शतकानुशतके चालत आलेल्या लोकपरंपरा, आख्यायिका, यांचा समकालीन वातावरणात, नवदृष्टीने विचार करताना मल्याळम कवयित्री एन. बालामणी अम्मा यांना वर्तमान सामाजिक प्रश्नही अस्वस्थ करतात. मूळ सात्त्विक वृत्ती, भारतीय संस्कृतीतील मूल्यांवर श्रद्धा आणि ठाम विचार मांडण्याची पद्धत यामुळे त्यांची कविता वेगळी, वेधक ठरते आणि त्यांच्या लेखनातील आर्तता भिडते म्हणूनच मल्याळी कवितेची ‘जननी’ असा त्यांचा गौरव केला जातो.
‘स्त्रीला आपला थोडासा अवकाश मिळू दे. मग ती किती तरी पुढे जाईल, उत्तमोत्तम कलाकृती निर्माण करेल,’ असा विश्वास ‘अ रूम ऑफ वन्स ओन’ या आपल्या पुस्तकात व्हर्जिनिया वूल्फने विसाव्या शतकाच्या आरंभीच व्यक्त केला होता. व्हर्जिनियाप्रमाणेच तिचे म्हणणे सर्वार्थाने स्वत:च्या उदाहरणाने सिद्ध केले ते आपल्या येथील मल्याळम् कवयित्री एन. बालामणी अम्मा यांनी! कधी कधी भौगोलिक, भाषिक, सांस्कृतिक अंतरं पार करून कलानिर्मितीच्या क्षेत्रात समान अभिव्यक्ती दिसून येते, ती अशी.
‘प्रत्येक अनुभव, मग तो सुखद असो वा दु:खद- जेव्हा मन:स्मृतींच्या मुशीमध्ये ओतला जातो, तेव्हा तो शुद्ध होऊन मगच आविष्कृत होतो. त्यातील कडवटपणा नाहीसा होतो, वैयक्तिक आवडनिवड नाहीशी होते आणि ते शुद्ध अनुभव आपल्याला अपरंपार आनंद देतात. या अनुभवांचं रोचक सार म्हणजेच साहित्यामृत असतं. आयुष्याचं मंथन करून प्राप्त झालेलं! साहित्यातील प्रथम निर्मिती म्हणजे सूर्योदयाप्रमाणे किंवा वसंतागमनाप्रमाणे मोठी घटना असली पाहिजे.’ साहित्यनिर्मितीचं रहस्य इतक्या नेमकेपणानं व सहज सांगणाऱ्या बालामणी अम्मा (१९०९-२००४) मल्याळम् भाषेतील एक श्रेष्ठ व ज्येष्ठ कवयित्री म्हणून ओळखल्या जातात. मल्याळी साहित्यिकांमध्ये त्यांचा मल्याळम् साहित्याची, विशेषत: कवितेची ‘जननी’ असा गौरव केला जातो.
स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम सगळ्या संस्कृतींनी अनेक वर्षे इमानेइतबारे केलं. जशी युरोपातील तशीच भारतातही स्थिती होती. त्यामुळे बालामणी अम्मा औपचारिक शिक्षण मुळीच घेऊ शकली नाही. ‘नालापत’ कुटुंब सुशिक्षित, सुसंस्कृत आणि साहित्यप्रेमी होतं. बालामणींचे मामा नारायण मेनन हे प्रसिद्ध साहित्यिक व तत्त्वज्ञ असल्याने घरात लेखकांची वर्दळ असे आणि साहित्यासंबंधी चर्चा घडत. लहानग्या बालामणीला त्यात खूपच रस असे. शाळेत जाता आलं नाही तरी घरातील प्रचंड ग्रंथसंभार तिच्यासाठी खुला होता आणि त्याचा तिने खूप उपयोग करून घेतला. स्वयंअध्ययनाने एखादी स्त्री स्वयंविकास कसा करून घेऊ शकते याचा बालामणी म्हणजे आदर्श होती. तत्कालीन परंपरा, संकेत यांचा भंग न करता आपले आपण वाचन वाढवत, संस्कृत, हिंदी ती शिकली. स्वत:मधील कवित्त्वशक्तीची जाणीव तिला फार लौकरच झाली आणि कवितालेखन अगदी लहान वयात सुरू झालं. जवळजवळ शतकाची साक्षीदार असलेल्या बालामणींनी सहा दशकांहून अधिक काळ, जवळजवळ शेवटपर्यंत आनंदात काव्यलेखन केलं!
घरातील मंडळींनी तिला विरोध केला नाही, पण वयाच्या अठराव्या वर्षी व्ही. एम. नायर यांच्याशी लग्न मात्र करून दिलं. पतीबरोबर ती गेली कोलकत्याला! पण काही काळाने तिचे पती ‘मातृभूमी’ या मल्याळी नियतकालिकाचे कार्यकारी संचालक व संपादक झाले व ती केरळात आली. त्यांनी तिची इंग्रजीशी ओळख करून दिली. बालामणीच्या वैवाहिक जीवनाने तिचा अवकाश संकुचित होण्याऐवजी विस्तारला. तिची प्रतिभा फुलली, काव्यलेखन बहरलं.
विशेष म्हणजे या काळात गांधीजींच्या ‘चले जाव’ आंदोलनात, सत्याग्रहात त्या सामील झाल्या. त्यांनी खादी स्वीकारली, चरखा चालवला, पण त्यातून त्या लौकरच बाहेर पडल्या. बालामणींना तो संघर्ष नकोसा वाटला असेल? त्यांचा पिंड कार्यकर्तीचा नसेल की आत्ममग्न स्वभावामुळे कवितेची ओढ अधिक प्रभावी ठरली असेल हे सांगणं कठीण! त्यांची मन:स्थिती त्या वेळी द्विधा झाली असावी. त्यांच्या कवितेवर याचा फारसा थेट परिणाम झालेला दिसत नाही हे खरं. पण पुढच्या काळात आपल्या काव्यप्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांची चिंतनशील कविता अहिंसेचा पुरस्कार करीत शांततामय मार्गाने जाण्याचे आवाहन करते.
शंभरेक वर्षांपूर्वीच्या काळात स्त्रिया अशिक्षित राहात, त्यांची कर्तव्यं त्यांना चोवीस तास माजघरातच डांबून ठेवीत आणि समाजाला त्यात काही गैर वाटत नसे हे आपल्या परिचयाचं आहे. या दडपणातून बालामणींनी स्वत:ला मुक्त केलं आणि अंतर्मनाचा आवाज ऐकत त्यांनी लेखनाशी, काव्याशी निष्ठा ठेवली. एका भाषणात त्यांनी आपल्या मन:स्थितीचा उल्लेख करत म्हटलं आहे की, ‘‘मीच पूर्वी लिहिलेल्या ‘पिंजऱ्यातील पक्ष्याचा विलाप’ या कवितेने मला यातून मोकळं केलं.’’ त्यांचं कवितेवर इतकं प्रेम होतं की इतर वाङ्मय प्रकारात लेखन झालं नाही.
बालामणींची कविता वयाबरोबर अधिकाधिक प्रगल्भ होत गेलेली दिसते. साधारणपणे त्यांची संपूर्ण कविता तीन भागांत विभागली जाते. पहिल्या टप्प्यातल्या आत्मपर कवितेला ‘चार भिंतींच्या आड’ असं सार्थ नाव आहे. प्रेयसी, गृहिणी, आई, आजी, नोकरदार स्त्री अशा स्त्रीच्या विविध रूपांचं त्यांनी दर्शन घडवावं हे स्वाभाविकच. अशा अनेक कवितांमधील भावमाधुर्य व अनलंकृत, भावनांचा सहज आविष्कार करणारी सोपी भाषा यामुळे या कविता लोकप्रिय झाल्या.
मातृत्वाचा आनंद वाटतो, पण त्यापाठोपाठ आपल्याला गृहीत धरलं जातंय हे लक्षात येऊन त्या व्यथित होऊन म्हणतात, ‘स्त्रीचं जीवन ती रोज रांधणाऱ्या स्वयंपाकासारखंच तर आहे. जीव ओतून साऱ्या घरासाठी शिजवावं, पण संध्याकाळी सारी भांडी रिकामी! माझं आयुष्यही साऱ्यांसाठी झिजून असंच रितं?’ कधी तरी हा उद्वेग दूर होतो आणि आताच्या व पूर्वीच्या स्त्रीमधील फरक अधोरेखित करत त्या म्हणतात,
‘आजवर खाली मान घालून, घरा-देवघरातला
अंधार दूर करत तू दीप उजळवलेस.
आता तुझ्या अभ्यासिकेबाहेरचे
विद्युद्दीप उजळवतेस
शेजाऱ्यापाजाऱ्यांसाठी, घराकारखान्यांसाठी,
आणि चालतेस ताठ मानेने, चंद्रकिरणांची शीतलता देत!’
त्याबरोबरच त्यांनी तिच्या शक्तिशाली ‘काली’ रूपाचंही चित्रण केलं आहे. सारं विश्व मातृत्वभावनेतून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा असं मनाला वाटतं. पण आजूबाजूला दिसणारे हे भ्रष्ट जीवन, पापी लोकांचं वर्तन पाहून मन अस्वस्थ होतं, सारी शस्त्रं उपसावीशी वाटतात. कामधेनूस्वरूप असणाऱ्या पृथ्वीला माणसं आपल्या हव्यासानं वाटेल तशी ओरबाडतात, याचं दु:ख होतं. या जगातील सारा अनाचार नष्ट करावा असं वाटत असताना, तेवढं सामथ्र्य असतानाही हिंसेतील व्यर्थता जाणवते आणि विश्वमातृत्वाची भावनाही जागी होते, उदारमनस्कता दाखवावीशी वाटते.
मात्र मनातील ही खदखद शांत होत नाही. त्यातून वेगळ्या समाजसंबद्ध कविता लिहिल्या गेल्या आहेत. त्या टप्प्याला ‘रस्त्यावर’ असंच संबोधलं गेलंय. समाजाला पोखरणाऱ्या नाना प्रकारच्या समस्या, चिंता, जातिभेद, वर्गभेद यांविषयी त्यांच्या मनात असणारी वेदना खोलवरची आहे. ती व्यक्त करताना त्यांची चिंतनशीलता प्रकर्षांने व्यक्त होते. ऐंद्रिय वासना आणि नैतिकता, सामाजिक आणि आध्यात्मिक, दैनंदिन अशाश्वत जीवन आणि शाश्वतता यांचं मिश्रण मग होतं आणि योग्यायोग्यतेचा निवाडा कसा करायचा हा पेच उभा राहतो.
‘अंतिम सत्याचा शोध’ या तिसऱ्या भागातील कविता अंतर्मुख करणाऱ्या आहेत. मानवनिर्मित समस्या व त्यावरचे उपाय यांचे चिंतन मांडताना त्या दंतकथा, मिथकं, पौराणिक कथा, महाकाव्यातील व्यक्तिरेखा यांचा आधार घेतात. त्यांची कविता वाचताना, या साऱ्यांचा नव्याने अन्वयार्थ लावणाऱ्या त्यांच्या स्वगतरूपातील- दीर्घकविता ही त्यांच्या कवितेची खरी शक्ती आहे असं मला वाटलं. विश्वामित्र, वाल्मीकी, च्यवनऋषी, बिभीषण, परशुराम, कुब्जा, महावीर, ययाति, प्रतर्दन, वसुमान यांच्या कथा आपल्या परिचयाच्या आहेत. पण त्यावर आधारित, याच नावांच्या कवितांमधून मानवी वृत्ती-प्रवृत्ती, मानवी स्वभावजन्य सत्य सांगत, त्यांनी सत्तासंघर्ष, पुरुषी अहंकार, वासना, सुखोपभोगी वृत्ती यांसारख्या अनेक मानवी दुर्गुणांचा निषेध केला आहे. काळाबरोबर समाजधारणा कशा बदलतात याचा उत्तम नमुना इथे पाहता येतो.
आदिकवी वाल्मीकीच्या परिचित कथेचा वेगळा अर्थ सांगताना त्यांना वाटते, क्रौंचमिथुनातील एका पक्ष्याला बाण लागून तो मृत झाल्यावर जोडीदाराने जो विलाप केला तो पाहून संवेदनशील आदिकवीची प्रतिभा जागृत झाली आणि त्याच्या शोकाने श्लोकाचे रूप घेतले, असे म्हटले जाते खरे, पण वाल्मीकी आत्मनिंदा करीत म्हणत असेल–
‘हा कोण आहे? शोक करणारा जोडीदार की
भुकेने व्याकूळ होऊन तडफडणारी माझी प्रिया?
मी त्या पारध्याला पाहतोय का? की
ही माझीच भूतकाळातील सावली आहे?
मला कुणाबद्दल सहवेदना वाटतेय?
त्या जोडीदाराबद्दल की कुलद्रोही अशा माझ्याचबद्दल?’
वाल्या कोळ्याचे आपल्या कुटुंबाशी झालेले वर्तन त्यांना टीकायोग्य वाटते. वाल्मीकी कठोर तपश्चर्या करून ऋषी झाल्यावरही त्याचे ते पाप धुतले जात नाही अशी त्यांची धारणा आहे, भीष्माबाबतीतही त्याने अंबेवर अन्यायच केला, असे त्या म्हणतात. राम-रावण युद्धात आपण रामाबरोबर गेलो हे योग्य की नाही, असा प्रश्न त्यांच्या बिभीषणाच्या स्वगतातून पुढे येतो. परशूची कथामध्ये परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली याचा अर्थ भांडवलशहा, सरंजामदार, जमीनदार व दुर्बल भूमिपुत्र यांच्या संघर्षांत आपण न्यायाची बाजू घेतली असे परशुरामास वाटते, पण हिंसेने हिंसाच वाढते हे वडिलांनी-जमदग्नी ऋषींनी सांगितलेले तत्त्व त्याला पटते आणि तो आपला परशू समुद्रात फेकतो. काही काळानंतर त्यातूनच देवभूमी केरळची निर्मिती झाली व परशुरामास समाधान मिळाले अशी बालामणींची धारणा आहे. इतिहासाचे या दृष्टीने पुनर्लेखन व्हावे असे त्यांना वाटते.
शतकानुशतके चालत आलेल्या लोकपरंपरा, आख्यायिका, यांचा समकालीन वातावरणात, नवदृष्टीने विचार करताना बालामणींना वर्तमान सामजिक प्रश्नही अस्वस्थ करतात. त्यातूनच नक्षलवादींच्याबरोबरची एक रात्र, हरताळ, यंत्रयुगातील समस्या यांसारख्या विषयांवर त्या लिहितात.
मूळ सात्त्विक वृत्ती, भारतीय संस्कृतीतील मूल्यांवर श्रद्धा आणि सौम्य तरीही ठाम विचार मांडण्याची पद्धत यामुळे त्यांची कविता वेगळी, वेधक ठरते आणि त्यांच्या लेखनातील आर्तता भिडते ती अशा काही ओळींमधून-
जसा दिवस मावळत चालला, तसा तू आलास, आणि थेट माझ्या अंतर्यामींच्या गाभ्यात शिरलास.
मनाचा गाभारा कसा चांदण्यात न्हायला.
हे अनादि अनंता,
माझ्या विचारांचं, वाणीचं, कृतीचं
माधुर्य एकवटलेला हा नैवेद्य
मी तुला अर्पण करते.
* पद्मभूषण एन. बालामणी अम्मा (१९०९-२००४)
* कूप्पकै (ओंजळ), अम्मा, कुटुंबिनी, मुत्तशी (आजी), सोपान, नैवेद्य इत्यादी २५च्या वर कवितासंग्रह प्रकाशित.
* केरळ साहित्य अकादमी, साहित्य अकादमी, सरस्वती सन्मान यांसारखे अनेक राज्य व राष्ट्रपातळीवरील प्रतिष्ठित पुरस्कारप्राप्त.
डॉ. मीना वैशंपायन – meenaulhas@gmail.com