सतीश कुलकर्णी
ती छत्रीत येताच त्याने हलक्या हाताने तिला आपल्या जवळ ओढली. डोळे मोठ्ठे करून ‘‘हं’’ असं म्हणत तिने लटका विरोध केला खरा, पण कृती म्हणून ती त्याला आणखीनच बिलगली. रमतगमत ‘तो’ आणि ‘ती’ फिरत होते. तिचं घर यायच्या आधीच पाऊस थांबला आणि पुढे ती एकटीच भरभर चालत घरी गेली. आणि पाऊस थांबला असतानासुद्धा तो रस्त्यात छत्री उघडून उभा राहिला होता. हा होता ‘त्याचा’ आणि ‘तिचा’ पाऊस..
मे महिन्याचा शेवटचा आठवडा. एके दिवशी संध्याकाळी अचानक अंधारून आलं. सूं सूं करत वाहणारा वारा धुळीची वावटळे उंच उंच उठवू लागला. आणि विजेच्या चमचमाटात हलकासा पाऊस सुरू झाला. घरापुढील अंगणात छोटी मुलं ‘गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या’ म्हणत गोल फिरत नाचू लागली. परंतु ४-५ वर्षांचा ‘तो’ मात्र घराच्या पायरीवर मलूल होऊन बसला होता. ‘‘काय रे तुला नाही का पावसात खेळायचं.’’ असं आईनं विचारताच त्याने नकारार्थी मान हलवत तोंडाने जोरात ‘च्यक्’ केलं आणि तो आईला म्हणाला, ‘‘तूच म्हणतेस ना पाऊस आला की सुट्टी संपून शाळा सुरू होते. उद्यापासून शाळा सुरू का?’’
‘‘नाही अजून ८-१० दिवस आहेत शाळा सुरू व्हायला.’’ आईने अशी समजूत काढतच तो खूश होऊन हसत दुडक्या चालीने उडय़ा मारत पावसात खेळावयास पळाला. हा ‘त्याचा’ पाऊस होता..
त्याची शाळा सुरू झाली. थोडे पाऊस त्याने अनुभवले. आता तो शाळेत एकटा जात होता. शाळा सुटली की मित्रांसोबत मज्जा करत घरी येत होता. एके दिवशी अचानक संध्याकाळी शाळा सुटताना पाऊस सुरू झाला. रेनकोट नसल्याने डोक्यावर दप्तर धरून मित्रांसोबत भिजत भिजत रस्त्यावर साठलेलं पाणी पायाने उडवत मुद्दाम लांबच्या वाटेने घरी आला. घरी येताच दारात उभ्या असलेल्या आईच्या कमरेला त्याने घट्ट मिठी मारली आणि आई पदराने त्याचं ओलं डोकं पुसू लागताच तो तिला आणखीनच बिलगला.. हा ‘त्याचा’ पाऊस होता.
आणखीन काही पाऊस गेले. आता तो रंगीबेरंगी ठिपक्यांच्या रेनकोटातून बाहेर पडून फोल्डिंग छत्री घेऊन शाळेत जाऊ लागला होता. माध्यमिक शाळा, मुला-मुलींचा एकत्र वर्ग. दर तासाला विषयानुसार बदलणारे शिक्षक या वातावरणाला तो हळूहळू सरावला. वर्गातील मुलींशी दोस्ती भांडण सारं सुरू झालं. पुन्हा एकदा शाळा सुटताना पाऊस सुरू झाला. या वेळी मात्र ‘त्याच्या’कडे छत्री होती, पण ‘तिच्या’कडे नेमकी नव्हती. त्याने धीर करून तिला घरी सोडू का तुला, असं विचारलं. ती होकार देताना का लाजली हे त्याला कळलं नाही. एकाच छत्रीतून घरी जाताना ते दोघेही अर्धे भिजत होते. एरवी वर्गात एकमेकांसोबत बोलणाऱ्या त्या दोघांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. दोघांच्याही घशाला कोरड पडली होती. एकमेकांच्या मध्ये अंतर ठेवण्याची कसरत करत ते दोघे चालत होते. घर यायच्या आधीच थोडय़ा अंतरावर ती त्याच्या छत्रीतून बाहेर पडली आणि काहीही न बोलता घराच्या दिशेने ती हलकेच धावत गेली आणि तो मुग्धपणे पुढचा रस्ता चालू लागला. हा होता ‘त्याचा आणि तिचा’ पाऊस..
असाच पाऊस पडत होता. त्याचं आणि तिचं महाविद्यालयीन रंगीत जीवन सुरू झालं होतं. एकदा कॉलेज सुटलं आणि त्याला आणि तिला हवाहवासा वाटणारा पाऊस पडू लागला. या वेळी तिने स्वत:हून छत्री पर्समध्ये कोंबली आणि तिने एक अर्थपूर्ण कटाक्ष त्याच्याकडे टाकला. दोघेही अर्थात एकाच छत्रीतून कॉलेजच्या बाहेर पडले. या वेळी मात्र ती छत्रीत येताच त्याने हलक्या हाताने तिला आपल्या जवळ ओढली. डोळे मोठ्ठे करून ‘‘हं’’ असं म्हणत तिने लटका विरोध केला खरा, पण कृती म्हणून ती त्याला आणखीनच बिलगली. रमतगमत ‘तो’ आणि ‘ती’ फिरत होते. तिचं घर यायच्या आधीच पाऊस थांबला आणि पुढे ती एकटीच भरभर चालत घरी गेली. आणि पाऊस थांबला असतानासुद्धा तो रस्त्यात छत्री उघडून उभा राहिला होता. हा होता ‘त्याचा’ आणि ‘तिचा’ पाऊस.
यथावकाश आणखी काही पावसाळे गेले. योगायोगानं तो आणि ती एकाच ऑफिसमध्ये नोकरीस लागली. एका संध्याकाळी खूप जोरात पाऊस सुरू झाला. रस्तोरस्ती पाणीच पाणी. घरी कसं जायचं या कल्पनेनं भेदरलेल्या तिला त्याने आश्वासक आधार दिला. जबाबदारी घेऊन त्याने तिला सुखरूप घरापर्यंत सोडलं. एका आत्मिक समाधानानं तिच्याकडे पाहत तो मागे वळत असतानाच तिने त्याच्या हाताला धरलं आणि घरी येण्याची विनंती करू लागली. घरी जाताच तिने त्याची ओळख आई वडिलांशी करून दिली. तिला सुखरूप घरी पोहोचवल्याबद्दल त्यांनी त्याचे आभार मानले. तो घरी परत जात असताना पुन्हा सुरू झालेला पाऊस त्याची हुरहुर वाढवत होता. आजचा पाऊस ‘त्याला’ आणि ‘तिला’ वेगळंच समाधान देणारा होता.
पुढच्या पावसाळ्याच्या आधीच दोघांच्याही घरून त्यांना एकाच छत्रीखाली वावरण्याला मान्यता मिळाली आणि ‘तो व ती’ ‘श्री आणि सौ’ झाले. हॉटेलातील मधुचंद्राची उष्ण आणि सुगंधी रात्र सरत असतानाच सकाळीच त्या दोघांचा मित्र पाऊस सुरू झाला. हातातले कॉफीचे मग टेबलवर ठेऊन दोघेही हॉटेलच्या हिरवळीवर पावसात भिजायला पळाले. एकमेकांना बिलगत, लिपटत तो आणि ती स्वैरपणे फिरले. हॉटेलात आल्यावर तिने आपले केस मोकळे सोडले आणि टॉवेलने ती ते पुसू लागली आणि तो तिच्याकडे पाहताच राहिला. आणि पुन्हा एकदा वातावरण उष्ण, सुगंधी झालं. हा होता नवपरिणीत ‘तो आणि ती’ यांचा पाऊस..
‘‘अहो न विसरता छत्री घेऊन जा. भिजत याल आणि सर्दी होईल आणि मग ऑफिस बुडेल दोन दिवस.’’ ऑफिसला जात असलेल्या त्याला ती बजावत असते. (त्यांची मुलंसुद्धा रंगबिरंगी रेनकोटातून विंडचीटपर्यंत पोहोचलेली असतात. त्यांचा स्वत:चा एक पाऊस सुरू झालेला असतो.)छत्री असूनसुद्धा बेफाट पावसाने तो भिजून घरी येतो. आईच्या मायेने ती त्याचं डोकं पुसते. तो डोळे मिटून तसाच पडून राहतो. आजचा पाऊस दोघांना प्रगल्भ करणारा असतो.
‘‘आई-बाबा पावसापाण्याचं घराबाहेर पडू नका. बाल्कनीत बसून पावसाची मजा बघा. गळ्याभोवती मफलर गुंडाळा म्हणजे सर्दी होणार नाही..’’ ऑफिसला चाललेल्या सून आणि मुलाचं त्याला आणि तिला सूचना देणं.. तो आणि ती दुपारी बाल्कनीत बसून कॉफी पित असताना पाऊस सुरू होतो. दोघे एकमेकांकडे पाहतात, गळ्याभोवतालचं मफलरचं ओझं काढून फेकून देतात आणि कोण काय म्हणेल यांची पर्वा न करता बिल्डिंगच्या खाली असणाऱ्या बागेत मूकपणे परंतु मनमुराद भिजतात. पाऊसही त्यांच्या कृतीला दाद देत आणखीनच जोरात कोसळू लागतो..
‘तो’ आणि ‘ती’ याचं जीवन समृद्ध करून पाऊस आता थांबलेला असतो..
satishbk1410@gmail.com
chaturang@expressindia.com