‘समाजवास्तवाला भिडताना’ या सदरातील अॅड. रंजना पगार गवांदे यांचा ‘चेटकीण’ हा लेख (१८ जानेवारी) वाचला. आज एकविसाव्या शतकातील पाव शतक उलटून गेल्यानंतरही आपला समाज किती बुरसटलेल्या विचारांचा आहे, हे वाचून सखेदाश्चर्य वाटलं. आज जगात तंत्रज्ञानानं आणलेले क्रांतिकारी बदल मती गुंग करणारे आहेत. पण नाशिकसारख्या जिल्ह्यातील एका गावात एका स्वाभिमानी, कष्टाळू स्त्रीने तिची जमीन बड्या धेंडाला देण्यास नकार देताच, तिला ‘चेटकीण’ ठरवण्यापर्यंत त्यांची मजल जाते आणि उर्वरित समाज ते सहज मान्य करतो, हे अतिशय क्लेशकारक आहे. लेखातील स्वाभिमानी धोंडीबाईला योग्य वेळी मदत मिळाल्यामुळेच तिचा जीव वाचला आणि धेंडांना चाप बसला. पण इतकं होईपर्यंत त्या भागातील सुविद्या मंडळी काय करत होती, हा प्रश्न अनुत्तरित राहतोच. त्याचं उत्तर जोपर्यंत समाधानकारकरीत्या मिळत नाही तोपर्यंत समाजाचे बुरसटलेपण कमी होणार नाही.

अशोक साळवे, मालाड

आयुष्य आनंदी करण्यासाठी उद्बोधक

‘आयुष्याचा तोल साधताना…’ हा डॉ. मेधा ताडपत्रीकर यांचा लेख (१८ जानेवारी) प्रत्येकाने आचरणात आणावा असा आहे. आपली तब्येत सांभाळण्यासाठी आणि आयुष्य आनंदी करण्यासाठी तो खूपच उद्बोधक आहे. मी लहानपणापासून सूर्यनमस्कार आदी व्यायाम करीत असे. नोकरीला लागल्यानंतरही ते चालू होते. पण पुढे नोकरीत बढती मिळाल्यावर त्यात खंड पडला होता. आमच्या कंपनीने उच्च अधिकाऱ्यांसाठी एक दिवसाचे आरोग्य शिबीर आयोजित केले होते. तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की, ‘प्रत्येकाला दररोज चोवीसच तास मिळतात, त्यांचा योग्य विनियोग करणे आपल्या हातात असते. सकाळच्या फिरण्यासाठी नेहमीपेक्षा अर्धा तास लवकर उठून फिरायला जात जा.’ ते मी मनावर घेतले आणि दुसऱ्या दिवसापासून सकाळी फिरणे व व्यायाम करणे चालू केले ते आजतागायत चालू आहे. तेव्हा मी वयाच्या पन्नाशीत होतो. आज माझे वय चौऱ्याऐंशी आहे. मी सशक्त आहे. माझ्या पत्नीलाही मी व्यायामासाठी उद्याुक्त केले. तीही नियमित सकाळी फिरणे व व्यायाम करत आहे.

– रमेश नारायण वेदक, टिळकनगर

कामाचे सहा तास असावेत!

‘आयुष्याचा तोल साधताना…’ हा डॉ. मेधा ताडपात्रीकर यांचा लेख व्यक्तिमत्त्व विकास व नोकरी यांचा सुंदर तोल सांभाळणारा वाटला. ‘लार्सन अँड टुब्रो’ या प्रख्यात अभियांत्रिकी कंपनीचे अध्यक्ष सुब्रह्मण्यम आणि नारायण मूर्ती यांनी आठवड्याला ९० व ७० तास काम केले पाहिजे, असे म्हटल्यावर याची चर्चा सुरू झाली. कर्मचारी प्रथम मनुष्यप्राणी आहे व तो कार्यालयापासून दूर राहत असल्याने, त्याचे चार ते पाच तास जीवघेण्या गर्दीतच जातात. भारतात सरासरी कामाचे तास, अमेरिका, इंग्लंड, जपान यापेक्षा अधिक आहेत तसेच भारतातील सर्व आस्थापनांतील ‘मॅनेजमेंट कॅडर’ या विभागातील लोकांना १२ ते १८ तास दररोज काम करावे लागते. सुट्टीच्या दिवशीही तेवढेच काम करावे लागते. परिणामी कौटुंबिक अनास्था निर्माण होऊन, कामाच्या दर्जावरही त्याचा वाईट परिणाम होतो, याबाबत शासनाने वेगळा कायदा आणून, सर्वांचेच कामाचे तास सहा करावेत, म्हणजे ‘तीन’ऐवजी ‘चार’ पाळ्या कराव्यात, यामुळे बेरोजगारांना कामाची संधी मिळेल, तसेच कामही दर्जेदार होऊन राष्ट्रीय विकासाला चालना मिळेल व मनुष्याची आध्यात्मिक, सामाजिक, शारीरिक ध्येये ही नोकरीइतकीच महत्त्वपूर्ण असतात हे लक्षात घेऊन, कामगारांना ‘मनुष्य’ म्हणून कुटुंबासमवेत जगण्याची तसेच स्वत:चा व्यक्तिमत्त्व विकास साधण्याची संधी उपलब्ध करून देणे, आजच्या काळाची गरज ठरली आहे.

– प्रदीप करमरकर, ठाणे</strong>

मनोवेधक लेख

साठीनंतर जीवनात मोठं शून्य उत्पन्न होतं. डेमी मूर या नटीला वयाच्या ६२व्या वर्षी ‘द सबस्टन्स’ या चित्रपटासाठी अभिनयाचा प्रतिष्ठित ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’ जाहीर झाला. तसेच या नटीने ‘इन साइड आउट’ या नावाचे एक आत्मचरित्र लिहिले आहे. या विषयांवर संदेश कुलकर्णी यांनी लिहिलेला वूमन ऑफ ‘सबटन्स’ हा (१८ जानेवारी) लेख चांगला आहे. तो संवादी धाटणीचा असल्याने मनोवेधकही ठरतो. प्रत्येक व्यवसायात अडचणी येत असतात. पण कौटुंबिक पाठिंब्याने त्यातून मार्ग काढता येतो व पुढे यशस्वी होता येते. पण आई मनोरुग्ण व मुलीचा अबोला या परिस्थितीत कौटुंबिक पाठिंब्याशिवाय मानसिक ताणतणावावर मात करीत डेमी मूरने साठीनंतर जीवनात घेतलेली उभारी निश्चित प्रशंसनीय आहे. या उत्तम लेखासाठी संदेश कुलकर्णी यांचे अभिनंदन. – किरण देशपांडे, नेरुळ, नवी मुंबई.

Story img Loader