‘‘सशस्त्र टोळी नेते, गुन्हेगार आणि अमली पदार्थाच्या व्यापाऱ्यांची अफगाण-संसदेत जी उपस्थिती आहे, त्याबद्दल मी अफगाणी जनतेचं सांत्वन करते. अफगाण जनता नुकतीच तालिबान्यांच्या कचाटय़ातून सुटली असली, तरी ती आता गुंडांच्या कचाटय़ात नव्यानं सापडली आहे.’’सप्टेंबर २००५
दोन हजार नऊ सालचा नोबेल शांती- पुरस्कार जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना देण्यात आला, तेव्हा अमेरिकेतील एका सुप्रसिद्ध व्यक्तीनं- नॉम चॉम्स्की यांनी- न्यूयॉर्क टाइम्समधील लेखात लिहिलं होतं, ‘नोबेल शांती-पुरस्कार-समितीनं अधिक योग्य व्यक्तीची निवड करायला हवी होती. अशा लायक व्यक्तींच्या अग्रस्थानी आहे. अफगाणिस्तानातील लक्षणीय बलप्रवर्तक कार्यकर्ती मलालाय जोया!’
कोण आहे ही तरुणी? तिनं कोणती असाधारण कामगिरी केलीय?
मलालाय जोयाचा जन्म, २५ एप्रिल १९७८ साली पश्चिम अफगाणिस्तानातील फराह प्रांतात झाला. तिचे वडील वैद्यकीय प्रशिक्षण घेत होते; परंतु अफगाणिस्तानात रशियाविरुद्ध लढताना त्यांना एक पाय गमवावा लागला. १९८२ साली, मलालाय चार वर्षांची असताना हे कुटुंब अफगाणिस्तानातून इराणला पळून गेलं आणि तिथे निर्वासित- छावणीत राहू लागलं. आठवीत असल्यापासूनच मलालायनं समाजसेवी कार्यात सहभाग घ्यायला सुरुवात केली. निर्वासित छावण्यांमधील वेगवेगळ्या समित्यांमध्ये तिनं सक्रिय सहभाग घेतला. तेथील स्त्रियांसाठीसाठीच्या मदतकार्याला हातभार लावता लावता मलालाय खूप खूप शिकली. या स्त्रिया अशिक्षित असल्या, तरी त्यांच्याकडून तिनं खूप बोध घेतला. तेथील अपार दारिद्रय़, रोगराई, असहायता यांच्याशी झुंजणारे लोक तिनं जवळून पाहिले. तेथील प्रत्येक झोपडीत यातनांची एक वेगळीच कहाणी तिला दिसत होती. केवळ दगडांच्या साहाय्यानं शत्रूंशी दोन हात करणारी मुलं तिनं तिथं पाहिली. ती म्हणते, ‘‘तिथं मी एक कुटुंब पाहिलं, त्यांचं बाळ अस्थिपंजर झालेलं होतं. त्याला डॉक्टरकडे नेण्याइतकाही पैसा त्यांच्यापाशी नव्हता. अगतिकतेनं मृत्यूची वाट पाहण्याखेरीज त्यांच्या हाती काहीही नव्हतं. अशा यातनांबद्दल लिहायला कुणीही लेखक धजावत नव्हता!’’
रशियाच्या पाडावानंतर, तालिबानी राजवट सुरू झाल्यावर जोयाचं कुटुंबीय १९९८ साली अफगाणिस्तानात परत आलं. आत जोया विशीची झाली होती. तिनं अफगाण स्त्रियांचं सक्षमीकरण करणाऱ्या एका सेवाभावी संस्थेची अध्यक्षा म्हणून कार्याचा प्रारंभ केला. ही संस्था हेरात आणि पाराहया पश्चिमी प्रांतात मदत पुरवत होती. ती ‘लोया जिर्गा’मध्ये निवडून आली. ‘लोया जिर्गा’ हा पश्तो भाषेतला शब्द आहे. त्याचा अर्थ आहे, ‘महामंडळ’ हे महामंडळ-लोया जिर्गा- महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी बैठक भरवतं. संविधानाला मान्यता देणं, महत्त्वाचे राजकीय निर्णय घेणं, आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास त्याबद्दल विचारविनिमय करून धोरणं आखणं अशा गोष्टींसाठी लोया-जिर्गाची बैठक बोलावली जाते. १७ डिसेंबर २००३च्या लोया-जिर्गाच्या वेळेस मलालायकडे साऱ्या जगाचं लक्ष वेधलं गेलं. अफगाणिस्तानच्या संविधानाला अधिकृत मान्यता देण्यासाठी भरवल्या गेलेल्या लोया-जिर्गाच्या बैठकीच्या वेळेस, जोयानं अवघ्या तीन मिनिटांच्या धाडसी वक्तव्यानं साऱ्या जगाला हादरवून टाकलं. राजकारणात गुन्हेगारांचा आणि अमली पदार्थाचा व्यापार आणि तस्करी करणाऱ्यांचा जो सुळसुळाट झाला आहे, त्याबद्दल तिनं जाहीर निषेध करून अशा लोकशाही (!) सरकारचा धिक्कारकेला. ती म्हणाली, ‘‘प्रत्येक समितीचा अध्यक्ष हा बैठक भरवण्यापूर्वीच निवडला गेलेला असतो. अशा गुन्हेगारांनी सर्व समित्या व्यापल्या आहेत. याच देशशत्रूंशी आपल्या देशाला युद्धाच्या खाईत लोटलं आहे. हेच लोक स्त्रियांचे विरोधक आहेत. त्यांनीच आपला देश रसातळाला नेला आहे. त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयांपुढे उभं करायला हवं!’’
तिच्या या निर्भय वक्तव्यानंतर सभागृहात क्षणभर नीरव शांतता पसरली आणि पुढल्याच क्षणाला गदारोळ उठला. पायांपाशी बंदुका ठेवून सभेत बसलेले मुजाहिदीन तिच्यावर चाल करून आले. तिला यू. एन.च्या रक्षकदलाकडून संरक्षण देणं भाग पडलं. धोरणं आखणाऱ्या समित्यांवर अशा गुंड-गुन्हेगारांची नियुक्ती करण्याविरोधात तिनं, जे टीकास्त्र सोडलं, ते करायला भलेभलेही त्यापूर्वी धजले नव्हते.
२४९ प्रतिनिधींच्या राष्ट्रीय समितीवर (वोलेसी जिर्गावर), सप्टेंबर २००५ मध्ये फराह प्रांताची प्रतिनिधी म्हणून जोया निवडून आली. शपथविधीनंतर तिनं आयत्या वेळेस घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं, ‘‘सशस्त्र टोळी नेते, गुन्हेगार आणि अमली पदार्थाच्या व्यापाऱ्यांची अफगाण-संसदेत जी उपस्थिती आहे, त्याबद्दल मी अफगाणी जनतेचं सांत्वन करते. अफगाण जनता नुकतीच तालिबान्यांच्या कचाटय़ातून सुटली असली, तरी ती आता गुंडांच्या कचाटय़ात नव्यानं सापडली आहे.’’ सध्याच्या अफगाण-सरकारमध्ये अशा गुन्हेगारांचा समावेश करण्याविरोधात तिनं तीव्र निषेध जारी ठेवला आहे. तिची हत्या करण्याबाबत तिला सतत धमक्या दिल्या जात आहेत. ती विवाहित असली, तरी तिनं पतीचं नाव गुप्त ठेवलं आहे; कारण त्याच्या जिवाला धोका संभवतो. अशा धमक्यांना ती अजिबात भीक घालत नाही. जानेवारी २००७ मध्ये बी.बी.सी.नं तिची मुलाखत घेतली होती आणि ‘अफगाणिस्तानातील सर्वात सुप्रसिद्ध स्त्री’ अशा शब्दात तिचा गौरव केला होता. त्या मुलाखतीदरम्यान जोया म्हणाली, ‘‘ते मला ठार मारतील परंतु ते माझा आवाज बंद करू शकणार नाहीत, कारण तो साऱ्या अफगाण स्त्रियांचा आवाज आहे. तुम्ही फूल चुरडून टाकू शकता; परंतु वसंत ऋतूचं आगमन थोपवू शकत नाही!’’
ती जाहीरपणे म्हणते, ‘‘धमक्यांना घाबरून मी कधीही कुजबुजत्या स्वरात बोलणार नाही! मी माझ्या देशबांधवांच्या जीवघेण्या संघर्षांचं केवळ एक प्रतीक आहे आणि त्यांच्या ध्येयाकडच्या प्रवासातली त्यांची निष्ठावान सेवक आहे आणि जर माझ्या ठाम मतांसाठी माझी हत्या करण्यात आली, तर माझं सांडलेलं रक्त त्यांच्या मुक्तिमार्गावरला दीपस्तंभ ठरो आणि माझे शब्द पुढल्या अनेक पिढय़ांसाठी एक क्रांतिगीत ठरोत!’’
तिच्या परखड टीकेच्या विरोधात, २१ मे २००७ रोजी ‘वोलसेई जिर्गा’ संसदेतून अन्य सदस्यांनी तिला तीन वर्षांसाठी निलंबित केलं. त्यांनी दावा केला की, अन्य सदस्यांवर जाहीर टीका करून, तिनं संसदेच्या सत्तराव्या कलमाचा भंग केला आहे. मानव अधिकार आयोगाचे आशियाचे प्रमुख ब्रॅण्ड अॅडम्स् यांनी यावर टिप्पणी करताना म्हटलं होतं, ‘‘मलालाय जोया मानवाधिकारांची खंदी समर्थक आहे आणि अफगाण-स्त्रियांचा आवाज जगापुढे नेणारं प्रभावी माध्यम आहे.’’
जोयाला संसदेतून निलंबित केल्यानंतर फराह, नांगरहार, बागलला, काबूल आणि अफगाणिस्तानातील अन्य प्रांतांमधील जनतेनं तीव्र निषेध नोंदवला. तिच्या समर्थकांनी तिची संसदेत पुनर्नियुक्ती व्हावी म्हणून जगभरात आवाज उठवला.
नोबेल शांती पुरस्कार मिळवणाऱ्या सहा स्त्रियांनी (शिरीन अबादी, जोडी विल्यम्स, वंगारी मथाई, रिगोबेर्टा मांचू, बेटी विल्यम्स आणि मेथरीड मग्वायर) एक संयुक्त निवेदनात मलालाय जोयाला पाठिंबा देत म्हटलं, ‘‘आम्ही तिच्या धैर्याबद्दल तिचा गौरव करतो आणि अफगाणिस्तानातील राष्ट्रीय संसदेवर तिची पूर्वीच्या पदावर पुन्हा नियुक्ती केली जावी, अशी मागणी करतो. आमची बहीण, आंग सान स्यू की, हिच्याप्रमाणेच जोयासुद्धा, जगातला न्याय वाढवण्यासाठी धडपडणाऱ्या जगभरातील स्त्रियांपुढील आदर्श आहे!’
२०१० सालच्या फेब्रुवारीत, जोयानं सप्टेंबरमधील संसद-निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला. नांगरहार, निमरोझ, टखार, काबूल आणि फराह प्रांतातील लोकांनी तिला विनंती केली होती की, तिनं त्यांचं संसदेत प्रतिनिधित्व करावं. परंतु जुलै २०१० मध्ये तिनं हा निर्णय मागे घेतला. मात्र जगभरात आपला आवाज पोचवण्याची आणि अफगाणिस्तानमधील अंतर्गत परिस्थिती आणि त्यातली अमेरिकेची ढवळाढवळ याबद्दल जागतिक व्यासपीठावरून निषेध नोंदवण्याची एकही संधी ती गमावत नाही. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, भारत येथे तिनं दौरे केले आहेत. प्रथम अमेरिकेनं तिला प्रवेश-परवाना नाकारला होता, परंतु जागतिक दबावामुळे तिला तो अखेरीस मिळाला आणि २०११च्या मार्च महिन्यांत तिनं अमेरिकेतील दौरा बॉस्लामधील हारवर्ड मेमोरियल चर्चमधील भाषणानं सुरू केला. या भाषणाला व्यासपीठावर तिच्यासमवेत खुद्द नॉम चॉम्स्की उपस्थित होते. संसदेबाहेर राहूनही मलालायचा जीवितध्येयाचा प्रवास जोमानं सुरू आहे. आपल्या देशातील स्त्रियांना मोकळा श्वास घेता यावा, त्यांचं सक्षमीकरण व्हावं, अफगाणिस्तानात निर्मळ लोकशाही यावी यासाठीचे तिचे प्रयत्न स्तिमित करणारे आहेत. तिच्या आंतरिक ऊर्जेनं प्रतिकूलतेवर मात केली आहे!
आशेचा किरण
''सशस्त्र टोळी नेते, गुन्हेगार आणि अमली पदार्थाच्या व्यापाऱ्यांची अफगाण-संसदेत जी उपस्थिती आहे, त्याबद्दल मी अफगाणी जनतेचं सांत्वन करते. अफगाण जनता नुकतीच तालिबान्यांच्या कचाटय़ातून सुटली असली, तरी ती आता गुंडांच्या कचाटय़ात नव्यानं सापडली आहे.''सप्टेंबर २००५ मध्ये फराह प्रांताची प्रतिनिधी म्हणून जोया …
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-07-2014 at 01:10 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malalai joya hope of ray in afghanistan