉडेल, सिनेकलाकार आणि आपल्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी प्रकाशझोतात आलेल्या मिलिंद सोमण यांच्या एका भांडी घासण्याच्या जाहिरातीमुळे समाजमाध्यमांत संमिश्र प्रतिक्रियांचा पाऊस पडला. यासंदर्भात मुलींनी ‘मुलांनी भांडी घासणे, घरगुती कामे करणे गरजेचे आहे’,असे मत मांडले. मुलांनी अपवादात्मक परिस्थितीत भांडी घासण्यात घरकामे करण्यात काहीच गैर नसल्याचे मत मांडले. तर बहुतेक मुलांनी ‘ही कामे मुलींची आहेत’ असे मत नोंदवले. आजही घरकामे करणे हे स्त्रियांचे आणि बाहेर जाऊन पैसे कमावणे हे पुरुषांचे काम आहे, असे आपल्याकडे रूढार्थाने मानले जाते. पुरुषांना घरची कामे करण्यास सांगितले की, त्यांचा अहंम दुखावला जातो. त्यातून कौटुंबिक वाद – कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडतात. आपल्या समाजाला स्त्रीचे ‘हाऊस वाईफ’ असणे गैर वाटत नाही पण पुरुषाने ‘हाऊस हजबण्ड’ असणे कमीपणाचे वाटते. जिच्या श्रमाला आणि जिला सतत गृहीत धरले जाते ती ‘गृहिणी’ अशी संकल्पना रूढ झाली असावी.- बाळकृष्ण शिंदे, पुणे</p>
…तर माणूस दिशाहीन होऊ शकतो
‘जगण्याचं तत्त्वज्ञान’ (२३ नोव्हेंबर) हा डॉ. नंदू मुलमुले यांनी लिहिलेला सुंदर लेख वाचला. त्यांनी लिहिल्याप्रमाणे, आयुष्य उद्दिष्टविरहित असेल, तर माणूस दिशाहीन होऊ शकतो. ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ व्हिक्टर फ्रँकलने म्हटल्याप्रमाणे, ‘ Those who have a ‘why’ to live, can bear with almost any ‘how’. तो ‘ why’ कोणत्याही स्वरूपात असू शकतो. उदा. रोजचा व्यायाम, आपल्याला चांगले पदार्थ खायला आवडतात. पण ते पचवायला तरी थोडे चालायला हवे. एखादा नवीन पदार्थ करायला शिकता आला (पुरुषांनाही) तर फारच छान. आवडत असलेल्या कलेसाठी वेळ देणे, वाचन, नवीन कला किंवा भाषा शिकणे, घरी एकमेकांना पूरक अशी मदत करणे, बागकाम इ… थोडक्यात, मेंदूच्या दोन्ही बाजू (बुद्धी आणि कला) क्रियाशील ठेवणे. मित्रमंडळी, नातेवाईक, शेजाऱ्यांच्या संपर्कात राहाणे. यामुळे बऱ्याच गोष्टी सुखकर होतात.- राजश्री कुलकर्णी
समाधानाकडे लक्ष देणे गरजेचे
‘तणावावरचा उपाय’ हा १४ डिसेंबरच्या अंकातील संकेत पै यांचा लेख मार्गदर्शक वाटला. सध्याच्या युगात तरुण पिढीला प्रचंड ताणतणावाच्या वातावरणाचा सामना करावा लागत आहे. शिक्षण प्रवेश, नोकरी, ध्येय साध्य करणे, वरिष्ठांचे विक्षिप्त वागणे, पत्नी अथवा पतीचा अनपेक्षित त्रागा, निरर्थक चिंता या सर्वांचा एकत्रित परिणाम व्यक्तिमत्त्व विकासावर नकळत होत असतो. तेव्हा तणाव, चिंता यावर लक्ष देण्यापेक्षा समाधानाकडे लक्ष देणे गरजेचे असते. ताणतणावाकडे दुर्लक्ष करून, आजचा दिवस मी आनंदात घालवीन अशी प्रार्थना रोज सकाळी करणे, सकारात्मक विचारांची योग्य सुरुवात ठरणार आहे.- प्रदीप करमरकर, ठाणे</p>