नानासाहेब पेशवे यांची एकुलती एक मुलगी मैनावती. चौदा वर्षांचे वय, परंतु धाडसी वृत्तीमुळेच नानांनी इंग्रज अधिकाऱ्यांच्या बायका-मुलांना वाचवण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवली. त्याच दरम्यान ती इंग्रजांच्या तावडीत सापडली. नानासाहेबांचा ठावठिकाणा विचारण्यासाठी त्यांनी तिचा खूप छळ केला. पण तिने तोंड उघडले नाही ते नाहीच. तिला झाडाला बांधून पेटवून देण्यात आले.. आणि या देशाच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात एक स्वातंत्र्यसैनिक म्हणून पंचत्त्वात विलीन झाली..
आत्तापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या या कर्तव्यकठोर स्त्रीचं, हे बहुआयामी लखलखीत रूप.. खास जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने..
१८ ५७ च्या बंडाचा काळ. बंडाचा वणवा उत्तर भारताइतक्या मोठय़ा प्रमाणात दक्षिण भारतात पेटला नव्हता. या बंडाचे नेतृत्व मात्र राणी लक्ष्मीबाई झाशीवाली, नानासाहेब पेशवे व तात्या टोपे यांनी केले. याच काळातील कर्तव्यकठोर, सहृदय मैनावतीची कथा.
मैनावतीबद्दल एक पानभर मजकूर एका हिंदी पुस्तकात वाचायला मिळाला होता. ते पुस्तक उत्तरेकडच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या माहितीचा कोश होता. त्यानंतर आणखी एका हिंदी भाषिक लेखिकेने तिच्याबद्दल थोडासा मजकूर लिहिलेला वाचनात आला. मराठय़ांच्या इतिहासाबद्दल अभ्यास असणाऱ्या अनेकांना मैनावतीबद्दल विचारले. पण कुणालाच अशी कुणी मुलगी/ बाई १८५७ च्या वणव्यात विद्युल्लतेप्रमाणे कडाडून अमर झाल्याची माहिती मिळाली नाही. गेली ४/५ वर्षे माहिती मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. माझ्या मानगुटीवर स्त्री अभ्यासाचे भूत बसलेले आहे व ते मी बाजूला करावे व उतारवयात नाही ती म्हणजे नसलेली मढी उकरू नयेत, असा उपदेशवजा सल्ला मला मिळत राहिला. पण मैनावतीला मी माझ्या मनातून बाहेर काढू शकले नाही आणि अचानक तात्या टोपे यांचे नातू विनायकराव टोपे मु. बिठूर यांनी संपादित केलेली ‘क्रांती का संक्षिप्त परिचय’ ही पुस्तिका हाती आली. या पुस्तिकेत मैनावतीची कथा आहे. आशालता व्होरा यांनी आपल्या पुस्तकात केलेले उल्लेख, उत्तर भारतीय स्वातंत्र्यसैनिक चरित्रकोश व विनायकराव टोपे यांच्या पुस्तिकेतील मैनावतीची माहिती यांचे धागेदोरे विणत गेले व वाटले की टोपे कुटुंब हे पेशवे कुटुंबाशी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या जवळचे कुटुंब होते. त्यांच्याबरोबरच टोपे कुटुंब उत्तरेकडे आले होते. त्यामुळे विनायकराव टोप्यांची माहिती दंतकथेवर आधारलेली असण्याची शक्यता कमी आहे. कोश व टोपे यांच्या मजकुरावरून स्पष्ट दिसते की मैनावतीची कथा ही सत्यकथा आहे. त्यावर संशोधन करून भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात तिला तिचे मानाचे पान मिळायलाच हवे.
नानासाहेब पेशवे यांना एकुलती एक मुलगी होती. मुलीला आजीचे नाव मैनावती हे ठेवले. मैनावतीची आई लवकरच गेली व आजीतर त्यापूर्वीच गेली होती. मैनावतीला पेशवे घराण्याच्या रीतीप्रमाणे लिहिणे, वाचणे, पत्रे तयार करणे इत्यादी गोष्टी शिकवल्या असणारच. धार्मिक ग्रंथांची पारायणे ही गोष्ट त्यात आलीच. नानासाहेबांचे आपल्या मुलीवर जिवापाड प्रेम होते. आईविना मुलगी म्हणून तसे ते शक्य होतेच तसेच आपल्याला परक्याच्या घरी जाणाऱ्या या मुलीला वेळ देता येत नाही या विचारामुळेही अधिक होते. नानासाहेब पेशवे व इंग्रज यांचे सुरुवातीचे संबंध बरे होते (इति टोपे). त्यामुळे इंग्रज अधिकाऱ्यांच्या बरोबर प्रसंगापरत्वे ऊठबस होत असावी. मैनावतीचेही इंग्रज मुलींच्या बरोबर संबंध होते. त्यामुळे त्यांच्या सहवासात तिला कामचलाऊ इंग्रजी समजू लागले व बोलताही येऊ लागल्याचे टोप्यांच्या माहितीवरून कळते.
मैनावतीची कथा सुरू होते ती पेशव्यांच्या कानपूर विजयापासून. शिपायांनी कानपूर लुटले. बिबिका घर, सतीचौरा ही ठिकाणे जाळली. इंग्रज बायका व मुले यांना कैद केले. हे कैदी नानासाहेब पेशव्यांसमोर हजर करावे की कानपूरच्या इतर इंग्रजांप्रमाणे त्यांनाही येशूकडे पाठवावे, असे शिपायांनी नानासाहेबांना विचारले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे इंग्रज मुलाबायकांचा निकाल लावायचा असे ठरवून शिपाई नानासाहेबांच्या आज्ञेची वाट पाहू लागले. शिपायांचा मानस कळल्यावर नानासाहेबांना वाईट वाटले. मराठय़ांच्या इतिहासात शत्रूच्या बायका-मुलांची कत्तल कधीच झाली नव्हती. शिपायांचे असे वर्तन हे मराठय़ांना शोभणारे नाही. त्यामुळे ‘इंग्रज मुला-बायकांना सन्मानाने बिठूरला पोहोचवावे व त्यांची व्यवस्था आपण जातीने करू’ असा उलटा खलिता नानासाहेब पेशव्यांनी पाठविला. इंग्रजांचा कुटुंबकबिला त्यांनी मैनावतीच्या स्वाधीन केला. त्या सर्वाचा दोन दिवस पाहुणचार करून त्यांना इंग्रजांच्या फौजेत परत पाठविण्याचा आपला बेत त्यांनी मैनावतीला सांगितला. इतकेच नाही तर ते सर्व सुरक्षित पोहोचण्याची जबाबदारीही मैनावतीवर सोपवली. त्या करता त्या कबिल्याबरोबर मैनावतीला जातीने सोबत करावयास सांगितले. मैनावतीबरोबर असल्यामुळे त्यांचा प्रवास निर्धोक पार पडेल याचा नानासाहेबांना विश्वास होता. या प्रवासात पहिला इंग्रज फौजेचा जथ्था जिथे भेटेल तिथे इंग्रज बायका-मुले त्यांच्या स्वाधीन करून मैनावतीने परत फिरावे, असा आदेश मैनावतीला होता. मैनावतीच्या सोबतीमुळे इंग्रज कुटुंबे सुखरूप प्रवास करू शकली. रस्त्यातील दंग्याधोप्यांचा त्यांना त्रास झाला नाही. आपल्याला सुखरूपपणे आपल्या लोकांच्या हवाली केल्याबद्दल त्यांना मैनावतीबद्दल कृतज्ञता वाटली तर नवल नाही. मैनावती ही नानासाहेबांची मुलगी आहे हे त्या इंग्रज बायकांना माहीत होते की नव्हते, की त्यांना ही मैनावती सुरक्षित घरी पोहोचवण्यासाठी तिचे नाव गुप्त ठेवणे योग्य वाटले असावे हे कळायला मार्ग नाही.
मैनावती बिठूरला पोहोचण्यापूर्वी नानासाहेबांनी बिठूर सोडले होते. कारण शिपायांनी जिंकलेले कानपूर परत इंग्रजांनी हिसकावून घेतले होते व ते बिठूरच्या दिशेने निघाले होते. बिठूरला येऊन इंग्रजांनी पेशव्यांचा किल्लेवजा वाडा लुटला. पेशवे कुटुंबातील फक्त मैनावती व नोकर चाकर व आश्रयदाते वाडय़ात होते. मैनावती सोडून सर्व पळून गेले. वाडा बेचिराख करण्याकरता त्यावर तोफा डागण्याचा हुकूम दिला. तोफांची हलवाहलव मैनावतीच्या कानी पडली. ती तडक वाडय़ाच्या बाहेर येऊन उभी राहिली. तिला तिथं उभी पाहताच इंग्रज सेनापती थॉमसला आश्चर्य वाटले. कारण वाडा लुटताना तिथे चिटपाखरूही आढळले नव्हते. तिला पाहता क्षणीच थॉमसने तिला ओळखले. मैनावतीने त्याला इंग्रजीत पण नम्रपणे विचारले. ‘‘ज्या वाडय़ाला आपण बेचिराख करायला निघाला आहात त्या वाडय़ाने आपले काय वाकडे केले आहे? तो तर आश्रयदाता आहे. जड आहे. त्याने आपला असा कोणता अपराध केला आहे? ’’ थॉमसने उत्तर दिले, की वाडा न जाळण्याची परवानगी मला व्हाईस रॉयकडून तार करून मागवावी लागेल. त्यांनी परवानगी दिली तर वाडा जाळणार नाही. तार लंडनला पोहोचली. लॉर्ड सभेत चर्चा झाली. काही लॉर्डानी एक विचित्रच सूर लावला. थॉमसचे मैनावतीवर प्रेम बसले असावे म्हणून तो वाडा तोफांच्या साहाय्याने उडवायला हिचखीच करतो आहे. वाडा तर उद्ध्वस्त झालाच पाहिजे पण थॉमसच्या समोरच (मैनावतीकडून नानासाहेबांचा पत्ता विचारून) मैनावतीला जिवंत जाळली पाहिजे. लॉर्ड सभेचा हा अजबच न्याय होता!
मैनावतीने विद्रोही सैनिकांच्या पासून इंग्रज अधिकाऱ्यांच्या बायका-मुलांना वाचवले होते. त्यांना प्रथम वाडय़ात ठेवून घेऊन सुरक्षितपणे इंग्रजांच्या गोटात पोहोचवले होते. अशा मैनावतीला ही शिक्षा इंग्रज लॉर्डाची सभ्य संस्कृती किती बेगडी होती हे लक्षात येते. आठव्या शतकात हिंदुस्थानच्या उत्तर सीमेवर आलेल्या रानवट मुसलमानांच्या टोळ्यांनी केलेल्या कृत्याइतकेच ते भीषण होते. थॉमसची मुलगी मैनावतीची मैत्रीण होती. मैनावतीचे मोठेपण व तिने इंग्रज कुटुंबांना विद्रोही सैनिकापासून वाचविले ही गोष्ट म्हणजे इंग्रज अधिकाऱ्यांवर असलेले उपकारच आहेत असे ती परत परत ओरडून सांगत होती. मैनावतीच्या देखतच तिचे राहते घर तोफांच्या भक्ष्यस्थानी पडले. तिला कैद्यासारखी वागणूक देत कानपूरला इंग्रज कमिशनरसमोर उभे केले. नानासाहेबांचा ठावठिकाणा विचारण्यासाठी तिचा खूप छळ केला. मैनावतीने छळ सहन केला पण काहीही बोलण्यासाठी तोंड उघडले नाही ते नाहीच. मैनावतीचे वय त्यावेळी १४/१५ वर्षांचे असावे. मैनावतीचा छळ करूनही ती काहीच माहिती देत नाही याचा कानपूर कमिशनरला खूप संताप आला. त्यांनी तिला झाडाला बांधून पेटवून देण्याची आज्ञा दिली. हा भीषण प्रसंग बघण्याकरता कानपूर शहरवासीयांस मुद्दाम हजर राहण्यास सांगितले होते. दहशत बसविण्याचा तो एक मार्ग होता. मैनावती जळत होती. लोक अश्रू ढाळत होते. पण मैनावतीने तोंडाने जराही आवाज केला नाही आणि या देशाच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात एक स्वातंत्र्यसैनिक म्हणून पंचत्वात विलीन झाली.
मैनावतीला नानासाहेबांचे नाव न सांगितल्यामुळे जाळून मारली यात टोपे व आशालता व्होरा यांचे एकमत आहे. तपशिलात थोडा फरक आहे. टोपे यांच्या म्हणण्याप्रमाणे कानपूरमधून प्रसिद्ध होणाऱ्या ‘बखर’ नावाच्या वर्तमानपत्रात तत्कालीन इतिहासकार महादेव चिटणीस यांनी नानासाहेबांच्या एकुलत्या एक कन्येच्या जिवंत जाळण्याची व तिने शांतपणे मरणाला कवटाळण्याची बातमी दिली होती. तिला शांतपणे जळताना पाहून हिंदवासीयांना ती देवतास्वरूपी वाटत होती. मैनावती ही हिंदी स्वातंत्र्याच्या लढय़ात आहुती देऊन अमर झाली.
एका स्त्रीचं हे कर्तव्यकठोर रूप. त्यासाठी आगीचा दाह सहन करण्याची सोशिकता, इंग्रजांच्या बायका-मुलांना सुखरूप पोहोचण्यामागची ममता, त्यासाठी संरक्षक कवच म्हणून जाण्यातलं साहस, पत्ता गुप्त ठेवण्यासाठीची कणखरता, मृत्यू कवटाळण्यातलं धाडस.. एका स्त्रीचं हे बहुआयामी लखलखीत रूप.. एक स्त्री काय करू शकते हे दाखवणारं…
हुतात्मा मैनावती पेशवे : कर्तव्यकठोर लखलखीत रूप
नानासाहेब पेशवे यांची एकुलती एक मुलगी मैनावती. चौदा वर्षांचे वय, परंतु धाडसी वृत्तीमुळेच नानांनी इंग्रज अधिकाऱ्यांच्या बायका-मुलांना वाचवण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवली. त्याच दरम्यान ती इंग्रजांच्या तावडीत सापडली. नानासाहेबांचा ठावठिकाणा विचारण्यासाठी त्यांनी तिचा खूप छळ केला.
आणखी वाचा
First published on: 09-03-2013 at 01:03 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mainavati peshwa only daughter of nanasaheb peshwa