Elbert Hubbard या अमेरिकन संपादक, प्रकाशक, तत्त्ववेत्त्याने म्हटले आहे, ‘‘कोणतेही काम करताना आपल्याला जेवढी बुद्धी, शक्ती खर्च करावी लागते त्याच्यापेक्षा खूप जास्त बुद्धी, शक्ती, ‘आपण काय करावं?’ हे ठरवण्याकरिता आपल्याला खर्च करावी लागते.
सेवानिवृत्त झालेली शोभा, ‘दिवसभर काय करावं, वेळ चांगल्या रीतीने कसा घालवावा’, या चिंतेत पडली. घर सांभाळत बसू का, मुलांचे संस्कार वर्ग घेऊ, शिक्षण वर्ग घेऊ  का स्वत:च काही शिकू? अशा अनंत प्रश्नांनी डोक्यात फेर धरला होता. नातेवाईक, शेजारी, मित्र-मैत्रिणींनी दिलेल्या सल्लय़ावर विचार करण्यात बरेच दिवस गेले. वेगवेगळ्या संस्थांना भेटी दिल्या, त्यांच्या कामाची माहिती करून, काही आवडणारे करायला मिळते का हे तपासले. पण वेळ, शक्ती, पैसेच फक्त खर्च झाले. निष्पन्न काहीही झाले नाही.
शोभा एकदा बसच्या थांब्यावर उभी होती, एक बस आली. जवळच उभ्या असलेल्या गृहस्थांनी विचारले, ‘बस कोणती आहे? कुठे जाते?’ तिने त्यांना बसची माहिती दिली आणि विचारले, ‘तुम्हाला वाचता येत नाही का?’ या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आले आणि ‘आपण काय करावे?’ हा तिचा प्रश्न चुटकीसरशी सुटला.
दुसऱ्याच दिवशी जवळच्या शाळेत जाऊन तिने एक वर्ग २ तासांसाठी मिळवला. शेजारच्या वस्त्यांमधून अशिक्षित प्रौढांना लिहिण्या-वाचण्याचे महत्त्व पटवून प्रौढ शिक्षणाचा वर्ग सुरू केला. हळूहळू विद्यार्थ्यांची संख्या वाढली. बऱ्याच प्रौढांना तिने शिक्षित केले, अजूनही करते आहे.
वॉशिंग्टनला राहणाऱ्या कुटुंबातील मुलगा, ध्रूव, खूप हुशार, बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर हा पुरस्कार मिळवतो. त्याला शाळेतून विचारले गेले ‘आपल्या कंट्रीमधून रॉकेटियर क्लब सुरू होतो आहे. त्याचा सभासद होण्यासाठी ३ परीक्षा द्याव्या लागतील. उत्तम गुण मिळवणाऱ्याला सभासदत्व मिळेल. नंतर पुढील अभ्यास सुरू होईल. खूप चांगले भविष्य यातून घडेल. ध्रुवचा हा अत्यंत आवडीचा विषय होता. त्याने घरी येऊन परवानगी विचारली. आई-वडील, आजी-आजोबा यांचे एकमत होईना. खूप चर्चा, रुसवे फुगवे झाले. लहानशा मुलावर जास्त ओझे देऊ नये, असे आजोबा म्हणाले. तर त्याची आई म्हणाली, शाळेचा अभ्यास छान चालला आहे, त्यात व्यत्यय नको. वडिलांचे मत आणखी वेगळे. अशी संधी वारंवार येत नाही, अभ्यास करायचे हेच वय आहे वगैरे वगैरे.
या सर्व चर्चामध्ये वेळ जात होता. विचार करून डोकी पिकली होती. ध्रुवने संगणकावर माहिती मिळवली. रॉकेट्सचे सेंटर, प्रदर्शन पाहून आला आणि परीक्षा देऊन सभासदत्व मिळवण्याचे ठरवले. तिन्ही परीक्षा उत्तम रीतीने पास झाला तो! आज तो ६०० मुलांमधून जी ३० मुले निवडली गेली त्यांचे प्रतिनिधित्व करतो आहे. आपल्या पालकांप्रमाणे काय करावे? याविषयी निर्णय घेण्यात फार जास्त वेळ, पैसे, श्रम खर्च न केल्यामुळे त्याचे भविष्य खूप उज्ज्वल होणार आहे.

–  गीता ग्रामोपाध्ये