सोळाव्या शतकातल्या प्रमुख उडिया स्त्री-संतांपैकी माधवी दासी ही सर्वात पहिली संत कवयित्री. चैतन्य परंपरेत तिचा उल्लेख आढळतो खरा; पण तो तिचा संपूर्ण माणूस म्हणून स्वीकार न करणारा आहे. श्री चैतन्य चरितामृत या प्रसिद्ध ग्रंथात साडेतीन संत प्रसिद्ध आहेत, असा उल्लेख आहे. त्यातली अर्धी माधवी दासी. माधवी स्त्री होती म्हणून ती ‘अर्धजन’!
पुरी जिल्ह्य़ातल्या बेन्तापूर नावाच्या लहानशा खेडय़ात ती जन्मली. तिचं नाव माधवी दासी. माधवी दासी, वृंदावती दासी आणि प्रिया दासी या पंधराव्या- सोळाव्या शतकातल्या प्रमुख उडिया स्त्री संत. त्यांच्यापैकी माधवी दासी ही सर्वात पहिली संत कवयित्री. वैष्णव परंपरेतले पुरुष संत ते दास आणि स्त्री संत त्या दासी. तशी माधवी ही भक्त स्त्री होती, म्हणून दासी होती.
प्रसिद्ध वैष्णव संत राय रामानंदांची ती नातलग होती. मुरारी मोहन्ती आणि शिखी मोहन्ती हे तिचे दोघे सख्खे भाऊ जगन्नाथाच्या सेवेत होते. यामुळे कुटुंबाकडे देवाची सेवा परंपरेने चालत आली होती. माधवीही जगन्नाथाची भक्त होती. बलराम आणि सुभद्रेसह तो द्वारकेचा राजा पश्चिम समुद्रावरून थेट पूर्व समुद्रापाशी येऊन उभा राहिला आहे, याची तिला अपूर्वाई वाटत होती.
तिच्या जगन्नाथ भक्तीला कृष्णभक्तीचा विशेष रंग चढवला तो महाप्रभू चैतन्यांनी. ते बंगालमधून पुरीला येऊन राहिले आणि त्यांच्या शिष्टमंडळात शिखी मोहन्ती आणि माधवी दासी हे दोघे बहीण-भाऊ दाखल झाले. चैतन्यांच्या चौघा अंतरंग शिष्यांपैकी ते दोघेही गणले जाऊ लागले. मात्र चैतन्यांनी माधवी दासीचं मुखदर्शन कधी घेतलं नाही. स्त्रियांना त्यांनी कायमच दूर ठेवलं. त्यांच्या एका शिष्यानं एकदा माधवी दासीच्या घरून आणलेली खीर त्यांना खाऊ घातली. पण ती खीर कुठून आली हे समजलं तेव्हा चैतन्य त्या शिष्यावर कमालीचे नाराज झाले आणि काही दिवस पुरी सोडून प्रयागला जाऊन राहिले.
माधवी दासी या उपेक्षेने खंतावली. त्यांची नुसती झलक मिळाली तरी माणूस मोक्षाला जाईल. माझंच दुर्दैव की मला त्यांचं दर्शन घेता येत नाही, अशा भावनेनं ती व्याकूळ झाली. तिच्या पदांमधून ती व्याकुळताही सहज व्यक्त होत गेली.
माधवी दासी बुद्धिमान तर होतीच पण संवेदनशीलही होती आणि प्रतिभावानही होती. तिची बुद्धिमत्ता आणि प्रतिभा जाणून तत्कालीन राजा प्रतापरुद्रदेवाने तिला जगन्नाथ मंदिराची पंजी लिहिण्याचे, म्हणजे नित्यविधींचे तपशील लिहिण्याचे अधिकार दिले. त्याच्या दरबारात तिला मानाचं स्थान होतं. तिच्या स्तुतीचे श्लोकही उडिया भक्तांनी आणि कवींनी नंतर रचले आहेत.
माधवी दासी स्त्री होती आणि स्त्री असण्यामुळे जन्मजातच तिच्या मर्यादा ठरून गेल्या होत्या. चैतन्य परंपरेत तिचा उल्लेख आढळतो खरा; पण तो तिचा संपूर्ण माणूस म्हणून स्वीकार न करणारा आहे. श्री चैतन्य चरितामृत या प्रसिद्ध ग्रंथात राधा-माधवाची महती गाणारे साडेतीन संत प्रसिद्ध आहेत, असा उल्लेख आहे. त्यातले एक स्वरूप गोसावी, दुसरे राय रामानंद, तिसरे शिखी मोहन्ती आणि अर्धी माधवी दासी. माधवी स्त्री होती म्हणून ती ‘अर्धजन’ होती.
माधवी दासीने मात्र आपल्या सगळ्या निष्ठा चैतन्यांना वाहिल्या होत्या. तिच्यासाठी चैतन्य म्हणजेच जगन्नाथ. चैतन्य म्हणजे कृष्ण. या देवासाठी तिनं किती तरी काव्यरचना केल्या. तिनं वज्रबोलीत गीतं रचली, तिनं बंगालीत गीतं रचली आणि तिनं उडिया भाषेतही पदरचना केली. आजमितीला तिचं सर्व काव्य उपलब्ध झालेलं नाही. पण जे उपलब्ध आहे ते रचना सामर्थ्यांनं महाराष्ट्रीय संत कवयित्रीचं स्मरण करून देणारं आहे. तिची रचना गोड आहे, प्रासादिक आहे आणि सुघड आहे. शब्दांची अचूक निवड हे तिचं सामथ्र्य आहे.
आंदळासारखीच माधवी दासी प्रेम गाणारी कवयित्री आहे. राधा-कृष्णाच्या रागानुरागाची काव्यं तिनं लिहिली आहेत. माधुरी दासी या नावाने प्रसिद्ध झालेली पदंही तिचीच असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. ते प्रमाण मानायचं तर आध्यात्मिक जाणिवेत जगन्नाथ म्हणजे निर्गुण, निराकार अशा परब्रह्माचं रूप आहे. प्रेमाचं आणि एकात्मतेचं सगुणसाकार रूपही तेच आहे. म्हणून ती ईश्वराची स्तुती गाते, म्हणजेच जगन्नाथाची स्तुती गाते, कृष्णाची स्तुती गाते आणि कृष्णरूप चैतन्यांचीही स्तुती गाते.
उत्कल वैष्णव पंथ आणि गौडीय वैष्णव पंथ यांचा मिलाप तिच्यात झाला आहे. सातशे वर्षे उडिया साहित्य परंपरेत तिची पदं टिकून आहेत ती त्यामुळे. नवविधा भक्तीचे सगळे उत्कट रंग माधवी दासीच्या काव्यात उतरले आहेत. आंदळा आणि मीरेप्रमाणेच तीही कृष्णप्रिया आहे. राधा हृदय मिरवणारी आहे. प्रियतम कृष्णाच्या विरहाची वेदना, त्याच्या स्मृतींनी एकाच वेळी आनंद आणि दु:खं यांचा येणारा अनुभव आणि भेटीनं होणारी परम तृप्ती प्रकट करणारी किती तरी भावकोमल आणि संगीतपूर्ण अशी गीतं माधवी दासीनं लिहिली आहेत. दिव्य अशी समर्पण भावना हा तिच्या रचनेचा गाभा आहे.
हे ईश्वरा जनजीवना
मी शरण आले रे तुला
ऐक माझ्या हृद्गताला
भक्ततारक बरसला!
द्रौपदीला वस्त्र देशी
तू अहल्या तारिशी
दिव्य तू, लीला तुझ्या, मी
मानुषी वर्णू कशी?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा