गाडी घेऊन बाहेर पडलो की गाडी पार्क करायला जागा मिळेल का? हे प्रश्नचिन्ह आपल्या सगळ्यांच्याच समोर असते. गाडय़ांची वाढती संख्या हे एक मोठे कारण आहेच आणि त्याच्या भरीला मोठय़ा गाडय़ा घेण्याचं वेड हेही  तेवढेच मोठे कारण असावे. पाहिजे तिथे जायला रिक्षा न मिळणे, प्रवासी वाहने, मोठी वाहने ही कारणे तर आहेतच पण आपल्या सगळ्यांमध्ये जोमाने फोफावणारे बेशिस्तीचे रोपटे हे सगळ्यात मोठे कारण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पब्लिक ट्रान्सपोर्ट, अर्थात सार्वजनिक वाहतूक का सुधारत नाही? किंवा पाहिजे तिथे जायला रिक्षा का तयार होत नाहीत? किंवा मोठय़ा आणि परदेशी गाडय़ा घेण्याचा हव्यास आपण का करतो? किंवा आपण कायदेकानू का पाळत नाही? आपल्या इथे हे प्रश्न अजिबात महत्त्वाचे का ठरत नाहीत, हे कधीही न सुटणारे प्रश्न आहेत.

या सगळ्यांमुळे आपणच प्रदूषण वाढवत आहोत, आपणच वाहतूक जीवघेणी करत आहोत आणि आपणच पार्किंगची समस्या वाढवत आहोत. प्रदूषण आणि जीवघेणी वाहतूक हे कलियुग संपवण्याकरता येणाऱ्या ‘कल्की’ या शेवटच्या अवताराच्या असंख्य हातांपैकी दोन हात आहेत हे नक्की. आता राहिला विषय पार्किंगचा. या अडचणीवर मात्र हुशार मंडळी मार्ग काढत आहेत.

आपण गाडी घेऊन बाहेर पडलो की पार्किंगला जागा मिळेल का? या प्रश्नाच्या जोडीला हेपण प्रश्नचिन्ह असते, की पार्किंगला जागा मिळाली, तर नंतर गाडी बाहेर काढता येईल का?  दुचाकीवाल्यांचा पार्किंगचा अनुभव साधारण असा असतो – आपण गाडी घेऊन बँकेजवळ, दुकानाजवळ किंवा हॉटेलजवळ थांबतो. गाडी लावायला कुठेच जागा नसते. पुढे जावे का? असा विचार करत असतो आणि कुणीतरी त्याची गाडी काढताना दिसतो. आपण लगेच आपली गाडी आत घुसवतो आणि कामाला जातो. कधी कधी जागाच मिळत नाही, मग लांब कुठेतरी गल्लीबोळात जाऊन गाडी लावावी लागते. काम झाल्यावर आपण गाडीजवळ येतो आणि आपली गाडी आजूबाजूच्या गाडय़ांमध्ये अशी अडलेली असते की तिरपे-तारपे होऊन कसरत करत गाडी बाहेर काढवी लागते. कधी कधी आपल्या गाडीच्या मागे बाइक आडवी लावलेली असते. अशा वेळेस थांबणे किंवा कसरत करणे हाच पर्याय असतो.

चार चाकी गाडीला सहसा पाहिजे तिथे पार्किंग मिळतच नाही. पार्किंग मिळालंच तर समांतर पार्किंगमधून गाडी काढणे मुश्कील असते. मागची गाडी एकदम जवळ असते आणि समोर खेटून बाइक उभ्या असतात. यावर लोक काय डोकं चालवतील हे आपल्या कल्पनेच्या नक्कीच बाहेरचे आहे. गेल्या सोमवारी आम्ही नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला बाहेर पडलो. रस्त्यात शंकराचे मंदिर आहे. शंकर देव फक्त सोमवारीच पावतात, असा आपला समज असल्यामुळे इतर दिवशी शुकशुकाट असणाऱ्या या मंदिरात त्या दिवशी झुंबड होती. अशा ठिकाणी दुचाकीपेक्षा चार चाकीवाले जास्त असतात. या रस्त्यावर समांतर पार्किंगची सोय आहे. एका गाडीचा मागचा भाग मला एकदमच वेगळा वाटला. कारच्या मागच्या बंपरच्या मागे साधारण ३ फूट लांब स्टँड होता आणि त्याला कुलूप होते. मी जरा वेळ बघत थांबलो की हा काय प्रकार आहे? मग लक्षात आले की मागच्या गाडीला पार्क करताना तेवढे ३ फूट अंतर सोडावेच लागते. तेवढय़ात गाडीचे मालक आलेच. त्यांनी आल्या आल्या कुलूप काढले आणि स्टँड गाडीच्या मागच्या भागावर फोल्ड करून ठेवला. मी त्यांच्या कल्पनेबद्दल त्यांचे अभिनंदन केले. स्टँड वजनाला एकदम हलका होता. मी स्टँड फोल्ड – अनफोल्ड करून बघितला. मालक गाडीत बसले. स्टँडमुळे मागे मोकळी जागा होतीच. त्यांनी गाडी मागे घेतली आणि आरामात बाहेर काढली. काही कारच्या मागे सायकल अडकवलेली असते त्यावरूनच ही कल्पना मालकांना सुचली होती. अडचण आपली मानली तर त्यावर मातही करता येतेच याची प्रचीती आली. अर्थात हा अगदी छोटा फोल्ड होता त्यामुळे फार जागा व्यापणारा नव्हता, अन्यथा..

दुचाकीकरता अशीच पण ‘लय भारी’ कल्पना परवाच बघण्यात आली. दोन दिवसांपूर्वी पुण्यातल्याच लक्ष्मी रोडच्या बाजूच्या रस्त्यावर काही कामासाठी गेलो होतो. फुटपाथच्या बाजूला अगदी एकमेकांना चिकटून भरपूर दुचाकी उभ्या होत्या. काहींनी फुटपाथवर पण गाडय़ा लावल्या होत्या. लोकांची गाडय़ा लावण्याची आणि गाडय़ा काढण्याची कसरत दिसत होती. वयस्कर स्त्री-पुरुषांची दमछाकपण दिसत होती. या सगळ्या सीनमध्ये एक स्कूटी मात्र लक्ष वेधून घेत होती. गाडीच्या दोन्ही बाजूला वीत-वीत मोकळी जागा होती, गाडीच्या मागे कुणी गाडी लावली नव्हती. आणि गाडीच्या सीटवर एक शिकारी कुत्र्यासारखे कुत्रे आरामात बसले होते. सीटवरच बाजूला एक चारही बाजूंनी वाचता येईल असा बोर्ड ठेवला होता. बोर्ड वाचायला जवळ गेलो, पण कुत्रे शांत होते. बोर्डवरचा मजकूर असा होता – ‘तुमची गाडी या स्कूटरच्या दोन्ही बाजूला वीतभर तरी अंतर सोडून उभी करा. जास्त जवळ गाडी लावलेले टॉमीला आवडत नाही. या गाडीच्या मागे गाडी उभी केलेलीपण याला आवडत नाही. अशा वेळेस तो काय करतो हे अनुभवच सांगू शकेल. असा अनुभव घेणे महागातही पडू शकेल. टॉमी भाडय़ाने आणला आहे त्यामुळे याला रॅबीजचे इंजेक्शन दिलेले आहे की नाही हे माहीत नाही. हॅपी पार्किंग.’

मी विचार केला की गाडीच्या मालकाला भेटून आणखी माहिती काढायला पाहिजे. तेवढय़ात एक मोठी बाइक आली आणि या स्कूटीच्या मागे उभी राहिली. कुत्रं शांत होतं. आपलाच रस्ता आहे या थाटात, आहे तिथेच पार्क करण्याकरता त्याने साइड स्टँड बाहेर काढला आणि उतरण्याची पोझ घेतली. टॉमीचं डोकं सटकलं आणि त्याने भुंकण्याचं अस्त्र बाहेर काढलं. सटारणे हा काय प्रकार आहे ते बघायला मिळाले. तो माणूस बाइकचा साइड स्टँड वर न करताच पळता झाला. तेवढय़ात एक मॅडम आल्या. त्यांना बघताच टॉमी सीटवरून खाली उतरला. संधी साधून मी मॅड्मशी संवाद साधला. ‘‘मॅडम, तुमची टॉमीची कल्पना नुसतीच भारी नाही तर लय भारी आहे. भाडय़ाने टॉमी हा काय प्रकार आहे?’’ मॅडम म्हणाल्या, २० रुपये तास या किमतीवर याला आणले आहे. आमच्या भागात कुत्र्यांचे डे-केअर सेंटर आहे. एक बाई चालवतात. लोक गावाला जाताना त्यांची कुत्री त्यांच्याकडे सोडून जातात आणि दिवसभर राहण्याकरताही कुत्री असतात. त्या बाई उत्तम ट्रेनर आहेत. कुत्र्यांना ठेवून घेणं आणि आवश्यक ते प्रशिक्षण देणं अशी कामं त्या करतात. ‘नो द सोसायटी अ‍ॅण्ड ह्य़ुमन बीइंग्ज अ‍ॅट लार्ज’ या प्रशिक्षण शीर्षकाखाली त्या कुत्र्यांना अनोळखी माणसांबरोबर नाममात्र भाडं आकारून बाहेर पाठवतात. आम्हाला गळ्यात हा टॅग लावावा लागतो, ज्याला हा टॉमी ओळखतो. टॉमीमुळे पार्किंगमधून गाडी बाहेर काढणे एकदम सोपे झाले आहे. आता जाताना हा समोर पायाशी उभा राहतो. बाइक असेल तर तो मागच्या सीटबर बसतो किंवा मागे बसणाऱ्याच्या मांडीवर बसतो.

टॉमीला बाय करत निरोप घेतला. पुण्यात कुत्री पाळणाऱ्यांची संख्या वाढते आहे – त्या पटीत कुत्र्यांची डे-केअर सेंटरपण वाढतील – आणि पार्किंगची समस्या थोडी हलकी करायला लवकरच प्रत्येकाच्याच दुचाकीवर भाडय़ाचे टॉमी/ जिमी/ मोती दिसायला लागेल. पण हा मार्ग किती सोयीचा किती गैरसोयीचा हे ज्याचं त्यानं ठरवावं.

सुधीर करंदीकर

srkarandikar@gmail.com