मी लिहितो याचं तिला कौतुक होतं. मला एखादा पुरस्कार मिळाला की, माझ्यापेक्षा तिलाच जास्त आनंद व्हायचा. आपण दिलेल्या सवलतीचं चीज झाल्यासारखं वाटायचं. डोकेदुखीचा त्रास असला तरी ती कधी त्रासलेली वैतागलेली दिसली नाही. जेव्हा तिच्या मृत्यूदाखल्यात मेंदूशी संबंधित आजाराचा उल्लेख मी वाचला तेव्हा तिची डोकेदुखी तिने किंवा मीसुद्धा गांभीर्याने घेतली नाही याचं वाईट वाटलं.’’ उद्याच्या जागतिक कुटुंब दिनानिमित्ताने एका पतीने जागवलेल्या पत्नीच्या आठवणी..
माझी पत्नी गेली त्याला आता साडेनऊ वर्षे झाली. गेली तेव्हा ती चोपन्न वर्षांची होती आणि मी छप्पन्न वर्षांचा. चोपन्न हे काही जायचं वय नव्हे. पण अल्पशा आजराने ती गेली. अहेव मरण यावं, अशी तिची इच्छा होती. पण त्यासाठी जायची एवढी घाई करायचं कारण नव्हतं. माझी तब्ब्येत उत्तम होती.
ती गृहिणी होती. मला मिळणाऱ्या पगारात तीस वर्षे तिने उत्तम संसार केला. सगळ्या प्रापंचिक जबाबदाऱ्या तिनेच पार पाडल्या. मी लेखक असल्यामुळे कुटुंबाच्या जबाबदारीपासून तिने मला लांब ठेवलं होतं. मी थोडा आळशी होतो तसंच जबाबदाऱ्या टाळण्याकडे माझा कल असायचा. त्याबाबतीत माझं लिहिणं माझ्या पत्थ्यावरच पडलं होतं. मी लिहितो याचं तिला कौतुक होतं. मला एखादा पुरस्कार मिळाला की, माझ्यापेक्षा तिलाच जास्त आनंद व्हायचा. आपण दिलेल्या सवलतीचं चीज झाल्यासारखं वाटायचं. माझी आजवर पंचवीस पुस्तकं प्रकाशित झाली. अनेक पुरस्कार मिळाले, हे सगळं तिच्या सहकार्यामुळेच.
मी गंभीर प्रकृतीचा आणि थोडासा अबोल तर ती हसतमुख, बडबडी आणि मिश्कील स्वभावाची होती. पन्नाशी उलटली तरी तिच्यातला अवखळपणा कमी झाला नव्हता. खुषीत असली की मला ‘काय लेखक?’ किंवा ‘काय प्रभाकर’ अशी हाक मारायची. अधूनमधून ती मला, ‘तुम्हाला ‘प्रभाकर’ म्हणू का हो?’ असं विचारायची मी ‘चालेल’ म्हणून सांगायचो. पण ते विसरून शेवटी ती ‘अहो’वरच यायची. घरात वावरताना जाता-येता ती मला टपली मारायची आणि पुढे जाऊन माझी प्रतिक्रिया आजमवायची. कधी खटका उडाला की अबोला निर्माण व्हायचा. तिला आपली चूक कळून यायची. मग काही तरी निमित्त घेऊन ती समोर यायची आणि ओठ मुडपून हसायची. ती पांढरं निशाण दाखवतेय हे मला कळायचं, पण मी मुद्दामच ताणून धरायचो. पण मग मलासुद्धा आपली चूक होतेय हे कळायचं आणि अबोला दूर व्हायचा.
शास्त्रीय व नाटय़संगीत गाणारी एक गायिका मला खूप आवडायची. तिचा कार्यक्रम सुरू झाला की, ती मला हाक मारायची, सांगायची, ‘‘अहो, या तुमची ती आलीय.’’ ‘शुक्रतारा’ हे भावगीत मला खूप आवडायचं. कॉलेजमध्ये असताना एका मुलीबद्दल मला आकर्षण वाटलं होतं. हे गाणं लागलं की मी डोळे मिटायचो. ती मुलगी डोळ्यांसमोर यायची. आमचं छायागीत सुरू व्हायचं. हे मी हिला एका सांगितलं होतं. पुढे मी हे गाणं एका संपूर्ण टेपवर ध्वनिमुद्रित करून घेतलं होतं. त्या गाण्याची पाच सहा आवर्तनं व्हायची. कधी कधी संध्याकाळच्या वेळी मी बेडरूममध्ये ही टेप ऐकत बसायचो. ही म्हणायची, ‘‘दरवाजा बंद करून घेते. करा दोघं काय करायचंय ते.’’ काही वर्षांपासून अधूनमधून तिचं डोकं दुखायचं म्हणून झोपताना ती बामची बाटली उशाशी ठेवायची. मला बामचा वास आवडत नसे. म्हणून, ‘मला झोप लागेपर्यंत तू बाम लावू नकोस,’ असं मी तिला सांगून ठेवलं होतं. त्यावर तिने मला सांगितलं होतं, ‘‘मग तुम्हाला किंवा मला झोप लागेपर्यंत तुम्ही माझं डोकं चेपायचं.’’ मी हो म्हटलं, पण कशी कुणास ठाऊक, डोकं चेपताना आकडे मोजायची सवय मला लागली होती. चेपताना प्रत्येक दाबाबरोबर मी मनातल्या मनात अंक मोजायचो आणि शेवटचे दोन अंक म्हणजे नव्व्याण्णव, शंभर हे मोठय़ाने म्हणून चेपणकार्याची सांगता करायचो. तिला हे आवडायचं नाही. वैतागून म्हणायची, ‘‘बायकोची सेवा करताय ती मोजताय कसली!’’ असंच एकदा तिचं डोकं दुखत होतं. मी नेहमीप्रमाणे चेपण्याच्या तयारीला लागलो तेव्हा ती म्हणाली, ‘‘चेपा. पण मोजायचं नाही.’’ मी कबूल केलं आणि डोकं चेपू लागलो. डोकं चेपून मी बाजूला झालो तेव्हा ती रागाने मला म्हणाली, ‘‘शेवटी मोजलंतच ना?’’
‘‘नाही गं,’’ मी म्हणालो. ‘‘मग बरोबर शंभर झाल्यावर कसे थांबलात.’’ मी मनातल्या मनात आकडे मोजत होतोच. माझी परीक्षा पाहण्यासाठी तीसुद्धा मोजत होती हे लक्षात आल्यावर मी कबुली दिली.
डोकेदुखीचा त्रास असला तरी ती कधी त्रासलेली वैतागलेली दिसली नाही. तिच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं नाही की अवखळपणा उणावला नाही. त्यामुळे तिच्या वारंवारच्या डोकेदुखीचं गांभीर्य मला कधी कळलंच नाही. जेव्हा तिच्या मृत्युदाखल्यात मेंदूशी संबंधित आजाराचा उल्लेख मी वाचला तेव्हा तिची डोकेदुखी तिने किंवा मीसुद्धा गांभीर्याने घेतली नाही याचं वाईट वाटलं.
आम्ही कधी कधी अंधश्रद्धा, जुनाट रूढी-परंपरा याबद्दलदेखील बोलत असू. मृत्यूनंतरच्या क्रियाकर्मावर माझ्याप्रमाणेच तिचासुद्धा विश्वास नव्हता. आम्ही एकमेकांना सांगून ठेवलं होतं की, आपल्या मृत्यूनंतर अग्सिसंस्काराशिवाय कोणताही विधी केला जाऊ नये. त्याप्रमाणे ती गेल्यावर मी तिचं, दहावं, बारावं केलं नाही. पण मी ठाम विचारांचा समाजसुधारक नव्हतो. सामाजिक कारणांमुळे तिचं तेरावं मला करावं लागलं. पण तिच्या मनाविरुद्ध मी हे केलं. त्याची टोचणी मला लागून राहिली आहे.
तिच्या विषयीच्या आठवणी अधूनमधून येतच असतात. ती आता नाही, पण तिच्या आठवणी येतात हेसुद्धा काही कमी नाही. जन्मभर सोबत करण्याचं वचन तिनं पाळलं. ती पुढे गेलीय. माझी वाट पाहत असेल. मी एवढय़ावरूनच समाधान मानतो की, ती माझ्या नजरेसमोर येते, ती चोपन्न वर्षांची हसतमुख, उत्साही उतारवयाच्या खुणा नसलेली. माझी अजून किती वर्षे उरली आहेत माहीत नाही, गेल्यावर मी तिला आळखेन पण तिच्या डोळ्यात असलेलं माझं रूप बदललेलं असल्यामुळे ती मला ओळखेल की नाही कुणास ठाऊक! ओळख करून द्यायची वेळ आली नाही म्हणजे मिळवलं!