प्रज्ञा शिदोरे

pradnya.shidore@gmail.com

mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Numerology number 8
Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते शनीची कृपादृष्टी, मान-सन्मानासह कमावतात प्रचंड संपत्ती; भाग्यापेक्षा असतो कर्मावर विश्वास
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक

जगभरातील स्त्रिया विविध क्षेत्रात मोठी कामगिरी बजावू लागल्या, यश मिळवू लागल्या, अधिकार पदावर पोहोचल्या..  या गोष्टीलाही साधारण १०० वर्षांहून अधिक काळ झाला आहे. याचे पडसाद आपल्या समाजात नक्कीच पडले आहेत. बदल घडण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. त्याचा नेमका परिणाम प्रत्येक क्षेत्रात कसा होत गेला आणि कसा होत आहे, राज्यात, देशात आणि परदेशात.. ‘यत्र तत्र सर्वत्र’ संचार करणाऱ्या या स्त्रीशक्तीमुळे स्त्रीच्या जगण्यात आणि समाजात नेमके काय बदल झाले, स्त्री- पुरुष या भेदाऐवजी माणूसपणाच्या दिशेने आपण जाणार आहोत का, याचा उहापोह करणारं सदर दर पंधरवडय़ाने.

सहा महिन्यांपूर्वी आशाताई पोळ्या लाटताना सांगत होत्या, ‘‘एकदा का ते मुलाचं लग्न झालं, की मी काम सोडणार वहिनी. घरी राहणार, मुलांकडून लाड करून घेणार.’’ २५ वर्षांपूर्वी त्यांच्या नवऱ्यानं दुसरं लग्न केलं. तेव्हापासून २ मुलं, म्हातारी आई यांना त्या एकटय़ा सांभाळतात. मध्यंतरी नवरा आजारी होता तेव्हा त्याची शुश्रूषा करायला हॉस्पिटलमध्ये त्यांनीच चकरा मारल्या. काल आल्या अन् म्हणाल्या, ‘‘माझी सून जाते नोकरीला, मुलाची नोकरी दूर आहे म्हणून ते जाणार लांब राहायला. आईंचं कोण करणार? आणि ‘हे’ आता आजारी असतात.. त्यांचं पण बघायला हवं ना..’’ साधारण पंचावन्नच्या पण सत्तरीच्या दिसणाऱ्या आशाताई आता नवीन कामंही शोधत आहेत.

आकांक्षा बारावीनंतरच अमेरिकेला गेली. तिच्यापेक्षा कमी कुवतीचा पण केवळ पुरुष असल्याने तिच्या सहकाऱ्याचा पगार अधिक आहे हे तिला कळलं आणि तिने गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून दिली आणि स्वत:च्या हिमतीवर, तिथे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित स्वत:ची कंपनी सुरू केली. आता, साधारण पस्तिशीच्या असणाऱ्या आकांक्षाला, ‘योग्य स्थळ’ कसं मिळणार, तिच्या बाकीच्या गोष्टी ‘वेळेवर’ कशा होणार, म्हणून तिची आई चिंतेत आहे. ‘टेरिफीक ३५ अंडर ३५’ या बे एरियामधील यादीत झळकलेल्या आकांक्षाला, तिथे एक जोडीदार मिळाली आहे, आणि त्यांचं एकत्र आयुष्य, उत्तम सुरू आहे, पण हे तिच्या घरच्यांना सांगायची तिची हिंमत होत नाहीए.

फिनलँडच्या ३४ वर्षांच्या सना मरीन नुकत्याच सर्वात कमी वयाच्या पंतप्रधान ठरल्या. आई-बाबांचा घटस्फोट झाल्यावर त्यांना त्यांची आई आणि तिची जोडीदार दोघींनी मिळून वाढवलं. त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारल्यावर पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, ‘माझं वय, लिंग आणि तुम्हाला वाटतं तसं माझं ‘वेगळं’ बालपण याविषयी मला कृपया प्रश्न विचारू नका. हे महत्त्वाचं नाहीए. माझं काम, मी मांडत असलेले मुद्दे आणि माझ्या सरकारपुढची आव्हाने यावर आपण बोलू या.’ मरीन यांनी चार पक्षांच्या मदतीनं सरकार स्थापन केलं आहे, या प्रत्येक पक्षाच्या प्रमुख या ४० वर्षांखालील स्त्रियाच आहेत!

आशाताई, आकांक्षा, सना मरीन असो वा इंदिरा नुई, गीता गोपिनाथ किंवा अगदी तुमची माझी आई, घरी कामाला येणाऱ्या मदतनीस, तुमची कार्यालयीन अधिकारी, यांच्यामध्ये काय साम्य आहे असा विचार करत होते. बघायला गेलं तर साम्य काहीच नाहीए. या प्रत्येकीचे स्त्री म्हणून असणारे प्रश्न वेगळे आहेत. या प्रत्येकीची लढाई वेगळी आहे. हो, पण प्रत्येकीची एक स्वतंत्र लढाई आहे. अपेक्षांना पुरे पडण्याची लढाई, ‘स्व’चा आवाज बुलंद करण्याची लढाई, इतिहासाने लादलेल्या भुमिकेतून थोडं बाहेर येऊन वेगळा विचार करण्यासाठीची लढाई. आपल्यासाठी कदाचित छोटी-मोठी असेल ती. पण या प्रत्येकीसाठी अतिशय जवळची. शिवाय, खरं तर एक समाज म्हणून प्रगती करण्यासाठी आपल्या सर्वासाठीच अतिशय महत्त्वाची लढाई. या प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया मोठय़ा प्रमाणात सहभागी होताना दिसत आहेत वगैरे आता सर्वाना माहीत आहे. पण या सहभागामुळे त्या क्षेत्रांत काही बदल झाला का? त्या क्षेत्रात असल्यामुळे त्या स्त्रीमध्ये काही बदल घडला का? हेसुद्धा पाहायला हवं.

असं म्हणतात की, स्त्रियांना एका वेळी अनेक कामांचं भान ठेवणं सहज जमतं. मग अशा निसर्गाने दिलेल्या क्षमतांमुळे त्यांच्या काम करण्याच्या पद्धतींमध्ये काही बदल झाले का, हे पाहायला हवे. कोणताही बदल हा साधा-सोपा नसतो. स्त्रिया विविध क्षेत्रात मोठी कामगिरी बजावू लागल्या, मतदान करू लागल्या, राजकारणात सहभागी होऊ लागल्या, या गोष्टीला साधारण १०० वर्षांहून अधिक काळ झाला आहे. यामुळे आपल्यात समाज म्हणून बदल घडण्याची प्रक्रिया कशी झाली, हेसुद्धा बघायला हवं. अर्थात, प्रत्येक क्षेत्रातले बदल, तिथे झालेला परिणाम हा वेगळा असेल, पण त्यात काही समान धागा मिळतो आहे का, हे पाहायला हवं.

नव्या दशकातल्या, नव्या वर्षांतल्या या नव्या सदरामध्ये, स्त्रियांच्या विविध क्षेत्रातील सहभागाच्या कहाण्यांबरोबरच, त्यांनी केलेल्या आणि त्यांच्यावर झालेल्या परिणामांचा ऊहापोह करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. त्याबरोबरच, भविष्यातल्या बदलांचा वेध घेण्याचा प्रयत्नही आपण या लेखांमधून करणार आहोत.

भविष्याचा विचार करताना भूतकाळात गेल्यावाचून राहवत नाही. गेल्या दहा हजार वर्षांचा विचार केला, तर एक मानव प्राणी म्हणून आपल्या शरीरामध्ये फार काही बदल झालेले नाहीत असं वाटतं. शास्त्र कदाचित वेगळं सांगेल, पण आपलं शरीर हे काही आपलं भविष्य ठरवण्याचे साधन होऊ नये असं वाटतं. मग ते शरीर स्त्रीचं असेल किंवा पुरुषाचं. आज जगभरातल्या अनेक स्त्रिया या एकाच गोष्टीमुळे बळी गेलेल्या आपण पाहत आलो आहोत.

खरं तर स्त्रियांबरोबर पुरुषांनाही अपल्या पिढय़ान्पिढय़ा चालत आलेल्या भूमिका पार पाडण्याची सक्तीच होताना दिसते. भूमिकांमधल्या या बदलांचा अभ्यास व्हायला हवा. २०१७ मध्ये ‘नॅशनल जिऑग्राफिक’ने एक अंक प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये जगभरात लिंगभावाबद्दलच्या कल्पना, विचार कसे बदलत चालले आहेत, याविषयी विस्तृत मांडणी केली होती. या अंकात ‘आपले लिंग हीच आपली एकमेव ओळख नाही’, असं मानणाऱ्या आणि स्त्री किंवा पुरुष या दोन पर्यायांच्या पलीकडे जाऊन एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या अनेक लोकांच्या कहाण्या त्यात होत्या. या अंकाला त्या वर्षीच्या विश्लेषणात्मक पत्रकारितेसाठी नामांकनही मिळाले होते.

गेल्या दशकात आपण जगात सगळीकडेच समाज हा धर्म, जात, पंथ यांमुळे अधिकाधिक विभागला गेलेला पाहिला. पण या विषयांवरचा भेदभाव आणि लिंगाधारित भेदभाव यामधला एक मोठा फरक आहे. तो म्हणजे हा भेद स्वत:च्या कुटुंबातूनच सुरू होतो, आणि म्हणून प्रत्येकीचा अनुभव, प्रमाण, वेगळं असतं. पण येणारं दशक वेगळं असेल. जगभरातील सत्ताधारी वर्गाला आणि तिथल्या समाजाला हळूहळू एक गोष्ट पक्की लक्षात येईल. ती म्हणजे, जर आपल्याला एक देश म्हणून किंवा एक समाज म्हणून मोठं व्हायचं असेल, भविष्यात येणारी आव्हाने समर्थपणे पेलायची असतील तर आपल्याला आपल्या सर्व नागरिकांची कौशल्ये, त्यांची प्रतिभा, याचा वापर करून घ्यायला हवा.

या भावनेमुळे निश्चितच स्त्री-पुरुष समानतेसाठी मोठी पावले उचलली जातील..आणि कदाचित आपण समाज म्हणून लवकरच माणसाला माणूस म्हणून बघायला लागू..

प्रज्ञा शिदोरे या राजकीय विश्लेषक व अभ्यासक असून गेली अनेक वर्षे सातत्याने विविध वर्तमानपत्रांमध्ये लिखाण करीत आहेत. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी राजकीय व सामाजिक विषयांवर भाष्य करण्यासाठी विविध माध्यमांचा प्रभावी उपयोग केला. मराठीतील मान्यवर वृत्तपत्रांत लेखन करत असताना त्यांनी द वॉल स्ट्रीट जर्नल’, ‘नॅशनल जिओग्रफिकअशा विविध आंतरराष्ट्रीय प्रकाशनांसाठीही साहाय्यक बातमीदार म्हणून काम केले आहे. सिमला येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स स्टडीजमध्ये महात्मा गांधी यांचे आयुष्य आणि विचारया विषयावर अभ्यास करण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती. ग्रीनअर्थया सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेमध्ये त्या राज्यकारभार व धोरणे या विषयात सल्लागार म्हणून काम करतात. एका राजकीय पक्षाच्या महाराष्ट्राच्या ब्लू-प्रिंटकरिता त्यांनी राज्यकारभार आणि धोरणे या संपूर्ण विभागाचे लेखनदेखील केले आहे. त्याचबरोबर मैत्रीया सामाजिक संस्थेत त्या गेली अनेक वर्षे स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहेत.