महाभारतातील द्रौपदी ही हस्तिनापूरची सम्राज्ञी आहे. परंतु हे राज्ञीपद उपभोगताना तिला अनंत दु:खांचा, वेदनांचा सामना करावा लागला. शेवटी तर ‘माझ्या रक्तामांसाचं कुणीही उरलं नाही’चा तिचा आकांत अश्वत्थाम्याचा सूड घ्यायला भाग पाडतो. पण हेच तिचं आईपण त्याच्या जखमेवर तेल घालण्यापर्यंत तिला विस्तारता येतं. कर्तव्य आणि मातृत्वातली ही सीमारेषा आजच्या स्त्रीलाही वेगवेगळ्या पातळ्यांवर अनुभवायलाच लागते, म्हणूनच द्रौपदी नव्हे ‘माता द्रौपदी’ आपल्याला भावते.

‘‘भीमा, तो मणी! याच्या चेहऱ्यावर माणसाचं कोणतंही तेज राहता कामा नये. ते नष्ट झालंच पाहिजे. कापून काढ तो मणी…!’’ द्रौपदीने अश्वत्थाम्यासाठी उच्चारलेल्या या शब्दांबरोबर त्या दिवशी प्रेक्षागृहाने माझ्यासह अनुभवलेला तो नि:शब्द थरार! जेव्हा जेव्हा मला विजयाबाई मेहतांची मोकळे केस सोडलेली ‘माता द्रौपदी’ नाटकातील याज्ञसेनी द्रौपदी आठवते, तेव्हा मी तो थरार पुन:पुन्हा अनुभवते.

chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Shruti Haasan With Parents
“लोक माझ्याकडे बोट दाखवायचे अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्री घटस्फोटित आई-वडिलांना म्हणाली ‘हट्टी’
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
samantha want to be mother
अभिनेत्री समांथा रूथ प्रभूला व्हायचंय आई, इच्छा व्यक्त करत म्हणाली, “वयाचा विचार…”
Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Paithani web series on Zee 5 OTT entertainment news
आई मुलीच्या नात्याची ‘पैठणी’

हेही वाचा : सांधा बदलताना : पालकत्वाच्या मर्यादा

विद्याधर पुंडलिकांनी १९७२ मध्ये लिहिलेले हे नाटक! त्यांच्या ‘नाट्यमंदार’ने याचे थोडे प्रयोग केले. मी पाहिलेल्या नाटकात भीमाच्या भूमिकेत दीनानाथ टाकळकर, यशवंत दत्त – कृष्ण, दत्ता भट -अश्वत्थामा, गांधारी-दया डोंगरे आणि द्रौपदी असायच्या विजयाबाई. फार तगडी मंडळी आणि अत्यंत उच्च दर्जाचं तत्त्वज्ञान नाट्यमय पद्धतीत सांगणारं हे नाटक! हा अविस्मरणीय प्रयोग मला पाहता आला.

आताच्या स्त्रीचा किंवा स्त्रीत्वाचा मी विचार करते तेव्हा द्रौपदीची व्यक्तिरेखा मला काही वेळा समांतर किंवा काही वेळा रस्ता दाखवणारी वाटते. कालची स्त्री आचार्य अत्र्यांनी लिहिलेल्या निर्मलेच्या रूपानं ‘घराबाहेर’ पडली. आज तिचं कार्यक्षेत्र विस्तारलं. वेगवेगळ्या क्षेत्रात पदार्पण करताना ती अनेक लढाया आजही लढत असते. प्रत्येक स्त्रीची रणभूमी वेगळी असते. तसाच तिचा धर्मही! पोलीस, डॉक्टर, पत्रकार, अभिनेत्री, चित्रकार, व्यवस्थापक, इंजिनीयर म्हणून तिचा एक त्या त्या व्यवसायाचा धर्म असतो. धर्म म्हणजे मूल्य! द्रौपदीचा क्षात्रधर्म असल्यामुळे युद्ध आणि राजनीती हाच तिचा धर्म होता. तसाच आजच्या स्त्रीचाही असतो. त्या धर्माचं पालन करून ती यशस्विनी होते, पण धर्मापासून परावृत्त करणाऱ्याही अनेक गोष्टी तिच्या वैयक्तिक आयुष्यात व समाजात घडत असतात. त्यावर मात करून तिला उभं राहायचं असतं. याशिवाय मातृत्वाच्या भावनांचं व्यवस्थापन आलंच. तिचं मातृत्व आणि कार्यक्षेत्र याचा तोल सांधण्याची कसरत ही लढाईच, स्वत:शी! मला भावली ती पुंडलिकांची द्रौपदी, कर्तव्याचे वेगवेगळे आयाम आणि सीमारेषा दाखवणारी, तरीही आईपणाचा अर्थ शोधणारी वैयक्तिक व वैश्विक पातळीवर संवाद साधणारी द्रौपदी नव्हे, ‘माता द्रौपदी’!

हेही वाचा : स्वभाव – विभाव : ते असे का वागतात?

कौरव आणि पांडव यांच्यातील धगधगणाऱ्या वैराचं, एक विलक्षण सुडाच्या प्रवासाचं नाटक विद्याधर पुंडलिकांनी त्यांच्या अद्भुत प्रतिभेने दोन अंकात उभं केलं. युद्धाची ती शेवटची संध्याकाळ अर्थात पांडवांच्या विजयाची पहिली! द्रौपदीचं तिच्या पाच मुलांबरोबरचं रमणं, त्यांचे हास्यविनोद, त्यांच्या तारुण्यसुलभ भावना, विजयी वीर म्हणून त्यांचा अभिमान आणि त्यांच्यावरचं प्रेम हे सारं पहिल्या प्रवेशात अनुभवायला मिळतं. त्यांच्या औक्षणासाठी पाच सुवासिनी मात्र मिळाल्या नाहीत हे ऐकल्यावर, द्रौपदी वीराचं मरण हे भाग्याचं, अशी अवंतिकेची समजूत काढते. पण त्याचवेळी मरण कसं स्वीकारायचं यातच शेवटी सगळ्या जीवनाचं तर रहस्य नाही ना? हे प्रश्नरूपी उत्तर ती मांडते.

त्याच काळरात्री अश्वत्थामा तिच्या पुत्रांची ते झोपेत असताना हत्या करतो आणि पांडवांचा लखलखीत विजय पूर्ण काळवंडून जातो. द्रौपदी उन्मळून पडते, पण विरक्त होत नाही. ती हस्तिनापूरची भल्या मोठ्या साम्राज्याची सम्राज्ञी आहे. द्रौपदी सतत लढत असते. तिच्यातलं क्षात्रतेज आपल्याला पदोपदी जाणवतं. तिच्या सगळ्या शाखा, पारंब्या अश्वत्थामाकडून छाटल्या गेल्या, तरी ती सुडाच्या मातीत किंवा राखेत म्हणाना, तिची मूळं घट्ट बांधून घेते आणि तिच्या सर्व प्रतिज्ञा पूर्ण करणाऱ्या भीमाला अश्वत्थाम्याला पकडून आणण्याची आज्ञा देते. त्याला पकडल्यावर ती त्याला मारत नाही, कारण तो चिरंजीव असतो. पण ती बुद्धिमान आहे. ती अश्वत्थाम्याला शह देऊन त्याचा शहाणपणाचा, त्याच्या मस्तकावरचा तेजस्वी मणी काढून त्याच्यावर मात करते. द्रौपदी इथे जिंकते; रुढार्थाने! हस्तिनापूरचं साम्राज्य ती पांडवांसह १८ वर्षं उपभोगते.

महाभारतातल्या स्त्रिया या खलनायिका नाहीत. त्या नियतीच्या पटावरल्या खंबीर, स्वतंत्र अस्तित्वाने त्यांच्या निर्णयांनी ‘महाभारत’ घडवितात. अंबा, कुंती, गांधारी, द्रौपदी. त्यांच्यात द्रौपदी ही फार सशक्त आणि विलक्षण व्यक्तिरेखा! युद्धातला नृशंस संहार आणि रक्तपात पाहिल्यानंतर, पुत्र गेल्यानंतर द्रौपदी तिचा क्षात्रधर्म आणि तिच्या राज्ञीपणाचे कर्तव्य यात कसूर करत नाही. द्रौपदीच्या स्त्रीत्वाचे विविध पदर या नाटकात प्रेक्षकांच्या लक्षात येतात. एक विचार मनात सतत येतो की, इतकं मनाचं निग्रही असणं, असं ठाम उभं राहणं कसं जमलं तिला? याज्ञसेनी आहे म्हणून ती मंद तेवणारी शांत ज्योत नाही, तर ती लखलखीत जाळणारी ज्वाळा आहे.

या नाटकात तिचा आणि गांधारी यांच्या भेटीचा एक मनस्वी प्रवेश आहे. गांधारी व द्रौपदी आता दोघी समदु:खी आहेत. गांधारीची १०० मुलं मारली गेली, तर द्रौपदीची पाचही! प्रश्न आकड्यांचा नव्हता, तर दु:खाचा होता. गांधारी तिला म्हणते, ‘‘द्रौपदी, माझं मन आता सर्व प्रश्नांच्या पलीकडे गेले आहे.’’ द्रौपदी उत्तरते, ‘‘तुम्ही जिथे आहात तिथे मी येणार नाही. मी त्या प्रश्नांपलीकडे जाणार नाही. सगळं कधीच संपत नाही. काही तरी उरतं.’’ डोळ्यांवर पट्टी बांधलेली गांधारी तिला, तूही पट्टी बांधलेली आहेस अन् तिही क्षात्रधर्माची. तू त्याच वाटेने चालते आहेस, याची जाणीव करून देते. तेव्हा द्रौपदी गांधारीला विचारते, ‘‘दुसऱ्या वाटा असतात का?’’ या द्रौपदी आणि गांधारीच्या संवादाचं उत्तर कृष्ण आणि द्रौपदीच्या एका संवादात मिळतं. तो तिला सांगतो, ‘‘एकदा कुरुक्षेत्राची वाट धरली की गोकुळ, वृंदावनाची वाट बंद! मग मुरलीची नुसती आठवण होणं हासुद्धा अधर्म आहे.’’

ही धर्माची कठोर भाषा आत्मसात केलेल्या या द्रौपदीला पुंडलिक आपल्याला भेटवतात. फार मोठ्या निर्णयांची, मनाची कसोटी पाहणाऱ्या संघर्षाला पेलणारी द्रौपदी इथे आहे. क्षात्रधर्म मानणारी आणि पाळणारी द्रौपदी मनात प्रश्न ठेवून जगते. प्रेक्षकांना वेगळ्या रुपात दिसते ती शेवटच्या प्रवेशात. स्वर्गारोहणाच्या वेळेस निघण्यापूर्वीचा आदला दिवस. कृष्णाच्या जाण्याचंही दु:ख पचवलेली द्रौपदी! द्रौपदी तिच्या एकुलत्या नातवाचा, परीक्षिताचा निरोप घेते आणि भीमाला सांगते, ‘‘तू नेहमी क्षत्रियासारखा बोलतो. कृष्ण नेहमी मुत्सद्द्यासारखा, व्यास आणि धौम्य तत्त्वज्ञासारखे बोलतात, धर्म दुबळ्या साधूसारखा, पण एका क्षणात पाच मुलं गेलेल्या आईशी साध्या माणसासारखं कोणी बोलत नाही. मला माझ्या दु:खाची संगती कळली पाहिजे.’’
निर्वाणाच्या वाटेवर प्रश्नांच्या संमोहाने तिचं आत्मतेज ढळतंय आणि पतन होतंय हे जाणणारा भीम तिला म्हणतो, ‘‘वीरांच्या मार्गात करुणा अशीच येते. तिचा चेहरा नुसता सुंदर नसतो. उदात्तही असतो. तुझं दुबळं वात्सल्य, करुणा या प्रस्थानाच्या वेळी का? प्रस्थानाआधीच तुझं पतन झालं द्रौपदी…’’ प्रेक्षकांना समजतं की, तिच्या आयुष्याचा सुंदर तोल घालवला तो अश्वत्थाम्याने केलेल्या संहारामुळे आणि हेही कळतं की, द्रौपदीचे पिता द्रृृपद आणि अश्वत्थामाचे पिता द्रोणाचार्य यांच्यातील मानापमानामुळे महाभारताचे चक्र सुरु झाले आणि त्या प्रचंड चक्राचे दोन विरुद्ध बिंदू म्हणजे द्रौपदी आणि अश्वत्थामा.

अश्वत्थामा शेवटी तिला जाब विचारतो, ‘‘कोणी कुठं थांबायचं? मग मीच का थांबायचं? तू मला केलेली जखम, माणसाने माणसाला केलेली कायमची जखम आहे.’’ त्यावर ती उत्तरते, ‘‘कदाचित अटळपणे कुठून तरी सुटलेल्या बाणाचं अश्वत्थामा तू फक्त शेवटचं धारदार टोक होतास. अटळपणे उच्चारल्या गेलेल्या मंत्राचा तू शेवटचा भेसूर शब्द होतास. त्या भयंकर कुतुहलाचं तू एक शेवटचं रक्ताळलेलं प्रश्नचिन्ह होतास!’’ माणसाच्या भागधेयातील अटळत्व द्रौपदीच्या रूपानं पुंडलिक सामर्थ्याने मांडतात. ‘परीक्षित माझा नाही तो सुभद्रेचा! कारण तो अभिमन्यूचा पुत्र. माझ्या रक्तामासाचं कोणीच उरलं नाही,’ हा आकांत करणाऱ्या द्रौपदीचं मातृत्व सरतेशेवटी विस्तारलेल्या आईपणाचा प्रत्यय प्रेक्षकांना देतं ते अश्वत्थामा आणि द्रौपदीच्या शेवटच्या संवादात आणि अश्वत्थाम्याच्या जखमेवर तेल घालण्याच्या कृतीत. जीवनाचं अनाकलनीय अंतिम सत्य विद्याधर पुंडलिकांची द्रौपदी कधी पत्नी, कधी सम्राज्ञी म्हणून शोधत राहते आणि शेवटी तिथपर्यंत पोहोचवणारी छोटीशी वाट तिला मातृत्वाच्या दिशेने सापडते. निर्मितीची आदिम शक्ती असलेली स्त्रीच शेवटी सर्वनाशाचं चक्र थांबवण्यासाठी आपला हात पुढे करते.

हेही वाचा : एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व!

आज स्वत:च्या अस्तित्वाचे प्रश्न, सुडाची जळमटं मनात घेऊन जगणाऱ्या स्त्रिया जेव्हा विविध ठिकाणी भेटतात, तेव्हा लक्षात येतं की, ‘आई’ म्हणून हरणं आणि ‘बाई’ म्हणून जिंकणं किंवा उलटंही यांची बेरीज शेवटी वजाबाकी होऊन ‘शून्यच’ उरतं. द्रौपदी शेवटी स्वत:च तिचे प्रश्न सोडवते. ती म्हणते, ‘‘कुणीतरी न संपणारा हा सुडाचा आणि दु:खाचा गुणाकार थांबवलाच पाहिजे आणि आकाशाएवढे हे प्रचंड चक्र थांबवलंच पाहिजे आणि हे थांबवणारा लहानसा हात शेवटी माणसाच्या आईचाच पाहिजे.’’

ती शेवटी म्हणते, ‘‘यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। अश्वत्थामा, तू मात्र जगत राहशील या सूडासकट, वेदनेसकट. माणसाजवळ काही नाही असं नाही. निदान एक तरी गोष्ट आहे. कुठेतरी अर्थ आहे, संगती आहे. माझी दु:ख माझ्याबरोबर संपतील. तू मात्र उन्हातान्हातून माणसाच्या घरादारावरून थकत, थांबत, भटकत राहशील. ज्याला त्याला संतापून किंवा रडून तेल मागशील. एखाद्याच्या दारावर थाप मारल्यावर ते उघडलं जाईल आणि तो तुझ्याशी चार शब्द बोलेल. तुझ्या जखमेवर तेल घालेल. अश्वत्थामा त्याला मात्र सांग की, फार फार वर्षांपूर्वी द्रौपदीनंसुद्धा मला असंच तेल दिलं होतं.’’

मला आयुष्यात पुंडलिकांच्या या द्रौपदीनं कायम सोबत केली. तिचा गुरू आणि सखा म्हणजे कृष्ण! त्यानं सांगितलेल्या ‘धर्म’ म्हणजे अर्थात मूल्य आणि कर्तव्य या तत्त्वज्ञानाचा वसा घेतलेली द्रौपदी वेगवेगळ्या वळणांवर भेटत राहिली.

हेही वाचा : बहीण खरंच लाडकी असेल तर…

विद्याधर पुंडलिक मरणाबद्दलचं अंतिम सत्य आणि जीवनातल्या अपरिहार्यतेवरचं भाष्य द्रौपदीच्या तोंडून करतात. त्या गूढ, अविनाशी, आदितत्त्वाचे स्पंदन द्रौपदीच्या प्रश्नातून मी अनुभवते. म्हणूनच मला ही ‘माता’ द्रौपदी जवळची वाटते.

पुंडलिक सरांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. ‘माता द्रौपदी’च्या रूपानं एका वेगळ्या स्त्रीत्वाला चितारणाऱ्या विद्याधर पुंडलिक सरांना वंदन!
chaturang@expressindia.com