डॉ. तन्वी यार्दी
गेले काही दिवस अमेय जरा जास्तच अस्वस्थ होता. कामातही लक्ष लागत नव्हतं. एकटेपण छळायला लागलं होतं. सोबत कशी मिळवावी? त्याचं विचारचक्र सुरू झालं. त्यानं लॅपटॉप उघडला. ‘ऑनलाइन कंपॅनियनशिप’ असा सर्च गुगलवर टाकला. अनेक पर्याय समोर आले..
अमेयने लॅपटॉप बंद केला आणि मायक्रोवेव्हमध्ये कॉफीसाठी दूध ठेवलं. त्याची चिडचिड होत होती. कॉफी तयार केली खरी, पण एकटय़ाने बसून प्यायची इच्छा होईना. ती तशीच टाकून दार ओढून घेत तो गच्चीत गेला. आजूबाजूला दिसणाऱ्या इमारती, झाडं, पक्षी पाहू लागला. दोन पक्षी दिसले. चोचीने एकमेकांशी खेळत होते. ‘त्यांच्याकडे काहीच नाही तरी ते एकटे नाहीयेत आणि माझ्याकडे सगळं असून मी एकटा?’ त्याच्या मनात येऊन गेलं. गेले काही दिवस तो जरा जास्तच अस्वस्थ होता. कामातही लक्ष लागत नव्हतं. एकटेपण छळायला लागलं होतं. तो चटकन गच्चीतून घरी आला. कॉफी अजूनही वाफाळत होती, पण त्यानं दुर्लक्ष केलं. लॅपटॉप उघडला. ‘ऑनलाइन कंपॅनियनशिप’ असा सर्च गुगलवर टाकला. अनेक पर्याय समोर आले..
त्याला आवडेल अशी मुलगी पटकन दिसेना. फिल्टर करत-करत पंचवीस ते तीस वयोगटाची, मराठी बोलणारी, शिकलेली, तरुणी एक तास सोबत करायला येईल, असं ठरलं. पंधरा मिनिटांत ती आलीही. अमेयने दार उघडताना लांब श्वास घेतला, डोळे मिटून घेतले.
‘‘हाय मी स्नेहल. ‘ऑनलाइन कंपॅनियनशिप’ बुक केली आहे ना तुम्ही? मी एक तासासाठी आले आहे. हे माझे चार्जेस, तिने व्हॉट्स अॅप मेसेज दाखवला. ’’
‘‘हो, हो, या ना आत.. आय मीन.. ये ना स्नेहल,’’ असं म्हणत त्यानं तिला आत घेतलं.
‘‘कॉफी?’’
‘‘नो, थँक्स.’’ औपचारिक संवाद सुरू झाले. आपल्याला नेमकं काय हवंय ते अमेयला कळत नव्हतं.
‘‘कुठल्या प्रकारची कंपॅनियनशिप हवी आहे?’’ तिने थेटच विचारलं. ‘‘आपल्याकडे एक तास आहे, ५ वाजता मला पुढचा कॉल आहे.’’ तिनं कोरडेपणानं सांगून टाकलं. अमेयला कसं तरीच झालं ते ऐकून. ‘ही काय कॅबची ड्रायव्हर आहे का? पुढचा कॉल?’ जरा भानावर येत तो म्हणाला, ‘‘काही नाही, माझ्याबरोबर बाल्कनीमध्ये बस. सोबत कॉफी पिऊ. माझा दिवस कसा गेला ते विचार. मी दुपारी का जेवलो नाही ते विचार. माझ्या खांद्यावर हात ठेव. माझ्या सगळ्या अडचणी सुटतील, असा विश्वास दे मला. मला फक्त एवढंच हवंय.’’ बोलता बोलता त्याला भरून यायला लागलं.. एकटेपणा धावून आला आणि त्याला रडू कोसळलं. ‘कंपॅनियनशिप’साठी आलेली स्नेहल गोंधळली. अशी ‘सोबत’ कधी कोणी मागितली नसावी. कोणी रडताना काय करायचं असतं हे तिला ठाऊकही नव्हतं आणि या प्रकारच्या प्रशिक्षणात शिकवलेलंही नव्हतं. अशा गरजा असतात कोणाच्या तरी हे तिच्या गावीही नव्हतं कदाचित. कंपॅनियनशिपच्या पार्ट टाइम जॉबमध्येही ती अतिशय यशस्वी होती. तिला हा प्रसंग म्हणजे जणू पराभवच वाटायला लागला. तिला थांबवेना. ती जायला निघाली तसा अमेय जोरात ओरडला, ‘‘कोणी रडत असेल तर त्याला कसं समजवतात तेही तुला माहीत नाही का गं? अगं, मला रडू येतंय, माझे डोळे तरी पूस. डोक्यावरून हात फिरव माझ्या. तू माझी समजूत नाही का घालू शकत?’’
ती सरळ ‘नाही’ म्हणाली; पण तरी तिने त्याला हवं तसं करण्याचा प्रयत्न केला, पण अमेयला किळस आली. ‘शी!! काय करतोय आपण?’ तिला त्याने पैसे दिले आणि जायला सांगितलं. ‘हा काय प्रकार आहे आपल्याला न येणारा, शिकून घ्यावा लागेल. नाही तर असे क्लाएंट आपला ‘रिव्ह्य़ू’ खराब करू शकतात वेबसाइटवर’ तिच्या मनात आलं नि ती पुढचा कॉल ‘अटेंड’ करायला निघूनही गेली.
अमेय बाथरूममध्ये जाऊन शॉवरखाली उभा राहिला. मनातली घाण शरीरावर पडणाऱ्या पाण्याने घालवायचा प्रयत्न करत राहिला. आंघोळ झाल्यावर त्यानं ध्यान-नामस्मरण केलं. मन शांत झालं. ऑफिसचं काम केलं थोडा वेळ. दोन-तीन वेळा गरम-गार-गरम अशा चक्रातून फिरलेली ती कॉफी प्यायली त्यानं शेवटी. बरं वाटलं; पण अस्वस्थ वाटत राहिलंच. काही तरी हवंय आणि ते मिळत नाहीये हे जाणवत होतं. आपल्याला फक्त सोबत हवीय. मग ती कुणीही देऊ शकेल की, त्याच्या मनात आलं आणि एक कल्पना सुचली. त्या ऑनलाइन कंपॅनियनशिपवाल्यांकडे आजी-आजोबांचीही सोबत मिळत असेल का? विचार करत त्याने सर्च करायला सुरुवात केली.
आणि त्याला ते चक्क सापडलंही. एकटय़ा आजी, एकटे आजोबा, आजी-आजोबांची जोडी आणि त्यांचे दर सगळं एका साइटवर स्पष्टपणे मांडलं होतं. म्हणजे, आजीआजोबांची सोबत हवे असणारे लोक आहेत तर, म्हणून तर या वेबसाइटवर इतकं काही उपलब्ध असणार. अमेयला हायसं वाटलं.
त्याच्या आईबाबांचा घटस्फोट झाल्यानंतर ते दोघे वेगवेगळ्या घरांमध्ये राहू लागले. अमेय तसा मोठा होता, त्यांनी त्यालाही एक वेगळं घर दिलं होतं. त्यानेही कधीच आई-वडिलांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. नात्यातलं अंतरं वाढत गेली. पर्याय नसल्यामुळे तो एकटा राहू लागला आणि सर्वार्थाने एकटाच पडत गेला..
वेबसाइटवर तो आजीआजोबांची जोडी शोधू लागला. पांडुरंग आणि रुक्मिणी नावाचं एक जोडपं त्याला आवडलं. आडनाव नव्हतंच तिथे. अमेयने ते जोडपं ‘बुक’ केलं दोन तासांसाठी. आपले सख्खे आजीआजोबा आता कुठे असतील? त्याच्या मनात विचार आलाच. ते वृद्धाश्रमात राहायला गेले हे त्याला माहीत होतं, पण कुठल्या हे नव्हतं माहीत. शिवाय त्यानंतर त्यांचाही अनेक वर्ष काहीच संपर्क नव्हता.
इतक्यात बेल वाजल्याने अमेय तंद्रीतून जागा झाला. ‘आजी-आजोबा आले!’ असं म्हणत त्यानं दार उघडलं. त्यांना आत घेऊन अमेयने आधी वाकून नमस्कार केला. का कुणास ठाऊक, पण एकदम ओळखीचे वाटले ते त्याला. त्यांनीही अमेयशी खूप गप्पा मारल्या. वातावरण मोकळं होत गेलं. त्यांना बसवून अमेय कॉफी करायला लागला. ‘‘मी करू का कॉफी?’’ आजीचं ते प्रेमळ वाक्य ऐकून अमेयच्या डोळ्यांत पाणी उभं राहिलं. किती तरी दिवसांनी कुणी तरी असं प्रेमानं त्याला विचारलं होतं. डोळ्यांतल्या पाण्याला त्याने मुक्त वाट करून दिली. आजी त्याच्या जवळ जाऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, ‘‘काळजी करू नकोस बाळा. अडचणी सुटतात. आपण खंबीर राहायचं असतं.’’ अमेयनं मोकळेपणानं रडून घेतलं. त्याला खूप मोकळं वाटत होतं.. तो शांत होत गेला..
कॉफी पिताना , ‘‘आमचं काय चुकलं? आमच्याकडे सगळं असूनही आम्ही असे अधुरे, अपुरे का आहोत?’’ त्यावर ‘‘काय धरायचं आणि काय सोडायचं हेच नेमकं कळलं नाही बघ तुम्हाला,’’ असे तात्त्विक-वैचारिक संवादही सुरू झाले. वेळ संपत आली. अमेयने शेवटचा प्रश्न विचारला, ‘‘तुम्हाला वृद्धाश्रमातून असं सारखं-सारखं बाहेर पडता येतं? कसं काय परवानगी देतात?’’ उत्तर आलं, ‘‘त्यांचंही कमिशन असतं प्रत्येक कॉलमागे. तेच बुकिंगचं सगळं बघतात. कॅब बोलावतात आणि आम्हाला पाठवतात. त्यांनाही पैसे मिळतात आणि आम्हालाही!’’
‘‘मी नेहमी तुमच्यासाठी कॉल पाठवत जाईन,’’ असं म्हणत तो पटकन रोख रकमेचं पाकीट घेऊन आला आतून. वेबसाइटवर लिहिलेल्या चार्जेसपेक्षा बरेच जास्त पैसे होते त्यात. ते दोघे काही घेईनात. ‘‘पेन्शन मिळतेच की रे यांची’’ इति आजी. ‘‘आणि शिवाय या ‘ऑन कॉल’चेही बरे पैसे मिळतात.’’ अमेयने ते पाकीट त्यांना आग्रहाने घ्यायलाच लावले आणि त्यांच्या पाया पडला.
‘‘शुभम भवतु। देव तुला आनंदात ठेवो.’’ आशीर्वाद देता-देता आजीआजोबांचा फोन वाजला. एका चिमुरडीसाठी तो कॉल होता. तिच्या आई-वडिलांनी त्यांना सुट्टी असूनसुद्धा रोजच्यासारखंच तिला डे केअर सेंटरमध्ये ठेवलं होतं.. तिला बागेत फिरायला नेण्यासाठी कॉल होता. आजी-आजोबा त्या कॉलसाठी निघाले..
अमेयही बाहेर पडला. विचारांचा आणि भावनांचा गुंता सोडवायला..
ytanvi@rediffmail.com
chaturang@expressindia.com