मॅगीवरच्या बंदीमुळे अनेकांसमोर चटपट भुकेचा प्रश्न आ वासून उभा राहिलाय. तिच्यामुळे आम्हा गृहिणींना वेळच वेळ मिळायचा, त्यामुळे नाटक-सिनेमांची तिकिटं खपायची. भिशी ग्रुपमुळे हॉटेल हाऊसफुल्ल व्हायची, मॉल, प्रदर्शने ओसंडून जायची, पण आता.. ‘तिच्या’वर अवलंबून राहिलेल्या महिलावर्गाच्या झालेल्या ‘गोची’वरची ही उपहासिका..
‘तिच्या’वर घातलेल्या बंदीमुळे आम्हा तमाम गृहिणीवर्गाला मुदपाकखान्यातील बंदिवासात पुन्हा एकदा जाण्याची वेळ आली आहे. काय घोर पाप केले होते हो आम्ही, की ही तुमची नतद्रष्टी बंदी का फंदी तुम्ही तिच्यावर आणली आणि हा बंदिवास आमच्या पदरात.. सॉरी ओढणीमध्ये टाकला..
अहो! ‘ती आहे’ फक्त या एका भावनेनेही आम्हा गृहिणींना दहा हत्तीणींचे बळ यायचे. आमच्या कुटुंबातील चुन्नू मन्नूपासून ते आजी-आजोबांपर्यंतचा भुकेचा प्रश्न सोडवायला ती दोन मिनिटांत हजर व्हायची त्यांच्या सेवेला, विनातक्रार!
बरं, तिला कुठलीही जागा, वेळ वज्र्य नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळ, पहाट, मध्यरात्र कोणत्याही वेळी ती झटपट तुमच्या सेवेला हजर! हिमालयातील कडाक्याची थंडी असो वा वाळवंटातील रणरणते ऊन, ती त्याच चटकदार नजाकतेत हजर! वर आता तुम्ही जातपात, रंगभेद, लिंगभेद, वर्णभेद म्हणाल तर त्याची बातच नको. ज्याला आवडली, परवडली, त्याची ती झाली. नोकरी-शिक्षणासाठी स्वत:च्या घराबाहेर राहणाऱ्यांच्या पोटाची चिंता ती कमी करायची. आता हेच बघा ना, गेली साठ वर्षे आपल्या देशाला भेडसावणाऱ्या भुकेचा प्रश्न तिने छोटय़ामोठय़ा आकारांत व किमतीत दोन मिनिटांत सोडविला होता. मग आता बोला? एवढय़ा सगळय़ा खुबी असलेल्या तिच्यावर बंदी?
अहो! तुमच्या या बंदीमुळे आम्हाला म्हणजे तमाम गृहिणीवर्गाला काय काय झेलावे लागेल याची तुम्हाला कल्पना नाही. आम्हाला आमच्या घरातील माळय़ावरील अडगळीत पडलेल्या आमच्या पाककलेच्या जुन्या वह्य़ा व पुस्तके धूळ झटकून खाली काढावी लागली, कारण ती आमच्या जीवनात आल्यापासून आम्ही बाकीच्या पदार्थाची चवच विसरून गेलो ना! तिच्या झटपट व सुटसुटीतपणामुळे आम्ही कधीही केव्हाही उठून नाटक, सिनेमा, किटीपार्टी, पिकनिकला जाऊ शकत होतो, पण आता या तुमच्या बंदीमुळे आम्हाला कुठे जायची सोय राहिली नाही. आधी स्वयंपाकघरात राबा आणि मग नाटक-सिनेमे बघा, ऑफिसमधील जास्तीच्या कामाची जबाबदारी तर आता नकोच वाटते, कारण सतत डोक्यात नाश्त्याला काय करायचे? जेवायला काय करायचे? वर परत होस्टेलला राहणाऱ्यांसाठी आता घरूनच लाडू, चिवडा, शंकरपाळे यांनी डबे भरून द्यायचे. ती होती तेव्हा तिला भरभरून दिले की आम्ही निर्धास्त.
अहो, आमची घरची मंडळी तर या बंदीमुळे पार रडकुंडीला आली हो, कारण त्यांना आता आमच्या पाककलेला तोंड द्यायचे आहे ना! बिचाऱ्या वयस्कर मंडळींनी तर तिच्यावरच्या बंदीची बातमी ऐकून अंथरुणंच धरली आहेत, कारण कोणत्याही कटकटी व बत्तिशीशिवाय ती अलगद त्यांच्या पोटात जायची तिच्या चटकदार चवीनिशी. आता या वृद्धांवर उपासमारीची वेळ आली आहे. तुम्ही अहो, कशाला शिव्याशाप घेता त्यांचे?
कोणा मेल्या दुष्टाची नजर लागली. तिच्या या रूपगुणाला कोण जाणे? म्हणे ती भ्रष्ट होती. तिची वरवरची रंगरंगोटी तिचा चटकदारपणा जनतेच्या आरोग्याला घातक होता. अहो! अशी कशी ती आताच घातक झाली? तिचा जन्म झाला तेव्हा नव्हती का ती घातक? स्त्री भ्रूणहत्येप्रमाणे जन्माच्या आधीच का नाही तिचा गळा घोटला? का ती पहिली बेटीप्रमाणे धन की पेटी होती म्हणजे तिच्या पायगुणांमुळे मिळणारे धन आधी लाटायचे व नंतर तिला नाहीशी करायचे?
अरे! मग तुम्ही तिला अस्तित्वातच का आणली? का आम्हाला तिची सवय लावली? आणि हो, तिची घातकता अचानक कशी कळली तुम्हाला? का ती घातक आहे हे माहीत असूनही तिच्याकडून मिळणाऱ्या धनाच्या पेटीसाठी डोळय़ावर पट्टी बांधली. कोणत्याही खाद्यपदार्थापासून जनतेच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून तुमचा एक विभाग बारीक नजरेने काम करतो म्हणे. अगदी तीक्ष्ण व घारीच्या नजरेने या डिपार्टमेंटची सर्वत्र नजर असते. मग ही कशी इतकी वर्षे त्यांच्या नजरेतून सुटली, की तीच आता बदललीय कोण जाणे!
पण तुम्हाला आमच्या मनातली, आतली गोष्ट सांगते हं! तुम्ही भले कितीही तिच्यावर बंदी आणा, पण आमच्या मनात तिची प्रतिमा ताजीच राहील, कारण तिने तिच्या अंगच्या गुणांनी आम्हाला दिलेले सुखसमाधान बरं का! आता तिच्यासारख्या अनेक जणी येत-जात राहतील, पण तिच्यासारखी तीच, तिची सर कोणालाच नाही येणार.
जाऊ दे. शेवटी काय, तिच्यामुळे आम्हा गृहिणींना मिळणारी वेळेची सवलत, आमचे वाचणारे कष्ट तुम्हाला बघवले नाहीत. अहो, तिच्यामुळे जसे तुम्ही धनको झालात तशीच इतरही अनेक उद्योगांची भरभराट झालीच होती ना! आता हेच बघा ना, तिच्यामुळे आम्हा गृहिणींना वेळच वेळ मिळायचा. त्यामुळे नाटक-सिनेमांची तिकिटं खपायची. भिशी ग्रुपमुळे हॉटेल हाऊसफुल्ल व्हायची; मॉल, प्रदर्शने ओसंडून जायची; पण आता.. ‘पुन्हा येरे माझ्या मागल्या’- तेच ते रहाटगाडगे- घर-स्वैंपाकघर, ऑफिस-घर. आम्हा गृहिणी, नोकरदार स्त्रियांच्या नशिबी पुन्हा हा बंदिवास तुम्ही आणला. आता आमच्या हाती उरलंय ते ‘सिलसिला’ सिनेमातलं अमिताभ बच्चन म्हणायचा ती कविता तिच्यासाठी म्हणणं.. तुम होती तो ऐसा होता.. तुम होती तो वैसा होता…
मंजूषा महेंद्र -chaturang@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा