डॉ. शुभांगी पारकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रचंड प्रेमात असलेल्या व्यक्ती संसारात पडल्या की प्रेमाची नशा कमी कमी होऊ लागते. तसंच ब्रेकअपचंही आहे. प्रेमभंगाची वेदना ही जीवघेणी असू शकते, पण तुमच्या आयुष्याचा तो शेवट असूच शकत नाही. कदाचित तुम्हाला नव्यानं शोधणारं तुमच्या आयुष्यातलं ते शानदार वळण असू शकतं..

दोन व्यक्तींमधले प्रेमाचे बंध तुटल्यानं अनेकांच्या आयुष्यात भावनिक भूकंप येतो. शोक आणि राग हे या जबरदस्त आघाताचे सामान्य आणि निरोगी प्रतिसाद असतात. हृदयात खोलवर दर्दभरी कळ तुमच्या भंगल्या प्रेमाचा पुरावा तुम्हाला देत राहाते. प्रेमभंगातून निर्माण झालेली मन:स्थिती आणि भावनिक उद्रेक हा अगदी खराखुरा असतो.

  अशा वेळी अनेक मित्रमंडळी आणि सगेसोयरे तुम्हाला एक उपयोगी सल्ला देत असतात, की ‘जे झालं ते विसर, आता तू पुढे जायला पाहिजेस’. असा सल्ला कोणी दिला आणि आपल्याला वाटलं म्हणून प्रेमाच्या जखमा आपण कधी विसरू शकतो का? वाटतं इतकं हे संभव नाही. या जखमा अनेक व्रण मागे सोडतात. ब्रेकअपमध्ये एखादी व्यक्ती आपल्या प्रिय व्यक्तीलाच गमावत नाही, तर या प्रणयी द्वयीतील एक भाग म्हणून आपलं अस्तित्वच गमावल्याचा अनुभव घेत असते. बऱ्याच जणांना आपण जीवन जगायचा एक भावुक मार्ग हरवून बसलो आहोत असं वाटतं. या प्रीतीनं भारलेल्या नातेसंबंधाचा अंत होतो, तेव्हा आयुष्यही संपल्यासारखं वाटत राहातं. किशोरवयीन मुलांमध्ये जेव्हा ‘ब्रेकअप’ होतात, तेव्हा त्यांना पौगंडावस्थेतच तीव्र नैराश्याचा सामना करावा लागतो आणि त्याबरोबर येते ती आत्महत्येची भावना. संशोधनात असं दिसून आलं आहे, की पौगंडावस्थेतल्या पाचांपैकी एका मुलाला प्रेमभंगामुळे नैराश्य येतं, म्हणजे इतकं ते सामान्य आहे.

१६ वर्ष असलेले प्रेमसंबंध संपुष्टात आल्यावर ४० वर्षांची अ‍ॅना तिच्या भावनिक वेदना, तळमळत काढलेल्या रात्री, रसहीन आयुष्य आणि मनात दाटलेली धिक्काराची भावना, आत्महत्येचे विचार आठवले, की मन आजही कसं हळहळतं याचा अनुभव सांगते. ब्रेकअपनंतर काय विशिष्ट अनुभूती येते असं जरी सांगता आलं नाही, तरी काही सर्वसामान्य गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. यात चूक किंवा बरोबर असा अनुभवाचा अंदाज बांधता येत नाही, तरी दु:ख, गोंधळ, राग, द्वेष आणि कधी सुखदायक अशा सर्व प्रकारच्या भावना मनात येऊ शकतात. तुम्ही ब्रेकअपची सुरुवात केली असेल, तुमचा ब्रेकअप पूर्ण झाला असेल किंवा ते परस्परसंमतीनं असेल, पण त्या वेळी येणाऱ्या अगम्य विचारांचं आणि अतरंगी अनुभवांचं विचित्र स्वरूप तर्कशुद्ध मनालाही काही काळ बदलता येत नाही, हे खरं.

 ब्रेकअप ही एक प्रकारची भावनिक हानी आहे आणि त्यानंतरच्या काळात ब्रेकअपचं नैराश्य (Breakup depression) किंवा हृदयात अतीव विरहवेदना जाणवणं हा असामान्य अनुभव नाही. ज्या लोकांना औदासीन्य जाणवतं त्यांना फक्त दु:खाचेच कढ येतात असं नाही. ते सतत भंगलेल्या आशा आणि त्यामुळे मनाला आलेली ग्लानी, या भावनांशी दीर्घकाळ झगडत असतात. कधी कधी त्यांना त्यांच्या भूतकाळातल्या भंगलेल्या नात्याबद्दलच नव्हे, तर भविष्याबद्दलही- सुखद आणि स्वप्नरंजित प्रीतीच्या अपयशाचं दु:ख होत असतं. ‘क्या से क्या हो गया बेवफा तेरे प्यार में’ अशी काहीशी त्यांची नकारात्मक स्थिती असते. ‘चलो सुहाना भरम तो टुटा, जाना के हुस्न क्या हैं’ असं म्हणणारं त्यांचं पराभूत मन वस्तुस्थितीशी चार हात करण्यात कमी पडतं. त्यांची एकाग्रता आणि निर्णय घ्यायची क्षमता कमी पडते. असा विलक्षण भावनिक थकवा जेव्हा येतो, तेव्हा आपलं लक्ष विरहग्रस्त परिघातून बाहेर काढणाऱ्या क्रियाकलापांचा विचार करणं हे नैराश्यग्रस्त मनाच्या आवाक्यापलीकडचं काम असतं. ‘इकडे लक्ष गुंतव’, ‘मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालव’, ‘मनाची करमणूक करणाऱ्या कृती कर’ हे सगळं प्रियजन जरी सांगत असले, तरी ‘दिल हैं के मानता नही’ अशी मन:स्थिती असते. बऱ्याच वेळेला आपली स्वत:ची आणि इतरांची प्रेमभंगाकडे ‘अपयशी नातेसंबंध’ म्हणून पाहावयाची नकारात्मक सवय असेल, तर तुमच्या आत्मसन्मानावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. माझे बरेच रुग्ण असं सांगतात, की प्रेमभंग झाला त्याबद्दल तितकंसं समस्याजनक वाटत नाही, पण स्वत:बद्दल, स्वत:च्या क्षमतेबद्दल संभ्रम वाटू लागला आहे. एकापेक्षा जास्त ब्रेकअप झाले तर? हा विचार तीव्रतेनं मनात येत राहतो. हे तुटलेले संबंध तुम्हाला अनाकर्षक, अवांछित वाटू शकतात. आजकाल प्रेमसंबंध ज्या वेगानं जुळतात त्यापेक्षाही अधिक वेगानं तुटताना दिसत आहेत. आधीचा आणि आताचा प्रियतम/ प्रियतमा वर्तमान स्थितीत तरुणांच्या संवादात उपस्थित राहाताना दिसतात. आज ते सर्वसामान्य आहे. ‘माझा ब्रेकअप खूप वेळा झाला आहे. तर माझ्यात काही विकृती आहे का हो डॉक्टर?’ हा गहन प्रश्न अनेक वेळा माझ्या कानावरून गेला आहे. अशा वेळी मीही गंभीरपणे त्यांना समजावलं आहे, की यामुळे तुम्ही नवीन रुमानी नातेसंबंध जोडण्यास असमर्थ आहात किंवा प्रीतीची ही नाती अयशस्वी होत आहेत म्हणून तुम्ही व्यक्ती म्हणून अयशस्वी ठरता आहात असं होत नाही. हे सगळे अनुभव जर प्रामाणिकपणे अभ्यासता आले, तर ती व्यक्तीच्या जीवनातली अनुभवाची आणि विकासाची एक उत्तम संधी ठरू शकते. तुम्ही नात्यात किंवा रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नसाल किंवा कुणाला तुम्ही इष्ट वाटाल किंवा न वाटाल, त्यामुळे तुमचं व्यक्ती म्हणून मूल्य जोखलं जाणं चुकीचं आहे. प्रेमासाठी तुम्ही पात्र आहात किंवा नाही, याचा एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून तुम्ही कशा आहात किंवा असाव्यात याच्याशी काहीही संबंध नाही. अत्यंत यशस्वी आणि सक्षम व्यक्ती प्रेमाच्या दुनियेत कुठे फेकली जाईल याचा तर्क करता येत नाही. अशा गोष्टी आयुष्यात घडत असतात. हे कायमसाठी आहे असं कुणी समजू नये. हा आयुष्यात येणारा एक टप्पा आहे. हा टप्पाही निघून जाईल.

‘हार्टब्रेक’ किंवा प्रेमभंग ही फाशीची शिक्षा नाही. आयुष्य त्याच्यापेक्षा खूप मोठं आहे आणि तरुणांना अजून खूप काही बघायचं आहे. रोमियो-ज्यूलिएट वा लैला-मजनू ही अत्यंत काळजीपूर्व आणि निष्ठेनं केलेल्या प्रीतीची ओळख आहे आणि हा त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा एक छोटासा भाग आहे. त्यांच्या प्रेमकथा ऐकताना ते प्रेमाशिवाय दुसरं काहीच करत नाहीत का, असा प्रश्न उभा राहातो. प्रेमभंग झाला, की अनेकजण परिस्थितीच्या अनिश्चिततेमुळे आणि आपल्या भावनांना विचारांवरच्या पगडय़ामुळे घाबरतात. एका संशोधनात असं सुचवलं आहे, की रोमँटिक नातेसंबंधात उच्च वचनबद्धता (टोकाची ‘कमिटमेंट’) तो नातेसंबंध संपला तर नैराश्य निर्माण करते आणि आत्महत्येमागचा एक जोखमीचा घटक ठरू शकते.  जेव्हा केव्हा आत्महत्या घडतात तेव्हा मानसिक वेदनेची तीव्रता व्यक्तीच्या सहनशीलतेपेक्षा अधिक असते. आपण सगळेच आपल्या जैविक आणि भावनिक जडणघडणीमध्ये बऱ्यापैकी अद्वितीय आहोत. एखाद्या व्यक्तीला कशामुळे वेदना होऊ शकते आणि दुसऱ्याला लढण्याचं कारण कसं काय मिळू शकतं, हे सांगता येणं खूप कठीण आहे. प्रीती आणि प्रेमभंगात एकच माप सगळय़ांना फिट बसेल असं नाही.

अरुंधती आणि दिवाकर यांचं कॉलेजच्या रम्य दिवसांतलं प्रेम होतं. ते किती भावुक आणि अस्मानी असतं हे आपल्याला ठाऊक आहे. या दोघांच्या घरून जेव्हा विरोध झाला, तेव्हा त्यांनी सगळी तयारी करून प्रेमाची सांगता करायचं ठरवलं आणि आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. पण शेवटच्या क्षणी ते भेटले, तेव्हा अरुंधती दिवाकरला म्हणाली, ‘आपल्या या भावनांवर काबू ठेवणं इतकं कठीण आहे का ? थोडं जटिल, गैरसोईचं होईल आपल्याला.. पण आपल्या कुटुंबांना आपण का शिक्षा द्यायची?’ योग्य वेळी जीवनविषयक मूल्याचा हा प्रश्न त्यांना आत्महत्येच्या शिखरावरून प्रगल्भतेच्या पायथ्याशी घेऊन आला आणि दोन आत्महत्या टळल्या.

साहिर लुधियानवी यांचे शायराना शैलीतले उच्चतम समुपदेशनाचे हे शब्द अनेकांना शहाणपणा देऊन जातात- 

‘वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन उसे इक खूबसूरत मोड देकर छोडना अच्छा’  प्रेमभंगानंतरच्या बहुतेक आत्महत्या प्रचंड भावनिक आणि मानसिक त्रास व वेदनेमुळे होतात. मानसिक आजाराशीही त्यांचा संबंध असू शकतो. पण ब्रेकअपनंतर बरंच काही मनात आणि जगात घडत असताना आपण ते किती प्रगल्भतेनं आणि प्रामाणिकपणे हाताळतो हे महत्त्वाचं आहे. ‘रोमँटिक प्रेम हे कधीच विसरता येत नाही’ हा जनास ‘पागल’  करणारा गैरसमज आहे. शिवाय तो व्यावहारिक शहाणपणाचा नाही, याची ग्वाही सगळय़ा परिपक्व माणसांना देता येईल. एवढंच कशाला, प्रेमाच्या धुंदीतून बाहेर येऊन संसारात पडलेल्या माणसाची नशाही फार लवकर उतरते बरं!

 प्रेमात पडणं ही व्यसनाधीन होण्यासारखी एक प्रक्रिया आहे. प्रेमात कोकेनच्या व्यसनाप्रमाणेच ‘न्यूरल सर्किटरी’चा समावेश होतो. ब्रेकअपनंतर ‘डीटॉक्स’चा आवश्यक कालावधी प्रत्येकानं आपापल्या गरजेनुसार स्वत:ला द्यायला पाहिजे. ज्या व्यक्तीच्या प्रेमात एखादा पडतो, तेव्हा त्या व्यक्तीनं आपली मानसिक आणि हृदयातली जागा मोठय़ा प्रमाणात व्यापलेली असते.

माझी ईशिता ही रुग्ण प्रेमभंगातून आत्महत्येचा प्रयत्न करून सावरली तेव्हा म्हणाली, ‘इतकी अडगळ डोक्यात झाली होती, त्याची साफसफाई करायला खूप वेळ लागला मला.’ आम्ही या विरही, भावुक मंडळींना- ज्या इतर वेळी शहाण्यासारख्या वागत असतात, त्यांना त्यांच्या माजी प्रेमाबद्दल विचार करताना मनात होणारी ‘भावनिक रीअ‍ॅक्टिव्हिटी’ वा खळबळ ओळखायला शिकवतो. त्या नातेसंबंधातल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी ओळखण्यात जर स्पष्टता आली, तर तुम्ही स्वत:बद्दलचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वाढवू शकता. आपली योग्यता, आपली जीवनस्वप्नं याची जाण अशा ब्रेकअपमध्ये सावरायला नक्की मदत करते. म्हणून स्वत:ला आवडणाऱ्या गोष्टी करायला सुरुवात केली पाहिजे. उदा. अडगळीत टाकलेली गिटार बाहेर आली पाहिजे, बाजूला सारलेल्या मित्रमंडळींना पुन्हा आपल्या दुनियेत आणलं पाहिजे, आपल्या आवडत्या रंगाचे कपडे पुन्हा वापरले पाहिजेत.. प्रेमात बऱ्याच गोष्टी दुसऱ्याला आवडतात म्हणून आपण करत असतो. प्रेमभंगानंतर मात्र स्वत:चे लाड करता यायला पाहिजे. पाठिंब्यासाठी मित्र, कुटुंब किंवा अगदी मानसिक आरोग्य व्यावसायिकांकडेही जाऊ शकता. अधीर होऊन व्यसन आणि पुन्हा घाईघाईत भावनावश प्रेमात (Rebound love) पडण्यापासून सावध राहा. कुठल्या गोष्टी तुम्हाला खास बनवतात हे शोधण्यासाठी पुरेसा वेळ घालवा. नवीन आठवणी, नवे छंद निर्माण करा. आपल्यातली नवीन ऊर्जा, नवचैतन्य जागृत करा. लक्षात ठेवायला पाहिजे, ‘जो बीत गयी सो बात गयी’. विरहात अंतर्मुख व्हायला शिकायला पाहिजे. आपला स्वत:चा वेळ सर्जनशील, आणि टवटवीत होण्यासाठी वापरला पाहिजे. रागाचे आणि क्षोभाचे क्षण येऊ शकतात. ओरडण्यासाठी, रडण्यासाठी खुशाल वेळ द्या. धावा, नृत्य करा, पेंटिंग करा, प्राण्यांना दत्तक घ्या. आपल्या  महत्त्वाकांक्षेला उत्साहानं वर्धित करायला लागा. नवा अभ्यासक्रम, नवीन नोकरी स्वीकारा. जे जे स्वत:चं नवनिर्माण करण्यासाठी आवश्यक आहे ते करा.

  सानिकानं तर एक छानसं कुत्र्याचं पिल्लू दत्तक घेऊन आपल्या प्रेमाच्या ऊर्मीला एक मोहरणारी नवी दिशा दिली. ब्रेकअप वाईट आहे, पण तितकासा नाही. उलट आपण त्यानंतरच स्वत:च्या भावनांना ओळखायला आणि जोपासायला शिकतो. म्हटलं तर संपलं, नाहीतर खूप काही उमगलं!

pshubhangi@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mage rahilelyanchya katha vyatha author world love break pain life ysh
Show comments