‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार २०२४’च्या मानकरी डॉ. तारा भवाळकर यांचे सविस्तर भाषण २ नोव्हेंबरच्या अंकात वाचले. खरोखरच प्रत्येकाला मनामध्ये डोकावून पाहायला लावणारे, विचार करायला लावणारे त्यांचे भाषण होते. कठीण, संस्कृतप्रचुर शब्द त्यांनी भाषणात टाळले. अभिजात मराठी नावाचा दर्जा आपल्याला मिळाला म्हणजे नेमकं काय झालं, हा जसा प्रश्न त्यांना पडला तसा सामान्य वाचकांना- लेखकांनाही पडला असावा असो… शिक्षित व सुशिक्षित या शब्दात फरक आहे. सुशिक्षित म्हटलं की शिक्षणाच्या जोडीने शहाणपण, व्यवहारज्ञान असावं अशी अपेक्षा करतो. रस्त्यावरची भाजीवाली ही पदवीधर शिक्षित ग्राहकापेक्षा पटकन व्यवहार-हिशोब करते. उपजत बुद्धी असणं यालाही महत्त्व आहे. साक्षरता, शहाणपण आणि शिक्षण यांच्यामध्ये फरक असतो. हल्ली शाळेतील शिक्षित शिक्षकांचे ‘प्रताप’ आपण वृत्तपत्रात वाचतोच. अगदी पूर्वी लिहिता-वाचता येत नव्हतं तेव्हा ‘अनुभव’ महत्त्वाचा होता, तो शहाणपण शिकवत असे. मी ‘चतुरंग’चा जुना वाचक आहे. हल्लीच्या पुरवणीत वाचकांसाठी तऱ्हतऱ्हेचे विषय- सदरे देऊन लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं.
- श्रीनिवास स. डोंगरे
u
लोकसाहित्याचा सखोल अभ्यास
डॉ. तारा भवाळकर यांचे संपूर्ण भाषण वाचायला मिळाले. त्यांचा लोकसाहित्याचा सखोल अभ्यास. खेड्यातील असो किंवा शहरातील, सुशिक्षित वा अशिक्षित, स्त्रीचे मानसिक बळ किती असते, तिचे उपजत शहाणपण तिला, तिच्या कुटुंबाला, समाजालाही कसे तगवते हे त्यांनी इतक्या तळमळीने सांगितले की ते वाचणारीलाही आणखी बळ, अभिमान देऊन जाते. संपूर्ण भाषण वाचायला मिळाले, धन्यवाद.
- संजीवनी आपटे
हेही वाचा : इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत
शहाणपणा अंगी बाणवणे महत्त्वाचे
डॉ. तारा भवाळकर यांचे संपूर्ण भाषण वाचले. वाचल्यानंतर त्या कुणाचा वारसा पुढे नेत आहेत ते सांगणे अतिशय अवघड आहे, कारण त्यांच्याकडे दैवी संपत्ती इतकी समृद्ध आहे की त्याला विशिष्ट मर्यादा येऊ शकत नाही. आयुष्याच्या प्रवासात शहाणपणा कोणाचा सोबती असतो, हे अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या मराठी भाषेतदेखील सांगणे अवघड आहे. शिक्षण म्हणजे पदवी मिळवणे नाही, ज्ञान मिळविणेदेखील नाही तर शहाणपणा अंगी बाणवणे आहे. हे अनेक माध्यमांतून त्यांनी छान व्यक्त केले आहे. ‘नर’ आणि ‘नारी’ हे दोन प्रकार असले तरी शक्ती एकच आहे आणि जेव्हा ती शक्ती एकवटते तेव्हा नियतीदेखील ‘तथास्तु’ म्हणते. यात कोणतेही द्वैत नसून अद्वैत शक्तीचेच प्रकटन असते. हाच संदेश डॉ. भवाळकरांच्या भाषणातून मिळतो. दैैनिक ‘लोकसत्ता’चा जो ज्ञानसंवर्धक वारसा गिरीश कुबेर पुढे नेत आहेत, त्यातूनच भावी समृद्धी साकारली जाणार असे आजचे चित्र आहे.
- प्रभू अग्रहारकर
मानवी मूल्यांची सकारात्मक गुंफण
‘जगण्याचे सशक्त मार्ग’ हा संकेत पै यांचा लेख (२ नोव्हेंबर) मार्गदर्शक वाटला. मित्र, अन्न, भावना, समजुती, श्रद्धा या मानवी आयुष्याला आकार देणाऱ्या पाच घटकांचा एकमेकांशी अत्यंत सोप्या भाषेत दाखविलेला आंतरिक संबंध आश्चर्यजनक वाटला. एकमेकांत गुंफलेला विविध रंगांच्या फुलांचा जसा आकर्षक हार तयार होतो तसेच काहीशी समाजातील विविध मानवी मूल्यांची सकारात्मक गुंफण या लेखात असून, ती म्हणूनच आकर्षक व आनंददायी ठरली आहे.
- प्रदीप करमरकर