आयुष्य समरसून जगण्याची ओढ आणि आपल्या तत्त्वांशी-निष्ठांशी प्रामाणिक राहात कर्तव्यपूर्ती व जगणं दोन्ही अर्थपूर्ण करण्याची धडपड असलेल्या, आंतरिक ऊर्मी आणि स्वत:वरच्या विश्वासातून आपलं व्यक्तित्व घडवणाऱ्या तीन कर्तबगार स्त्रियांचे विचार, त्यांच्या अनुभवांच्या चांदणशिंपणानं यंदाचा ‘लोकसत्ता वर्षवेध’ प्रकाशन सोहळा लखलखून निघाला.
‘लोकसत्ता’च्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘कचेरीच्या चौकटीबाहेर’ या खास कार्यक्रमात महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाच्या (मॅट) अध्यक्ष, न्यायमूर्ती मृदुला भाटकर (निवृत्त), मुंबईच्या आयकर आयुक्त डॉ. पल्लवी दराडे आणि जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्याशी खुसखुशीत गप्पा रंगल्या. त्यांची कार्यालयीन प्रतिमा लोकांच्या परिचयाची असली, तरी कार्यालयाबाहेरचं त्यांचं जगणं, मतं, छंद, खाण्यापासून गाण्यापर्यंतच्या आवडीनिवडी, यावर गप्पा मारत प्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी हिनं या तिघींमधल्या ‘माणूसपणा’चं दर्शन उपस्थितांना घडवलं. या मनमोकळया गप्पांना कवितेचीही साथ मिळाली. नियमांच्या चौकटीत राहून काम करताना कडक शिस्तीने वागणाऱ्या या स्त्रियांच्या व्यक्तिमत्त्वात कुठे एक खवय्या दडला आहे, एकीचं मन फिरस्तीत रमतंय, तर दुसरीचं कवितेत.. कुणी खेळात पारंगत आहे, तर कुणाला भाषणांमधून लोकांना विचारप्रवृत्त करण्याची कला अवगत आहे. स्त्रीच्या अंतरंगाचे पैलू सहजपणे उलगडणाऱ्या या शब्दमैफलीची सांगताही स्पृहा जोशी हिच्या अप्रतिम कवितेनं झाली. ‘आपल्याला काय वाटतं हे खरेपणाने तुला सांगता येतं आहे, मनाच्या आतलं खरेपणाने मांडता येतं आहे.. ही चूक नाही तुझी ही साजरं करायची गोष्ट आहे,’
या स्पृहा जोशीच्या ओळी तंतोतंत खऱ्या ठराव्यात, इतक्या मनमुरादपणे भाटकर, दराडे आणि सापळे या तिघींनीही आपले विचार ‘कचेरीच्या चौकटीबाहेर’ या गप्पांमधून उपस्थितांसमोर मांडले. या प्रेरक विचारांचं कोंदण यंदाच्या ‘लोकसत्ता वर्षवेध’ प्रकाशन सोहळयास लाभलं.
हेही वाचा…शाळेची वेळ: सकाळची की दुपारची?
‘माणूस म्हणून जगले!
अन्यायाविरुद्ध लढायचं असेल तर पत्रकार होणं पुरेसं नाही, कायदा माहिती पाहिजे.. म्हणून मी कायद्याचा अभ्यास सुरू केला आणि पुढे न्यायमूर्ती झाले. लहानपणापासूनच बॅडमिंटन, पोहणं, चालणं आणि पळणं, सायकल चालवणं माझ्या आवडीचं आहे. कामापलीकडे मैदान आणि खेळात मी प्रचंड रमते. बकरीपासून ते गायीपर्यंतचे प्राणी, श्वान, मांजरी मला खूप आवडतात. आजही माझ्याकडे तीन मांजरी आहेत. ताणतणावापासून मुक्त राहण्यासाठी एक तर प्रेम करता यायला हवं किंवा कुठल्या तरी प्रेमात असायला हवं. विनोदबुद्धी चांगली हवी. मुळात माणूस म्हणून जगता यायला हवं! नाटक, कविता आणि साहित्य या तीन गोष्टी मला प्रिय आहेत. मीही सातत्यानं लिहीत गेले आणि ‘कविता मनातल्या, कविता कोर्टातल्या’ हे पुस्तक तयार झालं. ‘हे सांगायला हवं’ या पुस्तकाचं लिखाण ही माझी स्वत:ची आत्यंतिक गरज होती म्हणून झालंय. वेळात वेळ काढून नाटक पाहायला मला आवडतं. मी जवळच्या अनेक व्यक्तींचे मृत्यू पाहिले आहेत. अतिशय छोटया काळात त्या सगळयांना गमावल्यामुळे कदाचित आता मला जगण्याची किंमत कळली आहे. त्यामुळे जगण्यावर मी खूप प्रेम करते. झोकून देऊन काम करण्याबरोबरच स्वत:चे काही छंदही जोपासले, तर आव्हानात्मक परिस्थितीतून वाट काढतानाही जगणं आनंददायी होतं. चांगली माणसं आपल्या आयुष्यात येणं, हा एक मोठा योग असतो. माझ्या आयुष्यात मला मदतनीस खूप चांगले मिळाले, त्यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजते. मित्र-मैत्रिणी खूप चांगले मिळाले. माझ्या आदर्श न्यायमूर्ती रोशन दळवी, सुषमा देशपांडे आणि नीरा आडारकर महाविद्यालयीन जीवनापासून माझ्याबरोबर आहेत. त्यांचं खूप मोठं ऋण आहे. स्त्रियांच्या मालमत्तेच्या वादांपासून बलात्कारापर्यंतचे विविध प्रश्न न्यायालयात येत असतात. ते हाताळताना एक बाई म्हणून मला कधीही अडचण आली नाही. बाई म्हणून जगण्यापेक्षा मी एक माणूस म्हणून जगले. न्यायाधीशानं सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून आणि कायद्याशी प्रामाणिक राहून निकाल दिला पाहिजे. त्यासाठी स्वत:शी अत्यंत प्रामाणिक असणं गरजेचं आहे. मी त्या पद्धतीनं आयुष्य जगले. त्यामुळे निकाल देऊन घरी परतल्यानंतर मला शांत झोप लागते. कुठल्याही निर्णयाचा मला पश्चात्ताप करावा लागला नाही. – मृदुला भाटकर, निवृत्त न्यायमूर्ती, महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाच्या (मॅट) अध्यक्ष
हेही वाचा…‘तुमचं आणि आमचं सेम ‘केमिकल’ असतं..’
‘शून्य अपेक्षा, अधिक मेहनत’
मेहनत खूप करायची, पण अपेक्षा शून्य ठेवायच्या, हे सूत्र मनात पक्कं ठेवून मी आजवरची वाटचाल केली. अभ्यास केला तर आपल्याला चांगले गुण मिळू शकतात हे लक्षात आलं आणि अभ्यासाची गोडी लागली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. जशी गरज वाटली, तशा नवनवीन गोष्टी शिकत गेले. आयकर विभागात आल्यानंतर कळलं, की कायदे माहिती पाहिजेत. त्यामुळे कायद्याचं शिक्षण घेतलं. विपश्यनेची आवड निर्माण झाली, म्हणून पाली भाषेत ‘एम.ए.’ केलं. पाली भाषेत शिकवायचं म्हणून मी नुकतीच ‘नेट’ परीक्षाही उत्तीर्ण झाले. त्यामुळे आता अभ्यासाची सवयच झाली आहे जणू! स्त्री अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजाचा व्याप आणि घरची जबाबदारी दोन्ही सांभाळावं लागतं. त्यामुळे त्यातून येणारा ताण घालवण्यासाठी छंद जोपासले पाहिजेत. त्या छंदांतूनही काहीएक समाधानकारक गोष्ट हाती लागते. शासकीय सेवेत आल्यानंतर सुरुवातीला मला भाषण करणं जमत नव्हतं. मनातली भाषणाची भीती घालवण्यासाठी मी जाणीवपूर्वक छोटया-छोटया समारंभांना हजेरी लावणं, विषय घेऊन त्याचं लेखन, त्यासंदर्भातलं वाचन करणं, आरशासमोर उभं राहून भाषणाची तयारी, हे सगळं मनापासून, सातत्यानं केलं. त्या अभ्यासाचा फायदा कामातही झाला. पुढे उत्तम वक्ता ही ओळख मिळाली. श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची संधी मिळते, तेव्हा त्यांना विचारप्रवृत्त करणारे विचार मांडले पाहिजेत हे कटाक्षानं पाळलं. कामाच्या ठिकाणी आणि वैयक्तिक जीवनात ज्या पद्धतीनं आपण वागतो, त्यानुसार आपली प्रतिमा समोरच्या व्यक्तीच्या मनात तयार होत जाते. पुढे तीच प्रतिमा तुमच्या कामी येते. अधिकारी म्हणून वागताना याचा प्रत्यय वारंवार येतो. विपश्यनेमध्ये नैतिकतेचं पालन केलं जातं, मनावर लक्ष केंद्रित केलं जातं. आपल्या मनात सतत सुरू असलेला भावनांचा कल्लोळ थांबवून मन एकाग्र होण्यासाठी मी दररोज सकाळी एक तास विपश्यना करते. आयुष्यात वेगवेगळया प्रसंगांना सामोरं जाताना तुम्ही स्वत:साठी काही मर्यादा, नियम ठरवून घेतले, तर कोणताही निर्णय घेणं सोपं जातं. काय चूक आणि काय बरोबर हे बरोबर कळतं. – डॉ. पल्लवी दराडे, आयकर आयुक्त, मुंबई
हेही वाचा…सांदीत सापडलेले.. ! एका जगण्यात दोन आयुष्यं!
चुकांमधून शिकत गेले!
वर्षभर परीक्षेपुरता अभ्यास करणारी मी! अभ्यासाची आवड कधीच नव्हती. आई मला नेहमी म्हणायची, ‘‘तू कादंबरी वाचताना हरवून जातेस. हाक मारलेलीही ऐकू येत नाही. तसं अभ्यासाच्या बाबतीत होत नाही!’’ पण याच पुस्तक वाचनातून माझी इंग्रजी भाषा सुधारली आणि आयुष्यात अनेक प्रसंगांत कसं वागावं याचे धडेही मिळाले. अधिष्ठाता व्हायच्या एक दिवस आधीपर्यंत मी बालचिकित्सा विभागात प्राध्यापक होते. एरवी प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण मिळतं कामाचं. तसं काही आमच्या वैद्यकीय क्षेत्रात होत नाही. त्यामुळे अधिष्ठाता झाल्यानंतरही खास प्रशिक्षण असं काही नव्हतं. प्रसंगांना सामोरं जाताना ज्या चुका घडल्या त्या पुढे होणार नाहीत याची काळजी घेत वाटचाल केली. एक गोष्ट प्रकर्षांनं जाणवली, की कुठल्याही अवघड परिस्थितीतून बाहेर पडताना मनावरचा ताण कमी करायचा असेल, तर आपल्याला आपल्या क्षेत्राबाहेरच्या व्यक्तींची, आपल्या कुटुंबीयांची अधिक मदत होते. माझ्यासाठी माझ्या जवळच्या व्यक्तींबरोबरच पुस्तकं कायम मार्गदर्शक, मित्रवत राहिली आहेत. पुस्तक वाचनातून अनेकदा कुठल्या प्रसंगाला किती महत्त्व द्यायला हवं? किंवा आपण एखाद्या गोष्टीवर विनाकारण त्रागा करतो आहोत का? याविषयीची दिशा मला मिळत गेली. आता अधिष्ठाता होऊन सात वर्ष झाली आहेत. चुका आजही होतात, पण नव्या चुका करते आणि नवं काही शिकते! अधिकारी म्हणून समोर येणाऱ्या अडचणी, समस्या हाताळताना सतत दुसऱ्यांचेच अहंकार वा विरोध अडथळे ठरतात असं नाही. आपला अहंकारही निर्णयाच्या आड येणार नाही याची अधिक काळजी घ्यावी लागते! इथेही पंचतंत्रातल्या गोष्टी, पौराणिक गोष्टींचं वाचन माझ्या मदतीला धावून आलं. स्त्री-पुरुष समानतेच्या विचारावर ठाम असणाऱ्या माझ्यासारख्या स्त्रीला अधिष्ठाता झाल्यानंतर समानतेचा विचार प्रत्यक्षात पूर्णपणे साध्य झालेला नाही हे ठळकपणे जाणवलं. पुरुष अधिकाऱ्यानं चारचौघांतही खरंखोटं सुनावलं असेल, तर त्याबद्दल थोडीफार नाराजी व्यक्त करून गोष्टी सोडून दिल्या जातात. स्त्री अधिकाऱ्यांच्या बाबतीत मात्र ते सहन केलं जात नाही आणि ‘हिला आता धडा शिकवतो’ या दृष्टीनं पुढची वागणूक मिळते. अधिष्ठाता म्हणून माझी पहिली नियुक्ती मिरजमध्ये झाली, तेव्हा ‘हे नेमकं निभावायचं कसं?’ या प्रश्नाला उत्तर म्हणून माझ्या एका मित्रानं मला पंचतंत्रातल्या गोष्टींचा उपयोग करण्यास सुचवलं! पंचतंत्रातल्या गोष्टी विष्णू शर्मानं तीन राजपुत्रांना सांगितल्या होत्या. त्यामुळे राज्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून या गोष्टी वाचण्याचा मित्राचा सल्ला उपयुक्त ठरला. पंचतंत्रातल्या गोष्टी असोत वा पौराणिक गोष्टी.. त्या वास्तवात घडल्यात की नाही याचा विचार करत बसण्यापेक्षा तुम्ही त्यातून काय घेऊ शकता, यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. मी नेहमी म्हणते तसं, पुस्तकं खरोखरच मित्रवत आहेत. कुठल्याही गोष्टीकडे स्वत:च्या संकुचित विचारांपलीकडे जाऊन व्यापकपणे पाहण्याचा दृष्टिकोन मला पुस्तकांनी दिला. – डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता, जे. जे. रुग्णालय
reshma.raikwar@expressindia.com
(मुलाखती संकलन सहाय्य – अभिषेक तेली)