|| मेघना जोशी
कधी कधी मन अस्वस्थ होतं जेव्हा आपल्याला असे अनुभव येतात की आपले लाड कोणी करतच नाहीये, किंवा आपण कुणालाही आवडतच नाहीये. अशा अस्वस्थ क्षणी आपण उदास होऊन जातो त्याच वेळी असे काही क्षण आठवतात की मग जाणवतं, अरे एखादा क्षण जरी असा असला तरी असे किती तरी जणांनी आपले लाड केले आहेत, काळजी केली आहे, जे क्षण आपल्याला आनंद देऊन गेले आहेत. हे आठवतं आणि मन जागेवर येतं.
काही वेळा आपल्याला असं वाटतं की आपण कोणाला आवडतच नाही, कोणी आपले लाड करत नाही. घरात लहानमोठे पटकन आपल्या बोलण्या वागण्यावर एखादी तिखट नकारार्थी प्रतिक्रिया व्यक्त करतात, तर कामाच्या ठिकाणी सहकारी किंवा वरिष्ठ पटकन बोचरी प्रतिक्रिया देतात आणि या दोन्ही वेळी खूप वाईट वाटतं, मन अस्वस्थ होतं. पण या वाईट वाटण्याच्या क्षणीही काही क्षण असे असतात ते मनात आले किंवा मनात आणलं की मन कसं पटकन जाग्यावर येतं. अस्वस्थ मन उभारी घेतं..
मला आठवतात असे काही क्षण..
चाळीत राहत होतो. फार श्रीमंत तर नव्हतोच. सारेच मध्यमवर्गीय. पण दर महिन्याची ७ तारीख खूप स्पेशल असायची. शेजारी राहणाऱ्या राणेकाकांचा ते एस.टी.मध्ये नोकरी करत असल्याने दर ७ तारखेला पगाराचा दिवस असायचा आणि ते त्यांचा मुलगा रवीबरोबरच मलाही खाऊ आणायचे. आमच्या बिऱ्हाडांमध्ये असणाऱ्या मोकळ्या जागेतून रात्री कितीही उशिरा आले तरी राणेकाका मला खाऊची पुडी द्यायचेच. हे आठवतं आणि मन जाग्यावर येतं..
मला वाटतं मी चौथी-पाचवीत असेन, मी आणि माझ्या मावसबहिणी आजोळी चाललो होतो. खचाखच भरून वाहणाऱ्या एस.टी.तून चाललेला कंटाळवाणा प्रवास. तेव्हा एस.टी.त पुढे आडवी सीट असायची. त्या सीटवर बसून आम्ही आमच्यासमोर बसलेला माणूस वाचत असलेल्या वर्तमानपत्रातील शीर्षके जशी जमतील तशी वाचत होतो. हे खूप वेळ न्याहाळून त्या माणसाने आपल्याकडलं वर्तमानपत्र आणि एक मासिक आम्हाला दिलं आणि तुम्हालाच ठेवा हे, असं म्हणत उतरूनही गेला.
हे आठवतं आणि मन जाग्यावर येतं..
शाळेत असताना आमच्या शेजारी राहणारी लाडूमावशी माझ्यासाठी गरमागरम तांदळाची भाकरी करायची आणि टम्म फुगलेली भाकरी खायचा आग्रह करायची. शेजारची विजूताई फिरणी खायला हमखास बोलवायची. हायस्कूलला असताना रात्री दुधाच्या कपात शालीताई थोडीशी साय घालायची. महाविद्यालयात जात असताना शेजारच्या ताम्हणकर वहिनी बटाटय़ाची भाजी किंवा मनगणं खास वेगळं ठेवून द्यायच्या माझ्यासाठी.
हे आठवतं आणि मन जाग्यावर येतं..
मला मुलगा झाल्यावर शेजारच्या दामले वहिनी रोज सकाळी बाळाच्या आंघोळीनंतर त्याला मस्तपैकी घट्ट गुंडाळून द्यायच्या आणि बाळ रडायला लागलं की पुराणिक वहिनींचा जीव घाबराघुबरा व्हायचा.
हे आठवतं आणि मन जाग्यावर येतं..
शाळेत कामाची खूप दगदग होती, मान वर करायला उसंत नव्हती. सकाळी साडेसातला शाळेत जाणं म्हणजे शिक्षाच वाटत होती रोजची. अशा गडबडीच्या काळात एकदा वैतागतच शाळेत पोहोचले तर एक हसऱ्या चेहऱ्याची मुलगी दारातच वाट पाहत असलेली. ‘गुड मॉर्निग’ म्हणत तिने माझं आवडतं हिरव्या चाफ्याचं फूल पुढे केलं. त्या सुवासानं तो वैतागी दिवसच सुवासिक झाला..
हे आठवतं आणि मन जाग्यावर येतं..
joshimeghana.23@gmail.com