हेमा वेलणकर  velankarhema@gmail.com

‘ती’ नथ माझ्या आईने वापरलेली असल्याने आमच्यासाठी ती अनमोल आहेच, पण ती आखाती देशातली जगप्रसिद्ध ‘बसरा’ जातीच्या दुर्मीळ अस्सल मोत्याची असल्याचे समजल्यावर तर ती मौल्यवानही झाली. अशी शंभर वर्षांपूर्वीची अनमोल आणि मौल्यवान नथ आताच्या काळातही वापरायची तर चापाची करून घ्यायला हवी होती. मोठी ‘रिस्क’ घेऊन मी ती दुकानदाराला दिली खरी..

Testimony of Eknath Shinde regarding Malegaon district
दादा भुसे यांना दुप्पट मताधिक्य द्या, तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती
young woman arrested for stealing, shopping,
सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या तरुणीसह साथीदार गजाआड; पुणे, मुंबई, ठाण्यात चोरीचे गुन्हे
Gold prices at lows Big fall after Diwali
सुवर्णवार्ता… सोन्याचे दर निच्चांकीवर… दिवाळीनंतर मोठी घसरण…
Pune Burglary attempted, Sadashiv Peth Burglary,
पुणे : सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न, महिलेला धक्का देऊन चोरटा पसार
Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
aai kuthe kay karte fame Radhika Deshpande expresses her point about women bindi on forehead
स्त्रीने टिकली लावण्याविषयी ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने मांडलं परखड मत, म्हणाली, “आपण आपली संस्कृती…”

माझ्या आईच्या पश्चात इतकी वर्ष बहिणीने सांभाळलेली तिची नथ अलीकडेच फार मोठय़ा मनाने तिने मला दिली. त्याबद्दल तिचे खूप खूप आभार. मला स्वत:ला नथ घालणं खरं तर आवडत नाही, पण तरी ही आईची नथ तिने मला दिली हा मला माझा सन्मानच वाटला. त्या वेळी मला काय वाटलं ते शब्दात सांगणं कठीण आहे.

आमची आई आज हयात असती तर नव्वदीच्या पुढे असती. तिच्या लग्नात तिच्या सासूबाईंची म्हणजे माझ्या आजीची ही नथ तिला दिली गेली होती याहून अधिक नथीचा इतिहास माहीत नाही. म्हणजे ती माझ्या आजीला तिच्या आईने/ सासूबाईंनी त्यांची म्हणून दिली होती की तेव्हा ती नवीच घेतली होती वगैरे. पण तरीही साधारण शंभरहून अधिक वर्ष जुनी तरी नक्कीच असेल. माझी आई रोज काही नथ घालत नसे. पण नथ हे सौभाग्याचं लेणं आहे या भावनेने लग्न समारंभात किंवा कार्यप्रसंगी मात्र तिच्या नाकात नथ असेच असे. तसेच चैत्रगौरीच्या किंवा संक्रांतीच्या हळदीकुंकवाला, हरितालिकेच्या किंवा वटसावित्रीच्या पूजेला, गौरी गणपतींना औक्षण करून त्यांना घरात घेताना अशा प्रसंगी ती आवर्जून नथ घालत असे. दररोज घालत नसल्याने नथीची तार जरी अगदी बारीक/पातळ असली तरी ती नाकात घालताना तिच्या चेहऱ्यावर दिसणारी एक अस्पष्ट वेदना मला आजही स्पष्टपणे आठवते आहे. पण एकदा का ती नाकात गेली की ती वेदना क्षणार्धात निघून जात असे आणि तिचा चेहरा पुन्हा पहिल्यासारखा प्रसन्न होत असे. दिवाळीत अंगणात ठेवण्यासाठी पणत्यांनी भरलेलं सूप जेव्हा ती हातात घेई तेव्हा त्या पणत्यांच्या मंद प्रकाशात उजळून निघालेला नथ घातलेला तिचा चेहरा मला आजही आठवतोय. जणू काही आईची ही प्रतिमा माझ्या मनावर कायमची कोरली गेली आहे. नथीच्या टपोऱ्या मोत्यांचं तेज तिच्या चेहऱ्यावर पसरलंय हे मला त्या लहान वयातही जाणवत असे. नथीचं काम झाल्यावर इतर कामांच्या गडबडीत ती कपाटात ठेवायला जर तिला वेळ झाला नाही तर नथीची डबी ठेवण्याची तिची आवडती आणि सर्वात सेफ जागा म्हणजे तिच्या नऊवारीचं केळं! ती ते जरासं उकलून नथीची छोटीशी डबी त्यात सरकवत असे आणि केळं परत सारखं करत असे. नथीची डबी केळ्यात आहे हे कोणाला समजतही नसे. ज्या कौशल्याने ती हे करायची ते बघणं तेव्हाही मला फार आवडायचं.

ती नथ माझ्या आईने वापरलेली असल्याने आमच्यासाठी ती नथ अनमोलच आहे. कारण त्या नथीवरून हात फिरवताना, ती हातात घेऊन तिला कुरवाळताना आम्हाला जणू काही आम्ही आईलाच भेटत आहोत असं वाटतं. आणि त्यानिमित्ताने आमच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळाही मिळतो. बहिणीकडे सगळे जमलो की एखाद्या दुपारी ती नथ हातात घेऊन बघणे, जुन्या आठवणीत रमून त्यावर गप्पा मारणे हा ठरलेला कार्यक्रम असतो.

इतकी वर्ष वापरल्यामुळे तिची बांधणी आता जरा सैलावली आहे. तसेच ती चापाची नसल्याने आणि हल्ली कोणाचे नाक टोचलेलं नसल्याने इच्छा असूनही ती वापरता येत नाही. जुन्या घरावर जरी प्रेम असलं तरी त्याचंही रिनोवेशन करावंच लागतं, तेही काळाप्रमाणे बदलावंच लागतं. तसं ही नथही वापरण्यायोग्य करण्यासाठी ती चापाची करून घ्यावी या विचाराने आम्ही एका रत्नांसाठी प्रसिद्ध असलेल्या दुकानात गेलो. ती नथ पर्समधून काढून मी काउंटरवर ठेवताक्षणी तिथल्या विक्रेत्याचे डोळेच चमकले आणि आपण काहीतरी विलक्षण बघतोय असे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले. काहीतरी अनमोल चीज बघितल्याचा पहिला भर ओसरल्यावर ही नथ कशी फार मौल्यवान आहे हे त्याने आम्हाला सांगितले. कारण ती जगप्रसिद्ध ‘बसरा’ जातीच्या अस्सल मोत्याची आहे.

आता थोडं ‘बसरा’ मोत्यांबद्दल.. (अर्थात कुतूहलामुळे नेटवरून घेतलेली माहिती) आखाती देशात हे मोती नैसर्गिकपणे म्हणजे पावसाचा थेंब (आपल्याकडे ‘पडतील स्वाती तर पिकतील मोती’ अशी यथार्थ म्हण ही आहे.) शिंपल्यात पडून तयार होत असत आणि तिथल्या बसरा या शहरात त्यांचा व्यापार चालत असे. त्यावरूनच त्यांना ‘बसरा’ हे नाव मिळालं आहे. त्यावर कोणतीही कृत्रिम प्रक्रिया केली गेली नसल्यामुळे ते नैसर्गिक आणि अगदी अस्सल मानले जातात. साहाजिकच त्यांचा आकारही अगदी गोल आणि सारखा नसतो. आपल्या नैसर्गिक तेजामुळे त्यांना हिऱ्यासारखी नाही, पण स्निग्ध चांदण्यासारखी चमक मात्र प्राप्त होते. मला वाटतं म्हणूनच मोती हे चंद्राचं रत्न मानत असावेत. अलीकडच्या काळात आखाती देशात तेल विहिरी वाढल्यामुळे हे बसरा मोती तयार होणं आता बंद झालं आहे. आता बसरा जातीचे नवीन मोती बाजारात मिळणं शक्य नाही. असेच कुणाकडे असले आणि तुम्हाला मिळाले तरच! म्हणजे आता ते दुर्मीळ आणि म्हणून अधिक मौल्यवानही झाले आहेत.

अशी दुर्मीळ चीज आपल्याकडे आहे आणि ती आपल्या आईने वापरलीही आहे या भावनेने दुकानातही माझे डोळे भरून आले. दुकानातील सर्व विक्रेत्यांना अगदी बोलावून बोलावून ती नथ दाखवण्यात आली. तिची बांधणी नीट निरखून पाहण्यात आली. नथीचा प्रत्येक मोती जरी आकाराने वेगळा असला तरी कारागिराने ते असे काही चपखलपणे गुंफले आहेत की नथीचा आकार फार सुबक झाला आहे.

आईने वापरलेली म्हणून आमच्यासाठी मौल्यवान असलेली ती नथ आता भौतिक जगातही मौल्यवान झाली आहे. नॅचरली पहिली रिअ‍ॅक्शन ‘‘आहे तशीच राहू दे, कोण देणार मोती बदली होणार नाहीत याचा भरवसा, अशीच होती. त्यामुळे पुनर्बाधणीचा विचार बारगळून ती परत पर्समध्ये ठेवली गेली. दुसरी खरेदी करत असताना ही पर्समधील नथीची डबी सारखी चाचपून पाहिली जात होती. परंतु त्यामुळे विक्रेत्याचा माझ्या पर्समध्ये आणखी काही दुर्मीळ वस्तू असाव्यात असा गोड गैरसमज मात्र झाला.

घरी आल्यावर, भावनेचा पहिला आवेग ओसरल्यावर पुन्हा बुद्धीने विचार करणे सुरू झाले आणि ती जर कोणी वापरावी असे वाटत असेल तर ती चापाची करून घेण्याला पर्याय नाही हा विचार पक्का होऊन ती चापाची करण्यासाठी त्यांना दिली. त्या वेळी माझ्या

जणू काही काळजाचा तुकडा काढून मी त्यांना देतेय असंच मला वाटत होतं. पुन्हा पुन्हा ‘नीट करा’ असं मी त्यांना सांगत होते. कारण ती त्यांना देताना मी फार मोठी रिस्क घेत आहे असं मला वाटत होतं. पण त्यांनी तिचा ‘मेकओव्हर’ अतिशय छान पद्धतीने करून दिला. नथीचं बदललेलं रूपही (चापाची केली) तेवढंच सुंदर दिसत आहे. मूळ नथीचं सौंदर्य कुठेही कमी झालेलं नाहीये हेच खूप मोठं समाधान आहे.

chaturang@expressindia.com