प्रत्येक गाडीला समोर एक आरसा बसवलेला असतो त्याला रिअर व्ह्य़ू मिरर म्हणतात. तसाच एक रिअर व्ह्य़ू प्रत्येकाच्या मनात बसवलेला असतो. ज्यावेळी आपल्याला वाटेल नवीन पिढी काही चुकीचं करत आहे त्यावेळी त्यामध्ये पाहाण्याची सवय आपण ठेवायला हवी. अशा कारणाने होणारा मनस्ताप कमी होण्याला हमखास मदत होते आणि आपला सर्वाचाच पुढचा आयुष्याचा प्रवास सुखकर होतो.

रात्रीची शतपावली करताना, सोसायटीच्या आवारात, एका भिंतीच्या कडेला, नवी कोरी चंदेरी रंगाची गाडी अंग चोरून उभी होती. बोनेटवर, लाल रंगाचं स्वतिक होतं आणि दोन रंगीत रिबिनीचा ‘व्ही’ आकार त्यावर चिकटवलेला दिसत होता. समोर जाळीला हारदेखील लटकत होता. थोडक्यात शोरूम कंडीशनमधली नवी कोरी गाडी सोसायटीत नव्याने दाखल झाली होती. घरी पोहोचलो तर दात्यांचा महेश हातात पेढय़ांचा बॉक्स घेऊन माझी वाट पाहात बसला होता. मला पाहताच उठून उभा राहिला आणि माझ्या आणि बायकोच्या पाया पडून आम्हाला पेढे देऊन त्यांनी नवीन गाडी घेतल्याची सुवार्ता आम्हाला सांगितली. मी म्हटलं, ‘‘वा, वा, गुड, छान बातमी दिलीस. अरे, तरुणपणी प्रत्येक जण स्वत:चं घर आणि चारचाकी गाडीचं स्वप्न पाहतच असतो. घराबरोबर आता तुझं गाडीचं पण स्वप्न पूर्ण झालं, अभिनंदन. आम्ही कुठे रस्त्यात दिसलो तर ओळख दाखव आणि जमलं तर लिफ्ट पण दे काय!’’ मी आपला नेहमीचा विनोद टाकला. महेश म्हणाला, ‘‘बस, काय काका, आता चला तुम्हाला फिरवून आणतो.’’ मी म्हटलं, ‘‘अरे गंमत केली. आता आमची वये तुमची स्वप्न पुरी होताना पहायची आणि आशीर्वाद द्यायची आहेत. आता बायकोला लॉग ड्राइव्हला ने आणि त्या माईंना कोकणात नेऊन आण.’’ तो हो हो म्हणत, निघून गेला.

आमच्या शंभर वर्षे जुन्या चाळीच्या ठिकाणी आता हा वीस मजल्याचा टॉवर उभा राहिला आहे. आम्ही जवळ जवळ चाळीस एक शेजारी त्या जागी उभ्या राहिलेल्या टॉवरमध्ये राहायला आलो. आम्ही सर्व या आधी जवळ जवळ पन्नास एक वर्षे एका कुटुंबासारखे चाळीत राहात होतो. एकमेकांची सर्व सुखदु:ख आम्ही एकत्र राहून अनुभवली आहेत. दाते आणि आमच्या घराचा फार पूर्वी पासूनचा घरोबा. अगदी महेशच्या जन्माआधी पासूनचा. चाळीत प्रत्येकाकडे घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगातील बारीकसारीक तपशिलासकट एकमेकांना माहिती. अगदी जोश्यांना गावच्या प्रॉपर्टीतील कितवा हिस्सा मिळाला आणि त्यांच्या बहिणींनी कसा त्यावेळी गोंधळ घातला इत्यादी इत्थंभूत माहिती आम्हा त्यांच्या शेजाऱ्यांना मुखोद्गत होती. आता मात्र नवीन इमारतीत सर्व पांगले. वेगवेगळ्या मजल्यांवर ब्लॉकमध्ये बंदिस्त झाले. तरीही अजूनही आमची सुखदु:ख एकमेकांकडे जाऊन आम्ही मोकळी करतो.

दाते दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे खाली सोसायटीत फेऱ्या मारताना भेटले. त्यांची नवी कोरी करकरीत गाडीदेखील, नुकतीच धुवून पुसून. चकाचक होऊन, पुढचे दोन्ही वायपर पुढे रोखून उभी होती. दाते मात्र तिच्या बाजूने जात होते, पण पाहिले न पाहिले असे करून. मी दातेंना म्हटलं, ‘‘अभिनंदन दाते, महेशने गाडी घेतली ना! नव्या गाडीत बसून आता गावाला जाऊन या. एसटीचे धक्के खात जाऊ  नका.’’ पण दाते मात्र मख्ख. मला थांबवून उभ्या उभ्या म्हणाले, ‘‘अभिनंदन वगैरे सगळं ठीक आहे. पण मला महेशचा हा निर्णय अजिबात पटलेला नाही.’’ तेच म्हणाले, ‘‘चला घरी चला, सांगतो.’’ मी म्हटलं, ‘‘तुमच्या घरी नको, आमच्या घरी जाऊ या.’’ कारण दातेंच्या मन:स्थितीचा अंदाज मला आला होता. त्याच्या घरी कदाचित विषयाला वेगळं वळण लागलं असतं. दाते आणि मी आमच्या घरी आलो. बायकोला म्हटलं, ‘‘दाते नव्या गाडीची पार्टी देतील तेव्हा देतील, आपण आधी आपल्याकडचा चहा देऊ. दातेंनी परत मगाचेच वाक्य उच्चारून विषयाला सुरुवात केली. ‘‘महेशाची ही खरेदी आम्हाला अजिबात पटलेली नाही.’’ आम्हाला म्हणजे त्याच्या बायकोलाही तो त्यात घेत होता, हे आम्हाला अनुभवावरून लगेच लक्षात आलं. माझी बायकोही चहाचा कप घेऊन बाहेर आमच्याबरोबर चहा प्यायला येऊन बसली. त्यांनी सांगितलेली हकिकत थोडक्यात अशी : काल महेशने एकदम गाडी आणून सर्वाना सरप्राइज दिलं होतं. तो गाडी घेणार अशी थोडी कुणकुण लागली होती. पण इतक्या लगेच तो निर्णय तडीस नेईल अशी कोणाला कल्पना नव्हती. मुळात आता गाडी घेऊच नये आणि कर्ज काढून तर अजिबात नको असेच श्री. दाते आणि सौ. दाते यांना वाटत होतं. महेश आणि त्याच्या बायकोचं कामाचं ठिकाण लक्षात घेतलं तर तसा गाडीचा उपयोग नव्हता आणि तो एक पांढरा हत्ती आहे अशी दाते आणि त्यांच्या बायकोचं ठाम मत होतं. त्यापेक्षा महेशनं नवीन घर घेताना काही थोडं फार कर्ज झालं होतं ते आधी फेडण्यासाठी प्रयत्न करावा. कर्ज न काढता चांगल्या राहणीमानाचा आनंद आयुष्यात घेता येणार नाही आणि कर्ज काढणं अजिबात गैर नाही, असं महेश आणि त्याच्या पत्नीचं मत होतं. सर्वाकडे गाडय़ा आहेत ज्यांच्याकडे आज नाहीत तेदेखील लवकरच घेणार आहेत, म्हणून आपणही त्या बाबतीत मागे राहायला नको हा नवीन पिढीचा विचार तसा आईबापाच्या पचनी पडत नाहीच. तोच प्रकार दातेंकडेही घडत होता आणि गाडी घरी आली हे कळल्यावर दाते पतीपत्नी आणि महेश आणि त्याची बायको यांच्यात थोडे नाराजीचे सूर उमटलेच. त्यावरून महेशची बायको रुष्ट झाली होती आणि यांना मुलांच्या आनंदात आनंद मानता येत नाही म्हणून निष्कर्ष काढून तिने सासू-सासऱ्यांशी कालपासून अबोला धरला होता. नव्या गाडीने आनंद आणण्याऐवजी अस्वस्थता आणली होती. माझी बायको हे सर्व शांतपणे ऐकत होती. दाते पूर्ण मोकळा झाला असं वाटल्यावर ती म्हणाली, ‘‘दातेकाका, एक सांगू का, तुम्ही म्हणता ते अजिबात चुकीचं नाही आणि खोटंदेखील नाही. पण खरं सांगू का! प्रत्येक काळातील नवीन पिढी आणि जुनी पिढी यात या प्रकारचा विचार संघर्ष अनादी आहे. चाळीच्या दोन खोल्यात आपण कितीतरी वर्षे संसार केलाच म्हणून चाळीतील जुन्या पिढीला नवीन प्रोजेक्ट पटत नव्हतेच, पण तरुणांनी चंग बांधला आणि हे प्रोजेक्ट प्रत्यक्षात उभं राहिलं. त्यावेळी काहींना थोडं कर्जदेखील झालं, पण नवीन ब्लॉकमध्ये आल्यावर या राहणीमानाचा आनंद आता आपल्याला कळू लागला आहे. हे प्रोजेक्ट होताना काही बिऱ्हाडांना त्याची आवश्यकता पटत नव्हती आज ते लोक नवीन घरात राहण्याचा आनंद घेत आहेतच ना. आता तुमच्याच घरात फार म्हणजे तीस पस्तीस वर्षांपूर्वी माझ्या समोर घडलेला प्रसंग तुम्हाला सांगते. तेव्हा तुमचे आईवडील हयात होते. तुम्ही त्यावेळी तुमच्या ऑफिसच्या सहकारी पत पेढीतून कर्ज काढून नवीन फ्रिज घेऊन आला होतात. तुमच्या आईवडिलांना ते अजिबात पटलं नव्हतं. त्यांना फ्रिजची आवश्यकताच पटत नव्हती. त्याचे कितीतरी दोष त्यांनी कथन केले होते. आजारपणाला निमंत्रण, वाढणारा वीज बिलाचा मुद्दा, अन्न शिळं करून खाण्याची सवय आणि कर्ज काढून तर असली वस्तू अजिबात नको असा त्यांचा मुद्दा होता. त्यापेक्षा त्या पैशांत डोंबिवली, कर्जत कसाऱ्याकडे एखादा प्लॉट घ्यावा त्यासाठी कर्ज काढले तर त्याचे दामदुप्पट भविष्यात वसूल होतील. पण, तरीही तुम्ही फ्रिज आणलातच. कारण तेव्हा बऱ्याच बिऱ्हाडात नव्याने फ्रिज घ्यायला लागले होते. तुमची आई तुमच्या बायकोशी काही काळ बोलत नव्हती. इतकंच काय फ्रिजमधले पदार्थ ती खायची नाही, आठवत का?

दाते काका, आता महेशने गाडी आणलीच आहे ना तर त्याच्या आनंदात विरजण घालू नका. तो सगळं निभावून नेईल. तो आणि त्याची बायको आता भरपूर कमावतात. त्यांना आधुनिक गोष्टींचा आनंद उपभोगू द्या. गाडीला एक समोर आरसा बसवलेला असतो त्याला रिअर व्ह्य़ू मिरर म्हणतात. गाडी चालवणाऱ्याने त्यात मध्ये मध्ये डोकावत मागच्या गाडय़ांचा अंदाज घेऊन गाडी चालवत राहायची असते. तसाच एक रिअर व्ह्य़ू प्रत्येकाच्या मनात बसवलेला असतो त्यात प्रत्येकाच्या आयुष्यात पूर्वी घडून गेलेल्या चांगल्या वाईट अशा महत्त्वाच्या घटना आणि प्रसंग बघता येण्याची सोय असते. ज्यावेळी आपल्याला वाटेल नवीन पिढी काही चुकीचं करत आहे त्यावेळी त्यामध्ये पाहाण्याची सवय आपण ठेवायला हवी. अशा कारणाने होणारा मनस्ताप कमी होण्याला हमखास मदत होते आणि आपला सर्वाचाच पुढचा आयुष्याचा प्रवास सुखकर होतो.’’

दाते म्हणाले, ‘‘आजचा दिवस कारणी लागला, सकाळ अगदी स्वच्छ स्वच्छ वाटतेय.’’ मग म्हणाले, ‘‘रत्नागिरी इथून किती किलोमीटर असेल हो. आता आमच्या कुलदैवताचा उत्सव जवळ आला. महेशाला सांगतो, गाडी घेऊन आधी कुलदेवतेच्या पाया पडायला चल. ही गाडी किती अ‍ॅव्हरेज देते पाहिले पाहिजे. म्हणजे अंदाजे पेट्रोल किती लागेल ते पाहतो.’’ मी आणि बायको एकदम म्हणालो, ‘‘दातेकाका त्याचा विचार महेशला करू द्या. तुम्ही फक्त गारे गार एअर कंडीशनमधून गावाला जा.’’

दाते मला टाळी देत हसत हसत उठले, ‘‘जुनी सवय जायला थोडा वेळ लागणारच, आमची आईसुद्धा नंतर नंतर पित्त झालं की फ्रिजमधलं थंडगार दूध औषध म्हणून घ्यायचीच आणि जावई आले की लिंबू सरबतात फ्रिजमधले पाणी घालून द्यायचीच.’’ दाते गेल्यावर मी बायकोला म्हटलं, ‘‘रिअर व्ह्य़ू मिररचा अँगलपण अ‍ॅडजेस्ट करावा लागतो.’’

मोहन गद्रे

gadrekaka@gmail.com