उन्हाळ्याची सुट्टी लागली आणि माझा नातू, मुलाचा मुलगा सुट्टीत आमच्याकडे राहायला आला. दोन दिवस झाल्यावर त्याने मला मी दिलेल्या ‘प्रॉमिस’ची आठवण करून दिली. अगदी सकाळी उठल्यापासून तसा हट्टच त्याने धरला होता. मे महिन्याच्या सुट्टीत मी त्याला क्रिकेटचे पूर्ण कीट, म्हणजे बॅट, बॉल, स्टंप आणि बाकी जे लागते ते सर्व साहित्य घेऊन देण्याचे कबूल केले होते. मामला थोडा खर्चीकच होता, महिनाअखेर होती, त्यामुळे  नंतर आणू म्हणून समजावण्याचा प्रयत्न करत होतो. माझे पेन्शन आल्यावर घ्यावे असा माझा विचार होता. त्याला माझे म्हणणे अजिबात मान्य नव्हते.  तशी भुणभुण माझ्या आणि आजीच्या मागे त्याने लावली होती, मी थोडा चिडलो होतो. मनात त्याचा राग येत होता. इतका देखील समंजसपणा त्याने दाखवू नये म्हणून वाईट वाटत होते आणि रागपण येत होता. मी, का नाही म्हणतो आहे, याचा बरोबर अंदाज माझ्या बायकोला आला होता. तिने गपचूप मला एका बाजूला घेऊन सांगितले, तुम्ही त्याच्याशी आता वाद घालू नका. त्याचे वय या सर्व गोष्टी समजण्याच्या पलीकडचे आहे. तेव्हा माझ्याकडचे पैसे घेऊन जा आणि तो काय म्हणतोय ते त्याला आणून द्या, तिने माझ्या हातात गुपचूप दोन हजारची रक्कम ठेवली. मी थोडा घुश्शातच त्याला घेऊन भर दुपारचा रणरणत्या उन्हात बाजारात गेलो. दुकानातून त्याला हवे ते क्रिकेटचे सामान घेतले आणि  निघालो. बरेचसे समान माझ्याकडे घेऊन त्याचा एक हात हातात धरून चालू लागलो. चालता चालता मला तो खूप काही सांगत होता. त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. मी त्याच्या त्या रूपाकडे पाहात पुढे जात असताना, माझ्या हातातून एक अनामिक प्रवाह त्याच्या हातात जात असून, तो आणि मी वेगळे नव्हतोच, असा भास होऊ लागला.

मी एकदम साठ-पासष्ट वर्षे मागे कसा गेलो ते माझे मलाच कळले नाही. आमच्या चाळीत, आमच्या शेजारी राहणाऱ्या दिलीपने, जो माझ्याच वर्गात चौथीत होता. जत्रेतून मोठी लाकडी एसटीची बसगाडी आणली होती आणि तो ती गॅलरीत या टोकापासून त्या टोकापर्यंत दोरी लावून फिरवत होता. त्या एसटीचा कंडक्टर होऊन रुबाबात इकडून तिकडे जात होता. तो त्याची एसटी दाखवून मला खिजवतोय असे वाटत होते. ती एसटी माझ्या मनात भरली होती. तशीच बस मला हवी म्हणून मी आई-बाबांजवळ हट्ट धरला होता. माझे वडील, दोन दिवसांनी जत्रेला जाऊ  आणि याच्यापेक्षा मोठी बस तुला आणू म्हणून समजावत होते, पण मी मात्र ‘आजच्या आजच’चा धोशा लावला होता. घरात आलेल्या पाहुण्यांसमोर चक्क रडून खाली लोळण घेतली होती. मग काय झाले कोणास ठाऊक, आई आणि बाबांचे काय बोलणे झाले कळले नाही. ते कळण्याइतका मी मोठा नव्हतोच. आईने मिसळण्याच्या डब्यातले पाच रुपये काढून बाबांच्या हाती ठेवले. मी आणि बाबा असेच भर दुपारी रणरणत्या उन्हात जत्रेत गेलो आणि तशी लाकडी एसटीची मोठी बस घेऊन आलो आणि दिलीपच्या पाठोपाठ माझी रत्नागिरी एसटी घेऊन गॅलरीत आनंदाने धावू लागलो. ते सगळं आठवत मी रस्त्याने चाललो होतो. चालता चालता, नातवाने वर माझ्याकडे बघत मला विचारले, ‘‘आजोबा, तुमच्या लहानपणी क्रिकेट होतं का हो?’’ त्याच्या प्रश्नाने मी एकदम भानावर आलो. मी म्हटलं होतं रे आणि एसटीची बसपण होती. माझे बोलणे ऐकून तो बुचकळ्यात पडला. मला म्हणाला, ‘‘क्रिकेट आणि एसटी काय संबंध?’’ मी म्हटलं, ‘‘तुला नाही कळणार.’’ माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या, त्यातून त्याच्याकडे पाहिले आणि मीच माझा हात धरून चाललोय असे वाटू लागले. तो आणि मी वेगवेगळे नव्हतोच. मी डोळे पुसायला रुमाल काढला, आणि परत खिशात तसाच ठेवून दिला. माझ्या डोळ्यांतील पाणी मला तसेच ठेवायचे होते. कारण त्या डोळ्यांतील पाण्याने मला वेगळीच अनुभूती दिली होती. मलाच मी आज  परत सापडलो होतो.

मोहन गद्रे

gadrekaka@gmail.com

chaturang@expressindia.com