आजींनी सुरुवात केली, ‘‘झालं असं होतं की बसला छोटासा अपघातच झाला. थोडंफार लागलंही कित्येकांना. मला लोकांनी झाडाशी बसवल्यावर क्षणभर आपण हातीपायी धड असल्याचे जाणवून देवाचे आभार मानले. पण, पुढच्याच क्षणी  आपल्या हातातील पिशवी पडल्याचे माझ्या लक्षात आले. आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला.

सकाळी दूधवाल्याकडून दूध घेताना समोरच्या फ्लॅटमधली मैत्रीण म्हणाली, ‘‘आज पहाटे आमच्या राणी लक्ष्मीबाई मोठय़ा लढाईत विजयी होऊन आल्यात गं.. अगदी सुखरूपपणे.. अपघातातून वाचल्यात म्हण ना.. मी आत्ता काही सांगत नाही, पण तूच ये ना त्यांच्या तोंडूनच प्रत्यक्ष  ऐकायला, तुझं आटपलं की.’’ अपघात शब्द ऐकून मनात कुठेतरी खळबळ उडाली, पण तिचा काहीसा मिश्कील मूड बघून कोडय़ात पडले.

आमच्या समोरच्या आज्जींचे खरे नाव लक्ष्मीबाई साठे, पण धडाडी, पराक्रम हे गुण बहुधा लक्ष्मी या नावाला पूर्वापारच चिकटले असावेत म्हणूनच आजींची मुलेबाळे आणि सर्व गोतावळाच कौतुकमिश्रित चेष्टेने त्यांना ‘झाशीची राणी’ म्हणूनच संबोधतो. लहान वयातच वैधव्याची कुऱ्हाड कोसळल्यावरही जुजबी शिक्षण असलेल्या आजींनी कूळकायद्याच्या कटकटी, भाऊबंदकीचे तंटे सगळ्याला मोठय़ा जिद्दीने तोंड दिले होते. मुलाला उत्तम शिक्षण दिले. पुढे उच्चशिक्षित लेकाने शहरात संसार थाटल्यावर आईला गावातला पसारा आवरून आपल्या आलिशान घरात कायमचे बोलावले, पण नातवंडांना सुट्टीत गावात हक्काचे घर हवे या जिद्दीने त्या गावातच वटवृक्षासारख्या ठाम रुजून राहिल्या होत्या. त्यांच्या धडाडीचे बरेच किस्से मी आजवर त्यांच्या कुटुंबीयांकडून ऐकले होते. तेव्हा त्यांचा आज काय नवीन पराक्रम ऐकायला मिळणार या विचारात मी त्यांच्याकडे गेले.

‘‘मावशी! तुला ब्रेकिंग न्यूज कळली का आमच्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंची? तुला माहितेय का, आता आज्जीला ना आमच्या मॅनेजमेंट कॉलेजमधे डिझास्टर मॅनेजमेंटवर लेक्चर द्यायला बोलावणारेत.’’ मला पाहून आतल्या खोलीत लवंडलेल्या साठे आजी उठून बसल्या आणि ‘‘नेहा! पुरे झाला हं तुझा चहाटळपणा’’ म्हणत त्यांनी नेहाला गप्प केले.

‘‘जाऊ  दे ना आजी.. तुम्ही कशा आहात?.. अपघात कसला झाला? नक्की काय झालं?’’ मी. माझ्या प्रश्नांची जणू वाटच पाहात असल्याप्रमाणे साठे आजी घडली हकिगत सांगायला सरसावल्या.

‘‘अगं, काय सांगू तुला.. नातीच्या लग्नाला हजर राहायचंय. नातजावयाचे तोंड पाहायची माझी इच्छाशक्ती जबरी ना, म्हणून वाचले गं बाई अपघातातून. अगं, नेहाचं लग्न आता १५ दिवसांवर आलंय ना तेव्हा गावच्या घराची सगळी आवराआवर करून काल संध्याकाळच्या बसने इकडे यायला निघाले. माझे सामान तसे खूप नव्हते, पण जोखमीचे मात्र होते. रात्री नक्की काय झाले माहीत नाही, कारण मला डुलकी लागली होती. पण लोकांच्या बोलण्यातून कळले की एका वळणावर बसचे पुढचे चाक एका छोटय़ा खड्डय़ात गेले आणि रस्ता सोडून बस खाली कलंडत जात समोरच्या मोठय़ा झाडावर आपटली. ड्रायव्हर मोठा हुशार होता म्हणून फारसा अनर्थ घडला नाही. पण त्या क्षणी परिस्थिती समजेपर्यंत.. नक्की काय झालंय कळेपर्यंत गोंधळ मात्र खूप उडाला. एकतर आजूबाजूला अंधार. सगळीकडे आरडाओरडा चालू झाला. मी पुढच्याच सीटवर होते, मला म्हातारीला कुणीतरी हाताला धरून कलंडलेल्या बसमधून उतरवले आणि झाडाखाली बसवले. माझा डावा हात बहुतेक कुठेतरी आपटला होता आणि थोडे खरचटलेही होते. हे बघ..’’ आजींनी हात दाखवला. गोऱ्यापान साठे आजींचा कोपरापासून मनगटापर्यंतचा हात थोडा सुजलेला दिसत होता. ‘‘चला, जिवावरचे हातावर निभावले म्हणायचे. पण आजी मगापासून नेहा तुम्हाला काहीतरी मॅनेजमेंट गुरू वगैरे म्हणतेय त्याचे काय?’’ मी.

‘‘हां, ते सांगते ना.. तीच तर गंमत आहे. आजकाल तुम्ही काय म्हणता गं तुमच्या भाषेत ते संकटकाळी.. काय बरं?’’ ..आजी गोंधळल्या.

‘‘डिझास्टर मॅनेजमेंट’’ नेहा लॅपटॉपमधून डोकं वर न करता उत्तरली.

‘‘हं आपत्कालीन व्यवस्था’’ मी.

‘‘अगं, म्हणजे साध्या भाषेत बोलायचं तर प्रसंगावधान.’’ आजींनी सुरुवात केली, ‘‘झालं असं होतं की बसला काही महाभयंकर अपघात झाला नव्हता. पण झाडावर आदळल्याने बसची पुढची बाजू चेपली असावी. थोडंफार लागलंही कित्येकांना. पण एक एक करत बहुतेक सगळे प्रवासी बहुधा सुखरूप बाहेर पडले. पण, बस कलंडल्यामुळे काहींचे सामान बाहेर फेकले गेले होते किंवा बसमध्येच अस्ताव्यस्त पडले असावे. जे असेल ते असो.. मला लोकांनी झाडाशी बसवल्यावर क्षणभर आपण हातीपायी धड असल्याचे जाणवून देवाचे हात जोडून आभार मानले. पण, पुढच्याच क्षणी इतका वेळ छातीशी घट्ट धरून ठेवलेली आपल्या हातातील छोटी पिशवी कुठेतरी पडल्याचे माझ्या लक्षात आले. आणि तेव्हा.. मात्र माझ्या काळजाचा ठोका चुकला.  कारण, अगं, नेहाला लग्नात देण्यासाठी मी माझी घसघशीत दोन पदरी मोहनमाळ त्या पिशवीतल्या एका छोटय़ा डबीत ठेवली होती. प्रवासाला सुरुवात केल्यापासून मी ती पिशवी घट्ट धरून होते. पण या गोंधळात ती कुठे पडली या कल्पनेने घशाला कोरड पडली माझ्या.’’ ‘‘मग काय झालं आजी?’’ माझा उत्सुक प्रश्न.

‘‘ऐक तर पुढे. विचार केला, माझी पर्स, माझी पिशवी हरवलीय म्हणून ओरडले तर न जाणो कुणाच्या मनात कुठले पापी विचार येतील आणि मग कदाचित ती माझ्या कधीच हाती लागणार नाही. आजच्या भावात त्या मोहनमाळेची किंमत केवढीतरी असेल ना.. पण त्याहीपेक्षा त्याच्यामागच्या भावनेचे मोल मोठेच गं! कारण हिचे आजोबा गेल्यानंतर कधीही अंगावर न चढवलेली ती माळ इतकी वर्षे मी या नातीसाठी जपून ठेवलेली होती. आता ती हरवली असती तर त्याची टोचणी जास्तच लागली असती ना.. परिस्थितीच माणसाला मार्ग काढायला शिकवते म्हणतात. तेव्हा प्रसंगावधान राखलं आणि चक्क आजूबाजूच्या लोकांसमोर छातीवर हात चोळत जीव घाबराघुबरा झाल्याचं नाटक केलं. माझी तगमग पाहून म्हणजे खरी वाटून हं, लोकांना या म्हातारीच्या जिवाचे या क्षणी काही बरंवाईट होतंय की काय याची काळजी वाटली. कुणी मला तिथेच आडवे करू लागले, कुणी पाणी देऊ  केले, कुणी पेपरने वारा घालू लागले. तेव्हा सर्वाना हाताने थोपवत थोडय़ा घाबऱ्या आवाजात माझी पिशवी कुठेतरी पडलीय ती आणा. त्यात माझी औषधे आहेत, त्यातली माझी नेहमीची गोळी घेतल्याने बरे वाटेल असे सांगून पिशवीचं वर्णन केलं. दोघाचौघांनी शोधाशोध केल्यावर माझ्या सीटखालीच ती पिशवी त्यांना सापडली म्हणे. तश्शीच्या तश्शी घेऊन ते माझ्या पुढय़ात हजर झाले. मी हलकेच हात घालून ती डबी चाचपली आतला मुद्देमाल शाबूत असल्याचे लक्षात आल्यावर जीव भांडय़ात पडला. पण लगेच तसे न दाखवता पिशवीतच ठेवलेल्या औषधांच्या डब्यातील एक गोळी गिळली. साधी शक्तीचीच होती गं ती, बाकी मला फारसे रोग आहेतच कुठे?’’ आजी हसून म्हणाल्या, ‘‘थोडय़ा वेळाने माझ्या चेहऱ्यावरची टवटवी पाहून लोकांना बिचाऱ्यांना वाटले की.. त्यांनी आणून दिलेल्या औषधाचा असर झाला आणि म्हातारी टवटवीत झाली. पण अंदरकी बात फक्त मीच जाणून होते ना?’’ म्हणत साठे आजींनी टाळीसाठी माझ्यापुढे हात केला, पण टाळी देण्याऐवजी कसोटीच्या वेळी प्रसंगावधान दाखवलेल्या आजींकडे पाहून राणी लक्ष्मीबाई झिंदाबाद, असे म्हणावेसे मला तीव्रतेने वाटले.

अलकनंदा पाध्ये

alaknanda263@yahoo.com