२०२५ या नवीन वर्षांतील पहिल्या दोन्ही पुरवण्यांनी आमच्यासारख्यांच्या अपेक्षा खूप वाढवल्या आहेत. सर्वच सदरं छान आणि मेंदूला खुराक देणारी आहेत. ४ जानेवारीचा मुख्य लेख ‘रिकामटेकडी’ने तर मेंदू शांत झाला. झोपाळय़ावर एकटं बसलं तरी झाडं, आकाश, पक्षी बघताना भान हरपतं. मला हे सारं झोपाळय़ावर बसून दिसतं. कारण मी खेडेवजा शहरात राहाते. एकीकडे गाव गावासारखं आहे. तर दुसरीकडे मोठय़ा प्रमाणात वाढलेल्या पर्यटनामुळे शहरी वातावरण असतं. शारीरिक रिकामटेकडी असते. तशी मनानेही शांत असते. मेडिटेशन म्हणतात ते हेच का?
डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याकडून खूप अनुभव ऐकायचे आहेत. ‘ऋतुप्राप्ती आणि ऋतुसमाप्ती’ या दोन्ही काळांत घरातील पुरुषाने तिला समजून घेतलं, तर ती स्त्री आनंदी आणि समंजस राहील, असं वाटतं. याचा फायदा कुटुंबालाच होईल. एकंदरीत स्त्री, तिचे प्रश्न, तिच्या व्यथा आणि तिचं कर्तृत्व याचीही माहिती या पुरवण्यांमधून समजणार आहे. ‘चतुरंग’ला मन:पूर्वक शुभेच्छा! अंजली अरविंद भातखंडे स्फूर्ती, आत्मविश्वास देणारा लेख डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या (४ जानेवारी) ‘ऊब आणि उमेद’ या सदरातील ‘ऊर्जायात्रा’ हा लेख वाचला. वाचून क्षणभर खूप वाईट वाटलं, पण दुसऱ्याच क्षणी मनात उमेद निर्माण झाली. ‘पार्ले टिळक’मधील त्यांच्या मित्रांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. त्यांनी दिलेली मैत्रीची साथ खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. त्या सगळय़ांना धन्यवाद. डॉ. नाडकर्णी यांचं हे सदर स्फूर्ती आणि आत्मविश्वास देणारं असेल याची खात्री आहे.
हेही वाचा…बारमाही : असले जरी तेच ते…
सुधा थोरात
समृद्ध आयुष्य जगण्याची ग्वाही डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या ‘ऊब आणि उमेद’ या सदरातला ‘ऊर्जायात्रा’ हा लेख वाचून डोळय़ात पाणी आलं. सगळय़ांच्या सहकार्याचं मोल जसं लेखातून व्यक्त केलं तसं १९६८-६९ आठवीची मुलं सडेतोड भूमिका घेऊन त्यांच्या पाठीशी उभी राहतात याचं अपार कौतुक वाटलं. विनाअट विश्वास आणि प्रेम दाखवणारे वडील त्यांना मिळाले हे त्यांचं परम भाग्य. आज कमी पडणाऱ्या प्रत्येक मार्कासाठी मुलांना दोष देणारे पालक पाहिले की, या देवासमान माणसाचं मोल कळतं. अभय बंग आणि राणी बंग अशी माणसं आयुष्यात यावी अन् नातेवाईकांपेक्षा जास्त लळा लावावा अन् ती आपली होऊन जावी याच्यासारखं भाग्य नाही. आज सख्खे म्हणवणारे किरकोळ स्वार्थासाठी दुसऱ्यांना खोटं, वाईट ठरवतात तेव्हा अशा माणसांचं मोठेपण निश्चितच उठून दिसतं. वेळोवेळी आयुष्यात अनेक संकटं येतात आणि जातात तरीही नीरक्षीरविवेक जागृत ठेवून चांगले क्षण, चांगल्या व्यक्ती, चांगल्या घटना वाचकांसमोर ठेवून डॉक्टर आम्हाला ऊर्जा देत एक चांगला आदर्श निर्माण करत आहेत याचं मला अपार कौतुक आहेच, पण तेही आपलं आयुष्य अपार ऊर्जेसहित सजग व समृद्ध जगत असल्याची ती ग्वाही आहे.
अशाच लेखांच्या अपेक्षेत! उमा मोकाशी, पुणे ऊब मिळाली की उमेद येतेच डॉ. आनंद कुलकर्णी यांचा ‘ऊब आणि उमेद’ हा लेख वाचताना नक्की पटले की, आपल्या माणसाची, त्याच्या जवळकीची ऊब मिळाली की उमेद येतेच. आयुष्यातील चढउतार झेलायला त्यांना अशी माणसे सोबतीला मिळाली हे त्यांचं नशीब म्हणावे लागेल. अशा अनुभवानंतरच एखाद्याच्या जाणिवा, गरजूंबद्दलची कणव खरी उतरते.
हेही वाचा…पडसाद : स्वार्थ आणि परमार्थ साधायचा असेल तर…
नीता शेरे
..अन्यथा आपणच प्रदूषण ठरू! आजच्या पर्यावरणीय ध्वनी प्रदूषणातून बाहेर पडण्यासाठी ‘ध्वनिसौंदर्य’ ही तृप्ती चावरे – तिजारे यांची लेखमाला काळाची गरज आहे. जेव्हा टीव्ही, मोबाइल तर नाहीच साधे रेडिओदेखील नव्हते तेव्हा न शिकलेल्या आईच्या मांडीवर झोपून ‘बाळा जो जो रे’, ‘पापणीच्या पंखात झोपू दे डोळय़ांची पाखरे’ही अंगाई गीतं ऐकताना डोळे केव्हा बंद व्हायचे हे आमच्या पिढीला कळलंच नाही. त्या सुस्वरात आईच्या वात्सल्ययुक्त माधुर्याचा सागर, फुलांची कोमलता, गंगेची निर्मलता, चंद्राची रमणीयता आणि पृथ्वीची क्षमता होती.
आज जेवणाचा डबा घेऊन कुटुंब पोषणासाठी धावत घराबाहेर पडणारी आई हे ध्वनिसौंदर्य मुलांना देऊ शकत नाही. मग मुलांच्या हातात लहानपणीच मोबाइलसारखे घातक यंत्र येते. आईवडील घरी आल्यावर टीव्हीवरील कर्णकर्कश्श मालिका घराचा ताबा घेतात. या महाभयंकर आघातामधून सुटका करण्यासाठी हे सदर मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही. पर्यावरणीय ध्वनी प्रदूषण समस्येवरील ही उपाययोजना आपण समजून घेऊया अन्यथा आपणच एक प्रदूषण ठरू. सूर्यकांत भोसले, मुलुंड