|| उज्ज्वला रानडे

‘‘पैसे पन नकोत ताई, पोरीला कालेजला सुट्टी लागलीय. मी तिला भेटाय गेले तर तुमची अडचण हुईल. त्यापेक्षा तिलाच आठ दिवस इथे रहायला आनलं तर चालेल का ते विचारायचं होतं.’’ कमलचा हा प्रश्न अगदीच अनपेक्षित होता. नुकतीच आंघोळ झाल्याने थकवा आला होता. डोकं अगदी चालत नव्हतं. बहिणीशी बोलून काय ते ठरवू असा विचार करून, ‘‘बघू, नंतर सांगते’’ म्हणून त्यांनी संकट उद्यावर ढकललं..

video of a guy Heartwarming Answer
“बहिण का स्पेशल असते?” तरुणांनी दिले सुंदर उत्तर, प्रत्येक भावाने पाहावा हा VIDEO
Shivsena Eknath Shinde Rebel Winner Candidates List in Marathi
Shivsena Eknath Shinde Rebel Candidates Result : एकनाथ…
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
Special facilities to transport disabled voters to the polling station
नागपूरकरांनो, दिव्यांग मतदारांना ‘ही’ मोफत सेवा…
devendra fadnavis criticize uddhav thackeray for making video of bag checking
“त्यांच्या आधी माझी बॅग तपासली, केवळ भांडवल…”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र
father daughter relation
“मुलीला तिच्या आयुष्यात वडीलाइतकं कोणीच समजू शकत नाही” पाहा बापलेकीचा हृदयस्पर्शी व्हिडीओ
a brother Holding a cockroach in his hand showed fear to his sister
झुरळ हातात पकडून बहि‍णीला दाखवली भीती; तुमच्या भावाने तुमच्याबरोबर कधी असं केलं का? पाहा Viral Video

आंघोळ झाल्यावर मीनाताईंना कमलने हाताला धरून बेडरूममध्ये आणलं. केस विंचरून बुचडा बांधून दिला. एवढय़ा श्रमानेही मीनाताईंना थकवा आला. त्या बेडवर आडव्या झाल्या. एरवी नंतर कमल खोलीचे पडदे ओढून घेऊन आपल्या कामाला जात असे. पण आज ती जरा जास्तच रेंगाळल्येय हे लक्षात येऊन त्यांनी भुवया उंचावून तिला खुणेनेच काय म्हणून विचारलं. ‘‘ताई, एक विचारायचं होतं.’’ मीनाताईंचा चेहरा त्रासिक झाला. ‘‘हे बघ, आत्ता सुट्टीबिट्टी हवी असेल तर मिळणार नाही. मला पूर्ण बरं वाटेपर्यंत काम करण्याची आपली बोली आहे..’’ त्यांचं वाक्य मध्येच तोडत कमल म्हणाली, ‘‘नाई ताई सुट्टी नकोय मला.’’

‘‘मग पैसे हवे असतील तर तेही मिळणार नाहीत..’’

‘‘पैसे पन नकोत ताई, पोरीला कालेजला सुट्टी लागलीय. मी तिला भेटाय गेले तर तुमची अडचण हुईल. त्यापेक्षा तिलाच आठ दिवस इथे रहायला आनलं तर चालेल का ते विचारायचं होतं.’’ हा प्रश्न अगदीच अनपेक्षित होता. नुकतीच आंघोळ झाल्याने थकवा आला होता. डोकं अगदी चालत नव्हतं. बहिणीशी बोलून काय ते ठरवू असा विचार करून, ‘‘बघू, नंतर सांगते.’’ म्हणून त्यांनी संकट उद्यावर ढकललं आणि पायालगतचं पांघरूण अंगावर ओढलं. पण झोपेने आज असहकारच पुकारला. कमलची मुलगी राहायला आली तर काय काय त्रास होऊ शकतो यावर त्या विचार करत राहिल्या.

एक मुलगा अमेरिकेत आणि दुसरा दिल्लीत स्थिरावल्यावर आणि यजमानांचे निधन झाल्यावर गेली कित्येक वर्षे त्या या घरात एकटय़ाच राहात होत्या. त्यांना त्या एकटेपणाची हळूहळू सवय झाली होती. दुसरी व्यक्ती कधी काही कारणाने राहायला आली तर सोबत होण्याऐवजी कटकटच वाटे. चार महिन्यांपूर्वी हे अवघड आजारपण निघालं. मुलांना आपापले उद्योग सोडून इथे रहाणं शक्य नव्हतं म्हणून त्यांनी कमलला चोवीस तास कामावर ठेवलं होतं. आजारपणामुळे चिडचिडय़ा झालेल्या मीनाताईंची शुश्रूषा, जेवणखाण कमल हसतमुखाने करत होती. कमलच्या मुलीची कटकट तर होईलच, शिवाय कमल मुलीच्या तैनातीत राहून आपल्याकडे दुर्लक्ष करेल ही पण भीती होती.

दुपारी गावातली बहीण आली तेव्हा कमलला भाजी आणायला पाठवून त्यांनी बहिणीकडे विषय काढला. बहिणीचं म्हणणं पडलं, हल्ली शहरात सगळ्यांना घरात चोवीस तास राबवून घ्यायला विनापाश मध्यमवयीन बाई हवी असते. मध्यम वयापर्यंत कोणी बाई विनापाश कशी राहणार? म्हणजे त्या बिचाऱ्या परिस्थितीमुळे आपले पाश तोडूनच आपल्याकडे काम करणार ना? मग आपण पण त्याची जाणीव ठेवून जमेल तशी त्यांना मदत करायला हवी.

कमल परतल्यावर बहिणीने तिच्या मुलीची चौकशी केली. नवरा वारला तेव्हा ही मुलगी, नंदा तिचं नाव, सहा महिन्यांची होती. पोटापाण्यासाठी कमलला घराबाहेर पडावं लागलं. तेव्हा नंदाला तिने सुरुवातीला आपल्या आईकडे ठेवलं. नंतर शाळेत जायच्या वयाची झाल्यापासून नंदा कमलच्या बहिणीकडे राहात होती. ‘‘ताई, आमाला मायलेकींना एकत्र भेटायचं म्हटलं तर हक्काचं घर नाही. बहिणीची पण श्रीमंती काय वाया चालली नाय, आधीच पोरीला तिच्याकडे ठेवलंय, आणखी मी कुठे तिथं जाऊन राहू? हितं कसं घर पन मोठं आहे, रहायला मीनाताई आन् मी दोघीच तेव्हा तरुण पोरीला ठेवायला भीती पन नाही. म्हनून विचारलं हितं आनू का म्हनून. तिच्या जेवनाचे पैसे हवेतर माज्या पगारातून कापून घ्या.’’ हे ऐकल्यावर बहिणीने तिला मुलीला आणायची परवानगी परस्पर देऊन टाकली.

‘‘तू परवानगी दिलीस तिला तर आता तिचे पैसे किती कापायचे ते पण तूच सांग बाई!’’ मीनाताई म्हणाल्या. तशी बहीण अंगावरच आली. ‘‘तू तिचे पैसे कापणार ताई? अगं, तुझ्याकडे बक्कळ पैसा आहे, ज्याची तुझ्या मुलांना मुळीच गरज नाही आणि तुला ज्या सेवेची गरज आहे ती करायला मुलांपाशी सवड नाही. कमलला तुझ्या पैशांची गरज आहे आणि तुला तिच्या सेवेची. तिला कायदा न दाखवता माणुसकीने वागलीस तर ती तुझ्याशी तशीच वागेल. तिला जेवढी तुझी गरज आहे तेवढीच तुला तिची आहे हे लक्षात घे! प्रेम द्यावं आणि घ्यावं ताई!’’

अशा तऱ्हेने मीनाताईंचा विरोध असतानाही नंदाचे त्यांच्या घरी एकदिवस आगमन झाले. सतरा-अठरा वर्षांची चुणचुणीत, नीटस पोर, स्वस्तातले पण स्वच्छ, नीटनेटके कपडे घातलेली, टपोऱ्या डोळ्यांत भीती, कुतूहल, उत्सुकता असे संमिश्र भाव असलेली, बाप जन्मत:च गमावलेली आणि आई असून जवळ नसलेली नंदा पाहून कोणाही सहृदय माणसाला तिची कणव आली असती. पण मीनाताईंनी स्वत:ला बजावलं की ती तुझी प्रतिस्पर्धी आहे. तिच्याबद्दल तुला अजिबात कणव वाटता कामा नये. ती आल्यामुळे कमल कुठे कामात कुचराई करत्येय का ते त्या डोळ्यात तेल घालून बघत होत्या. पण मायलेकींनी मीनाताईंना तक्रारीला जागा ठेवली नाही. कमल काम करत असताना त्या दोघी अगदी हळूहळू बोलत. त्यांचं असं बोलणं सुरू झालं की मीनाताईंना नेमकी तहान लागे किंवा कमरेला रग लागली म्हणून कूस बदलायला कमलची मदत हवी असे. त्या कमलला हाक मारत. आता कमलने यायला वेळ लावला की तिची कशी खरडपट्टी काढायची याचा त्या विचार करणार तोच कमल लगबगीने येई. ‘‘काय हवंय ताई?’’ तिच्या आवाजातल्या मार्दवाने त्या अगदी खजील होऊन जात.

बहीण जे बोलली त्याचा प्रत्यय त्यांना चारच दिवसांत आला. एक दिवस केर भांडी करणारी मंगल आजारपणामुळे कामावर आली नाही तर ते काम नंदाने स्वत:हून अंगावर घेतलं. नुसता वरवर केर न काढता टेबल पुढे ओढून, खुच्र्या सरकवून ती केर काढायची. काम करताना सतत गोड आवाजात गुणगुणत असे. मंगलचा आजार लांबला तरी नंदाची कुरकुर नव्हती. पाचव्या दिवशी तिने स्टुलावर चढून पंखेही पुसले. त्याच्या दुसऱ्या दिवशी ती शोकेसजवळ जरा रेंगाळली म्हणून मीनाताई तिच्यावर खेकसणार तोच तिने विचारले, ‘‘आजी, या कपाटातल्या वस्तू आवरून नीट लावल्या मी तर चालतील का?’’ चार महिन्यांपूर्वीच हे काम करायचे त्यांच्या मनात आले होते. तेवढय़ात या गंभीर आजाराचे निदान झाले. मग सगळ्या तपासण्या, दोन्ही मुलांच्या फेऱ्या, शस्त्रक्रिया या सगळ्यात ते काम राहूनच गेले. त्यांनी मान हलवून तिला संमती दिली. ‘‘चालेल, उद्या करते’’ ती लगेच उत्साहाने म्हणाली.

दुसऱ्या दिवशी एखाद्या अनुभवी गृहिणीसारखं काम करून तिने कपाट आवरलं. ते करताना सतत तिची टकळी चालू होती. ‘‘आजी, हे कुणाचे फोटो? तुमच्या नातीचे? किती छान दिसते! माझ्या एवढीच आहे वाटतं!’’ किंवा ‘‘बाई गं, केवढी ही पुस्तकं! कोण वाचतं आजी ही?’’ मधेच एक पत्त्याचा कॅट दिसल्यावर तर बाईसाहेब हरखूनच गेल्या. ‘‘अय्या पत्ते! आजी, तुम्ही रमी खेळता? आपण खेळू या उद्या?’’ मीनाताईंनी हसून मान डोलावली.

मग दुपारच्या जेवणानंतर रोज रमी खेळणं सुरू झालं. कधी भेटायला आलेली मीनाताईंची बहीणही खेळात सामील व्हायची. कपाट आवरताना तिला मीनाताईंनी भरतकाम केलेला एक रुमाल सापडला होता. तसं भरतकाम मला शिकवा म्हणून तिने हट्ट केला. मग संध्याकाळी भरतकामाचे वर्ग सुरू झाले. पोरगी हुशार होती. पटापट शिकत होती. मीनाताईंच्या मनातलं बर्फ हळूहळू वितळायला लागलं. त्यांचं मन सारखी आपल्या नातीशी तिची तुलना करत राहिलं. शस्त्रक्रियेच्या वेळी दिल्लीहून मुलगा आला होता तेव्हा नातही बरोबर आली होती. तिने ना घरातल्या कामाला हात लावला, ना कधी आजीजवळ बसून तिची चौकशी केली. सतत टीव्ही किंवा मोबाइलला चिकटलेली आणि ‘‘डॅड, आय अ‍ॅम गेटिंग बोअर! आपण परत कधी जायचं?’’ हेच पालुपद लावून बसलेली. हिला एवढी समज कुठून आली असेल? कायम दुसऱ्याच्या घरी राहिल्याने?

एक दिवस भेंडय़ा खेळणं झालं. गोड आवाजात पारंपरिक ग्रामीण, मराठी, हिंदी सिनेमातली गाणी नंदा म्हणत होती. मध्येच गातागाता उठून नाचायला लागली. ‘झिंगाट’च्या गाण्यावर तर एवढी बेभान होऊन नाचली की मीनाताई आणि कमलने टाळ्या वाजवल्या. घराच्या भिंतीपण टाळ्या वाजवत आहेत असा त्यांना भास झाला. इतकं आनंदी, उत्सवी वातावरण त्या घराने खूप वर्षांत अनुभवलंच नव्हतं. त्या वातावरणाचा परिणाम मीनाताईंच्या तब्बेतीवरही झाला. नियमित तपासणीसाठी डॉक्टरकडे गेल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा तजेला पाहून डॉक्टर चकित झाले. मीनाताईंचं नंदाविषयीचं मतपरिवर्तन पाहून बहिणीनेही एक दिवस, ‘‘काय गं, ही आठच दिवस रहाणार होती ना? मग आता किती दिवस झाले’’ असं चेष्टेत विचारलं. ‘‘हवे तेवढे दिवस राहू दे गं, तिच्यामुळे माझ्या घराला घरपण येतंय, चैतन्य येतंय.’’ मीनाताई म्हणाल्या.

दीड महिना होत आला. एक दिवस कमलने सांगितलं की बहिणीच्या गावचा कोणी पाहुणा मुंबईत आला आहे आणि तो परवा रात्रीच्या गाडीने परतणार आहे. नंदाला घरापर्यंत सोबत आहे म्हणून त्याच्याबरोबर तिला पाठवण्याचे ठरले आहे. मीनाताईंना हे कळल्यापासून अगदी हूरहूर लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी नंदाच्या हातावर, ‘‘हे तुला खाऊला आणि शॉपिंगला’’ म्हणत पाचशेच्या करकरीत पाच नोटा ठेवल्या. नंदा अगदी हरखून गेली. ‘‘आजी उद्या तुम्ही आंघोळीनंतर झोपता तेव्हा आई आणि मी शॉपिंगला गेलो तर चालेल? जेवायच्या वेळेआधी येतोच.’’ मीनाताईंनी हसून मान डोलावली. त्यांना परतायला बराच उशीर झाला तरी मीनाताईंची तक्रार नव्हती. ती आली ती आनंदाने निथळत होती. आल्याबरोबर तिने सगळ्या वस्तू टेबलावर मांडल्या. तिने फक्त स्वत:साठी नाही तर सगळ्यांसाठी आठवणीने खरेदी केली होती. स्वत:साठी दोन ड्रेस घेतले होते. आईसाठी चप्पल, मावशीच्या मुलासाठी खेळ, मावशीसाठी डझनभर चमचे, कौतुकाची गोष्ट म्हणजे मीनाताई आणि त्यांच्या बहिणीसाठी रुमाल आणि मावशीकडे न्यायला खाऊ एवढं सगळं तिने त्या पैशात बसवलं होतं. ते पाहून मीनाताई गहिवरल्या. ‘‘आजी तुम्ही मला इथे रहाण्याची परवानगी दिली त्यामुळे मला काय काय मिळालं सांगू?’’ एकेक बोट मोजत नंदा सांगायला लागली, ‘‘माझी सुट्टी खूप छान गेली, मुंबईसारख्या शहरात पहिल्यांदाच यायला आणि एवढे दिवस रहायला मिळालं, आवडता ड्रेस घेता आला, सगळ्यांसाठी खरेदी करता आली, भरतकामाचे टाके शिकायला मिळाले..’’ ‘‘आणि ताई, ही सहा महिन्यांची असताना मी पोटासाठी घराबाहेर पडले, त्यानंतर आम्हा मायलेकींना पहिल्यांदाच एवढे दिवस एकत्र रहायला मिळालं.’’ नंदाचं बोलणं मध्येच तोडत डोळे टिपत कमल म्हणाली. नंदाच्या येण्यामुळे आपल्याला काय मिळालं याचा मीनाताई मनात हिशोब करत राहिल्या. नंदासारखी बोटं मोजायला गेलं तर हाताची बोटं कमीच पडतील याची त्यांना जाणीव झाली.

write2ujwala@yahoo.co.in

chaturang@expressindia.com