मेजर सुभाष गावंड यांची ८ महार रेजिमेंट ही बटालियन. परमवीरचक्र बटालियन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या रेजिमेंटचा त्यांना विलक्षण अभिमान आहे. आज मेजर गावंड ७५ वर्षांचे आहेत. १९८३ साली २२ वर्षे नोकरी झाल्यावर त्यांनी सैन्यदलातून निवृत्ती घेतली, त्या दिवसापासून आजतागायत त्यांनी मुलामुलींना सैनिकी प्रशिक्षण देण्याच्या कार्यात स्वत:ला झोकून दिलंय. त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेले ५०००च्या वर विद्यार्थी सैन्यात भरती झालेत. त्याबरोबर सैन्य व हवाई दलातले अधिकारीही त्यांनी घडवलेत. त्यांच्याविषयी..
कारगिल युद्धाच्या वेळी म्हणजे १९९९ साली मी स्टेट बँकेच्या ठाण्यातील जे.के.ग्राम शाखेत काम करत होते. त्यावेळचं वातावरणच प्रत्येकाचं रक्त देशप्रेमानं सळसळावं असं होतं. आपणही काहीतरी करावं असं आम्हाला वाटत होतं. विचारांती आम्ही, म्हणजे बँकेतल्या ४/५ मैत्रिणींनी या युद्धात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील जवानांच्या कुटुंबीयांसाठी वैयक्तिक स्तरावर मदत गोळा करण्याचं ठरवलं. ही संकल्पना आमचे शाखाधिकारी प्रदीप देशपांडे यांनी उचलून धरली आणि बघता बघता या मोहिमेत ठाणे शहरातील आमच्या पाचही शाखा सामील झाल्या. ग्राहकांनीही प्रतिसाद दिला आणि बघता बघता साडे सहा लाख (त्यावेळी) जमा झाले. हे पैसे योग्य हातात पोहचवण्यासाठी आम्ही मार्गदर्शकाच्या शोधात होता. तेव्हा एकमताने जे नाव पुढे आलं ते होतं, मेजर सुभाष गावंड.
‘देश हा देव असे माझा’ असं मानणाऱ्या मेजर गावंड यांनी सूत्र हाती घेताच आमच्या ‘ऑपरेशन कारगिल फंड’ने वेग घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातून शहिदांच्या कुटुंबीयांची माहिती, पत्ते मिळवण्यापासून शेवटी एका शानदार कार्यक्रमाचं आयोजन करून लष्करी इतमामात ती रक्कम गरजवंतांपर्यंत पोहचवण्यापर्यंत सारी धडपड त्यांनी घरचं कार्य समजून केली. एवढंच नव्हे तर या कार्यक्रमानंतर ते स्वत: जीप काढून त्या १३ जवानांच्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील घरात जाऊन कुटुंबीयांना भेटूनही आले.
आज मेजर गावंड ७५ वर्षांचे आहेत. गेली २० वर्षे रोज पहाटे येऊरचा डोंगर चढत त्यांनी स्वत:ला तंदुरुस्त ठेवलंय. १९८३ साली २२ वर्षे नोकरी झाल्यावर त्यांनी सैन्यदलातून निवृत्ती घेतली, पण त्यांची देशभक्तीची नाळ मात्र कायम जोडलेलीच राहिली; नव्हे अधिकच घट्ट होत गेली. निवृत्तीच्या दिवसापासून आजतागायत त्यांनी मुलामुलींना सैनिकी प्रशिक्षण देण्याच्या कार्यात स्वत:ला अक्षरश: झोकून दिलंय. त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेले ५०००च्या वर विद्यार्थी सैन्यात भरती झालेत. त्याबरोबर सैन्य व हवाई दलातले काही अधिकारीही त्यांनी घडवलेत. सैनिकी जीवनातील अनुभव त्यांनी ‘लष्करच्या भाकऱ्या चवदार’ (इंग्रजी- मेजर मेमरीज) या पुस्तकात शब्दबद्ध केलेत.
मेजर गावंड यांच्या मनात बी.ए. पूर्ण करेपर्यंत सैन्यात जाण्याचा विचारही नव्हता. एन.सी.सी.ची आवड मात्र होती. एकदा इंडियन मिलिटरी अॅकॅडमीमध्ये दाखल झालेला एक सीनियर , कॉलेजमध्ये त्याच्या ऑलिव्हग्रीन युनिफॉर्ममध्ये आला. त्याचा तो रुबाब पाहून भारावलेल्या सुभाषने (मेजर गावंड) तिथल्या तिथे माहिती घेऊन दुसऱ्याच दिवशी फॉर्म भरून सैन्यदलाच्या मुख्यालयाला पाठवलाही. पण छाती दडपवणाऱ्या नाना टेस्ट व हाडन्हाड तपासणारी मेडिकल या अग्निदिव्यातून ४८ उमेदवारांपैकी दोघांत त्यांची निवड झाली. मात्र त्याच क्षणी त्यांनी मनाशी निश्चय केला की, जेव्हा मी सेवानिवृत्त होईन तेव्हा पुढच्या पिढय़ांना व्यवस्थित मार्गदर्शन करीन; जेणेकरून मला बसला तसा धक्का त्यांना बसणार नाही. वास्तुदेवतेने तथास्तु म्हटलं आणि तसंच झालं.
सैन्यातून बाहेर पडल्यावर मेजर गावंड यांनी सर्वप्रथम ‘जिज्ञासा’ या संस्थेच्या माध्यमातून ‘जिज्ञासा संडे मिलिटरी स्कूल’ची स्थापना केली. गेली १८ वर्षे ही शाळा जोमाने सुरू आहे. १९९५ साली सिंघानिया स्कूलमध्ये आणि नंतर इतर ४/५ शाळांत हा उपक्रम सुरू झाला. या ठिकाणी मुलामुलींना एअर रायफल शूटिंग, ड्रील, मॅप रीडिंग, फर्स्टण्ड रेस्क्यू ऑपरेशन फायर फायटिंग असे मिलिटरीसंबंधी सर्व विषय शिकवले जातात. सध्या ठाणे-मुलुंड परिसरातील दीड हजार मुलं या प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत.
ज्या शाळेत मेजर गावंड शिकले, त्याच शाळेत म्हणजे ठाण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ते अध्यक्ष आहेत. या शाळेच्या ठाणे पूर्व शाखेत त्यांनी ऑलिम्पिक स्तरावरची शूटिंग रेंज बनवलीय. इथे रीतसर प्रवेश घेऊन १० ते ८० वयापर्यंतची कोणीही व्यक्ती सराव करू शकते. इथले प्रशिक्षकही देश पातळीवरचे आहेत. या रेंजचं नाव आहे, ‘मेजर सुभाष गावंड एअर रायफल शूटिंग रेंज.’ त्याचबरोबर इथे रॉक क्लायमिंगच्या सरावासाठी एक २९ फूट उंच भिंत बांधलीय. या भिंतीत बनवलेल्या कडय़ाकपारींचा आधार घेत लहान-लहान मुलं झपाझप वर चढतात. पुढच्याच महिन्यात या शाळेच्या इमारतीत मिलिटरी अॅकॅडमी सुरू होतेय. वयाच्या २१व्या वर्षी जिवाची पर्वा न करता पाकिस्तानचे २ रणगाडे उद्ध्वस्त करून वीरमरण स्वीकारलेल्या शहीद सेकंड लेफ्टनंट अरुण क्षेत्रपाल परमवीरचक्र याचं नाव या अॅकॅडमीला द्यायचं ठरलंय. सैनिकी प्रवेशासाठी लागणारी सर्व माहिती, फॉर्म एका ठिकाणी मिळावेत यासाठी ही धडपड. शिवाय त्यांचा आगामी प्लॅनही तयार आहे. पुढच्या वर्षी त्यांना धनुर्विद्येसाठी (आर्चरी) अद्यावत अशी रेंज बनवायची आहे. त्यासाठी तयारीही सुरू झालीय.
मेजर यांनी माहिती दिली की सैन्याच्या तिन्ही दलांत आपापल्या आवडीप्रमाणे विभाग निवडण्याची संधी आहे. डोंगरात भटकण्याची खुमखुमी असेल तर पायदळ सेना, ड्रायव्हिंगचं वेड असेल तर टँक रेजिमेंट, तोफा चालवण्याची आवड असेल तर तोफखाना विभाग, कॉम्प्युटरप्रेमी असल्यास सिग्नल रेजिमेंट, सैन्यातील इंजिनीयर व्हायचं असेल तर इंजिनीअर रेजिमेंट, वैद्यकीय क्षेत्रात रुची असल्यास आर्मी मेडिकल कोअर; एवढंच नव्हे तर पूजा पाठात गती असेल तर सैन्य विभागात ‘युनिट पंडितजी’ अशीही पोस्ट आहे.
१९८८ साली मेजर गावंड ठाण्याच्या रोटरी क्लबचे सदस्य झाले. तेव्हापासून त्यांनी रोटरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सैनिकी प्रवेशासंदर्भात मार्गदर्शनपर मेळावे घ्यायला सुरुवात केली. परंतु नंतर त्यांच्या लक्षात आलं की नुसते मेळावे पुरेसे नाहीत, खरी गरज ट्रेनिंगची आहे. तेव्हा रोटरी क्लबतर्फे पैसे उभारून त्यांनी प्रशिक्षणाचीही सोय केली. हे वर्ग वाडय़ाजवळील ‘उचट’ नावाच्या गावातील कॅप्टन अप्पा मोरे चालवत. या निवासी वर्गासाठी पैसे कमी पडू लागले तेव्हा मेजर गावंडनी व्यापाऱ्यांकडे झोळीही पसरली. त्यावेळी त्यांच्या पाठीपाठी एक टेम्पो फिरत असे. तांदूळ, गहू, तेल, साखर असं मिळेल ते वाणसामान ते गोळा करत. मध्यंतरी बंद पडलेल्या या प्रकल्पाचं त्यांना पुनरुज्जीवन करायचं आहे.
मेजर गावंड म्हणतात, ‘सैन्यात तुमच्या आयुष्याला शिस्त तर लागतेच, शिवाय मीपणाही गळून पडतो.’ डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अॅकॅडमीतील आपल्या पहिल्या दिवसाचा अनुभव सांगताना ते म्हणाले, ‘पहाटे ४ वाजता बिगूल वाजताच आम्ही उठलो आणि नवीन सूट घालून अॅकॅडमीत पोहचलो. गेल्या गेल्या आमच्या सरजटने ‘फ्रंट रोल’ म्हणजे कोलांटउडय़ा मारत जाण्याचा आदेश दिला. क्षणात नवीन सुटाबुटातले सर्व कॅडेट जमिनीवर लोळू लागले. त्यानंतर त्याने सायकल आणली व ऑर्डर दिली, ‘फॉलो मी. पुढचे दोन तास तास तो सायकलवर व आम्ही मागे या पद्धतीने त्याने आम्हाला लायब्ररी, कॅफेटेरीया, सलून, स्टोअर रूम इ..जागा दाखवल्या. ते म्हणाले की फ्रंट रोल, बॅक रोल, क्रॉलिंग (रांगणे), हातात सायकल उंच पकडून धावणे.. अशा शिक्षांची सवय झाली की सैनिक पुढे कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास समर्थ बनतो. आपल्या या विधानाच्या पुष्टीखातर त्यांनी आपल्या प्रशिक्षण केंद्रातून सैन्यात गेलेल्या पोलादी मनगटाच्या दोघींची कहाणी सांगितली. ठाण्यातील पहिली महिला मेजर सुगंधा खानझोडे जेव्हा सेकंड लेफ्टनंट झाली, तेव्हा तिला मिळालेलं पोस्टिंग होतं काश्मीर. तोफा, रणगाडे, रडार यांच्यातील इलेक्ट्रॉनिक्स भागांच्या दुरुस्तीसाठी तिला जीपने काश्मीरच्या संवेदनाक्षम भागात खोलवर जावे लागे. एकदा सुट्टीवर आली असताना ती मेजर गावंडना भेटली तेव्हा त्यांनी विचारलं, ‘उघडय़ा जीपने फिरताना तुला अतिरेक्यांची भीती नाही वाटत? यावर तिचं उत्तर होतं, ‘निर्भय बनायला तुम्हीच तर शिकवलं, उलट जीपमध्ये बसताना मी माझी स्टेनगन नेहमी पुरेपूर ३६ गोळय़ांनी भरून ठेवते, तिथून दुसरीकडे हलण्यापूर्वी मला दोघांना तरी उडवायचं आहे.’
भूपाली वडके ही पायलट म्हणून रुजू झाली तेव्हा बेस निवडण्यासाठी तिच्यासमोर पुणे, आग्रा, वाराणसी, चंदिगड आणि जोरहाट (आसाम) असे ५ पर्याय होते. भूपालीने यातील सर्वात जोखमीचा ‘जोरहाट’ बेस निवडला. कारण सांगताना म्हणाली, ‘मला भारत-चीन सीमेवरील दऱ्याखोऱ्यांवरून विमान उडवायचंय. तिथल्या जवानांना रसद घेऊन जायचीय, जखमींना अलगद परत आणायचंय.’ गेली अडीच वर्षे ही मुलगी तिथेच आहे. वर्षभरापूर्वी तिचं लग्नही झालंय. नवरा चंदिगडला आणि ही जोरहाटला असा दोन ध्रुवांवर संसार सुरू आहे.
मात्र इतका जीव ओतून घडवलेली आणि निवडीच्या कठीण प्रक्रियेतून तावूनसलाखून निघालेली मुलं जेव्हा पालकांच्या वेडय़ा हट्टापायी मागे फिरतात, तेव्हा त्यांच्या काळजाचं पाणी पाणी होतं. नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीच्या परीक्षेला बसलेल्या २०,००० मुलांतून निवडलेल्या ३५० मधील त्यांचा एक विद्यार्थी केवळ आजोबांनी घातलेल्या तिढय़ामुळे (सैन्यात जायचं असेल तर माझ्या प्रेतावरून जावं लागेल) पुढे जाऊ शकला नाही, ही गोष्ट त्या मुलाच्या व मेजर गावंडांच्या मनाला कायमची लागून राहिलीय.
मेजर म्हणतात, ‘पालकांनी मुलांची अवास्तव काळजी घेणं सोडायला हवं.’ त्यांच्या मिलिटरी स्कूलमधल्या एका विद्यार्थ्यांने आगळीक केली तेव्हा त्यांनी संपूर्ण चाळीसच्या चाळीस जणांना शिक्षा केली. लगेच पालकांनी तक्रार केली, ‘ज्याने चूक केलीय त्याला शासन द्या. सगळय़ांना का म्हणून?’ यावर त्यांनी सुनावलं, ‘शत्रूच्या प्रदेशातून जाताना ४० जणांपैकी एक जण जरी खोकला तर ते कोण खोकला हे बघत नाहीत, एक साथ सर्वानाच फायर केलं जातं.’
८ महार रेजिमेंट ही मेजर गावंड यांची बटालियन. परमवीरचक्र बटालियन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या महार रेजिमेंटचा त्यांना विलक्षण अभिमान आहे.
बटालियनचा परमवीरचक्र दिवस (२५ नोव्हेंबर) आणि जन्मदिवस (१ मार्च) म्हणजे त्यांचा दिवाळी-दसरा. या दिवशी काहीही करून ते बटालियन जिथे असेल तिथे जाण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात, ‘माझ्या महार रेजिमेंटमुळेच तर मी घडलो.’
मेजर गावंड यांच्याजवळ लष्करी सेवेतील थरारक अनुभवांची पोतडीच आहे. मिझोरमला पोस्टिंग असताना अतिरेक्यांची माहिती काढून ती वरिष्ठांना पोहचवण्याचं काम त्यांच्याकडे होतं. या कडव्या अतिरेक्याना बोलतं करणं म्हणजे एक आव्हानच असे. एकदा अतिरेक्यांचा टोळीचा एक म्होरक्या कॅप्टन जेम्स याला पकडून मेजर समोर आणलं गेलं. मेजरनी यावेळी वेगळी पद्धत वापरायचं ठरवलं आणि घरी फोन केला की जेवायला एक पाहुणा घेऊन येतोय. नंतर कॅप्टन जेम्सच्या बेडय़ा काढून त्याच्याशी हस्तांदोलन करून ते म्हणाले, ‘चल घरी जाऊ आणि जेवू.’ त्याला वाटलं नेहमीप्रमाणे आत नेणार आणि धोपटून काढणार. तो पटकन म्हणाला, ‘सर मला भूक नाही.’ पण नंतर जेव्हा मेजरनी त्याला घरी नेऊन जेवणाच्या टेबलावर बसवलं तेव्हा तो ओक्साबोक्शी रडायला लागला. जेवल्यानंतर एकही थप्पड न मारता त्याने मेजरना हवी ती सर्व माहिती दिली. नंतर त्याला इतरांप्रमाणे ३ महिन्यांची शिक्षा झाली. पण त्या दिवसापासून तो मेजरचा कायमचा मित्र बनला.
समोरच्या व्यक्तीचं मन प्रेमाने जिंकायचे संस्कार मेजरना त्यांचे वडील कै. गोविंदराव गावंड (दादा) यांच्याकडून मिळाले. ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले’ हा त्यांचा धर्म होता. त्यांचा फुलांचा व्यवसाय होता. परसात खूप गाई-म्हशी होत्या, दुधाची गंगा वाहत असे. दादा रोज सकाळ-संध्याकाळ आपल्या शेतमजुरांच्या २०/२५ मुलांना गोळा करून त्यांना ग्लास ग्लास दूध द्यायचे. नोकरांना घरामध्ये सन्मानाने वागवलं जाई. अनेक शैक्षणिक व क्रीडा संस्थांना दादांनी भरघोस देणग्या दिल्या. सामाजिक उत्तरदायित्त्वाचे संस्कार त्यांनी पुढील पिढीतही संक्रमित केले.
‘जीव टांगणीला लागणं म्हणजे काय, याचा पुरेपूर अर्थ मला मेजरशी लग्न झाल्यावर कळला’ , ऊर्मिला गावंड सांगत होत्या. अतिमहत्त्वाच्या मोहिमेवर असताना तर त्यांचा ठावठिकाणाही आम्हाला माहीत नसे. अशा वेळी आणि एरवीही डोकं शांत ठेवून घरच्या सर्व जबाबदाऱ्या उचलणं हे आम्हा मिलिटरीवाल्यांच्या बायकांपुढचं नेहमीचं मिशन. या दाम्पत्याला २ मुलं. राहुल आणि दीपा. दोघंही ठाण्यातच स्थायिक. राहुलला लहानपणापासून फायटर पायलट होण्याची प्रचंड इच्छा होती. पण एका अपघाताने त्याचं हे स्वप्न भंग पावलं.
२२ वर्षांच्या देदीप्यमान सैनिकी कारकीर्दीत मेजर गावंड यांना २१ वार्षिक मेरीट पदकांसह ७ विशेष सन्मानपदकं मिळाली. हजारो विद्यार्थ्यांना घडवल्याबद्दल महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे भूषण पुरस्काराचे ते मानकरी आहेत. संरक्षण सेवा क्षेत्रात नोकरीच्या सेवा देणाऱ्या संस्थेत ते १९९७ पासून डिस्ट्रिक्ट चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्टाचारविरोधी समितीवर त्यांची नियुक्ती झाली आहे. मात्र या सर्व सन्मानांच्या पलीकडे त्यांना तेव्हा खराखरा आनंद होतो, जेव्हा त्यांच्या एखाद्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील स्टार वाढतो.
तरुण पिढीला त्यांचं सांगणं आहे,‘ सैन्यात जाणं म्हणजे मरणाला आमंत्रण नव्हे. सैन्यात आपण शत्रूला मारायला जातो, मरायला जात नाही. मरण इथेही येणार व सीमेवरही. तिथे ‘हर एक गोलीपर लिखा है खानेवाले का नाम’ हे ब्रीदवाक्य असते. ज्या गोळीवर तुमचं नाव लिहिलं असेल तीच तुम्हाला लागते. लक्षात ठेवा, आयुष्याला सुंदर वळण लावण्यासाठी सैन्यासारखी दुसरी जागा नाही.’
सैनिकी गुण लहानपणापासूनच अंगी बाणले जावेत यासाठी आज जागोजागी संडे मिलिटरी स्कूल निर्माण होण्याची गरज आहे. आपल्या देशाला सशक्त व समर्थ करणाऱ्या या यज्ञकर्मात, कुणी पुढे येऊन या नि:स्पृह मेजरला मदतीचा हात देईल?

Story img Loader