कुठल्या तरी मोठय़ा शहरातल्या उद्यानावरून चाललेला वाद वृत्तपत्रात छापून आला होता. ते वृत्तपत्र माझ्यासमोर टाकत नव्वदीत प्रवेश करणारे गृहस्थ मला कळकळीनं सांगत होते. ‘अहो बगीचे नाही, आज माणसांना वनांची गरज आहे. वनं उभारा, वनं जोपासा. घातक कार्बनडाय ऑक्साईड भविष्यकाळाच्या छाताडावर पाय रोवून उभा आहे आणि विनाश करणार आहे. सुशिक्षित लोक गाफील आहेत.. त्यांना जागं करा. माझ्या इतिहासाबद्दल नको, देशाच्या भविष्याबद्दल लिहा.’ खणखणीत आवाज, तडफदार वक्तव्य, गोरापान चेहरा संतापानं लालबुंद झालेला.. त्यांचं नाव मेजर जनरल अनंत विश्वनाथ नातू.
१९७१ च्या युद्धात पूँछ भागात अतुलनीय पराक्रम गाजवल्यानंतर महावीरचक्रानं सन्मानित केले गेलेले हे जनरल नातू! त्यांनी स्थापन करून नेतृत्व केलेली तुकडी ४/९ गुरखा रायफल्स! पुढे त्यांचे सुपुत्र ब्रिगेडियर
सैन्यदलातून पिढय़ान् पिढय़ा देशसेवा करणारी अनेक कुटुंब आहेत. पण एकाच तुकडीचं तीन पिढय़ांनी नेतृत्व करणं विरळाच. भाऊसाहेब नातू मला मिस्कीलपणे म्हणाले, ‘अहो कसली घराणेशाही अन् काय, तुम्हाला माहीत आहे का पूर्वी असं म्हटलं जाई की, ज्या घराच्या दारात पिंजऱ्यातला पोपट वेद म्हणत असतो ते घर मंडन मिश्रांचं! हा, वंशपरंपरेनं अनेक कुशल कामं उत्कृष्टरीत्या संक्रांत होतात हे खरंय, पण जातीव्यवस्थेवरच्या राजकारणानं या कौशल्यांची मुस्कटदाबी झाली.’ बोलताना संस्कृत वाङ्मयापासून इंग्रजी वाङ्मयापर्यंत त्यांची मुशाफिरी चालू होती.
प्रचंड व्यासंग, तल्लख स्मरणशक्ती, भोवती घडणाऱ्या सर्व गोष्टींत रस, समाजाच्या भल्याची तळमळ आणि जोडीला शुद्ध वैज्ञानिक दृष्टी आणि प्रखर राष्ट्रनिष्ठा त्यामुळे त्यांचं बोलणं ऐकत राहणं ही एक पर्वणीच!
स्वातंत्र्यापूर्वीच १९४६ साली नातू सैन्यदलात रुजू झाले. भिक्षुकी करणारे वडील अन् पाठोपाठ आईचं छत्र वयाच्या सतराव्या वर्षीच हरपलं. पण वडीलही प्रखर बुद्धिमान आणि तत्त्वनिष्ठ होते. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी अकोल्यात ‘लवंगांच्या सत्याग्रहात’ भाग घेतला होता. आफ्रिकेतून येणाऱ्या लवंगांवर बहिष्कार घालण्यासाठी हा सत्याग्रह होता. त्यांचं पहिलंच पोस्टिंग अबोटाबादला होता. (ओसामा बिन लादेनवालं) मुस्लीमबहुल अबोटाबादमध्येही ते वर्षभरात लोकप्रिय झाले होते. याची एक विलक्षण आठवण ब्रिगे. विजय यांनी सांगितली. फाळणीनंतर सगळी गडबड उडाली. त्या वेळी हिंदुस्थानात परत येणारी बस काही शस्त्रधारींनी अडवली अन्, ‘है कोई बली का बकरा’ अशी गर्जना केली. नातूसाहेबांच्या शेजारच्या सीटवरच्या मुस्लीम ऑफिसर त्यांची ओळख उघड करू शकत होता. पण तो त्यांचा इतका आदर करत होता की त्यानंच या आपल्या शेजाऱ्याला वाचवलं, तो पुढे पाकिस्तान आर्मीमध्ये निघून गेला.
१९७१ च्या पूँछच्या लढाईतही त्या सेक्टरमध्ये नातूसाहेब मुस्लिमांच्या वस्त्यांत घुसायचे. आमच्या सैन्याकडून तुम्हाला काही त्रास नाही म्हणून आश्वस्त करायचे. केवळ सैनिकांचाच नव्हे तर तिथल्या जनतेचाही विश्वास त्यांनी संपादन केला होता. आजही तिथले काही जण फोन करत असतात.
रावळीपिंडीपासून जवळ असलेल्या पूँछ सेक्टरवर कब्जा करण्याच्या प्रयत्न १९४८ ते १९७१ सतत चालूच ठेवला पाकनं! १९७१ साली जेव्हा चकमकी सुरू होत्या तेव्हा फील्ड मार्शल माणेकशाँ पाहणी करायला गेले होते. ते नातूसाहेबांना म्हणाले, ‘‘अनंता, यू विल नॉट लेट मी डाऊन.’’ अन् पाकच्या अख्ख्या दोन डिव्हिजन्सना, चोख प्रत्युत्तर देत भारतानं हा हल्ला तर परतवून लावलाच पण चांगला धडा शिकवला. या लढाईनंतर ‘महावीरचक्र’ देऊन मेजर जनरल अनंत विश्वनाथ नातूंना सन्मानित करण्यात आलं. हा महाराष्ट्र शासनाचा आणि अलीकडे ‘महाराष्ट्र गौरव’ सावरकर प्रतिष्ठानचा विशेष सन्मान त्यांना लाभला.
त्यांनी कधी तरी सहजच आपल्या मुलाला वकील होण्यासाठी सुचवलं. ब्रिटिशांच्या ‘सेन्स ऑफ जस्टिस’बद्दल त्यांना विशेष कौतुक! पण तरुण विजयनं त्यांना सांगितलं की, ‘मला खोटं बोलणं आवडत नाही, जमणार नाही. अगदी व्यवसायासाठीसुद्धा!’ ते सैन्यदलात स्थिरावले. पण निश्चय देशसेवेचाच होता तो सफल झाला. आपल्या दोन्ही सुविद्य मुली सुनीता आणि ललिता यांच्यासाठी नातूसाहेबांनीच साथीदार निवडले. सुनीताचे पती कर्नल विपीन वैद्य, तर ललिताचे पती मेजर शिरीष देव. पण देव यांचं अकाली निधन झालं. ते अतिशय कर्तबगार अधिकारी म्हणून प्रख्यात होते.
विजयजींनी सैन्यदलात प्रवेश घेतला तोच वडिलांनी नेतृत्व केलेल्या ४/९ गुरखा रायफल्समध्ये नत्थुल्ला (सिक्कीम) मग एशियाडच्या काळात दिल्लीत विशेष नेमणूक. बियास, श्रीलंका, सियाचिन अशा विविध ठिकाणी त्यांनी विशेष कामगिरी बजावली. सियाचिनचं पोस्टिंग म्हणजे उन्हाळ्यात ४ ते ५ अंश से. तापमान तर हिवाळ्यात उणे पन्नास. इथेच त्यांनी ४/९ गुरखाचं नेतृत्व केलं. श्रीलंकेतली लढाई म्हणजे न दिसणाऱ्या छुप्या शत्रूशी तर सियाचिनमध्ये शत्रूबरोबरच निसर्गही प्रतिकूल. अशा वेळी नेतृत्वाचा कस लागतो. एका निर्णयावर अनेकांची आयुष्यं अवलंबून असतात. नियम, शिस्त, चातुर्य, आणि माणुसकी – सहृदयता यांची सांगड घालत राहावं लागतं. उंचावर असणाऱ्या एखाद्या आजारी जवानाचा जीव वाचवण्यासाठी त्याला खाली उतरवणं हाच एक मार्ग असतो. दिवसा हालचाल केली तर शत्रूच्या रडारवर आणि संध्याकाळी हेलीकॉप्टर उडणं नियमबाह्य़ अशा वेळी दिवसा धोका पत्करून जवानांना खाली आणल्याची आठवण सांगताना ते गलबलून जातात.
नातूसाहेबांचे जावई कर्नल विपीन वैद्य यांची आई नागपूरला प्रख्यात डॉक्टर तर आजोबा ब्रिटिश सैन्यदलात. कर्नलसाहेब रुजू झाले ते २ मराठा रेजिमेंटमध्ये. काश्मीर, मिझोरम, नागालँड, सिक्कीम, राजस्थान, चेन्नई, पुणे आणि कारगिल अशा विविध ठिकाणी त्यांनी काम केलं. या साऱ्यांनाच ‘विशेष कामगिरी’ असं विचारल्यावर नुसती स्मितरेषा येते. कुणीच आपल्या कामगिरीचं वर्णन करत नाही. ‘बस्स, कर्तव्य बजावलं, त्यात सांगायचं काय’ हीच भावना. मणिपूरला कर्नल वैद्यांचं पोस्टिंग असतानाचा एक कसोटीचा प्रसंग.. ‘‘तिथे सैनिकांची तुकडी घेऊन पुढे जायचं म्हणजे स्थानिकांचा विरोध! त्यातही स्त्रियांची एक संघटना जबरदस्त होती. त्यांची संपर्क यंत्रणाही अजब. आम्ही निघालो की साऱ्या जणी मुंग्यांसारख्या अचानक गोळा व्हायच्या मशाली घेऊन. मुळात स्त्रियांविषयी आदर.. हा लष्कराचा नियम! त्यांना विरोध करणं शक्य नाही, जरा निमित्त मिळालं तर अंगावर दगड नव्हे.. थेट मशालीच फेकत. अशा ठिकाणी लष्करी नेतृत्वगुणांबरोबर माणुसकी आणि मानसशास्त्र, सहनशीलता आणि संवादकौशल्य सारंच पणाला लावावं लागतं. स्थानिकांशी मिळून मिसळून आपलं काम पुढे न्यावं लागतं.
कर्नल वैद्य यांची मुलगी विनिता हिला आपल्या वडिलांच्या आईसारखं डॉक्टर व्हायचं होतं. अन् नातूआजोबा, मामा, आणि वडिलांसारखं सैन्यातही जायचं होतं. लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान, अभ्यासेतर सर्व कलांमध्ये आघाडीवर असणारी फ्लाईट लेफ्टनंट विनिता वायुदलात डॉक्टर म्हणून श्रीनगरमध्ये आहे.
सध्या तिथे तणाव आहेच. तिला फोनवर विचारलं. ‘असुरक्षित नाही वाटत?’ ताडकन् तिचं उत्तर आलं. ‘‘इतरांना असुरक्षित वाटू नये म्हणून आम्ही इथं आहोत ना.’’ विशेष अनुभव विचारल्यावर ती सांगते, ‘‘मला अजून काम करायचं आहे. आत्ता तर सुरुवात आहे. ताणाचं विशेष वाटत नाही. कारण लहानपणापासून याच वातावरणात वाढलो. प्रत्येक क्षण देशासाठी कारणी लागला पाहिजे हेच शिकलो. मी माझी डय़ुटी करतेय.’’ विनितानं फ्लाईट लेफ्टनंट डॉ. अमित कौशलशी विवाह केला आहे. त्यांचंही पोस्टिंग श्रीनगरमध्येच आहे.
कॅप्टन – वरुण वैद्यही सध्या अखनूरमध्ये आहे. जो ४/९ गुरखा रायफल्समध्ये दाखल होऊन आजोबा आणि मामाप्रमाणेच तुकडीचं नेतृत्व करणार असं दिसतंय. नातूंची दुसरी कन्या ललिता देव यांचाही जावई आशुतोष हवाईदलात पायलट आहे. तर मुलगा अगस्ती र्मचट नेव्हीत इंजिनीअर आहे. ही तिसरी पिढी एकत्र जमते, आजोबांसोबत गप्पा मारते. त्यांचे अनुभव ऐकून, थरार ऐकून यांच्या डोळ्यात एकच स्वप्न तरळतं.. आजोबांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करायची आहे.
या कुटुंबानं सैन्यदलात असताना तर आपलं कर्तव्य बजावलंच, पण निवृत्तीनंतरही प्रत्येक क्षण सैनिक कल्याणासाठीच दिला. चाळिशीतच निवृत्त होणाऱ्या जवान आणि अधिकाऱ्याचं प्रमाण खूप असतं. नातूसाहेबांनी चाळीसगाव इथं राहून त्यांच्यासाठी अथक प्रयत्न केले. जमिनीचे वाद, कौटुंबिक प्रश्न, पेन्शनचे प्रश्न अशा बाबी सोडवण्यासाठी ते धावधाव करतात.
विजयजींनी त्यांना साथ देत संस्थात्मक आणि शास्त्रशुद्ध रूप दिलं आहे. ‘जळगाव जिल्हा माजी सैनिक संघ’ स्थापन करून ३५०० सदस्यांना एकत्र आणणं त्यांना पुढे वेगळी नोकरी मिळावी असे प्रयत्न चालू आहेत.
मराठी तरुण, मावळ्यांप्रमाणे चिवट लढवय्ये पण इंग्रजीमुळे स्पर्धा परीक्षेत मागे पडतात. विजयजींनी त्यावरही कार्य सुरू केले होतं. आता सैन्यदलातील पगार वाढले आहेत, इतर सुविधा भरपूर मिळतात मुख्य म्हणजे मूल्याधिष्ठित – शिस्तशीर जीवनपद्धती मिळते. आत्मसन्मान राखता येतो आणि देशासाठी जगत असल्याचं समाधान.. हे तरुणांना समजावलं पाहिजे असं त्यांना वाटतं.
युद्धाची वर्णनं, त्यागाचा गौरव म्हणजे सैन्यदल नव्हे. जय-पराजय, मर्दुमकी-बहादुरी यापलीकडे एक उत्कृष्ट जीवनशैली विकसित करण्याची संधी म्हणून या सव्र्हिसकडे बघायला हवं, असं म्हणणाऱ्या नातू आणि वैद्य परिवारानं स्वत:च्या वागण्यातून जीवनमूल्यातून आणि संस्कारातून ते सिद्ध केलं आहे.
फ्लाईट लेफ्टनंट विनिता वैद्य किंवा ४/९ गुरखा रायफल्सचा कॅप्टन वरुण वैद्य यांनाही आपल्या युद्धकथा रंगवण्यात रस नाही, ना विक्रम नोंदवण्यात. त्यांना देशासाठी कामगिरी करायची आहे.. अभिमान वाटेल अशी! या उत्तरातच साऱ्या संस्कारांचं मर्म आलं आहे.
एकोणनव्वद वर्षांचे निवृत्त मेजर जनरल नातूसाहेब आजही लढायला तयार आहेत, पुढच्या पिढय़ांसाठी एक सुरक्षित पर्यावरण राखावं म्हणून ते तळमळत आहेत. ‘चिंता करितो विश्वाची’ असंच त्यांचं वागणं आहे. तेव्हा देशासाठी आणि आता मानवजातीच्या कल्याणासाठी, त्यांची लढाई चालूच आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा