वर्षां गजेंद्रगडकर – varshapune19@gmail.com

जागतिकीकरण आणि त्यातून आलेलं सांस्कृतिक सपाटीकरण, यामुळे  वेगवेगळ्या समाजांची खास ओळख सांगणारे चेहरे हरवत चालले आहेत. समाज माध्यमांमुळे  प्रतिभा आणि बुद्धिमत्तेच्या तुलनेत दिखाऊपणा वाढत चालल्याचं जाणवतं आहे. ८० वर्षांच्या समृद्ध नृत्यप्रवासानंतर अमला शंकर आणि त्यानंतर समृद्ध नाटय़जीवन जगून ९५ वर्षांचे इब्राहीम अल्काझी नुकतेच हे जग सोडून गेले. काळाच्या पडद्याआड गेलेले असे प्रज्ञावंत, या सर्जनशील व्यक्तींची, त्यांच्या व्यासंगाची, कलेसाठी वा ज्ञानासाठी अवघं आयुष्य पणाला लावण्याच्या त्यांच्या समर्पणाची तुलनाही करता येऊ नये, असा काळ आला आहे का, याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे..

Kavadi for lord importance of kavadi price of a kavadi
लोक-लौकिक : ‘कवडी’मोल!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Babasaheb Ambedkar Marathwada University ,
नामविस्तारानंतर आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटलेली कशी?
When Is Bhogi Celebrated in 2025
भोगीचा सण केव्हा साजरा केला जातो? जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर…
Meta x gets rid of fact checkers
अग्रलेख : फेकुचंदांचा फाल्गुनोत्सव!
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!
chaturang article
स्थलांतरातून बहरलेली खाद्यसंस्कृती
Slower shahane  Middle class awareness Daily
लोक-लोलक: ‘स्लोअर शहाणे’च्या जाणिवांच्या प्रदेशात…

अमला शंकर गेल्या. १०१ वर्षांचं नृत्यमग्न आयुष्य उपभोगून गेल्या. ९२ व्या वर्षांपर्यंत नृत्याचे प्रयोग करणाऱ्या या बाईनं हे शतक पाहिलं. नुसतं पाहिलंच नाही; ते आतल्या डोळ्यांनी निरखलं, अनुभवलं आणि आपल्या परीनं सांस्कृतिकदृष्टय़ा घडवलंही.

त्यांचा जन्म १९१९ मधला, आता बांगलादेशात असलेल्या जेसोरचा.  वडील अक्षयकुमार नंदी हे सोन्याचे व्यापारी. व्यावसायिक माणूस असूनही उत्तम कलाजाणिवा असलेल्या वडिलांसोबत त्या अवघ्या अकराव्या वर्षी पॅरिसला गेल्या, ते उदय शंकर यांच्या नृत्यदौऱ्यात सहभागी होण्यासाठी. या प्रवासात अतिभव्य रंगमंच पाहिले, उत्कट रसिकता असलेले प्रेक्षक पाहिले, आणि प्रयोगांना  मिळणारा उदंड प्रतिसादही पाहिला. नृत्यकलेमध्ये त्यांना असणारा मनस्वी रस माहीत असल्यामुळे पुढे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी उदय शंकर यांच्या अलमोऱ्यातल्या (उत्तराखंड) नृत्य अकादमीमध्ये अमला यांना पाठवण्यासाठी त्यांच्या वडिलांचं मन वळवलं. (अमला शंकर यांच्या ‘सात सागरेर परे’ या पुस्तकाला नेताजींनी नंतर प्रस्तावनाही लिहिली. नेताजींचं हे कलाप्रेम आपल्याला फारसं परिचित नाही.) अलमोऱ्यातून सुरू झालेला अमलाजींचा नृत्यप्रवास नंतर अखंड  ८० र्वष चालू राहिला. उदय शंकर यांच्याशी विवाह केल्यानंतर त्यांच्यासोबत काही काळ अलमोऱ्यात, मग मद्रासमध्ये (आता चेन्नई) आणि नंतर कलकत्ता (आता कोलकाता) येथे ‘उदय शंकर डान्स अकादमी’द्वारा त्या अनेक पिढय़ांना नृत्याचं प्रशिक्षण देत राहिल्या. भारताच्या सांस्कृतिक राजदूत म्हणून उदय शंकर यांच्यासह युरोप प्रवासाची संधी त्यांना मिळाली. ‘वंग विभूषण’ हा पश्चिम बंगाल सरकारचा सन्मानही त्यांना मिळाला.‘कल्पना’ या उदय शंकर यांचीच निर्मिती असलेल्या चित्रपटाच्या त्या नायिका होत्या आणि २०१२ मध्ये वयाच्या ९३ व्या वर्षी या चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनासाठी त्या ‘कान चित्रपट महोत्सवा’तही उपस्थित राहिल्या.

अमला शंकर यांच्याविषयी मी लिहू-सांगू शकते, ते एवढंच. तेही वाचनातून ठाऊक असलेलं! खरं तर संगीत-नृत्यादी कलांची बाराखडीही मला अवगत नाही आणि तरीही अमला शंकर यांच्या जाण्यानं एक रुखरुख, एक अस्वस्थता मला जाणवते आहे. गेल्या ८-१० वर्षांत साहित्य आणि कलेच्या क्षेत्रात डोंगराएवढं काम करणारी अनेक माणसं गेली; दीर्घायुषी होऊन गेली. या सगळ्या प्रतिभावंतांच्या निधनानंतर त्या-त्या वेळी एक युग संपल्याच्या आणि पोकळी निर्माण झाल्याच्या प्रामाणिक आणि औपचारिक प्रतिक्रियाही व्यक्त झाल्या. साहजिकच अशाच प्रतिक्रिया अमला शंकर यांच्या मृत्यूनंतरही उमटल्या. त्यांच्या क्षेत्रातल्या, त्यांना ओळखणाऱ्या, कलेच्या विश्वातल्या त्यांच्या कामाचं महत्त्व जाणणाऱ्या आणि ते न जाणणाऱ्याही अनेकांचे उद्गार, लेख आणि मुलाखती वाचल्या, तेव्हा मला किंवा माझ्यासारख्या अनेकांना जाणवणारी अस्वस्थता गडद करणारे आणि गेल्या काही वर्षांपासून अस्पष्टपणे जाणवणारे प्रश्न सरसरून वर आले.

एखादा प्रज्ञावंत, प्रतिभावंत गेल्यानंतर रिकाम्या राहणाऱ्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनातल्या जागा भरून येणार नाहीत का? भरल्याच तर त्या कुठल्या रसायनानं भरणार आहेत? काळ अखंड वाहात असतो आणि भूतकाळाची जागा वर्तमान घेत असतो, ही वस्तुस्थिती असली, तरी आजचं आपल्या- भोवतीचं वर्तमान आपल्याला नेमक्या कुठल्या दिशेनं घेऊन चाललं आहे?

सांस्कृतिक वारसा म्हणून ज्याचा आपण उल्लेख करतो, तो केवळ शिळा-स्मारकं, मंदिरं किंवा संग्रहालयांशी जाऊन थांबत नाही. मागच्या पिढय़ांकडून पुढच्या पिढय़ांकडे संक्रमित होणाऱ्या जिवंत अभिव्यक्ती आणि परंपरांमध्येही हा वारसा सामावलेला आहे. सण-उत्सव आणि मौखिक परंपरांपासून प्रायोगिक कलांपर्यंत आणि हस्तकला आणि सामाजिक रीतिरिवाजांपासून निसर्गाविषयीचं ज्ञान आणि त्याच्या संवर्धनाच्या पद्धतींपर्यंत सगळ्या मूर्त-अमूर्त गोष्टीही तेवढय़ाच ताकदीनं सांस्कृतिक वीण कायम राखत असतात. शिवाय संस्कृतीच्या विविध अंगांचा अभ्यास करणारे किंवा कलेच्या रूपानं सांस्कृतिक जगाचं भरणपोषण करणारे, त्याची समृद्धी वाढविणारे अभ्यासक, कलावंत  अशा सगळ्यांच्या केवळ वाचता-बघता-अनुभवता येणाऱ्या कामापुरतं सांस्कृतिक वारशाचं महत्त्व सीमित नसतं. त्यांची प्रज्ञा, प्रतिभा, त्यांच्या प्रेरणा, त्यांच्याभोवतीचं सामाजिक, सांस्कृतिक, नैसर्गिक पर्यावरण, त्यांच्यावर झालेले कौटुंबिक व सामाजिक संस्कार, त्यांची अंतर्दृष्टी, मांडणी वा सादरीकरण करण्यामागचा त्यांचा विचार, या गोष्टी त्यांच्या अभिव्यक्तीइतक्याच, किंबहुना त्याहून थोडय़ा अधिक महत्त्वाच्या असतात. अभिव्यक्तीमागच्या या सगळ्या गोष्टी आणि अभिव्यक्त होण्याची नेमकी आणि सुस्पष्ट प्रक्रिया चरित्र, आत्मचरित्र किंवा मुलाखती आणि भाषणांमध्ये फार अभावानं नोंदवली जाते. कलांच्या प्रशिक्षणातही ती उमटतेच असं नाही. माणूस जातो तेव्हा तो सोबत काही घेऊन जात नाही, असं आपण म्हणतो. मूर्त गोष्टी राहतात मागे, हे खरंय; पण अमूर्त सगळंच तो घेऊन जातो. अभिव्यक्त न झालेलं केवढं तरी ज्ञान आणि त्या-त्या व्यक्तीची अतिशय वैशिष्टय़पूर्ण सर्जनप्रक्रिया त्याच्यासोबत लोप पावत असते. प्रतिभावंतांच्या मृत्यूमुळे निर्माण होणारी पोकळी भरून येणं अवघड असतं, ते यामुळे.

या अटळ कारणाखेरीजही काही गोष्टी आहेत. आज ज्ञानाची आणि कलेची क्षेत्रं फार वेगानं विस्तारताना दिसताहेत. ज्ञानाचे अनेक नवे प्रदेश खुले होताहेत आणि त्याची देवघेवही सुलभ झाली आहे. तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे अनेक कलांचा चेहरा उजळला आहे आणि नव्या कलांचा विकासही होतो आहे; पण या सगळ्याबरोबर आलेलं जागतिकीकरण आणि त्याच्या हातात हात घालून आलेलं सांस्कृतिक सपाटीकरण, या दोन्ही गोष्टींमुळे  ठिकठिकाणच्या समाजांची खास ओळख सांगणारे चेहरे मात्र हरवत चाललेले दिसत आहेत. अनेक विशुद्ध सांस्कृतिक परंपरांचा ऱ्हास झाला आहे किंवा त्यांचं प्रमाणीकरण तरी झाल्याचं दिसत आहे. लोकपरंपरांचं पुनरुज्जीवन करण्याच्या आवेगात अनेकदा त्यांचं भ्रष्ट रूप सादर होताना पाहण्याची वेळ आली आहे. समाजमाध्यमांमुळे नव्या, तरुण अभिव्यक्तीसाठी मुक्त व्यासपीठं उपलब्ध झाली असली, तरी अनेकदा ती ‘लाइक्स’च्या आकडय़ांमध्ये अडकून राहताना दिसते आहे. प्रतिभा आणि बुद्धिमत्तेच्या तुलनेत दिखाऊपणा वाढताना दिसत आहे. अनेकदा कमअस्सल

गोष्टी अस्सल म्हणून पुढे येताहेत. काळाच्या पडद्याआड गेलेले प्रज्ञावंत, सर्जनशील व्यक्तींची, त्यांच्या व्यासंगाची, आपापल्या क्षेत्रावरच्या त्यांच्या अपार निष्ठेची आणि कलेसाठी वा ज्ञानासाठी अवघं आयुष्य पणाला लावण्याच्या त्यांच्या समर्पणाची तुलना करता येऊ नये, असा कठीण कालखंड आज आपल्यासमोर उभा आहे का?  कोशाचे अवजड भारे स्वत: वाहून नेऊन विकणारे ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर असोत, चित्रकला हाच श्वास असणारे आबालाल रहमान असोत, मूकबधीरतेला बाजूला सारत भारतीय चित्रकलेला आणि शिल्पकलेला जगाच्या नकाशावर नेणारे सतीश गुजराल असोत, वयाच्या नव्वदीतही नृत्याचे प्रयोग आणि प्रशिक्षणात मग्न असणाऱ्या अमला शंकर असोत किं वा आधुनिक भारतीय रंगभूमीचा चेहरा उजळवणारे इब्राहीम अल्काझी असोत; अशा सगळ्याच प्रतिभा-प्रज्ञावंतांचं अस्तित्व कधी ना कधी तरी संपणार असतंच, पण अनेक शतकांच्या ज्ञानपरंपरा आणि कलापरंपरा विशुद्ध रूपात पुढे नेणारा वारसा अशा व्यक्तींच्या जाण्यानं विकल होताना दिसतो. संवेदनशील माणसांना अस्वस्थता येते ती यामुळे.

सृष्टिविज्ञानाच्या अभ्यासात ‘रिस्टोअर इकॉलॉजी’ आणि ‘रिप्लेसमेंट इकॉलॉजी’ अशा दोन संज्ञा आहेत. एखाद्या ठिकाणच्या नैसर्गिक पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर त्या ठिकाणी मूळ जीवशास्त्रीय समुदाय जेव्हा हळूहळू पुन्हा रुजतो, तेव्हा त्या परिसंस्थेचं पुनरुज्जीवन होतं. ही ‘रिस्टोरेशन’ प्रक्रिया आहे; पण अनेकदा त्या क्षेत्रात पूर्वीची स्थिती प्रस्थापित होऊ शकत नाही. त्याऐवजी संपूर्ण वेगळा, बदली समुदाय ती जागा व्यापतो आणि पहिल्या खुणा पार पुसून जातात. जंगल नष्ट होऊन तिथे नंतर तण वाढावं, अशी ही स्थिती असते. याला ‘रिप्लेसमेंट’ प्रक्रिया म्हटलं जातं. आजचा जागतिकीकरण, व्यापारीकरण आणि तंत्रज्ञानावरचं अवलंबन यांचा झंझावात बघताना सांस्कृतिक पर्यावरणाचे सगळे देशी विशेष पुसले जातील की काय आणि ती पोकळी एका रस-रंग-गंधहीन रसायनानं भरली जाईल की काय, असं अनेकदा वाटून जातं. आजची सर्जनशीलता नव्या रूपात, नव्या प्रकारे व्यक्त होते आहे, हे खरं; पण काळाच्या प्रवाहात नाहीशा झालेल्या विद्वान आणि कलासक्त पिढय़ांच्या रिक्त जागा सानंद भरून निघतील, इतकी ही निर्मिती सकस आणि गर्द आहे का, असंही येऊन जातं मनात. आज अर्थव्यवस्था, रोजगार, शिक्षण अशा विविध बाबतीत जगभरातल्या देशांची क्रमवारी ठरवणारे निर्देशांक प्रस्थापित आहेत. यातला आनंदीपणाचा निर्देशांक (‘हॅपिनेस इंडेक्स’)  माणसाच्या आनंद आणि समाधानाचा सूचक आहे. हे समाधान के वळ पोट भरण्यानं मिळत नाही. शिक्षण, रोजगार आणि दोन वेळचं जेवण हे माणसाच्या प्राथमिक गरजा पूर्ण करत असलं, तरी जगण्यात रस, रंग निर्माण करण्याचं काम कला-संस्कृतीच करत असते. त्याखेरीजचा समाज यंत्रवतच असेल.

अमला शंकर यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे, ‘‘नृत्याची गतिशीलता ही इतर कुठल्याही कलेइतकीच जगण्याच्या गतिशीलतेशी घट्ट जोडलेली आहे आणि नृत्य कुठल्याच अर्थी स्थितिशील नाही. ते प्रत्येक व्यक्तीनुसार, काळानुसार, देशानुसार आणि ऋतुमानानुसारही बदलतं. त्यामुळेच या कलेला एकच इतिहास नाही, अनेक इतिहास आहेत.’’ अमलाजींचे हे उद्गार सगळ्याच कलांना लागू आहेत. मात्र, सांस्कृतिक सपाटीकरणाच्या रेटय़ात हे वेगवेगळे इतिहास पुसले जाऊन आणखी पन्नास-शंभर वर्षांनी संपूर्ण जगाचा, एखाद्या ओसाड पठारासारखा एकच इतिहास उरेल का? आपली बुद्धी, प्रतिभा, सर्जनशीलता यांचं सेंद्रिय भरणपोषण करून, पिढय़ान्पिढय़ा फळत  राहणारी बहुप्रसवा, समृद्ध भूमी आपण पुन्हा तयार करणार आहोत की नाही? फक्त बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या आजच्या व्यावहारिक जगानं निष्ठा, तप, समर्पण या गोष्टींना श्वास घेण्यासाठी जागाच ठेवलेली नाही, हे खरं; पण हे जग बदलणंही आपल्याच हातात नाही का? आपली मूठभर शक्ती आणि बुद्धी आपण जंगल निर्माण करण्यासाठी वापरणार की वाळवंट वाढविण्यासाठी?  आपण विचार करायला हवा. खरंच करायला हवा..

Story img Loader