उन्हाळ्याची सुट्टी लागली आणि माझा नातू, मुलाचा मुलगा सुट्टीत आमच्याकडे राहायला आला. दोन दिवस झाल्यावर त्याने मला मी दिलेल्या ‘प्रॉमिस’ची आठवण करून दिली. अगदी सकाळी उठल्यापासून तसा हट्टच त्याने धरला होता. मे महिन्याच्या सुट्टीत मी त्याला क्रिकेटचे पूर्ण कीट, म्हणजे बॅट, बॉल, स्टंप आणि बाकी जे लागते ते सर्व साहित्य घेऊन देण्याचे कबूल केले होते. मामला थोडा खर्चीकच होता, महिनाअखेर होती, त्यामुळे नंतर आणू म्हणून समजावण्याचा प्रयत्न करत होतो. माझे पेन्शन आल्यावर घ्यावे असा माझा विचार होता. त्याला माझे म्हणणे अजिबात मान्य नव्हते. तशी भुणभुण माझ्या आणि आजीच्या मागे त्याने लावली होती, मी थोडा चिडलो होतो. मनात त्याचा राग येत होता. इतका देखील समंजसपणा त्याने दाखवू नये म्हणून वाईट वाटत होते आणि रागपण येत होता. मी, का नाही म्हणतो आहे, याचा बरोबर अंदाज माझ्या बायकोला आला होता. तिने गपचूप मला एका बाजूला घेऊन सांगितले, तुम्ही त्याच्याशी आता वाद घालू नका. त्याचे वय या सर्व गोष्टी समजण्याच्या पलीकडचे आहे. तेव्हा माझ्याकडचे पैसे घेऊन जा आणि तो काय म्हणतोय ते त्याला आणून द्या, तिने माझ्या हातात गुपचूप दोन हजारची रक्कम ठेवली. मी थोडा घुश्शातच त्याला घेऊन भर दुपारचा रणरणत्या उन्हात बाजारात गेलो. दुकानातून त्याला हवे ते क्रिकेटचे सामान घेतले आणि निघालो. बरेचसे समान माझ्याकडे घेऊन त्याचा एक हात हातात धरून चालू लागलो. चालता चालता मला तो खूप काही सांगत होता. त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. मी त्याच्या त्या रूपाकडे पाहात पुढे जात असताना, माझ्या हातातून एक अनामिक प्रवाह त्याच्या हातात जात असून, तो आणि मी वेगळे नव्हतोच, असा भास होऊ लागला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा