अपंग जोडीदाराचा आहे त्या रूपात स्वीकार करण्याचं धारिष्टय़ दाखवणारी, प्रेमाचा आदर्श ठेवणारी ही तीन जोडपी. एक जोडपं आहे नुकताच लग्नाचा सुवर्णमहोत्सव साजरा करणारे नारायणराव आणि सुमतीताई. दुसरं आहे अंध जिज्ञासा व तिला साथ देणारा योगेश. तर तिसरं आहे, कलेची आराधना करीत अपंगत्वावर मात करणारी चंदा आणि दिलीप यांचं. प्रगल्भ प्रेमाच्या जोरावर उभ्या ठाकलेल्या या जोडप्यांच्या साहचर्याची ही गोष्ट, सक्षमता फक्त शरीराची नसते ती असते मनाचीही, हा संदेश देणारी..
खास १४ फेब्रुवारीच्या ‘व्हॅलेन्टाइन डे’ निमित्ताने.
प्रेम या अडीच अक्षरांच्या शब्दात एक हळुवार जादू आहे, तसंच आयुष्य भरभक्कमपणे पेलण्याचं सामथ्र्यही आहे. प्रेमाच्या गुलाबी रंगाला जे अल्लडपणाचं, अवखळपणाचं वरदान आहे तसंच या रंगात पुरतं रंगल्यावर येणाऱ्या जबाबदारी पेलण्याचं भानही आहे. प्रेम एक ना दोन.. अनेक रूपांत वळणावळणावर भेटत राहतं.. प्रेमाच्या अशाच या काही आगळ्यावेगळ्या कहाण्या. प्रेमाच्या जोरावर अपंगत्वावर मात करत आयुष्याला सुखद वळण देणाऱ्या, खास १४ फेब्रुवारीच्या ‘व्हॅलेन्टाइन डे’ निमित्तानं.
या कहाण्या म्हणजे नुसतं जगणं नाही ते आहे प्रगल्भ प्रेम. डोळसपणे स्वीकारलेलं. त्यातले एक जोडपं आहे, नुकताच लग्नाचा सुवर्णमहोत्सव साजरं करणारं नारायणराव आणि सुमतीताई यांचं. दुसरं आहे अंध जिज्ञासा व तिला साथ देणाऱ्या डोळस योगेशचं. तर तिसरं आहे, कलेची आराधना करीत अपंगत्वावर मात करणाऱ्या चंदा आणि दिलीपचं. आपले विचार व महत्त्वाकांक्षा हीच आपली ताकद असे मानणारी ही तीन सुखी जोडपी. या तीनही जोडप्यांना जोडणारा समान धागा आहे, त्यांच्यातील विश्वासाचा. एक जोडीदार, विशेषत: स्त्री-जोडीदार शारीरिकदृष्टय़ा सृदृढ नसतानाही त्यांचा मनापासून स्वीकार करणाऱ्या दुसऱ्या जोडीदाराचा. या साऱ्यांना मी भेटले आणि माझा प्रेमाकडे, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला.
ते ६०चं दशक होतं. जळगावस्थित दत्तात्रय कुळकर्णी या वधूपित्यानं आपल्या कन्येच्या विवाहासंदर्भातली जाहिरात ‘रोहिणी’ मासिकात दिली. मॅट्रिक उत्तीर्ण, वर्ण गोरा, नाकी-डोळी नीटस मात्र उजवा हात पोलिसोग्रस्त असल्याचा त्यात स्पष्ट उल्लेख केला. मूळचा अमरावतीचा मात्र नोकरीनिमित्त मुंबईत असणाऱ्या नारायण मुळे या युवकानं या जाहिरातीला प्रतिसाद देण्याचं ठरविलं. ‘आई, तुझ्या तीन मुलींपैकी एक अशी असती, तर तू काय केलं असतंस?’ हा सवाल त्यानं आईला व कुटुंबीयांना केला. १९४२ च्या स्वातंत्र्यलढय़ात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकाची पत्नी असणाऱ्या मनोरमा मुळे, त्यांच्या आईंनीही सामाजिक भान जोपासत विवाहास संमती दर्शवली.
सडपातळ बांधा आणि नीटनेटकी राहणी असणाऱ्या सुमतीनं घरात प्रवेश केला आणि आदर्श गृहिणी म्हणून थोडय़ाच दिवसांत साऱ्यांची मनंही जिंकली. एका हातानं, प्रचंड वेगानं कामं आवरण्याचा सुमतीबाईंचा धडाका बघून सारेच चकित होत. जोडीला शिवणकामातही त्या पुढे असायच्या हे विशेष. पण कुटुंबाच्या स्थैर्यासाठी आर्थिक स्थैर्य असणं गरजेचं आहे, त्यामुळे नोकरी केली तर चार पैसे जास्त मिळतील असं सुमतीताईंच्या मनानं घेतलं. सुमतीताईंनी फक्त एखादी इच्छा बोलून दाखवावी, नारायणरावांनी मम म्हटलंच समजावं, असा मामला असल्यानं नारायणरावांनी त्यांच्या नोकरीसाठी प्रयत्न केले. आरे मिल्क शासकीय दूध केंद्रात त्यांना सरकारी नोकरी लागली. तीन मुलांचा सांभाळ, नोकरी आणि पै-पाहुणा असं करता करता कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू लागल्या. आणि त्याचबरोबर संकटंही. सासूबाईंना गुडघ्याच्या कर्करोगानं ग्रासलं आणि त्यांचा पाय कापावा लागला. दोघांनीही ते अर्थातच मनापासून स्वीकारलं. आलेल्या-गेलेल्यांचं करण्यात कधी कसूर झाली नाही की कामाचा बोजा पडल्यानं त्यांचा आनंद कधी मावळला नाही. वयाच्या पन्नाशीनंतरही नारायणरावांनी अनेक कामं शिकून घेतली व सुमतीबाईंच्या कामात हातभार लावला.
६० च्या दशकात एका सुदृढ पुरुषानं शारीरिक व्यंग असणाऱ्या स्त्रीला स्वीकारणं हे काहीसं क्रांतिकारी पाऊल होतं.‘ मुलातही काही खोट असेल’ या सामाजिक विचारसरणीपुढे एकमेकांवरील विश्वास टिकवण्यासाठी धारिष्टय़ लागलं. पण हे शिवधनुष्य त्यांनी पेललं. आपल्या सुखी-समाधानी संसाराचा सुवर्णमहोत्सव गेल्याच वर्षी या जोडप्यानं साजरा केला. अपंगत्व डोळसपणे स्वीकारून ते तेवढय़ाच ताकदीनं सलग पन्नास वर्षे सांभाळणं यासाठी प्रेमाचा धागा अगदी घट्ट विणावा लागतो. त्यातूनच प्रेमावरचा विश्वास टिकत जातो. हे त्यांनी उदाहरणानं दाखवून दिलंय.
अशीच कहाणी जिज्ञासाची. मी नुकतीच नागपूरच्या ‘सक्षम’ या संस्थेशी जोडले गेले होते. एके संध्याकाळी एका मुलीच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम ठेवला होता आम्ही. त्या वेळी ती आली..मी तिला पाहिलं आणि तिनं मला जिंकलं.. हो, तिनं मला न पाहताही जिकलं! ती होती जिज्ञासा. जिज्ञासा अभ्यासात, खेळात फार गुणी मुलगी. अवघी १९ वर्षांची असताना तिला अचानक अंधूक दिसायला लागलं. आणि अथक उपचारानंतरही अखेर ज्याची भीती होती तेच झालं, तिची दृष्टी गेली. तारुण्याच्या उंबरठय़ावर सोनेरी स्वप्न बघण्याच्या काळात तिच्या आयुष्यात काळा रंग गडद झाला. ती बी.ए.च्या दुसऱ्या वर्गात शिकत होती. शिक्षण अर्धवट, वयही तसं कोवळंच. डोळ्यांपुढच्या अंधारानं बुद्धीचा ताबा घ्यावा असं सारं वातावरण. पण तिनं रडत बसण्यापेक्षा लढण्याचा मार्ग निवडला. एका अवयवानं दगा दिला म्हणून काय जगणं थांबवायचं का़़, या ईष्र्येनं तिनं आयुष्याचा डाव नव्यानं मांडायचं ठरवलं. आपल्यापेक्षा अधिक दु:खीकष्टी लोकांच्या आयुष्यात ती आनंद फुलवू लागली. योग-प्रावीण्य मिळवलेल्या जिज्ञासानं ‘मे फ्लॉवर’ या मतिमंद मुलांच्या शाळेत योग प्रशिक्षक म्हणून काम सुरू केलं. जोडीला अॅक्युप्रेशर, नॅचरोपॅथी डिप्लोमा असे कोर्सेस करत राहिली. संगणकाच्या ज्ञानाअभावी मागे पडण्याचा संभव लक्षात घेत तिनं थेट बंगळुरू गाठले व अंधांसाठी असणारे एम. एस. ऑफिस, एम.एच.सीआयटी यांसारखे संगणकाशी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण केले. तिची बुद्धिमत्ता व जिद्द पाहून ‘आनंदवना’तून थेट कौस्तुभ आमटेंनी तिला आनंदवनात संगणक शिक्षिका म्हणून बोलावणं धाडलं.
आनंदवनात आय.टी. प्रशिक्षण व इंग्रजी भाषा प्रशिक्षण या दोन अभ्यासक्रमांची जबाबदारी जिज्ञासा समर्थपणे पेलू लागली. कौटुंबिक परिचयातूनच तिची ओळख झाली योगेश चवलढाल या युवकाशी. घरगुती दैनंदिन कामं व संगणकीय माऊस ज्या सफाईदारपणे जिज्ञासा हाताळायची ते पाहून योगेश तिच्या प्रेमात पडला. त्यानं तिला मागणी घातली. तिनं त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला खरा, पण आनंदवनातच राहण्याची अट घालून. योगेशनं ते डोळसपणे स्वीकारलं. काम करण्यात तोही मागे नव्हताच. त्यानं आनंदवनातील शेती प्रकल्पाचं काम स्वीकारलं. आनंदवनात एका सुखी संसाराचा श्रीगणेशा झाला. आणि आपसातील सामंजस्यामुळे दिवसेंदिवस त्यांच्यातील नातं अधिकाधिक समृद्ध होत गेलं.
पुढे त्यांच्याही संसारात कसोटीचा प्रश्न आलाच. मातृत्व पत्करणं तिच्या आरोग्याच्या दृष्टीनं धोक्याचं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तिच्यासमोर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. योगेशला तिच्या भावनांची जाणीव होतीच. पूर्ण विचाराअंती त्यानं ‘ एक स्त्री म्हणून तुला यावर काय वाटतं,’ असा प्रश्न केला. या प्रश्नानं ती अवाक् झाली. पण तिचा आत्मविश्वास दुणावला. तीव्र इच्छेने शरीराच्या मर्यादेवर मात केली आणि पुढच्याच वर्षी तिला मुलगी झाली तीही पूर्णपणे ‘नॉर्मल’. आनंदवनाच्या वास्तव्यात सर्वसामान्य जोडप्यांप्रमाणे जिज्ञासा व योगेश मुलीचं संगोपन करीत होतेच आणि आज नागपुरातही करीत आहेत. दृष्टी नाही तरी जिज्ञासाचे कुठे अडत नाही. ती सकाळी उठून मुलीचा डबा करते. योगेश व ती मिळून तिच्या शाळेची तयारी करतात. मुलगीही समजूतदार आहे. रोजच्या आयुष्यात ज्या अडचणी जिज्ञासापुढे उभ्या ठाकतात तिथे-तिथे योगेशची खंबीर साथ तिला मिळते आहे.
आता जिज्ञासाची नागपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षक म्हणून नेमणूक झाली आहे. त्यामुळे आता ती नागपुरात स्थिरावते आहे. योगेशलाही एका कंपनीत काम मिळाले आहे. त्यामुळे इथेही त्यांचा संसार बहरतो आहे. ‘जे माझ्याजवळ आहे ते इतरांना द्यावे, या भावनेतून ‘आत्मदीपम्’ सोसायटीतर्फे जिज्ञासाने मोफत संगणक प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केला आहे.
जिज्ञासा आता ‘मोठी’ झाली आहे. तिच्या हस्ते ‘आशादीप’ या अपंगांच्या संस्थेतर्फे एका कार्यक्रमात काही जणांना वस्तूंचं वाटप होतं. या कार्यक्रमाचं आकर्षण होतं ‘बाहुल्यांचे प्रदर्शन.’ सुंदर, आकर्षक व मोहक बाहुल्यांच्या या रंगीबेरंगी प्रतिकृती सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होत्या. मला कुतूहल होतं कुणी केल्या आहेत या बाहुल्या़ इतक्यात पाहिलं तर दोन्ही पायाने अपंग असलेल्या तरुणीला घेऊन आलेल्या एकानं तिला उचलून स्टॉलजवळच्या खुर्चीत बसवलं आणि तिनं भराभर आपल्या आणखी काही बाहुल्या तिथे मांडायला सुरुवात केली. त्यात राधा होती, मीराही होती, बंजारनही होती. चौकशीअंती कळलं की वेगवेगळ्या रूपांत, ठसक्यात उभ्या असलेल्या या बाहुल्या साकारल्या होत्या चंदाच्या कल्पक हातांनी, आणि तिला समर्थपणे साथ देत होता तिचा नवरा दिलीप.
चंदा मूळची जबलपूरची. दोन्ही पायांनी अपंग असली तरी कलेचा वरदहस्त लाभलेली. दहावीपर्यंतचं शिक्षण अस्थिविकलांगांच्या शाळेत राहून तिनं जिद्दीनं पूर्ण केलं, पण पुढच्या सोयीसाठी शहर गाठणं भाग पडलं. नागपुरातल्या उषा संत यांच्या ‘आशादीप’ संस्थेशी तिची गाठ पडणं हा निव्वळ योगायोग होता, पण तिच्या आयुष्याला महत्त्वाचं वळण देणारा होता. शिक्षणासह एखादी हरहुन्नरी कला अंगात बाणवली तर स्वावलंबी होणं कठीण नाही, हा आत्मविश्वास संस्थेनं तिला दिला. चंदा बहिणीकडे राहत होती. हाताची सायकल तिच्याकडे होती. बाहुल्या साकारण्यातून अर्थार्जन होत होते. चंदाच्या शेजारी राहणाऱ्या दिलीप दिदोदिया या युवकानं चंदामधील प्रामाणिकपणा, तिची जिद्द पारखली. तिची आयुष्यभरासाठी जोडीदार म्हणून मनोमन स्वीकारही केला आणि तिला लग्नासाठी मागणी घातली. पण चंदानं जवळपास वर्षभर विचार केल्यानंतर त्याला लग्नासाठी होकार दिला. तिच्या मते, ‘‘अपंगांसाठी मनाच्या कोपऱ्यात हळवा कोपरा असणं वेगळं आणि अशा व्यक्तीला सहचारिणी म्हणून व्यावहारिकदृष्टय़ा स्वीकारणं फार वेगळं. म्हणून मी पूर्ण विचारांती आणि त्याच्याविषयीची खात्री पटल्यावरच त्याला होकार दिला.’’
चंदा त्याची अर्धागिनी झाली खरी, पण त्यानं ते पुढे प्रत्यक्षात निभावलंही. तिनं भाजी चिरली की तो फोडणी घालणार. घरातील पसारा दोघं मिळून आवरणार. कपडे धुणं, बाजारहाट करणं ही कामं त्यानं स्वत:हूनच स्वीकारली आहेत. खरी कसोटी होती ती चंदाच्या गर्भारपणात. त्याही वेळी बायकोला उचलून दवाखान्यात नेणारा, तिची डोळ्यांत तेल घालून काळजी घेणारा दिलीप सगळ्यांनी पाहिला. आज त्यांना दहा आणि सहा वर्षांच्या दोन मुली आहेत. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं घरची कामं घरीच करणं भाग होतं आणि त्यात कमीपणा तो काय..असा सवाल करत दिलीप स्वयंपाक करणं असो वा मुलाचं संगोपन, चांगलं निभावतो आहे. ‘तुझ्यावर माझं प्रेम आहे, मला आयुष्यभरासाठी तुला जोडीदार करायचं आहे,’ हे म्हणणं तसं सोप्पं, पण निभावणं खरंच कठीण. चंदा-दिलीप ते निभावत आहेत. द्वैत आणि अद्वैत यांचे मीलन म्हणजे संसार. संसाराच्या पायऱ्या चढताना एकेक वीट महत्त्वाची असते. छोटय़ा-मोठय़ा वादावादीनंतरच शाश्वत सोबतीची वाटचाल होत असते, याची या दोघांना जाणीव होती. म्हणूनच तर सामाजिक दबावाला बळी न पडता त्यांनी उचललेलं हे पाऊल कौतुकास्पद आहे.
आपला आत्मविश्वास, आपले विचार निष्ठापूर्ण असतील तर समाजाचे वाग्बाण निष्प्रभ होतात. जोडीदाराचा आहे त्या रूपात स्वीकार करण्याचं धारिष्टय़ दाखवणारी ही तिन्ही जोडपी प्रेमाचा आदर्श ठेवणारी. व्हॅलेन्टाइन दिनाच्या निमित्तानं प्रगल्भ प्रेमाच्या जोरावर उभ्या ठाकलेल्या या जोडप्यांच्या साहचर्याची ही गोष्ट सक्षमता फक्त शरीराची नसते ती असते मनाचीही हा संदेश देणारी.
सक्षमता शरीराची.. नव्हे मनाची
अपंग जोडीदाराचा आहे त्या रूपात स्वीकार करण्याचं धारिष्टय़ दाखवणारी, प्रेमाचा आदर्श ठेवणारी ही तीन जोडपी. एक जोडपं आहे नुकताच लग्नाचा सुवर्णमहोत्सव साजरा करणारे नारायणराव आणि सुमतीताई. दुसरं आहे अंध जिज्ञासा व तिला साथ देणारा योगेश. तर तिसरं आहे, कलेची आराधना करीत अपंगत्वावर मात करणारी चंदा आणि दिलीप यांचं. प्रगल्भ प्रेमाच्या जोरावर उभ्या ठाकलेल्या या जोडप्यांच्या साहचर्याची ही गोष्ट, सक्षमता फक्त शरीराची नसते ती असते मनाचीही, हा संदेश देणारी..
आणखी वाचा
First published on: 09-02-2013 at 12:20 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make strong to heart not to health