अनंत सोनवणे

एखाद्या व्यक्तीशी मैत्री का होते? त्यामागे त्या दोघांचे स्वभाव जुळणे किंवा पूरक असणे हे असतंच; परंतु त्याहीपेक्षा कोणता वेगळा घटक असतो, ज्यामुळे मैत्रीचं नातं कायमस्वरूपी सहजसुंदर बनू शकतं?

GBS Guillain Barre Syndrome suspected patient Karad
कराडमध्ये सापडला जीबीएसचा रुग्ण?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
ews certificate
ईडब्ल्यूएस विद्यार्थांना राज्याच्या नमुन्यातच प्रमाणपत्र द्यावे लागणार
Arvi , Shivaji Primary School, Padma Chaudhary,
अशीही एक ‘मॅडम’ ! घर समजून शाळेचं रुपडंच बदलले
Government school Number of students who have increased during the Corona period returns to their original positions Mumbai news
सरकारी शाळा पुन्हा ओस; करोनाकाळात वाढलेली पटसंख्या मूळ पदावर
Devendra Fadnavis expressed regret over the chaos happening in universities Nagpur news
मुख्यमंत्रीच म्हणतात, विद्यापीठांमध्ये अराजकतेचे बिजारोपण…कारण, माओवादी विचार…
teaching being hampered due to various committees are being formed
अबब, राज्यातील शाळांत १८ समित्या! शिक्षक मग शिकवितात केव्हा?
only one Gondi school in Maharashtra struggles for survival
महाराष्ट्रातील एकमेव गोंडी शाळेचा अस्तित्वासाठी संघर्ष, शिक्षण विभागाविरोधात ग्रामसभेची…

अभ्युदयनगर काळाचौकीच्या ‘शिवाजी विद्यालय’ या फक्त मुलांच्या शाळेतून मी रुईया कॉलेजमध्ये अकरावीला दाखल झालो, तेव्हा किंचित गांगरलो होतो. कारण इथं मुलं-मुली एकत्र शिकत होते.

पहिल्या दिवशी मी आणि ठाण्याचा राजीव एका बाकावर बसलो होतो. समोरच्या बाकावर दोन मुली बसल्या होत्या. त्यातली एक सडपातळ, आखूड केसांची मुलगी खूपच बोलकी होती. पहिल्याच दिवशी आमची ओळख झाली. तिचं नाव होतं वनिता. तसा आमच्यात खूप फरक होता. तेव्हा मी बऱ्यापैकी अबोल होतो, तर ती सतत बोलणारी. मी मराठी माध्यमात शिकलेला, ती इंग्रजी. मी चार भावंडांत शेंडेफळ, तर ती चार भावंडांत सर्वात मोठी. कसे कुणास ठाऊक, पण आमचे सूर जुळले. त्याचं सारं श्रेय तिलाच. आजही आमची मैत्री तितकीच घट्ट आहे आणि त्याचंही सारं श्रेय तिलाच जातं.

कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून वनिता, राजीव आणि मी असं आमचं त्रिकूट जमलं. मैत्री घट्ट होत गेली तसं वनिताचं नामांतर झालं ‘वॅन’. ती एक उत्कृष्ट कथ्थक नृत्यांगना होती. कॉलेजमधल्या स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणुका सगळीकडे आम्ही एकत्र असायचो. अभ्यासही एकत्र करायचो. लेक्चर बंक करण्यात थ्रील वाटू लागल्यावर आम्ही जास्त वेळ कॉलेजसमोरच्या कट्ट्यावर घालवायला लागलो. क्वचित कधी सिनेमाला जाऊ लागलो. मला आठवतं, एकदा आम्ही दादरच्या ‘शारदा’ सिनेमागृहात ‘साजन’ सिनेमा पाहायला गेलो होतो. पण सिनेमाचा ‘द एन्ड’ होण्याआधीच कॉलेजची वेळ संपली म्हणून सिनेमा अर्धवट सोडून आपापल्या घरी पळालो होतो.

आमच्या काळी मैत्रिणीला तिच्या घरापर्यंत सोडायला जाण्याची प्रथा होती. त्यानुसार, मी बऱ्याचदा कॉलेज सुटल्यावर वॅनला सोडायला तिच्या घरापर्यंत जायचो आणि मग पुन्हा लोकलने चिंचपोकळीला येऊन तिथून चालत स्वत:च्या घरी यायचो. जाताना माटुंगा ते विक्रोळी लोकलचं आणि विक्रोळी स्टेशनपासून कन्नमवारनगरपर्यंत बसचं तिकीट तीच काढायची. येताना मी विनातिकीट यायचो, कारण जवळ पैसेच नसायचे. आमचं एकमेकांच्या घरी येणं-जाणं होतं. वॅनच्या आई-बाबा आणि भावंडांनी मला त्यांच्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून स्वीकारलं. त्यांचा स्नेह आजही कायम आहे. आजही मी त्यांच्या स्वयंपाकघरात थेट घुसून स्वत: डबे उघडून मला हवं ते घेऊन खातो. माझ्या घरातसुद्धा वॅनचं आपुलकीनं स्वागत व्हायचं. माझ्या वडिलांची तर ती विशेष आवडती.

आम्ही दोघं खूप गप्पा मारायचो. कॉलेजमध्ये एकत्र असलो, घरी सोडायला गेलो, तरी आमच्या गप्पा संपायच्या नाहीत. दरम्यानच्या काळात लॅण्डलाइन फोन घरोघरी आले होते. त्यामुळे फोनवरसुद्धा गप्पा चालायच्या. आम्ही कधी कधी भांडायचोही. एकदा असंच कुठल्याशा मुद्द्यावरून आमचं भांडण झालं आणि दोघंही तणतणत आपापल्या घरी निघून गेलो. दुसऱ्या दिवशीही मी रागातच कॉलेजला गेलो. पण सकाळी सकाळी वॅनने प्रसन्न हसत ‘हाय’ केलं. कालच्या भांडणाचा मागमूसही तिच्या वागण्यात नव्हता. मी म्हटलं, ‘‘अगं काल तर एवढी तावातावानं भांडत होतीस आणि आता अशी वागतेयस की जणू काहीच झालं नाही.’’ यावर तिने हसून उत्तर दिलं, ‘‘हे बघ, एक म्हणजे तुझ्याशी भांडणं हा माझा अधिकार आहे आणि दुसरं म्हणजे ते कालचं भांडण होतं. रात गई, बात गई. लेट्स मूव्ह ऑन.’’ वॅनचा राग फार काळ टिकायचा नाही. हे तिचं मोठेपण होतं. आजही आमच्यात वाद झाले की मी धुसफुसत राहतो आणि ती दिलखुलास हसून सारं मळभ दूर करते.

वॅनची आणि माझी केमिस्ट्री सुरेख जुळली होती. त्यामुळे काही जणांनी ‘जोड्या जुळवा’ उठाठेवीत आमच्याकडे चाचपणी करून पाहिली. पण आम्ही त्यांना फारसं महत्त्व दिलं नाही. एवढंच नाही तर आम्ही एकमेकांकडे कधी त्या कुजबुजीचा उल्लेखही केला नाही. कारण आम्हाला त्याची गरजच भासली नाही. आमच्या दोघांच्या घरची आर्थिक परिस्थिती साधारणत: सारखीच होती. त्यामुळे लवकरात लवकर स्वत:च्या पायावर उभं राहणं दोघांसाठीही गरजेचं होतं. वॅन खूप मेहनती होती. तिने टायपिंग आणि शॉर्टहॅण्डचा कोर्स केला आणि बारावी झाल्यावर लगेच फोर्टमध्ये एका कंपनीत नोकरी सुरू केली. त्यामुळे तिचं सकाळी कॉलेज आणि दुपारपासून नोकरी असं चक्र सुरू झालं. माझ्या शिकवण्या सुरू होत्या. नंतर मी अर्धवेळ पत्रकारिता सुरू केली.

आम्ही एफवायबीएला असताना आमच्या ग्रुपमध्ये आणखी एका मैत्रिणीचा समावेश झाला. सुरेखाचा. वॅननं तिला मोकळ्या मनानं स्वीकारलं. पुढे मी आणि सुरेखा प्रेमात पडलो. मग माझ्या डोंबिवली वाऱ्या सुरू झाल्या. वॅनला वेळ देणं कमी झालं. खरं तर माझ्याकडून तिच्यावर अन्यायच झाला. पण पुन्हा एकदा मोठ्या मनानं तिनं मला सांभाळून घेतलं. ती माझीच नव्हे, तर सुरेखाचीसुद्धा बेस्ट फ्रेंड झाली. आजही आहे. आमच्या लग्नाची सगळी तयारी वॅनने केली. अगदी आमच्या घरासाठी भांड्यांची खरेदीसुद्धा तिनेच केली. लग्नाच्या चार दिवस आधीपासून ती घरी राहायला आली आणि सगळी व्यवस्था तिनं चोख सांभाळली. आमच्या लग्नानंतर तीनच महिन्यांनी वॅनचं लग्न झालं. तिचाही प्रेमविवाह होता. सुरेखानं तिच्या लग्नात बरीच धावपळ केली. सुरेखाच्या आणि माझ्या वैवाहिक जीवनात वॅनचं कायम महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आहे. सुरेखाचा एखादा मुद्दा माझ्या डोक्यात शिरत नसेल, तर वॅन मला तो समजावून सांगते. एखाद्या मुद्द्यावरून वाद झाला, तर ती आम्हा दोघांनाही समजावते. कधी कधी हक्काने रागावतेसुद्धा.

वॅनचा नवरा विकास इंजिनीअर आहे. करिअरच्या सुरुवातीला त्याच्या बदलत्या नोकऱ्यांबरोबर शहरंही बदलत राहिली. नागोठणे, भरुच, दिल्ली, पॅरिस असा प्रवास करून आता तो कुवैतमध्ये असतो. प्रत्येक वेळी सगळा संसार हलवणं, नव्या शहराशी जुळवून घेणं हे सारं वॅनसाठी खूप कठीण होतं. विशेषत: नवरा दीर्घकाळ परदेशात असताना दिल्लीत एकटीनं मुलीचं संगोपन करणं हे खूपच मोठं आव्हान होतं. पण तिने सर्व आव्हानं समर्थपणे पेलली. त्या काळात वेगवेगळ्या शहरांत राहत असल्यानं तिची-माझी वारंवार भेट होत नसे. पण आम्ही फोनवर संपर्कात राहायचो.

वॅन दिल्लीत राहत असताना एकदा तिच्या वाढदिवशी सुरेखाने तिला फोन करून शुभेच्छा दिल्या, पण मी मुद्दाम तिला फोन केला नाही. ती चिडणार याची खात्री होती, पण तिला सरप्राइज द्यायचा आमचा प्लॅन होता. त्यानुसार मी, सुरेखा आणि राजीव सकाळीच मुंबईहून विमानाने दिल्लीला निघालो. अपेक्षेनुसार मी सकाळपासून फोन न केल्यामुळे ती चिडली होती, पण आम्हा सगळ्यांना अचानक दरवाजात पाहिल्यावर तिच्या चेहऱ्यावर जो आनंद पसरला तो केवळ अवर्णनीय होता. अलीकडेच तिच्या पन्नासाव्या वाढदिवसाला मी तिला गुलमोहराचं एक रोप भेट दिलं. ते तिने कोकणातल्या तिच्या जमिनीत लावलं. त्या रोपट्याला आलेला पहिला फुलोरा बघून आम्हा दोघांनाही खूप आनंद झाला.

आता तर ती भारतात, नवरा कुवैतला आणि मुलगी अमेरिकेत असे तिघं तीन देशांत राहतात. इथं ती हिमतीनं सगळी कामं करते. एका बिल्डरनं दहा वर्षांपूर्वी पैसे लंपास करून तिला फसवलं. त्याच्याविरोधात ती पोलिसांत आणि न्यायालयात एकाकी लढा देतेय. मला तिचं खूप कौतुक वाटतं.

वॅन तशी खूप भोळी आहे. तिला कुणीही सहज गंडवू शकतं. म्हणून मी तिला ‘बावळी’ म्हणतो. एखादा तिरकस जोक तिला पटकन समजत नाही. पण तीच वॅन कधी कधी एकदम तत्त्वज्ञासारखी बोलते. एकदा मी तिला विचारलं, ‘‘कशी राहतेस गं तू एकटी? मला तर एक दिवस एकटं राहायचं म्हटलं तर घर खायला उठतं.’’ त्यावर ती शांतपणे म्हणाली, ‘‘आता मला सवय झालीय. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है।’’फिल्मी डायलॉग मारण्यात वॅनचा हातखंडा आहे.

मी फारसे सिनेमे पाहत नाही, तर तिला सिनेमाचं प्रचंड वेड. तिचं वाचन मोजकं आहे, पण जवळपास प्रत्येक सिनेमा तिनं पाहिलेला असतो. अगदी वाईटातला वाईट सिनेमा असला तरी तो का ‘वाईट’ आहे, हे जाणून घेण्यासाठी ती तो बघतेच. प्रत्येक सिनेमावरचं तिचं स्वत:चं परीक्षण असतं. मी तो सिनेमा पाहिलेला नसतो. पण वॅनचं विवेचन ऐकून माझी त्या सिनेमाशी ओळख होते. एखादा सिनेमा मी पाहिलाच पाहिजे असं तिला वाटलं की ती हात धुऊन माझ्या मागे लागते. मग आम्ही दोघं तो सिनेमा एकत्र पाहतो. त्यावर चर्चा करतो.

वॅन ‘फूडी’ आहे. तिला वेगवेगळ्या ठिकाणचे चविष्ट पदार्थ खायला आवडतात, तर मी घरच्या जेवणाचा भक्त. मांसाहार म्हणजे तिचा जीव की प्राण, तर मी शाकाहाराचा चाहता. एकत्र जेवायला बसलो की ही स्वत: काटे काढून सुरमई किंवा पापलेट माझ्या ताटात टाकणार. खेकड्याच्या नांग्या फोडून त्यातला खाण्यायोग्य भाग मला काढून देणार. मटणाच्या रश्शात भाकरी कुस्करून देणार. कधी ‘‘खाऊन तर बघ’’ असं आर्जव करणार, तर कधी ‘‘खा गुपचूप’’ असा दम देणार.

आज आम्ही वयाच्या पन्नाशीत आहोत, तर आमची मैत्री पस्तिशीत पोहोचतेय. मधल्या काळात आपापल्या वैयक्तिक आयुष्यात दोघांनीही खूप चांगले-वाईट अनुभव घेतले. त्यातून दोघांच्याही व्यक्तिमत्त्वाला, विचारसरणीला बरा-वाईट आकार आला. मात्र आमच्या मैत्रीचं शैशव आम्ही अजूनही जपलंय. आजही आमचं बोलणं होत नाही, असा एकही आठवडा जात नाही. एखादा जुना जोक आठवून आम्ही वेड्यासारखे हसतो.

आम्ही दोघं कोकणात भटकतो. तिथलं निसर्गसौंदर्य, तिथली शांतता, तिथले खाद्यापदार्थ दोघांनाही खूप आवडतात. गंमत म्हणजे आमच्या गप्पांना स्थळकाळाचं बंधन नाही. घर, प्रवास, फोनवर कुठेही एकत्र असलो की आमच्या गप्पा सुरूच असतात. घरातल्या कामवाल्या बाईचे नखरे असोत की रशिया-युक्रेन युद्ध, आमच्याकडे सर्व विषयांचा कीस पाडून मिळतो.

वॅनच्या आणि माझ्या मैत्रीतली मला सर्वाधिक भावणारी गोष्ट म्हणजे सहजता. आम्ही एकमेकांसोबत खूपच कम्फर्टेबल आहोत. सहसा दोन मित्रांमध्ये किंवा मैत्रिणींमध्ये जो मोकळेपणा असतो, तो आमच्या नात्यात आहे. जगासमोर घालायचा कोणताही मुखवटा इथं नसतो. समोरचा आपल्याला ‘जज’ करेल, ही भीती न बाळगता आम्ही एकमेकांसोबत सर्व काही शेअर करू शकतो.

मला वाटतं, प्रत्येक पुरुषाला वॅनसारखी एक तरी मैत्रीण असावी. कारण अशा सहजसुंदर नात्यामुळे जीवन भावनिक आणि वैचारिकदृष्ट्या खूप समृद्ध होतं.

sonawane.anant@gmail.com

Story img Loader