तुम्ही ज्याला ज्ञानदान करता तो ते ज्ञान ग्रहण करण्याच्या योग्यतेचा, पात्रतेचा असेल तरच त्यातून अपेक्षित फळ मिळतं, अशा अर्थाची एक म्हण आहे.
ज्ञान- मग ते कोणत्याही क्षेत्रातील असू शकतं! पुस्तकी ज्ञान, नृत्य, गाणं, अभिनय, यांत्रिकी, शेतीविषयीचं अगदी पाककलेविषयीचं सुद्धा. पालथ्या घडय़ावर पाणी पडू नये म्हणून कोणाला काही शिकवताना त्याची त्या विषयातील जाण, आवड, आत्मसात करण्याची बौद्धिक, मानसिक पातळी या गोष्टी तपासल्या पाहिजेत. ग्रहणशक्ती कमी असेल तर दोघांच्याही वेळेचा अपव्यय ठरलेला! पण पात्रता असणाऱ्याला ज्ञानदान केलं तर गोड फळं मिळतील.
सौम्या या देखण्या मुलीला गोड गळ्याची देणगी मिळालेली होती. अभिनयाचं अंग तिच्याकडे होतं. शाळा-कॉलेजमधील रंगमंचावर काही भूमिका केल्याने आत्मविश्वास वाढला होता. तुम्ही विचाराल, ‘‘आता अडलंय् कुठे?’’ अडलं होतं गुरूकरिता. थोडय़ाशा शोधानंतर, रंगमंच आणि चित्रपटसृष्टीत चांगलं नाव कमावलेल्या गुरूभगिनी भेटल्या. कॅमेरासमोरील अभिनय, डबिंग, कपडय़ांची रंगसंगती, साजेशी वेशभूषा, मेकअप, भरपूर सराव अशा अनेक उपयुक्त गोष्टींचे धडे तिने त्यांच्याकडे गिरवले. त्या वेळी अभिनयाबरोबर उत्तम गाणे गाणाऱ्या कलाकारांना कामे झटपट मिळत. सौम्याने केलेल्या काही कामांतून या क्षेत्रातील लोक तिला ‘गुणी अभिनेत्री’ म्हणून ओळखू लागले. चांगली अभिनेत्री म्हणून ती नावारूपाला आली.
आपण दिलेल्या ज्ञानाचं सोनं झालं, कारण सौम्या सर्व दृष्टीने ज्ञान ग्रहण करण्याच्या पात्रतेची होती. दोघींच्या कष्टांना गोड फळे त्यामुळेच आली. हा गुरुभगिनींना अनुभव आला.
कधी कधी याच्या उलट परिस्थिती पाहायला मिळते. शिक्षणाच्या बाबतीत अशा घटना जास्त घडतात. आपल्या मुलाने अमुक एक कोर्सच केला पाहिजे, असं पालकांनी आधीच ठरवलेलं असतं! त्यासाठी लागणारी कुवत त्याच्याकडे आहे की नाही याचा विचार होत नाही. देणगी देऊन प्रवेश मिळवतात. भरपूर पैसे मोजून क्लासमध्ये घातलं जातं! पण आडात नसेल तर पोहऱ्यात कोठून येणार? अगदी असंच झालं रोहितच्या बाबतीत. बारावीच्या परीक्षेत चांगले गुण नसताना
त्याला अभियांत्रिकी कॉलेजमध्ये घातले. त्याची माझी चांगली ओळख होती. म्हणून त्याला हे जमणार नाही याची मला खात्री होती. त्याच्या पालकांना राग येईल म्हणून मी गप्प बसले. तीन वर्षे आणि लाखो रुपयांचा चुराडा झाल्यावर मात्र मला फारच असह्य़ झालं आणि मी त्यांना सांगितलं, रोहितला दुचाकी वाहनांची चांगली माहिती आहे. त्याला एखादं वर्ष चांगल्या एखाद्या गॅरेजमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवा. त्यातील त्याची प्रगती पाहून तुम्हीच त्याला दुरुस्तीचं गॅरेज काढून द्याल. खरंच दोन वर्षांत त्याला गॅरेज चालविण्याचा आत्मविश्वास आला. पुढील दोन वर्षांत त्याची गिऱ्हाईकं वाढली. त्याच्या बुद्धीची कुवत दुचाकीचे काम करण्याची होती. पात्रतेनुसार ज्ञान मिळल्याने चांगले फळ मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा