११ जानेवारीच्या अंकातील डॉ. मंजूषा देशपांडे यांच्या ‘स्थलांतरातून बहरलेली खाद्यासंस्कृती’ या लेखात केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातल्याच या काही निवडक आणि संपादित प्रतिक्रिया. लग्न करून सासरी, दुसऱ्या प्रांतात गेलेल्या अनेकींच्या या प्रतिक्रिया म्हणजे खाद्यासंस्कृतीचा त्यांनी घातलेला चविष्ट मेळच. अनेकींना सासरच्या पाककृती समजून घेताना सुरुवातीला कठीण गेलं, अनेकदा गमतीशीर प्रसंग घडले. यात अनेकींना सासरच्या मंडळींचा समजूतदारपणा उपयोगी पडला, तर काहींच्या पाककौशल्याचा कस लागला. पण बहुसंख्य जणींनी माहेर-सासरच्या दोन्ही खाद्यापद्धतींमधला सुवर्णमध्य साधत सुखी संसाराचा मार्ग पोटातून जातो हे सिद्ध केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माझे वडील कोकणातले, त्यामुळे घरात आजीची मालवणी पद्धत चालत आलेली. आई मात्र पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापुरातून आलेली. त्यामुळे तिच्या स्वयंपाकावर कोल्हापुरी खाद्यापद्धतीचा प्रभाव. मी मुंबईत जन्माला आले, साहजिकच इथले फास्ट फूड, वडापाव आणि पावभाजी माझ्या डीएनएमध्ये आले. एकूणच मालवणी काजू, खोबऱ्याच्या वाटणामधून वाट काढत कोल्हापुरातून गोडा मसाला आणि कांदा-लसूण मसाल्यामधून झिरपत जाणारी, दर वीकेंडला वडापाव – पावभाजीवर विसावणारी अशी ही माझ्या कुटुंबाची खाद्यसंस्कृती. हे कमी की काय म्हणून अस्सल खानदेशी सासर मिळालं. आणि खरी मजा सुरू झाली. अमळनेरमधून पुण्यात आलेले माझे सासू-सासरे. अर्थातच स्वयंपाकघरात संपूर्णपणे खानदेशी पद्धतीची चलती. त्यात सासूबाईंसोबत सासरेही उत्तम स्वयंपाक करणारे आणि खानदेशी पदार्थांमध्ये त्यांचा हातखंडा. त्यामुळे सुरुवातीला माझी होणारी फजिती काही विचारू नका. एके दिवशी सासऱ्यांची सूचना, ‘‘भाजीला थोडी ‘चव’ लाव’’. आता ऐन वेळेस ओल्या नारळाचा ‘चव’ आणायचा कुठून या विचारात मी. मग सासूबाईंनी उलगडून सांगितले की ‘चव’ म्हणजे थोडीशी ‘साखर’ घाल. इथे नारळाचा काही संबंध नाही.

वांगी म्हणजे माझा शत्रू क्रमांक १ तर या जळगावकरांचे वांग्यावर निस्सीम प्रेम. इतके की सासरे स्वहस्ते निगुतीने वांग्याची भाजी करत. कधी मिरचीचा ठेचा आणि भरपूर कोथिंबीर घालून हिरवीगार वांगी तर कधी लाल तिखट आणि शेंगदाण्याच्या कुटाची लाल तर्रीदार वांगी. कधी भरली वांगी तर कधी घोटीव (वरणबट्टी हा खास खानदेशी बेत, ज्यात घोटीव वांग्याची भाजी एकदम मस्ट!). मग त्या दिवशी माझी आपली बटाट्यावर भिस्त! अजून एक चमत्कारिक गोष्ट ! हो, चमत्कारिकच कारण पुरणपोळीला मिट्ट गोड आमरसामध्ये बुडवून भुरके मारून खाणं. हे म्हणजे मी याची देही याची डोळा पाहिलेले दहावे आश्चर्य! सासरी पुरणपोळी अत्यंत आवडीची. पण ती दुधासोबत नाही तर चक्क आमरसासोबत खायची. आंब्याचा सिझन नसेल तेव्हा तूप- पुरणपोळी, पण दूध नाही. मला दूध-पुरणपोळी खाताना घरातले ही कशी वेडी आहे, अशा चेहऱ्याने माझ्याकडे पाहतात.

● तनुलता पालखे

लग्न झालं की मुलीचं खऱ्या अर्थानं स्थलांतर

होतं आणि म्हणूनच आयुष्यातील मोठे बदलही अटळच. ‘चार कोस पर पानी बदले, आठ कोस पर बानी’ असे म्हणतात. त्याचप्रमाणे दहा-पंधरा कोसाच्या अंतरावर खाद्यासंस्कृतीही बदलते. लग्नानंतर १९६६ला मी सासरी आले तेव्हा हा फरक जाणवलाच. सासरमाहेर दोन्ही देशस्थ ऋग्वेदी. शिवाय बऱ्हाणपूर येथेच माझे आईवडील नऊ वर्षं होते. योगायोगाने लग्नानंतर मी बऱ्हाणपूरलाच आले, पण खाद्यासंस्कृतीत फरक होता. माहेरी विदर्भाचा तर सासरी खानदेशातल्या संस्कृतीचा प्रभाव. इकडे घडीच्या चौपदरी पोळ्या असायच्या. माहेरी तर फुलके करायची सवय होती. प्रयत्न करून पाहिला, पण पोळीचे पदर कुठे गायब व्हायचे माहीत नाही आणि वातडपणाही कमी होईना. स्वत:चे स्वतंत्र बिऱ्हाड थाटल्यावर मात्र खुशाल फुलके करायला लागले आणि ते सर्वांना आवडायला लागले. आता तर माझ्या सासरच्या सर्वांकडे म्हणजे नणंदा-जावांकडे फुलक्यांचे स्वागत झाल्याने मी मनोमन सुखावले आहे. इथला संध्याकाळच्या जेवणातला ‘वन डिश मिल’ म्हणता येईल, असा पदार्थ म्हणजे ‘वरणफळे’. हा प्रकार तर मी खूप आनंदाने स्वीकारला. एकदा मात्र माझी फजिती झाली. डोंबिवलीला माझा संसार बघायला माझे सासरे, चुलत सासरे, आत्ये सासरे आले. मी मन लावून स्वयंपाक केला. वांग्याचं भरीत केलं होतं. पानात वाढल्याबरोबर काका ओरडलेच, हे काय, भरतात दही? मी घाबरले. माझी आई दही घालूनच भरीत करायची. पण इकडे ती पद्धत नव्हती. कानाला खडा लावला आणि पुन्हा दही घालून भरीत केलं नाही. माहेरी लाडू म्हटले की, रवा-नारळाचे, रवा-बेसनाचे, वाटल्या डाळीचे, पण पाकातले करायचे. इथे नेहमी बेसनाचे किंवा रवा-मैद्याचे लाडू पिठीसाखर घालून फेटून करतात. ते मात्र मला आवडत नाहीत. तूप साखरेचे गोळे त्यात कसलं कौशल्य? गोड आवडतं म्हणून हे लाडूही स्वीकारले. दोन्हीकडचे पदार्थ बनवून सगळ्यांच्या जिव्हा तृप्त करणं मला जमू लागलं.

● आसावरी फडणीस

माझं माहेर सोलापूर, सासर कोल्हापूर आणि आता नवऱ्याच्या नोकरीमुळे सध्या नागपूर. आईकडे रोजची भाजीसुद्धा तिखट असायची. मांसाहार असल्यावर तर जास्तच. सासरी भाज्या एकदमच सपक. पोट साफ व्हायचं नाही, त्यामुळे जेवण जायचं नाही आणि दिवसभर उत्साह जाणवायचा नाही. एकदा मी बाहेर फिरायला गेले असताना पाव-भाजी खाल्ली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्रयत्न न करता पोट साफ झालं. मग मी अधूनमधून बाहेर भेळ, पावभाजी, दाबेली खाऊ लागले. काहीच वर्षांनी दिराचं लग्न झालं. जावेच्या बाबतीतही हीच परिस्थिती निर्माण झाली, मग आम्ही त्यावर एक मजेशीर उपाय शोधून काढला. आम्ही चार-पाच दिवस पुरेल एवढा मिरचीचा ठेचा करून ठेवायचो आणिआमच्या जेवणात घालायचो, मग सपक भाजी पण छान लागायची! मांसाहार प्रिय असल्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजते की, मला सोलापूरचे काळ्या तिखटाचे, कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा आणि नागपूरचे सावजी हे चाखायला मिळाले. ढेमस, फणस, कच्ची केळी, कच्ची पपई ,तोंडले, सुरण आदी भाज्याही नागपूरला पहिल्यांदा आल्यावर बघितल्या. कच्च्या फळांची भाजी होऊ शकते हे तोपर्यंत माहीत नव्हतं. मी त्या सगळ्या भाज्या करून पहिल्या आणि आवडल्याही.

● मेघा राऊत दास

‘खाण्यासाठी जन्म आपला’ या खाद्या तत्त्वज्ञानावर आमचा प्रगाढ विश्वास. मूळचं माझं सासर विदर्भातलंच आहे, पण नोकरीच्या निमित्ताने सासरे मुंबईत आले आणि नंतर आमचं कुटुंब कायमचंच मुंबईकर झालं. सासुबाई आणि मी वर्ध्याच्या त्यामुळे खाद्यासंस्कृती बरीचशी सारखी. गरमागरम दही पिठलं, टोमॅटो पिठलं, हिरव्या मिरचीचे विविध प्रकार… आम्हा दोघींनाही मनापासून आवडायचे. विदर्भात बटाटावड्यांना ‘आलू बोंडा’ म्हणतात. कोथिंबिरीला सांबार म्हणतात. एकदा मुंबईकर पुतणीला ‘‘अगं, जरा सांबार चिरून दे.’’ असं म्हटल्यावर तिच्या चेहऱ्यावर गोंधळ उडाला. सांबार कसा चिरायचा? असा तिला प्रश्न पडला. मी सांगितल्यावर तिला गंमतच वाटली. ‘चून भाकरी’ हा विदर्भात सर्वांचा आवडता बेत. चून म्हणजे पिठलं. इकडे मुंबईला शाळेत एक सहकारी मोदकाचं चून तयार करायचं असं मोदकाची कृती सांगताना म्हणाल्या. तेव्हा माझाही असाच गोंधळ उडाला. मग लक्षात आलं की, त्या सारणाला चून म्हणत होत्या. पहिल्यांदा अळूचं फदफदं /फतफतं हा शब्द ऐकल्यावर मला हसायलाच आलं होतं. विदर्भात याला ‘धोप्याची डाळभाजी’ असं म्हणतात. ‘दापोडे /भातोडे’ म्हणजे ज्वारीचे पापड, मुगाचे सांडगे म्हणजे आपल्या मूगवड्या, गोड लिंबाचा पाला म्हणजे कढीपत्ता. गोडलिंबाचा पाला कोणाच्याही घरून झाडावरचा तोडून आणणं ही समाजमान्य पद्धत, पण इकडे तो ‘कढीपत्ता’ होतो व भाजी विकत घेतल्यावर भाजीवाल्या-

कडून हक्काने मागायचा असतो हे नव्याने कळलं. सांडशीला-पकड, सराट्याला-उलथनं, कोपऱ्याला-परात, गंजाला-पातेलं, कोहळ्याला- लाल भोपळा, मुंगण्याच्या शेंगेला-शेवग्याची शेंग, ज्ञानात भरच पडत गेली

● रंजना लाटकर

‘सुखी संसाराचा मार्ग पोटातून जातो’, असे म्हणतात. याचा अनुभव मी गेल्या ३० वर्षांपासून घेत आहे. आज महाराष्ट्रात कुठेही गेले तरी अनेक ठिकाणी हक्काची घरे निर्माण झाली आहेत, त्याचे श्रेय माझ्या पाककलेला व खाद्यासंस्कृतीला द्यावं लागेल. माहेरी व सासरी घरी येणाऱ्यांची वर्दळ खूप होती. त्यातून नवनवीन पदार्थ तयार करणे व इतरांना खाऊ घालण्याची आवड निर्माण झाली. यामुळे मोठ्या प्रमाणात माणसे जोडली गेली.

माझा जन्म व शिक्षण तेलंगण व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या कांडली, भोकर या परिसरात, ग्रामीण भागात झाले. त्यामुळे मराठी व तेलगू अशी आमची मिश्र खाद्यासंस्कृती निर्माण झाली. विशेषत: तेलगू भाषा व खाद्यासंस्कृतीचा आमच्या घरी प्रभाव होता. भात हे मुख्य अन्न. घरी कोणी जेवायला आलं की खिचडी-कढी वा भाताचा कुकर लावला आणि आंबट वरण केलं की काम भागत असे. माहेरी मला स्वयंपाक करायची अजिबात सवय नव्हती. लग्नानंतर जालन्याला आले. सासरी मराठवाडी खाद्यासंस्कृतीचा प्रभाव होता. रोजच्या जेवणात भाताचे प्रमाण कमी व पोळ्या-भाकरीवर अधिक भर होता. मला भाकरी करता येत नव्हती. ज्वारीची भाकरी कशी करावी, ती हातावर अलगद घेऊन तव्यावर कशी टाकावी तसेच पातळ, पांढरी शुभ्र, पुरीसारखी फुगलेली, संपूर्ण पापुद्रा निघणारी व न डागाळलेली भाकरी कशी करावी याचं कौशल्य सासूबाईंनी मला शिकवलं तसंच अनेक मराठवाडी पारंपरिक पदार्थही शिकवले. त्यामुळे मी पुढच्या पिढीसाठी हे पदार्थ करून खाऊ घालू शकते आहे.

संयुक्त कुटुंबात जावा, नणंदांचा सहवास मला लाभला. माझ्या एक जाऊबाई सोलापूरच्या. एके दिवशी एक भाजीवाली मेथीची भाजी घेऊन आली. जाऊबाई म्हणाल्या, ‘‘मेथीच्या चार पेंढ्या घे.’’ मराठवाड्यात मेथीची जुडी असा शब्दप्रयोग आहे तर ‘पेंढी’ हा शब्द गुरांच्या चाऱ्यासाठी वापरला जातो. त्यामुळे जुडी व पेंढी यावरून आमच्या घरात मोठा हशा पिकला होता. दीर तर गमतीने म्हणाले होते की, ‘‘घे चार पेंढ्या आणि टाक एकेकापुढं.’’ हा प्रसंग आठवला की आजही हसू येतं. माहेरी माझ्या मोठ्या बहिणीने मला खूप गोष्टी शिकवल्या, यात खारवलेल्या लाल मिरच्या, कच्चे पोहे, चवदार मेतकूट, पूड चटणी, चित्रान्न, सांबार आदी पदार्थांचा समावेश करावा लागेल. तर सासूबाई जवस, शेंगदाणे, तीळ चटणी रोजच्या जेवणात करीत. मी लोणच्याचे विविध प्रकार करीत असे. यात मिरची, हळद, गाजर, कारलं, लिंबू, कैरी यांच्यापासून मी तयार केलेलं झटपट (इन्स्टंट) लोणचं हळूहळू माझ्या सासूबाई व इतरांना आवडू लागलं, तर पाटा-वरवंटा यावर वाटून केलेली लसणाची खमंग चटणी, वाळलेल्या लाल मिरचीचा तव्यावर फोडणी देऊन केलेला खुडा हे खास मराठवाडी पदार्थ सासूबाईंनी मला शिकवले. सासरी प्रत्येक भाजीत शेंगदाणा कुटाचा भडिमार होता. मी स्वयंपाकघराचा ताबा घेतल्यापासून आमच्या किराणा मालातील शेंगदाण्याचा खर्च अर्ध्यावर आला, कारण घरी वाटून तयार केलेला मसाला भाजीत घालण्यावर माझा भर होता. आषाढ महिन्यात केले जाणारे काशीफळाचे घारगे, पुरणपोळी, मेथीचा घोळाणा, वाटून केलेली लाल मिरची-लसणाची ओली चटणी असे अनेक पारंपरिक पदार्थ मला सासरी शिकायला मिळाले. एक प्रकारे खाद्यासंस्कृतीचा हा पौष्टिक वारसाच मी आज पुढे नेते आहे याचा मला आनंद आहे.

● वर्षा सातभाई

आमचे लग्न म्हणजे कोकण आणि देश यांचा संगम. अर्थात जेवण-खाण्यात खूप फरक. आमच्याकडे कोकणात तूर-डाळीची आमटी करायची म्हणजे फोडणीत मिरच्या, कढीपत्ता घालून वरून नारळ, कोथिंबीर घातली जातं. त्यात चिंचेचा कोळ आणि थोडा गूळ घालून आंबट-गोड असे वरण बनवतात. तर देशावर त्याला ‘फोडणीचे वरण’ असे म्हणतात. त्यात लसणाची फोडणी व लालभडक तिखट घातलं जातं. देशावर वरणात/ भाज्यांत गूळ/ साखर बिलकूल घालत नाहीत. त्यामुळे मला ते खावंसं वाटत नसे. वरणात कणकेची शंकरपाळी घालून त्याला शिजवतो, त्याला आम्ही ‘चकोल्या’ असे म्हणतो. एकदा जाऊबाईंनी वरण मुटकुळा केला होता. तो पदार्थ काय आहे हे नावावरून मला काहीच कळलं नाही. पण पाहिल्यावर मी म्हटलं, ‘‘या तर आमच्या चकोल्या.’’ एकदा मी फोडणीची पोळी केली, तर जाऊबाई म्हणाल्या, ‘‘हा तर आमचा फोडणीचा कुस्करा.’’ अशा गमतीजमती होत असत. आमच्याकडे सगळ्यात नारळ, कोथिंबीर घातली जाते, तर जाऊबाई सगळ्यांत लाल तिखट, शेंगदाणा कूट घालत असत. असं करता मला देशावरच्या तर यांना कोकणातील पदार्थांची सवय झाली नि सर्व काही जमून गेलं.

● ललिता इनामदार

माझं माहेर अकोल्याचं अन् सासर वर्ध्याचं. माझं लग्न झालं तेव्हा सासरी आमचं एकत्र कुटुंब होतं. घरात अठरा जण, साधारण माझ्याच वयाच्या तीन चुलत नणंदा होत्या. कॉलेजमध्ये शिकत होत्या. ‘‘वहिनी , वहिनी’’ करत भोवती भिरभिरत असायच्या. मला ते भारीच गोड वाटायचं. त्या नवलाईच्या दिवसातला हा किस्सा. माझ्या लग्नाला जेमतेम महिनाही झाला नव्हता आणि माझ्या मोठ्या जावेचा वाढदिवस आला. अन् या नणंदा चिवचिवायला लागल्या ‘‘ए वहिनी, आज आम्हाला तुझ्या हातचं काहीतरी मस्त खायचंय. तुझी काय स्पेशालिटी असेल ती कर ना!’’ आता आली की नाही पंचाईत! माझी कसली डोंबल्याची स्पेशालिटी? मला तर स्वयंपाकातलं काहीच खास असं येत नव्हतं. अर्थात थोडंसं प्रसंगावधान राखून वेळ निभावून नेणं भाग होतं. अनायसे तेव्हाच तीन- चार दिवसांपूर्वीच आमच्या घरी पुडाची वडी (नागपुरी स्टाइलची) केली होती. माझ्या सासूबाईंची स्पेशालिटी. आणि नवी नवी सुनबाई म्हणून इम्प्रेशन मारण्यासाठी का होईना मी त्यांच्या हाताखाली कुठे कोथिंबीर चिरून दे, आलं किसून दे, त्या सांगतील तसं तिखट, मीठ, खसखस, चारोळी, धणे जिरे पूड, लिंबू, चवीला साखर वगैरे वगैरे टाकून पुडाच्या वडीचं सारण तयार करण्यात त्यांना पूर्ण मदत केली होती. त्यामुळे ते सारण कसं करतात ते माझ्या चांगलंच लक्षात होतं. मासिकात मी नुकतीच ब्रेड रोलची रेसिपी वाचली होती. त्यातून मला एक युक्ती सुचली. म्हटलं, या दोन रेसिपीज एकत्र करून नक्कीच काहीतरी नवीन करता येईल की! हा पुडाच्या वडीचा मसाला ब्रेडमध्ये भरून, त्याचा रोल बनवून तो बेसनाच्या पिठात बुडवून तळला तर? झालं, मी बिनधास्त सांगून टाकलं, ‘‘मी आज एक नवीन रेसिपी करणार आहे!’’ अर्थात मदतीला सगळ्या होत्याच. आतला मसाला छान चविष्ट झाल्याने अर्थात ब्रेड रोलही मस्तच झाले. गरमागरम, खमंग ब्रेड रोलचा सगळ्यांनी अगदी मनसोक्त आस्वाद घेतला अन् कौतुकही केलं.

● मधुमती वऱ्हाडपांडे

आंबट वरण आज फोडणीला टाकायला घेतलं. हो, एवढ्या वर्षांनंतर डाळीच्या आमटीला आंबट वरण हा शब्द माझ्या तोंडात चपखल बसलाय. माझ्या सासरी आंबट वरण म्हणजे लसणाच्या फोडणीचं वरण असं समीकरण असे. फारच क्वचित जिरं, मोहरीचा वापर होई. आईकडे आमटीची विविधता खूप होती. भोपळा, घोसाळं, टोमॅटो, काय काय घालून आमटी सजवली जाई. अगदी माझे वडीलही अनेक गोष्टी घालून आमटी करायचे, पण त्या आमटीची चव फक्त आणि फक्त लाजवाबच असे. सासरी नवरात्रात आठ दिवस नैवेद्याला आंबट वरण लागे. त्यावेळी या वेगवेगळ्या चवीच्या आंबट वरणाने नैवेद्याची लज्जत वाढवता आली.

● साधना ताम्हाणे

मला मुळातच खाण्याची खूप आवड. घरचे आणि बाहेरचे खमंग तिखट पदार्थ मला खायला विशेष आवडतात. पण सासर आणि माहेर एकाच शहरातले असल्याने चवींमध्ये समानता होती. माहेरी असताना, दोघी बहिणींमध्ये मी लहान असल्याने मला कधी स्वयंपाकघरात जायची वेळ येत नव्हती. खरी मज्जा सुरू झाली ती लग्नानंतर. माझ्या सासरी सगळेच खाण्याचे शौकीन. रोज वेगवगळे प्लॅन्स सुरूच असतात. त्या उलट माझ्या माहेरी मात्र सगळं ऐन वेळी ठरणार त्यामुळे मला या सगळ्याचं प्लॅनिंग करावं लागतं, हेच मुळी ठाऊक नव्हतं. सणांना कसे पारंपरिक पदार्थ बनवायचे, त्याची तयारी कशी करून ठेवायची हेही मला सासरीच शिकायला मिळालं. उदाहरण द्यायचं झालं तर, घरी दही लावून चक्का करून श्रीखंड करणं, गुळपोळीसाठी लागणारं सारण करणं, चकलीची खमंग भाजणी करणं असे अनेक पदार्थ आम्ही मिळून आवडीने करतो. त्यामुळे सासरी आल्यावर इकडच्या खाद्यासंस्कृतीची ओळख करून घेताना सुरुवातीला जड गेलं, पण आता ते अंगवळणीच पडलं.

● सुचित्रा पंडितराव

लग्न झाल्यानंतर स्वयंपाक करणं हा विषय प्रत्येक नववधूला ताण देणारा असतो. तसं माझं काहीसं झालं. माझ्या सासूबाई सुगरण होत्या. त्यांच्या बरोबरीने स्वयंपाकघरात काही पदार्थ करायचा मला खूप ताण यायचा. मी माहेरची कोकणस्थ आणि माझी आईही माहेरची कोकणस्थ, पण ती सांगलीची होती. माझं सासर कऱ्हाडे, सासूबाई कऱ्हाडी पद्धतीचा स्वयंपाक करायच्या.

एकदा मी वांग्याचं भरीत करायला घेतलं. आईकडे करायची पद्धत होती त्याप्रमाणे सासरीही तसंच बनवलं, पण भरीत खाल्लं तेव्हा सर्वांची तोंडं बघण्यासारखी होती. यामुळे मला माझी चेष्टा झाल्यासारखं वाटून डोळ्यात पाणी आलं. मग सासूबाई म्हणाल्या, ‘‘अगं, आपल्यात असं भरीत करत नाहीत.’’ मी भाजलेलं वांगं सोलून, ठेचून त्यात कच्चा कांदा, हिरवी मिरची, खोबरं, दाण्याचा कूट, मीठ, किंचित साखर घालून थोडं दही घालून एकत्र केलं होतं. याउलट सासरी साहित्य तेच पण सर्व फोडणीला टाकायचं. म्हणजे छान खमंग भरीत तयार होतं. हळूहळू शिकत शिकत सासर-माहेर दोन्हीकडचे पदार्थ जमत गेलेच.

● मुग्धा पानवलकर

४३ वर्षांपूर्वी लग्नानंतर सांगलीहून नागपूरला स्थलांतरित झाले. लग्नाआधी विदर्भाशी काहीही संबंध नसल्यानं येथील संस्कृतीशी मी पूर्णपणे अनभिज्ञ होते. आमच्याकडे सांगलीला भरपूर दूध दुभतं, उत्तम तूप , कंदी पेढे, कृष्णा काठची वांगी आदी गोष्टींचा फार अभिमान! जेवणाच्या शेवटी दहीभात खायची मला सवय होती. येथे मात्र शेवटच्या भातातही आमटी घालूनच खाण्याची पद्धत होती. गोष्ट अगदी लहान, पण तेव्हा तो बदलही अवघड वाटे. विदर्भात एकूणच तिखट व तेलाचे प्रमाण जास्त. मी स्वयंपाक केला तर वहिनींनी भाजीच्यावर मिरची धरली होती काय, असा गमतीशीर शेरा ऐकायला मिळत असे. तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग व लाल तिखट टाकलं की झाला तडका तयार. प्रत्येक वैदर्भीय व्यक्तीचा हा वीक पॉईंट! बाहेर सपक जेवण मिळालं तर हॉटेलच्या भटारखान्यात जाऊन तडका ताटात पाडून घेणारे वैदर्भीय मी पाहिले आहेत. मिळमिळीत खाण्याची सवय असलेल्या मला मात्र तडका या नावाचीच भीती वाटते. प्रत्येक चार भिंतीत वेगळी खाद्यासंस्कृती असते. तिला नावे ठेवण्यापेक्षा अंगिकारणे महत्त्वाचे!

● प्रफुल्लता रोडे

लग्न होऊन नवीन घरात गेल्यावर प्रत्येक बाईच्या आयुष्यात मोठे बदल घडत असतात आणि ते स्वाभाविकही असतं. ‘आमच्याकडे हे असेच केले जाते’ हे वाक्य कायम ऐकायला मिळतं. माझ्या सासूबाईंच्या प्रेमळ स्वभावामुळे मला नवीन घरात कधीच दडपण आलं नाही. आईंच्याकडून अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या. पानगा, तेलपोळ्या, मसाले भात,नानकटाई, गोडा मसाला असे एक ना अनेक पदार्थ मी त्यांच्या पद्धतीने बनवायला शिकले. माझ्या आईच्या आणि सासूबाईंच्या करण्यामध्ये खूप फरक होता दोन्ही घरच्या पद्धती, चवी वेगवेगळ्या होत्या. त्यामुळे आजही मी स्वयंपाक करताना दोन्ही घरातल्या पद्धतींची माझ्या परीने सांगड घालण्याचा प्रयत्न करते. मला आशा आहे की काही वर्षांनी माझी येणारी सूनही माझ्या खाद्या संस्कृतीशी नक्की जुळवून घेण्याचा प्रयत्न करेल, त्यासाठी मी तिला पूर्ण सहकार्य करेन.
● प्रज्ञा पुरंदरे
लग्न झाल्यानंतर आणि तेही वेगळ्या प्रांतात तर खाद्या स्थित्यंतरातून जावंच लागतं. अनेक जणी वर्षानुवर्षं त्यातून न बोलता जात आहेत. या समाजाच्या मनोवृत्तीमुळे आतापर्यंत कधी या विषयाला वाचा फोडण्यात आली नव्हती. ते काम डॉ. मंजूषा यांनी केलं, त्याबद्दल त्यांचे आभार. माझ्या बाबांचं मूळ गाव हे खानदेशात येतं, पण माझ्या बाबांची आई (म्हणजे माझी आजी) आणि माझी आई या दोघीही कोकणस्थ, पण बाबांचं सगळं आयुष्य मुंबईत गेलं. त्यामुळे माझ्या माहेरच्या जेवणावरती कोकणस्थ प्रभाव होता. माहेरी सर्व भाज्यांमध्ये नारळ व गूळ असणं, फारसा तिखट, कांदा-लसूण नसलेला सात्त्विक स्वयंपाक. अशा वातावरणातून मी लग्नानंतर पक्क्या खानदेशी घरात गेले. तिथलं जेवण माझ्या सवयीपेक्षा भरपूर जास्त तिखट तसेच भाज्या करायच्या पद्धती वेगळ्या (शेंगदाणे वाटून वगैरे) यामुळे सुरुवातीला मला रुळायला त्रास झाला. जास्त तिखट व कांदा, दाणे, लसणाचा भरपूर वापर असलेल्या स्वयंपाकामुळे मला सुरुवातीच्या दिवसांत जिभेला आणि पोटाला खूप त्रास व्हायचा. आता जीभ थोडी सरावली असली तरी पित्ताचा त्रास अधूनमधून उद्भवतोच. तसेच रोजच्या जेवणात ओला नारळ नसल्यामुळे त्वचेच्या कोरडेपणाचा त्रासही सुरुवातीच्या दिवसांत जाणवला. अन्न ही माणसाची पहिली मूलभूत गरज… आणि लग्नानंतर बायका शारीरिक, मानसिक स्थित्यंतर तर अनुभवतातच, पण साध्या रोजच्या खाण्यापिण्यासारख्या मूलभूत गोष्टींबद्दलही खूप मोठ्या बदलांना सामोऱ्या जातात. या गोष्टीबद्दल सासरच्यांनी निदान जाण ठेवली किंवा सहानुभूती दाखवली तरी हे स्थित्यंतर सोपे जाईल.

● प्राजक्ता हळकुंडे

मी माहेरची ललिता पटवर्धन. माझे वडील बँकेत असल्यामुळे दर तीन वर्षांनी त्यांची बदली व्हायची. वडिलांच्या बदलीनिमित्ताने आम्ही अकोल्याला (विदर्भ) असतानाच माझे लग्न जमले. अकोल्याजवळ अकोट या तालुक्याच्या ठिकाणी माझे सासर. अकोट जवळपास खेडेगावच होते आणि सासर देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण. त्यातही विदर्भातल्या छोट्या तालुक्यातले. त्यामुळे रोजच्या स्वयंपाकाच्या बाबतीत तर खूपच रुचीभिन्नता होती. रोजची भाजी जरा मसालेदार आणि तिखट चवीची. त्यातलीच एक म्हणजे डाळ-भाजी. माहेरी पातळ भाजी म्हणजे नुसतं बेसन लावून किंवा पालकाची ताक भाजी. आणि डाळ-भाजी म्हणजे तुरीचे वरण त्यात शिजलेला पालक घालून केलेलं थोडंसं घट्टसर वरण. जे मला अजूनही नीटसं जमत नाही. माहेरी खिचडी म्हणजे मुगाच्या डाळीची फोडणीची खिचडी, पण सासरी तुरीची डाळ आणि तांदूळ एकत्र कुकरमध्ये शिजवलेली खिचडी. माझ्या सासरच्या सगळ्यांनी मला न दुखावता नीट समजावून सांगत माझ्या स्वयंपाकाचे कौतुक करून स्वीकारल्यामुळे अवघड गेले नाही.

● सुप्रिया पांडे

माझं लग्न जरी एका मुंबईकराशी झालं असलं तरी त्यांचे बहुतेक आप्तजन मध्य प्रदेश खासकरून इंदोरला राहाणारे. मी पडले जन्मजात मुंबईकर! कुठेही अॅडजस्ट करणारी. ‘चलता है’ पंथाची. त्यामुळे सुरुवातीला या खाद्यासंस्कृतीशी जुळवून घेताना बरेचदा तारांबळ उडाली. पदार्थाच्या वेगळ्या नावांमुळे माझ्यावर ओढवलेला बाका प्रसंग सांगावासा वाटतो. लग्नानंतर जेमतेम २-३ महिन्यांनंतरची गोष्ट. सासू-सासरे बाहेरगावी गेले होते आणि इंदोरला राहणारे माझे मामेसासरे अचानक आमच्याकडे आले. चहापाणी झाल्यावर ‘‘जेवायला काय करू?’’ असा प्रश्न विचारायचा आगाऊपणा केला आणि फसले. कारण मुळात लग्नापर्यंत कॉलेजच्या अभ्यासामुळे स्वयंपाकघरात माझी फारशी ये-जा नव्हतीच. चार माणसांचा जुजबी स्वयंपाक करता येत होता. ‘‘जेवणाचे काय मोठं घेऊन बसलीये तू? थन्न रिकाम्यापोटी जायचं नाही म्हणून थोडं खाऊन घेतो. पण तू बिलकूल जास्तीचे घांदे घालत बसू नको. थोडक्यात कर काय ते. हां… चकुल्या आणि वरून थोडा बेसनभात खाऊन चाल्ला जाईने. बस्स.!’’ इंदोरी लहेजातील त्यांच्या ‘बस्स’ शब्दानंतर मी मात्र ताडकन् उभी राहिले. दिवाळीच्या फराळातील चकल्या फस्त करण्यात हातखंडा असला तरी चकुल्या? आणि बेसनभात? मला आजवर वरणभातापासून मसालेभात, वांगी, तोंडली, मटार असे कुठकुठल्या भाज्या घातलेले भात, पुलाव माहीत होते, पण बेसनभात? स्वत:च्या आगाऊपणावर प्रचंड चिडले. पण नवऱ्याला बघितल्यावर माझा जीव भल्यामोठ्या इंदोरी भगुण्यात (मुंबईच्या भाषेत पातेले) पडला. बायको ‘चकुल्या’ करतेय ऐकून तो आधी खूश झाला, पण माझं चकुल्याबद्दलचं अज्ञान पाहून त्याने त्याचा अर्थ सांगितला. तेव्हा ‘अरे, हाय काय अन् नाय काय?’ म्हणत मी आनंदाने अक्षरश: उडी मारली. कारण चकुल्या म्हणजेच आपल्याकडची ‘डाळढोकळी’ किंवा ‘वरणफळ’ आणि ‘बेसनभात’ म्हणजे चक्क आपला ‘पिठलंभात’ हो. अर्थातच तत्क्षणी अंगात संचारलेल्या अन्नपूर्णेने तासाभरातच मामेसासऱ्यांची बेसनभात आणि चकुल्यांची फर्माईश पूर्ण करून त्यांच्याकडून कौतुकाची थापही मिळवली हे सांगायला नकोच.

● अलकनंदा पाध्ये

माझे माहेर पुण्यातील जुन्नर जिल्ह्यात, तर सासर कोकणात रत्नागिरीला. त्यामुळे माझ्या खाद्यासंस्कृतीत खूप फरक पडला. लग्नाला आता २८ वर्षे झाली. माहेरी फार तिखट जेवण नसायचे आणि सासरी सासरे, नवरा सर्वांनाच तिखट स्वयंपाक आवडतो. आता त्यात मुलाची भर पडली आहे.

नवीन लग्न होऊन आल्यावर मी बनवलेल्या भाजीत नणंद गुपचूप येऊन दोन चमचे तिखट जास्त टाकायची. इकडे उकडीचे मोदक, काकडीचे, आंब्याचे, फणसाचे सांदण, पातोळ्या, नागपंचमीला आवर्जून खांडवी, रस घावणे, नारळ रसातील शिरवाळे तर घाटावर संक्रांतीला केली जाणारी गूळपोळी, पाकातील पुरी सासरी सर्वांना आवडू लागली. कोकणात रानभाज्यांची खूप विविधता आहे. पावसाळ्याच्या दिवसांत सुरुवातीला त्या करणे. फणसाच्या सीझनला कोवळ्या फणसाच्या कुयरी, बी धरलेला, मग कच्च्या गऱ्यांची भाजी, असे सर्व प्रकार खायला फार चविष्ट लागतात. माझ्या भागातील पालेभाज्या मी सासरी सगळ्यांना खायची सवय लावली. उदा. करडई, पोकला, डाळ-पालक, शेपू या भाज्याही सर्व जण आता चवीने खातात.

● मृणालिनी कोकजे

माझ्या माहेरी सगळा गोडाचा स्वयंपाक आणि सासरी एकाही पदार्थात गोडाचा गंधही नाही. माझी आई जसा स्वयंपाक करायची तसाच स्वयंपाक मी करू लागले. माझ्या पतीला भाजी, वरण, कोशिंबीर कशातही साखर, गूळ नको असे. सुरुवातीला तर गंमतच झाली. स्वयंपाक माझ्या सासूबाई करायच्या आणि त्यांना आजींची मदत होती. सगळ्या भाज्या चिरून देणं, निवडून, धुवून ठेवणं हे आजींचं काम. बाकी फोडण्या सगळ्या आईने घालायच्या. सुरेख स्वयंपाक करायच्या माझ्या सासूबाई. तर त्यांनी मला म्हटलं, ‘‘आज तू वरण फोडणीला घाल. अगदी तुझ्या पद्धतीनं घाल.’’ त्यांना बहुतेक माझा गोडाचा हात माहीत नव्हता. मी कांदा, टोमॅटो, मिरची फोडणीला टाकलं आणि शिजलेलं वरण त्यात मिसळलं. थोडा चवीला गूळही घातला. आजी बारकाईने निरीक्षण करत होत्या. मी गूळ घातल्याबरोबर त्या आईंना जोरात ओरडून म्हणाल्या, ‘‘अगं, ही गोडाची आहे गं.’’ आईंनी नकळत कपाळाला हात लावला.

जशी गोडाची गोष्ट तशीच टोमॅटोची. माहेरी प्रत्येक भाजी-आमटीला टोमॅटो होताच होता. सासरी टोमॅटो फक्त सूप बनवायला वापरत. रश्शाची भाजीसुद्धा टोमॅटो न घालता, कांदा-खोबरं, खसखस, आलं, मिरची, लसूण घालून केली जायची. आणि मला वांग्याच्या भाजीत, भरितात, पिठल्यात सगळ्यात टोमॅटो हवा. आता मीही सासरच्या पद्धतीला सरावले आहे. माहेरी गेले की आईला/ बहिणीला म्हणत असते, ‘‘केवढा गोड स्वयंपाक करते गं तू!’’ आता दोन्ही आईंचे थोडे थोडे पदार्थ शिकून बऱ्यापैकी चांगला स्वयंपाक करते आहे.

● प्रज्ञा आठल्ये

लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलींना काय काय अडचणी येतात हे मन मोकळं करून लिहिण्याची संधी स्त्रियांना दिल्याबद्दल विशेष आभार!

माझ्या लग्नाला आता ५५ वर्षं झाली. मी, लग्न होऊन ईटारसी, मध्य प्रदेशहून साताऱ्याला आले. मध्य प्रदेश म्हणजे गव्हाचे कोठार, पण इकडच्या घरी मात्र रोज भाकरी करत आणि ती मला करता येत नसे. खायला तर अजिबात आवडत नसे. सासरी सकाळ झाली की चहा घ्यायचा आणि कामाला लागायचे. नाश्ता हा प्रकारच नाही. मला नऊ-सव्वानऊ वाजले की नाश्त्याची खूप आठवण यायची, पण खायचे काय? सगळेजण सारखा अर्धा अर्धा कप चहाच घेत. जेवणाची पण तीच तऱ्हा. भाकरी, कढी व पचपचीत भाजी. फ्लॉवरसुद्धा बारीक पालेभाज्यांसारखा चिरायचा. अर्धा चमचा तेलात पाण्यावर जेवण शिजवायचे त्यामुळे माझी जेवणाची पंचाईत होत असे. सर्रास पाणीपुरी, सामोसे, लस्सी असे पदार्थ खायची पद्धत. ५० वर्षांपूर्वी साताऱ्याला पाणीपुरी माहीत नव्हती. बाजारात मटार आले की, सामोसे करावेसे वाटत पण लेवाळ्या, कणकेपासून केलेल्या मटारच्या करंज्या, ओलं खोबरे सारणात घालून करायची आमची पद्धत, तर सासरी सगळ्या पदार्थांत शेंगदाणे सर्रास वापरतात. पोहे, फोडणीची पोळी-भात सर्वात शेंगदाणे घालायचे. रस्सा म्हणजे दाण्याचा कूट सगळ्यात घातला की झाले. माहेरी दाण्याचा वापर नाहीच. त्यामुळे सासरी आठ पोती शेंगा दरवर्षी आणलेल्या बघून मोठी मजा वाटायची.

● अनुपमा गोडबोले

इंटरकास्ट, इंटरभाषा आणि इंटरराज्य असं आमचं इंटरेस्टिंग लग्न असल्यानं स्वयंपाकाच्या बाबतीतही सगळंच बदललं. आईकडे अतिशय अभावानेच दिसणारे कांदा, लसूण जिकडे-तिकडे चोहीकडे दिसू लागले. त्यातून सासूबाईंकडे जुन्या पद्धतीचे संगमरवरी पंधरा किलोचे पोळपाट, भलीमोठी परात, वेगळ्या आकाराचे लाटणे, दहा किलोचा लोखंडी तवा आणि त्यांचा आग्रह असा की, मी यावरच पोळ्या करायच्या. मग काय, ‘आधी हाताला चटके तवा मिळते भाकर…’ तंतोतंत! आधी सगळं येत असून स्वयंपाक येत नाही, असा शिक्का बसलाच ना मग!

असंच ‘वेटलिफ्टिंग’ करत आणि चटके खात, शिकत, चुकत दोन वर्षं गेली. सासूबाईंनी कधी प्रमाणं सांगितली नाहीत. त्या सगळं अंदाजाने टाकायच्या. त्यामुळे माझ्यावर करायची वेळ आली की कठीण वाटायचं. पण बघून बघून शिकत गेले. त्यातही थोडे आईकडचे पदार्थही करत गेले जे त्यांना आवडले. अगदी फोडणीचा कुस्करा, थालीपिठापासून ते पार मोदक, पुरणपोळी करण्याचंही धाडस केलं. अर्थात फोनवर आईकडून नीट सगळी प्रमाणं, कृती लिहून घेऊन मगच! दरम्यानच्या काळात दोन नवीन माणसं आली आयुष्यात. एक माझी धाकटी जाऊ आणि दुसरी माझी बाळी. दोघींच्या येण्याने माझ्या प्रवासात बरेच बदल झाले. आता मला जावेच्या रूपात ‘पार्टनर इन क्राइम’ मिळाला. आम्ही एकमेकींना खूप सांभाळून घेतलं आणि लेकीच्या रूपात प्रयोग करण्यासाठी हक्काचे माणूस. मी, जाऊ आणि सासूबाई एकत्र स्वयंपाक करत असू तेव्हा तर त्याला ‘कुकिंग कॉन्फरन्स’चं रूप यायचं. तिघीही एकमेकींना प्रत्येकीच्या माहेरी एखादा पदार्थ कसा बनतो आणि तेच कसं बरोबर हे पटवून देत असू. सुरुवातीला धक्के मारत चालणारी माझी गाडी या प्रवासात आता नीटच पळते आहे. एकूणच माझ्या या खाद्या प्रवासाला आईच्या पद्धतीचं, सासूबाईंच्या पद्धतीचं, दोन्हींचे फ्युजन आणि लेकीच्या आवडीचे नवीन अशा पदार्थांनी समृद्ध केलं. त्यामुळे कभी कभी लगता है, अपूनही मास्टर शेफ इंडिया है!

● दीपा गौर

माझं माहेर-सासर नागपुरातलंच, पण सासूबाई कोकणस्थ होत्या. लग्न झाल्यानंतर मला शब्दांमधला, खाण्यापिण्याच्या पद्धतींमधला फरक प्रकर्षाने जाणवायला लागला, पण बऱ्याच गोष्टी मी सासूबाईंकडून शिकले. माझी आई आंबट गोडाचं वरण करायची. चिंच किंवा आमचूर किंवा आमसूल आणि गूळ घातलेलं फोडणीचं थोडंसं पातळ वरण करत असे. खूप आवडायचं मला ते. सासूबाईंची पद्धत मात्र वेगळी होती. त्या दोन-तीन प्रकारचं वरण करायच्या. चिंच गूळ घातलेलं, बिना आंबट गोडाचं, आणखी एक पद्धत म्हणजे पळी फोडणीचं वरण. हे माझ्यासाठी नवीन होतं. म्हणजे साध्या वरणाला पळीमध्ये किंवा छोट्या कढईत तेल घालून मोहरी, हिंग, मिरची, कढीपत्ता घालून ती झणझणीत फोडणी वरणात घालायची. चर्र आवाज आला की छान फोडणी झाली समजायचं. काही सासरच्या तर काही माहेरच्या पद्धती घेऊन मी माझी खाद्यासंस्कृती निर्माण केली.

● अलका मोकाशी

मी ‘झाडे कुणबी’ आणि माझे पती मलकापूरकडचे ‘लेवा पाटील.’ परंतु नागपूरला स्थायिक झालेले. माझ्या माहेरी तांदळाचे विविध पदार्थ बनवले जातात, तर सासरी पोळी, भाकरी, शेंगदाण्याच्या चटणीवर ताव मारला जातो. माझ्या सासूबाई अतिशय सुगरण. त्यांनी मला प्रत्येक भाज्या करण्याच्या पद्धती सांगितल्या. सासरी प्रत्येक भाजीत कांदा, टोमॅटो घालत नाही. सहसा भाजीला जिरे, मोहरी, लसणाच्या कळ्या व हिरव्या मिरच्यांची फोडणी असते. मलकापुरातील मिरचीची भाजी, रोडगे, लिंबाची कढी, शेपूची भाजी, शेवेची भाजी, कानोले, शेंगदाण्याची ओली आणि सुकी चटणी इत्यादी अफलातून पदार्थांची वर्णी माझ्या पाककलेत लागली.

● विनीता रोंठे

यांनीही पत्रे पाठवली – मोनाली चेतन रेऊरे, जान्हवी नवरे, मनाली लेले, सुनिता साबळे, संध्या गावंडे ●