‘‘अच्छा साब अभी अगले इतवार को आऊंगा.’’ असं म्हणत तो पेटी उचलायला लागला. पॅसेजच्या अरुंद जागेत एकटय़ाने पेटी उचलणे अवघड होते. मग मी त्याला मदत केली. जाताना दोन्ही मुलींना टाटा करून अब्दुलचाचा गेला. पापुद्य््रााची बिस्किटे खरेच छान होती. दोनच दिवसांत संपली आणि आम्ही पुढच्या रविवारची वाट पाहायला लागलो. मग अब्दुलचाचा दर रविवारी येत राहिला..

रविवार सकाळचे आठ-साडेआठ वाजले होते. नुकताच दुसरा चहा होऊन निवांतपणे दैनिकाची पुरवणी वाचत बसलो होतो. इतक्यात बेल वाजली. कोण आलं असावं बरं यावेळी, असा विचार करत दार उघडलं तर समोर अब्दुलचाचा! पांढरी टोकदार परंतु थोडी अस्ताव्यस्त वाढलेली दाढी, डोक्यावर बारीक कापलेले पांढुरके केस, मळकट सफेत लेंगा, कोपरापर्यंत हात दुमडलेला सदरा अशा नेहमीच्या परिचित वेशातला अब्दुलचाचा !

‘‘अरे, बहुत दिनोंके बाद, नही नही बहुत साल के बाद दिख रहे हो ?’’ मी काहीशा आश्चर्याने विचारले. ‘‘हाँ साब, क्या करेगा, गाव गया था, अभी वापस आया, वापिस धंदा शुरू किया; तो हमेशा की तरह बोनी करने लिये आपके घर आया!’’ अब्दुलचाचा काहीशा खिन्न स्वरात म्हणाला.

हा अब्दुलचाचा बऱ्याच वर्षांपासून, म्हणजे माझ्या दोन्ही मुली लहान होत्या तेव्हापासून जवळपास २५-२६ वर्षांपासून यायचा. तो पहिल्यांदा आला तेव्हा तसा तरुणच होता. डोक्यावर खारी बिस्किटांची ट्रंक शिगोशीग भरलेली, म्हणजे खारी बिस्किटे एकावर एक अशी रचलेली, त्याच्या बाजूला लांबुळकी नानकटाई आणि एवढा माल भरल्यामुळे ट्रंकेचे झाकण लावू न शकल्याने तिरके झालेले, झाकणाच्या कडीला प्लास्टिकची दोरी बांधून तिचे दुसरे टोक पेटीच्या कडीला बांधलेलं, त्यावर मेणकापडाचे आच्छादन अशी ती जड पेटी डोक्यावर घेऊन तीन मजले चढून आमच्या घरापर्यंत आला होता. साहजिकच तो दमला होता. वरच्या छताला लागून बिस्किटे तुटणार नाहीत याची काळजी घेत मोठय़ा कष्टाने त्याने पेटी खाली ठेवली. स्वत: गच्चीकडे जाणाऱ्या जिन्याच्या पायरीवर बसला. मेणकापडाचे आच्छादन काढले, तराजू बाजूला ठेवला. हारीने रचलेली मस्का खारी, नानकटाई दाखवत म्हणाला ‘‘साब, इतना बडा बोझ उठाके पहले आपकेही घर आया हूँ, बोनी करो.’’ असे बोलणे ही कदाचित त्याची व्यावहारिक चतुराई असावी. नुकतीच १९९२ ची दंगल होऊन गेलेली, त्या पाश्र्वभूमीवर अब्दुलचाचाचं येणं अगदी वेगळं वाटलं. हाही पोटासाठी ओझं वाहणारा, पण वेगळा, हे जाणवलं.

इतक्यात माझ्या दोन्ही लहान मुली डोकावल्या. ती पापुद्ऱ्याची बिस्किटे (हा मुलींचा खास शब्द) मी त्यांच्या करता घेतली. ‘‘अच्छा साब अभी अगले इतवार को आऊंगा.’’ असं म्हणत तो पेटी उचलायला लागला. पॅसेजच्या अरुंद जागेत एकटय़ाने पेटी उचलणे अवघड होते. मग मी त्याला मदत केली. जाताना दोन्ही मुलींना टाटा करून अब्दुलचाचा गेला.

पापुद्ऱ्याची बिस्किटे खरेच छान होती. दोनच दिवसांत संपली आणि आम्ही पुढच्या रविवारची वाट पाहायला लागलो. मग अब्दुलचाचा दर रविवारी येत राहिला. विक्रोळीच्या बेकरीतून भल्या सकाळी तो ‘माल’ भरायचा नि पहिल्यांदा आमच्याकडे यायचा. २०/२५ किलो वजन घेऊन आजूबाजूस फिरायचा. बहुतेक गिऱ्हाईके बांधलेली, त्यामुळे बिस्किटे संपायची. अनेक वष्रे अब्दुलचाचा येत राहिला. काळाच्या ओघात माझ्या मुली मोठय़ा झाल्या, शिकल्या, लग्न होऊन सासरी गेल्या. आता आम्हा दोघांना बिस्किटांचे तेवढे अप्रूप राहिले नाही. त्यामुळे बिस्किटे घेणं कमी झालं, तरी चाचा यायचा. नको म्हटलं तर म्हणायचा ‘‘अरे! साब बिस्कूट खाते खाते बिटियाँको याद करो.’’ मग म्हणायचा, ‘‘कैसी है बिटियाँ, भगवान उन्हे सुखी रखे.’’ मागील तीनचार वर्षांत तो आलाच नव्हता. आम्हीही हळूहळू त्याला विसरून गेलो. आणि आज अचानक तो आला.

जड पेटी घेऊन वर येणं शक्य नव्हतं म्हणून प्लास्टिकच्या पिशवीत बिस्किटे घेऊन आला. त्याच्या येण्याने मला आश्चर्य आणि आनंद वाटला. मी चाचाला घरात बोलावले. तो सोफ्यावर न बसता जमिनीवरच बसला. म्हणाला, ‘‘क्या बोलू साब? चार साल पहले बहुत बिमार हुआ, फिर गाव चला गया, गोरखपूर के आगे. चार साल खेतीबाडी देखी. पिछले साल बटवारा हुआ, मुझे बहुत कम जमीन मिली. गुजारा होना मुश्कील था, इसलिये यहाँ वापस आया और फिरसे धंदा शुरू किया.’’

माझ्या पत्नीने त्याला चहा दिला. दोन्ही तळव्यात कप धरून चहाचे घोट घेत घेत त्याने विचारले, ‘‘साब बिटियाँ कैसी है ? उनको मेरा आरशिवाद बोलना. (तो नेहमी आरशिवाद असंच म्हणायचा) भगवान उन्हे सुखी रखे.’’ असं म्हणत तो उठला. दरवाजाबाहेर चप्पल घालताना म्हणाला, ‘‘साब, म सबसे पहले आया था तो मनमे डर था. ऊस वखत बम्बईमे दंगाफसाद हुआ था, मेरे जैसे मुसलमानसे आप बिस्क्कीट लेंगे या नही? लेकीन आपने इन्सानियत दिखायी, भाईचारेसे व्यवहार किया, इन्सान को और क्या चाहिये? भाईचाराही तो चाहिये!’’ असे म्हणत तो चाचा गेला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत असताना मनात विचार आला, ‘‘याला जे कळते ते इतरांना कधी कळणार?’’