शोपेनहॉवरचे विचार आजही लागू
‘जिव्हाळा आणि अलिप्तताही’ या ज्ञानदा नाईक यांच्या लेखामध्ये (चतुरंग, २३ फेब्रुवारी २०१९) शोपेनहॉवरचे एक वचन व्यंकटेश माडगूळकरांनी सांगितले, असा उल्लेख आहे. शोपेनहॉवर असे म्हणतो, आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीचे विचार अनुभवतो. जी व्यक्ती दिवसभर वाचन करते आणि मग विरंगुळा म्हणून विचार सोडून इतरच गोष्टी करते, ती व्यक्ती हळूहळू विचार करण्याची क्षमता गमावून बसते. आजच्या युगात बरेच लोक दिवसभर वाचत राहतात. शोपेनहॉवरचे विचार त्यांना तंतोतंत लागू होताना दिसतात हे लक्षात येऊन गंमत वाटली.
– धनंजय ढमढेरे, ठाणे</p>
सोपी उत्तरे
प्रदूषणमुक्ती! (चतुरंग २३ फेब्रुवारी) या अनुराधा ठाकूर यांच्या लेखात चीनमध्ये एका शहरात हवा शुद्धीकरण यंत्र बसवल्याची बातमी आणि रायगड जिल्हय़ातील एका ग्रामपंचायत प्रमुखाने पाणी शुद्धीकरण यंत्र बसवून १ रुपयात १ लिटर शुद्ध पाणी उपलब्ध करून दिल्याची बातमी, अनेक छोटे प्रकल्प उपक्रम मोठे कार्य करू शकतात. त्याचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. तालुका जिल्हा राज्य पातळीवरील विज्ञान प्रदर्शनात अनेक उपयुक्त प्रकल्प सादर होतात, छोटय़ा प्रतिकृती दिसतात. त्यात पाणी शुद्धीकरण, कचरा व्यवस्थापन, प्रदूषण कमी करणे, ग्रामीण भागातील शेतीसाठी साधीसोपी यंत्रे उपकरणे व कमी खर्चात करण्यासाठी प्रकल्प सादरीकरण होते. काहींना मोठी बक्षिसे, प्रमाणपत्रे मिळतात, पण पुढे या प्रकल्पांचे, शोधांचे काय होते? या गोष्टींना उत्तेजन मिळाले तर अनेक समस्यांवर सोपी उत्तरे मिळू शकतील असे वाटते.
– प्रफुल्लचंद्र काळे, नाशिक
हृदयस्पर्शी लेख
जॉन स्टाइनबॅक या अमेरिकी लेखकाशी तुलना करावी किंवा त्याची आठवण व्हावी असे वैविध्यपूर्ण आणि आगळेवेगळे लिखाण करून खास आपले स्वत:चे वेगळे आणि वैशिष्टय़पूर्ण स्थान मराठी साहित्यात व्यंकटेश माडगूळकर यांनी मिळवले. त्यांच्या कन्या ज्ञानदा नाईक यांनी ‘आभाळमाया’ सदरात लिहिलेल्या अतिशय हृदयस्पर्शी लेखाने व्यंकटेश माडगूळकर यांच्या लेखनाच्या माझ्यासारख्या असंख्य वाचकांना आनंद वाटला असेलच. त्याबाबत मन:पूर्वक कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते.
हे लिहिण्याचे दुसरे आणि महत्त्वाचे कारण वेगळेच आहे. लेखाच्या शेवटी त्या लिहितात, ‘त्या दिवशी आयुष्यात कधी कुणाजवळ बोलले नसतील ते तात्या माझ्याजवळ बोलले.’ ज्ञानदाताईंनी ते माडगूळकरांचे हृद्गत विस्मृतीत जाण्याअगोदर लिहून ठेवावे अशी अत्यंत नम्र सूचना करावीशी वाटते. पुढेमागे माडगूळकरांचे चरित्र नक्कीच लिहिले जाईल त्या वेळी या लिखाणाचे मोल किती असेल ते सांगायला नको. आपल्याकडे चरित्राला आधारभूत ठरणारी आणि व्यक्तीच्या अंतरंगात काय चाललेले होते ते ज्यावरून शक्य तेवढे यथातथ्यपणे सांगणारी लिखित साधने म्हणावी तेवढी नसतात. त्यामुळे लेखकांची चरित्रे म्हणावी तेवढी अंतरंग उलगडून दाखवणारी होत नाहीत. अत्यंत खासगी आणि वैयक्तिक तपशील वगळून त्यांनी हे हृद्गत भावी चरित्रलेखकांसाठी बंद लिफाफ्यात अमुक वर्षांनंतर उघडण्यात यावे अशी कायदेशीर तरतूद करून एखाद्या जबाबदार, प्रतिष्ठित साहित्य संस्थेकडे देऊन ठेवावे अशी नम्र सूचना करावीशी वाटते.
– गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर