रेणू दांडेकर
इथे सगळ्यांसाठी एकच अन्न शिजते, सगळे एकत्र जेवतात. मोठ्ठं मैदान, हिरवीगार शेती, पर्वतारोहणाची जागा, ग्रंथालय, प्रयोगशाळा, सुतारकाम कक्ष, संगणक व प्रोजेक्शन कक्ष आणि उघडे-मोकळे आकाश ही ‘मरुदम’ची ओळख आहे. शिकणं सर्जनशील कसं होईल, हा इथल्या प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे. तमिळनाडूमधल्या तिरुअन्नमलाई येथील ‘मरुदम फार्म स्कूल’ या प्रयोगशील शाळेविषयीचा हा उत्तरार्ध..
‘मरुदम’ या निसर्गशाळेच्या स्थापनेची अनोखी कथा आपण लेखाच्या पूर्वार्धात (१६ नोव्हेंबर) वाचली. निसर्गात आणि निसर्गाबरोबर काम करणे, हा समृद्ध विचार इथे प्रत्येक शिक्षक-विद्यार्थ्यांच्या मनात रुजलाय. हा विचार कृतीत आणताना ‘मरुदम’ची संस्थापक टीम सतत मुलांबरोबर असते, आहेच. काही शिक्षक स्थानिक आहेत, तर काहींनी परदेशातून इथे येत अध्यापनाचे काम स्वीकारले आहे.
निसर्गात वेगवेगळ्या प्रकारचे काम करणारी माणसंही इथे शिकतात. इथला हा शिक्षक संच २५ जणांचा आहे आणि मुलं आहेत सुमारे १२५. मुलं आणि शिक्षक हे प्रमाण जवळजवळ ५:१ असं आहे. आपल्या तुलनेत इथली मुले भाग्यवानच म्हणायला हवीत आणि हो, पौर्णिमा अक्का आणि अरुण अण्णा यांची मुलंही इथंच शिकतात. अनेक मुलं आणि कार्यकर्ते शेतावरच राहतात. निसर्गाची शाश्वतता, त्यावर विचार करणारी संवेदनशील माणसं, यांनी एखादी शाळा सुरू करण्याला नक्कीच वेगळा अर्थ आहे. निसर्गातच राहणं, हाताने काम करत-करत शिकणं, यातून कौशल्यविकास, अंतिमत: शिकण्यातून आनंद, ही या शाळानिर्मितीमागे असणारी मध्यवर्ती कल्पना आहे. सगळे जण एकत्र वावरतात, सगळ्यांसाठी एकच अन्न शिजते, सगळे एकत्र जेवतात. स्थानिक स्त्रिया जेवण बनवतात. थोडक्यात, मोठ्ठं मैदान, हिरवीगार शेती, पर्वतारोहणाची जागा, ग्रंथालय, प्रयोगशाळा, सुतारकाम कक्ष, संगणक व प्रोजेक्शन कक्ष आणि उघडे-मोकळे आकाश ही ‘मरुदम’ची ओळख आहे.
इथे अनेक विषयांवर गटात चर्चा होते. मुलं चटईवर बसतात नि लिहायला लहानसे डेस्क वापरतात. वय वर्षे तेरानंतरची मुलं काहीशी वर्ग पद्धतीनं शिकतात; पण सामान्यत: बारावीपर्यंतची मुलं वेगवेगळ्या सात क्षेत्रांत शिकतात. प्रत्येक गटाला एक, असा त्या विषयाचा शिक्षक असतो. त्याची भूमिका काहीशी निवेदकाचीही असते. एक त्याला मदत करणारा शिक्षक असतो. याला ‘अँकर टीचर’ म्हटलं जातं. तो अभ्यासक्रम बघतो. कोणत्या पद्धतीनं शिकवायचं हे तो ठरवतो. कोणती आणि काय-काय साधनं वापरायची ते ठरवतो. मदतनीस शिक्षक त्याला मदत करतो. ही साधनंसुद्धा मुलांची गरज लक्षात घेऊन तयार केली जातात.
अशा शाळेत शिकवले जाणारे विषय वेगळेच असणार. इथे बांधील वेळापत्रकही असणारच नाही. इथली मुलं वर्गात कमी नि मुक्त वातावरणात जास्त वेळ असतात. आपल्याला काय आवडतं, कशाची गोडी आहे, याचा विचार करायची एक नैसर्गिक सवयच जणू मुलांना लागली आहे. मला काय समजलं नाही, मी कुठे अडलोय, याचा विचार करून ते समजून देण्याविषयीची मागणी मुलं शिक्षकांकडे करतात. ही मुलं खूप ठिकाणांना भेटी देतात, देशभर फिरतात, खूप वाचतात, चर्चा करतात. म्हणूनच यांचं व्यक्तिमत्त्व वेगळं घडतंय.
मुलं विविधांगी विकास करणाऱ्या सात क्षेत्रांत काम करतात. पहिलं क्षेत्र आहे निसर्गकार्य आणि भूकार्य (नेचर वर्क अॅन्ड लॅन्ड वर्क). हे क्षेत्र खूप व्यापक आहे. शेती, लागवड, पिकं घेणं, सेंद्रिय शेती, उत्पन्न अशा अनेक गोष्टी प्रत्यक्षात करून शिकतात. शाळेला लागणारं जवळजवळ ८० टक्के उत्पन्न शेतीतून काढले जाते. दुसरं क्षेत्र आहे शरीर आणि आरोग्य. यात शरीराला आवश्यक असणारे अन्न, त्याची गुणवत्ता, आहार, लैंगिक शिक्षण, शरीराची काळजी, आजार, शारीरिक शिक्षण, व्यायाम इत्यादीचा समावेश आहे. तिसरं क्षेत्र आहे सामाजिकत्व किंवा परस्परांशी असणारी नातेबांधणी. इथे येणारी मुलं वेगवेगळ्या पार्श्वभूमींतली, गावांतली, स्तरांतली, देशीविदेशी असल्याने या क्षेत्राचा आवाका खूप मोठा आहे. एकत्र येऊन सर्वासाठी सर्वानी काम करण्याचे धडे इथे मुलांना मिळतात.
चौथे क्षेत्र आहे विचारप्रक्रिया आणि सजग मानसिक प्रक्रियात्मक क्षेत्र. यात गणित, विज्ञान, भाषा यांचा अंतर्भाव होतो. इथे मुलांमधली सर्जनशीलता आणि निर्मितीक्षमता यांचा विचार केला जातो. पाचवे क्षेत्र आहे समाजविज्ञान. यात मनुष्याचं अस्तित्व समजणं, मानवी वाढ आणि विकास जाणणं, स्थानिक इतिहासासोबतच ग्राम इतिहास, भारताचा इतिहास, जागतिक इतिहास, अशी व्यापकतेकडे नेणारी मांडणी आहे. भूगोलही असाच व्यापक आहे. शाळेचा भूगोल, परिसराचा, गावाचा, शहराचा, राज्याचा, देशाचा, परदेशाचा भूगोल, मुलं प्रत्यक्ष पाहून शिकतात. सहावे क्षेत्र आहे कला आणि कारागिरी. आठवडय़ातून तीन तास गणिताला दिले जातात, तसेच तीन तास कला-कारागिरीसाठी दिले जातात. गणिताइतकेच महत्त्व कलेला दिले जाते. शिवणकाम, कागदकाम, चित्रकला, मुखवटे, भेटकार्ड, मातीकाम, ज्वेलरी मेकिंग असे किती तरी प्रकार यात आहेत. एक आठवडय़ाचा ‘कलोत्सव’ साजरा होतो. यात इतर मुलंही सहभागी होतात. कपडे शिवणे, मातीच्या वस्तू बनवणे, नृत्य प्रकार, संगीत, नाटय़ यांबरोबर विविध प्रदर्शनेही आयोजित केली जातात. कलांशी नातं तुटत चालल्यानं आनंदाशी असणारे भावबंधही संपत आलेत. कलेला आवश्यक ते महत्त्व दिले जात असल्याने मुलांना अनेक गोष्टी माहीत होतात.
आजचं पुस्तकी शिक्षण मुलांमधलं नैसर्गिक कला-कौशल्य मारून टाकतंय. म्हणूनच ‘मरुदम’ लोककलांचा परिचय मुलांना देते, मुलांची आवड समजून संधी देते, यातून मी कोण आहे नि मुलांना काय-काय करता येते, याचीही जाणीव मुलांना होते. हातानं काम करणं, कलाकौशल्यातून व्यक्त होणं, ही मानवाची मोठी गरज आहे. ती गरज इथल्या कलाकारागिरी शिक्षणानं पूर्ण होते. सातवे क्षेत्र आहे वर्तमानाचा किंवा सद्य:स्थितीचा अभ्यास. यात पर्यावरण, पाणी, स्वच्छता, आरोग्य, प्लास्टिक अशा क्षेत्रांतल्या अनेक समस्या जाणून घेऊन मुलं अभ्यास करतात.
हे सगळं कसं घडतं, असा प्रश्न मलाही पडला. इथे इतर शाळांत असतात तशा इयत्ता नाहीत. मुलांच्या आकलन पातळीनुसार त्यांचे गट पाडले जातात. मुलं गटात काम करतात. त्यामुळे मुलांना अनुभवातला आनंद मिळतो. मुलं अत्यंत उत्साही असतात. मुख्य म्हणजे मुलांना असणारं नि इथल्या अवकाशात भरून राहिलेलं स्वातंत्र्य. इथल्या कामात एक स्वत:ची लय आहे. शिकणं हे मुलांच्या गरजा, अपेक्षा, आवड यांच्याशी बांधलं गेलंय.
शिकवण्यासाठी कोणत्याही ठरावीक पदवीची गरज नाही, असे ‘मरुदम’ला वाटते. मला जे चांगलं येतंय, जे मी देऊ शकतो, ते मी करेन. इथे अभियंता असलेले शिक्षक आहेत, इथे परदेशातून आलेले शिक्षक आहेत. मला प्रश्न पडला, की किती जण बाहेरच्या पगाराच्या आशेने सोडून जातात? यावर पौर्णिमा म्हणाल्या, ‘‘सुदैवाने इथे तसे नाही. संस्था सुरू झाल्यापासून इथे आलेली माणसे गेली १४ वर्षे इथेच रमली आहेत.’’
शिक्षकांना कसं तयार केलं जात असेल? कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण मिळत असेल? असे साहजिक प्रश्न मलाही पडले. मला वाटतं, ही जी चार माणसं आहेत त्यांच्या विचारांच्या, कामांच्या, भावनांच्या सहवासातून इतर जण खूप काही शिकत असावेत. इथे दर आठवडय़ाला सर्वाची सभा आणि एक कार्यशाळा होते. कोण घेतं ही कार्यशाळा? कुठे जावं लागतं का इथल्यांना? याचं उत्तर ‘नाही’ असं आहे. इथलेच शिक्षक, स्वयंसेवक, इतर कार्यकर्ते आणि मुलं, ही कार्यशाळा घेतात. काय करायचं, कसं करायचं यासह त्याचे परिणाम, गरज यावर या कार्यशाळेत विचारमंथन होतं. कला, सर्व क्षेत्रांत समोर येणाऱ्या नवनव्या संकल्पना, यावर इथे चर्चा होते. शिकणं सर्जनशील कसं होईल, हा इथल्या प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे.
‘निसर्ग देतो म्हणून ओरबाडू नका, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, निसर्ग अनेक तत्त्वं सांगतो. ती मनापासून ऐका,’ अशा विचारावर अजून तरी ही शाळा उभी आहे. हे शिकण्याची प्रयोगशाळा म्हणजे इथे प्रत्येक मुलाला दिला जाणारा शेतीचा तुकडा. इथे सगळे एकमेकांशी एका निर्मिताच्या सूत्रात बांधले गेलेत.
शाळेचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे, इथे मुलांना जो मुक्त अवकाश दिला जातो त्यामागे एक सखोल विचार आहे. याला इथे ‘सर्कल टाइम’ म्हटलं जातं. सॉक्रेटिसच्या काळात त्यांचे अनुयायी त्यांच्यासमवेत गोलाकार बसत असत. त्यांच्यात प्रश्नोत्तरे होत असत. यातूनच वेगळ्या तत्त्वज्ञानाचा जन्म झाला. म्हणूनच इथल्या अशा बैठक व्यवस्थेला हे नाव दिलं गेलंय.
असा तत्त्वज्ञ, त्या तत्त्वज्ञानाच्या त्याच्या संकल्पनांचं मोल ओळखणं, त्या प्रत्यक्षात आणणं, हेसुद्धा वेगळं आहे.. नि अगदी इथल्या रचनेला तंतोतंत लागू आहे. म्हणूनच अशा गोष्टी वेगळ्या ठरतात. नेहमीच्या यंत्रणेतल्या गोष्टी इथे नसतातच; पण त्याऐवजी जे असते ते वेगळे असतेच. यामुळे मुलांच्या जगण्याला वेगळी दिशा मिळते. वेगळा विचार करणारी ‘मरुदम’ इथल्या सर्वामध्येच स्वामित्वाची, ‘हे माझं आहे’ ही आपलेपणाची भावना निर्माण करते.
आपण सगळे एक तर आहोतच; पण निसर्गाचा एक भागही आहोत. त्या निसर्गाला एकसंध ठेवण्यासाठी, जपण्यासाठी शाळा निर्माण व्हावी ही केवढी वेगळी घटना आहे.. म्हणूनच अनेक शंका मनात असल्या तरी ‘मरुदम’च्या रूपानं गेली १९ वर्षे जे चाललंय, जे सहजसाधं, विधायक काम सुरू आहे ते एकूण समाजाच्या भवितव्यालाच वेगळी दिशा देणारं आहे, हे नक्की.
शाळेचा पत्ता : मरुदम फार्म स्कूल.
पूर्णिमा अक्का आणि अरुण अण्णा,
लीला आणि गोविंदा / कनथंबपुडी गाव/
सथनुर डॅम रोड जवळ/ तिरुअन्नमलाई
तमिळनाडू (६०६६०१).
ईमेल आयडी – http://www.maruthamfarmschool.com
aruntree@gmail.com
renudandekar@gmail.com
chaturang@expressindia.com