नोकरी-व्यवसाय करणाऱ्या स्त्रीला कामाशी निगडित अनेक व्यवधानं असतात. घर आणि नोकरी-व्यवसाय करताना अनेकदा तिचा ‘सोशल कनेक्ट’ कमी होत जातो. मग ते नातेवाईकांकडे जाणं असो की मैत्रिणींच्या संपर्कात असणं असो, ‘तिला नोकरी अधिक महत्त्वाची आहे,’ या समजातून मग आपल्याच माणसांकडून येणारा दुरावा, यात ती स्त्री एकटी पडत जाते. काय करायला हवं अशा वेळी?

सीमा आणि निशा कॉलेजपासून घनिष्ठ मैत्रिणी होत्या. निशाने स्पर्धा परीक्षा देऊन चांगली सरकारी नोकरी मिळवली आणि सीमा बदलीच्या नोकरीत असलेल्या नवऱ्यामागे गावोगाव फिरत राहिली. पण यानं त्यांच्या मैत्रीत फरक पडला नाही. दूरसंचार क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे हातात आलेल्या मोबाईलमुळे त्यांच्या मैत्रीची रेंजही टिकून होती. मात्र सीमाला नेहमीच निशाचा हेवा वाटायचा. निशाचं टापटीप तयार होऊन जाणं, प्रमोशन मिळाल्याबद्दल समाजमाध्यमांवर ‘पोस्ट’ करणं, दौऱ्यावर असताना वेगवेगळ्या ठिकाणांना दिलेल्या भेटीचे फोटो.. किती मज्जा ना! सीमाजवळ तिचं स्वत:चं असं काहीच नव्हतं ‘शेअर’ करायला.. सीमा अनेकदा निशाला मोकळेपणानं हे सगळं बोलून दाखवायची. निशा शांतपणे ऐकून घ्यायची आणि गप्प बसायची.

Health care also has a different system of advertising
आमचे येथे आरोग्य दुप्पट करून मिळेल
a mpsc guy started a hotel business in pune
Pune : MPSC चा अभ्यास करणाऱ्या तरुणाने पुण्यात सुरू केला स्वत:चा व्यवसाय, VIDEO होतोय व्हायरल
Karnataka High Court, Prosecuting Women Victims of Forced Prostitution , forced prostitution, Applicable Laws ,pita law, chatura article,
देहविक्रेय व्यवसायाच्या शिकार महिलेस दंडित करणे कायद्याचा उद्देश नाही…
farmers suffer from humani insect
‘हुमणी’चा उपद्रव
Abhijit Zaveri founded Career Mosaic Success Story Who left high paying job in US built Rs 150 crore company India Must Read
Success Story: परदेशातील नोकरी सोडून ‘त्यांनी’ भारतात उभा केला व्यवसाय; पाहा कोट्यवधींची कंपनी उभारणाऱ्या व्यावसायिकाचा ‘हा’ प्रवास
The Future of Design Education in India
डिझाइन रंग-अंतरंग : डिझाइनचे पदवी शिक्षण: भारतात की परदेशात?
Success Story Left the multi-crore family business and started his own company
Success Story: करोडोंचा कौटुंबिक व्यवसाय सोडून सुरू केली स्वतःची कंपनी; भारतात आहे ‘हा’ लोकप्रिय ब्रँड, अंबानी कुटुंबाशी आहे नातं
woman, rights
हवा सन्मान, हवेत अधिकार!

एकदा याच विषयावर सीमा निशाशी बोलत होती आणि निशाच्या डोळ्यांसमोर कालचा प्रसंग येऊन गेला. ऑफिसमधून आल्यावर तिनं आर्यनला खेळताना बघितलं. तिला प्रेमाचं भरतं आलं आणि आपल्या लहानग्याला तिनं पटकन कुशीत घेण्याचा प्रयत्न केला. पण खेळाच्या भरात असणाऱ्या त्यानं स्वत:ला आईच्या मिठीतून सोडवून घेतलं आणि तो खेळायला पळाला. तो खेळून आल्यावर तिनं त्याला ‘होमवर्क’ करायला बसवलं. ‘अभ्यास नको’ म्हणून त्याचं रडून झालं. अखेर अभ्यास संपल्यावर तो आजीकडे पळाला. टीव्ही बघत जेवून, आजीकडून गोष्ट ऐकून तिथेच झोपला. सकाळी त्याला उठवून शाळेत पाठवणं आणि स्वत:च्या ऑफिसची तयारी करणं, यात निशाची धावपळ व्हायची. या सगळ्यात ‘आई रागावणारी’, ‘अभ्यास करायला लावणारी’ म्हणून आर्यनला आईचा राग यायचा. त्याची सगळी माया आजीवर ऊतू जायची. निशाला वाटून गेलं, की सीमाला कळू शकेल का लेकरापासून दूर जाण्याची, एकटं पडण्याची भीती?

हेही वाचा – शाळेची वेळ: सकाळची की दुपारची?

बहुतेक वेळा नोकरी करणाऱ्या स्त्रियांना मुलांकडून अभ्यास करून घेणं, त्यांना शिस्त लावणं, शाळेत वेळेवर पाठवणं, यात खूप कठोर व्हावं लागतं. माया दाखवायला पुरेसा वेळच मिळत नाही. त्यामुळे मुलांना आईचा कठोरपणा तर रोज दिसतो, तिची एकटं पडत जाण्याची भावना समजण्याइतपत जाण त्यांच्यात अजून आलेली नसते.

भोवरा कसा कधी इथे, कधी तिथे, गरगरा एका पायावर फिरत राहतो, तसं नोकरी करणारी स्त्री सकाळी घर ते ऑफिस, संध्याकाळपर्यंत ऑफिस आणि रात्री पुन्हा घर, अशी नित्य नियमानं, वर्षांनुवर्ष फिरत राहते. हा भोवरा आठवड्याच्या शेवटी थोडा हळू आणि एरवी वेगात फिरत राहतो. सतत काहीतरी काम करत राहिल्याशिवाय भागत नाही. कोणतीही गोष्ट आरामात, शांतपणे अनुभवता येत नाही. त्यामुळे गरागरा फिरणाऱ्या भोवऱ्याची ऊर्जा शेवटी संपते आणि तो थांबतो, तसं एका क्षणी नोकरी करणाऱ्या स्त्रीलाही ‘आता नाही होणार माझ्याकडून,’ असं गलित्रगात्र व्हायला होतं. पण तिचा आवाज आपापल्या दैनंदिन वेळापत्रकात व्यग्र असणाऱ्या कुटुंबातल्या कोणालाच ऐकू येत नाही. आणि तिच्या लक्षात येतं, की तिचा आवाज ऐकणारं कोणीच नाहीये. त्यातूनच हळूहळू तिच्यात एकटेपणाची बिजं रुजायला लागतात.

मेघा माहिती तंत्रज्ञान कंपनीत होती. तिनं करिअरचा ‘ग्राफ’ छान मॅनेज केला होता. असं असतानाही ती उदास दिसायची. तिचा मुलगा आता दहावीला गेला होता. नववीत त्याला एकदमच कमी गुण मिळाल्यावर ती खूप रागावली. तो फाडकन तिला म्हणाला, ‘‘तू तर काही बोलू नको गं! तुला कधी वेळ असतो का माझ्या अभ्यासात मदत करायला? बाकीच्यांच्या आया कसा मुलांचा अभ्यास घेतात..’’ बाजूला जप करत बसलेली सासू त्यात भर घालत म्हणाली, ‘‘नोकरी करावी गं मेघा; पण आधी घर, मुलबाळ, हेच तुझं कर्तव्य आहे. थोडं कमी काम करत जा.’’ ‘आयटी’त नोकरी करताना आठ-नऊ तास अपुरे पडतात. त्यात कमी काम करायला वावच कुठे! पण हे सासूबाईंना सांगूनही पटणारं नव्हतं. तिचा मुलगा आज आपल्या अपयशाचं खापर तिच्यावर फोडत होता. सासूबाई कुटुंबाचा ‘प्रवक्ता’ होऊन कुटुंबाची नाराजी दाखवत होत्या. सगळं जग तिच्याविरुद्ध उभं आहे आणि ती एका टोकावर एकटी उभारून लढत आहे, असं तिला वाटू लागलं होतं. पण ती एवढं का आणि कुणाशी लढत आहे हेच तिला समजत नव्हतं. जीवाची पराकाष्टा करूनही फक्त नाराजीच पदरी पडत होती.

आता चाळिशीत असणाऱ्या पिढीला कामाच्या ठिकाणी ‘जमत नाही’ किंवा ‘मला शक्य नाही’ असं म्हणणं जीवावर येतं. त्यामानानं २५ ते ३० या वयात असणारी पिढी ‘वर्क लाईफ बॅलन्स’- म्हणजे काम आणि वैयक्तिक जीवनाचा समतोल साधण्यात पटाईत आहेत. विशेष म्हणजे अनेकदा वरिष्ठही त्यांना बोलायला धजावत नाहीत. मेघाला हा ‘वर्क लाइफ बॅलन्स’च साधायला शिकावं लागणार होतं. ऑफिसमध्ये ठामपणे आपल्या वैयक्तिक आयुष्यातली सध्याची गरज तिला सांगता यायला हवी. दुसरीकडे मुलगा चिडचिड करत आरोप करत असला, तरी त्याला आई हवी आहे, ही नोंद घेण्याजोगीच गोष्ट नाही काय!

पूर्णवेळ गृहिणी करत असलेली सगळी कामं, बरोबरीनं ऑफिस, मुलांचा अभ्यास, हे सगळं आपल्याला विनासायास जमावं ही अपेक्षाच चूक आहे! बायकांनाही हे कळतं. आता पूर्वीसारखा ‘सुपरवूमन’ होण्याचा सोस त्यांना नाही. पण गेल्या १०-१५ वर्षांत कामाच्या ठिकाणाचा धबडगा आणि कामाचे तास वाढत चालले आहेत. त्यामुळे त्यांचाही नाईलाज होतोय. गृहिणीचं घरातलं योगदान हे जर त्यांनी घराला दिलेला वेळ आणि त्यासाठी केलेले कष्ट असतील, तर नोकरी-व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया घरासाठी पैसा कमवून आणतात, हे लक्षात घेऊन त्यांची तुलना गृहिणीशी करणं योग्य नाही. याची जाणीव कुटुंबाला आणि नातेवाईकांही ठेवावी लागेल. वेळोवेळी त्यांच्या मेहनतीची कदर केली पाहिजे. मुख्य म्हणजे ‘मला समजून घेणारं कुणी नाही’ या भावनेची पुनरुक्ती होत होत अखेर त्यांना एकटं आणि एकाकी वाटणं कमी होईल.

बँकेत काम करणारी सुषमा समुपदेशनाच्या सत्रात सांगत होती, की ‘‘इतकी वर्ष नोकरी केल्यावर काहीतरी हरवल्यासारखं आणि हातातून सुटल्यासारखं वाटतंय.. खूप एकटं-एकटं वाटतंय. कोणाशीच ‘कनेक्टेड’ असल्याचा ‘फील’ येत नाही.’’ तिला जेव्हा विचारलं, की तिला काय हवंय किंवा काय केलं तर बरं वाटेल असं वाटतं? तेव्हा ती म्हणाली, ‘‘कदाचित फक्त शांत बसल्यावर, निष्क्रिय राहिल्यावर बरं वाटेल.’’ मी विचारलं, ‘‘मग त्यात काय अडचण येते?’’ ती म्हणाली, ‘‘कोणी मला मोकळं सोडतच नाही! सणवार, आजारपण, पाहुणे, यातच माझी रजा संपते. मग मला काही न करता नुसतं बसून उगीच काही तरी विचार करायला वेळच राहात नाही.’’ मी म्हटलं, ‘‘हे बघ सुषमा, तुला काय हवंय तुला कळतंय, पण वळत नाहीये! सातत्यानं जशी परिस्थिती येते, त्याला गेली कित्येक वर्ष तोंड देते आहेस. पण आपल्याला त्या त्या परिस्थितीत काय वाटलं, नेमक्या कोणत्या भावना आपण अनुभवल्या, याचं प्रोसेसिंग करणं गरजेचं आहे. एखाद्या सहकाऱ्याशी भांडण झालं असेल, तर आपण नंतर थंड डोक्यानं विचार करतो आणि ठरवतो, की ‘जाऊ दे! झालं गेलं विसरून जाऊ या. होतं असं एखाद्या वेळी.. एरवी किती वेळा मदतीला तोच आलेला असतो.’ यालाच म्हणतात ‘प्रोसेसिंग’. मग त्या प्रसंगाचा ताण मनातून निघून जातो. पण अशा परिस्थितीविषयी विचार करायला तुला निष्क्रिय बसायचंय. मनात रुतून बसलेले असे अनेक किस्से निकाली काढायचे आहेत. अशा प्रोसेसिंग न केलेल्या भावनांचा डोंगर साठला, की आपल्या डोक्यात गोंधळ उडतो. डोळ्यांत पाणी येतं. तू स्वत:शीच जोडली गेलेली नाहीस. तिथे तुला दुसऱ्यांशी ‘कनेक्ट’ होणं कसं जमेल?’’ सुषमाला ‘युरेका’सारखं वाटलं. ती म्हणाली, ‘‘अगदी खरं आहे! माझ्यातली ‘मी’ हरवली आहे आणि तिला शोधायला हवं. सगळ्यांचं सगळंच नीट करता येणार नाही हे समजून घ्यायला हवं. डोक्यात गोंधळ उडालेला असताना कोणत्याच नात्याला न्याय देता येत नाही असं वाटतं म्हणून मला एकटं वाटतं.’’ अशा परिस्थितीत आपण नेहमी सुट्टीच घेऊन, कुठेतरी जाऊन स्वत:शी संवाद साधायला पाहिजे असं नाही. दिवसभरात झोपायच्या आधी किंवा दहा मिनिटं लवकर उठून स्वत:शी बोलायला वेळ काढायला हवा, हे मात्र नक्की!

हेही वाचा – ‘तुमचं आणि आमचं सेम ‘केमिकल’ असतं..’

दर तीन वर्षांनी बदली होणाऱ्या स्त्रियांची परिस्थिती वेगळीच असते. मुलं लहान असेपर्यंत किंवा नवरा-बायको दोघांचीही सरकारी नोकरी असेल, तर एकत्र बदली होऊन निदान बदलीच्या गावी कुटुंब तरी सोबत असू शकतं. पण जेव्हा एकटी स्त्री सरकारी नोकरीत उच्च पदावर असते, तेव्हा तिच्या बदल्या होत राहतात. तिनं आणि कुटुंबानं हे सगळं स्वीकारलेलं असतं. अधिकार, सत्ता, पैसा सुरुवातीला पुरतही असेल, पण मिळालेल्या क्वार्टरमध्ये रोज एकटं राहायचं, हे भयानक असतं. दिवस कामात निघून जातो. पण मुलं-नवरा अशा जबाबदाऱ्या असतानाही ‘बॅचलर’सारखं रोजचं आयुष्य जगणं त्यांच्यासाठी अवघड असतं. कामाच्या बोजातून बाहेर पडल्यावर त्यांनाही इतर आयांसारखी आपल्या लेकरांची चिवचिव ऐकावीशी वाटत असेल, त्यांना भरवावंसं वाटत असेलच की! दर वेळी नवीन ऑफिस, नवीन लोकांना सामोरं जाणं, तिथलं राजकारण समजून घेऊन त्यात स्वत:ला ‘फिट’ करणं आव्हानात्मक असतं.

लहानमोठी कशीही नोकरी असो, आपण जर घोळक्यात राहूनही स्वत:शी संवाद साधू शकलो, तर आपल्या व्यग्र वेळापत्रकात आपण हरवून जाणार नाही. नातेवाईकांच्या प्रत्येक कार्यक्रमाला जाता येणं शक्य नाही, पण महत्त्वाच्या चांगल्या-वाईट प्रसंगाला जाणं, निदान फोनवरून संपर्क ठेवणं, हे करता आलं तरी तुमचाही मूड चांगला राहील. पर्यायानं तुम्ही तुमच्या इतर नात्यांना योग्य न्याय देऊन सगळ्यांशी जोडलेले राहाल. मग नोकरीच्या व्यापातून येणाऱ्या एकटेपणाचं व्यवस्थापन तुम्हाला नक्की जमू शकेल.

trupti.kulshreshtha@gmail.com