सुमित्रा धुमाळे यांच्यावरील लेख ‘एक फोन कॉल’ (२ फेब्रुवारी) वाचनीय होता. सत्य हे आहे की लैंगिक चालीरीती झपाटय़ाने बदलत आहेत, हे सुमित्राताईंच्या बाहेरील देशातल्या हेल्पलाइनमध्ये जसे दिसते तसेच ते भारतातील हेल्पलाइन्समध्येही बहुतेक दिसते, पण हे सत्य स्वीकारणे आपल्याला कदाचित जास्त अवघड आहे. वयात येणाऱ्या मुलंमुलींना लैंगिकतेबद्दल बोलायला, ते एक्सप्लोर करण्यासाठी लागणारे सुरक्षित आणि सामाजिकरीत्या ग्राह्य़ असे अवकाश (जागा) आपण त्यांना देत नाही. त्याचे प्रतिकूल परिणाम आजच्या पितृसत्ताकसमाजात स्त्रियांना भोगावे लागतात. मग ती नको असलेली गर्भधारणा असो किंवा लग्नानंतरचे ‘वाइफ स्वॅपिंग’ असो. सुमित्राताईंची हेल्पलाइन एक खूपच महत्त्वाची सेवा देत आहे. जिथे तरुण मुली स्वत:लाच नाही तर पुढच्या बाईलाही हा प्रश्न विचारू शकतात की ‘तो करतो तर मी केले तर काय झाले’. हे विचारून ती अंदाज घेते की समोरच्याचे यावर काय विचार आहेत आणि तिच्यासाठी ही सुरक्षित जागा आहे की नाही. वन नाइट स्टँड्स आणि तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलामुलींच्यातले लैंगिक संबंध भारतातपण वाढत आहेत, तेव्हा हे लक्षात घेणे जरुरीचे आहे की तरुण मुलगा  सामाजाने दिलेल्या पितृसत्ताकसत्तेचा वापर करतो त्याच बरोबर एक तरुणीही यात गुंतलेली असते (समलैंगिकही

असू शकते!), आणि तिला पारिणामाविरुद्धची प्रतिकारशक्ती नसते आणि म्हणूनच सर्वसाधारणपणे तरुण मुली या गोष्टी आपल्याकडे बोलताना दिसणार नाहीत. त्या गप्प राहण्याचे कारण आणि परिणाम हिंसा असते. अशी बोलायची जागा देणाऱ्या हेल्पलाइन्सना धन्यवाद. हे सत्य विसरून चालणार नाही की जोपर्यंत आपण आदराने लैंगिकतेची पवित्रता स्वीकारत नाही तोपर्यंत मी टु, लैंगिंक शोषण आणि बलात्कार या गोष्टीं आपल्या समाजात दिसणार.

– ऊर्मिला बेंद्रे

Story img Loader