आईच्या विणकामाच्या उद्योगाने तिला म्हातारपणी आनंद घ्यायला व द्यायलाही संधी मिळवून दिली. तिच्या मायेच्या बदल्यात तिला मिळू लागलं लहान-थोरांचं प्रेम व शुभेच्छा! पिटूची आई आज हयात नाही, पण जाताना आनंद वाटण्याचा व मिळवण्याचा वसा माझ्या आईला देऊन गेली.
माझी आई आज ऐंशीच्या घरातली! फारशा शिक्षित नसलेल्या माझ्या आईने महापालिकेत नोकरी केली. मी आणि माझ्या बहिणीनं चांगलं शिक्षण घेऊन ‘हािपसात’ नोकरी करावी एव्हढंच तिचं माफक स्वप्न! कामगार चळवळीत कार्यरत माझ्या वडिलांच्या विचारांचा प्रभाव तिच्यावर असल्यानं सिनेमे, बुवाबाजी, गंडेदोरे, ऋण काढून सण साजरं करणं अशा गोष्टींपासून ती दूरच असे. आपण बरे नि आपला संसार व नोकरी बरी असे तिचे जीवन होते. नाही म्हणायला तिची व चाळीतल्या आमच्याच माळ्यावर राहाणाऱ्या साठी ओलांडलेल्या आजीची म्हणजेच ‘पिटूच्या आईची’ चांगलीच गट्टी जमली होती.
पिटूच्या आईच्या वाटय़ाला अकालीच पती निधनाचं दु:ख आलं. पण तिनं मुलांचं संगोपन डोळ्यांत तेल घालून केलं. मोठा मनू व मधला छोटू शिकून नोकरीला लागले. त्यांनी स्वत:च्या स्वतंत्र जागा घेऊन बिऱ्हाडंही थाटली. धाकटय़ा पिटूनेही कॉलेज पूर्ण केलं व तोही नोकरीला लागला. रिकामपणचा विरंगुळा म्हणून लहान मुलामुलींना जमवून पत्त्यांचा खेळ मांडणं, रेडिओवरचे वनिता समाज, आपली आवड, श्रुितका हे कार्यक्रम ऐकणं हे छंद पिटूच्या आईने जोपासले होते. पण त्याचबरोबर विणकामाची तिला मोठी आवड होती. पिटूच्या आईच्या विणकामाचं माझ्या आईला मोठं अप्रूप असे. आई कामावर जाताना आम्हा भावंडांना पिटूच्या आईच्या हवाली करत असे. पिटूची आई आमचा सांभाळ करत असे व लाडही! पिटूच्या आईने शिवलेला स्वेटर, मोजे आमच्याही वाटय़ाला येत असत. पिटूच्या आईने विणून दिलेला क्रोशाचा टेबल क्लॉथ व दारावरचं तोरण पाहून आई हरखून जाई. कामावरून परतल्यावर पिटूच्या आईच्या बाजूस तासन् तास बसून ती पिटूच्या आईच्या हातची कला न्याहाळत बसे. एकीकडे गप्पा व दुसऱ्या बाजूला विणकाम सुरू असा कार्यक्रम सुरू राही. एकलव्याच्या एकाग्रतेने आईचे विणकामाचे प्रशिक्षण सुरू राही. एके दिवशी पैसे साठवून विकत आणलेल्या लोकरीचा एक छानसा स्वेटर आईने पिटूच्या आईच्या हाती ठेवला. ‘‘अगो बाई, तू केलास का हा?’’ पिटूच्या आईच्या स्वरात आनंद व आश्चर्य दोन्ही भरून आलं होतं. स्वेटर बऱ्यापैकी विणला होता, पण कुठे कुठे मापात चुकलाही होता. आता मात्र पिटूच्या आईचा विचार पक्का झाला होता. आपल्या या शिष्येला क्रोशाच्या विणकाम कलेत पारंगत करायचेच या निर्धाराने ती कामाला लागली. रोज कामावरून थकून-भागून परतलेली माझी आई पिटूच्या आईच्या शिकवणीलाच जाऊ लागली व लवकरच तिने क्रोशाच्या विणकाम कलेत कौशल्य प्राप्त केल्याबद्दल पिटूच्या आईची शाबासकीही मिळवली.
अधूनमधून लोकर, दोरे आणण्याइतपत पैसे जमवून माझी आईसुद्धा स्वेटर, मोजे, पर्स विणू लागली. छंद तसा न परवडणारा होता, पण मिळालाच रिकामा वेळ तर विणकाम तिला आनंद देत असे. पुढे यथावकाश मुले मोठी झाली. वडिलांचे निधन
झाले. आईने आता नोकरी करू नये असे आम्हां मुलांना वाटत होतेच. तिला नोकरीचा राजीनामा देण्यास आम्ही भाग पाडले. काबाडकष्ट करण्याचे दिवस मागे पडून सुखाचे दिवस वाटय़ाला येऊ
लागले होते. घरातील कामे स्वत: करण्याची तिची सवय मात्र तिला स्वस्थ बसू देत नव्हती. घरातील आम्ही सारी माणसं नोकरी-धंद्यासाठी व नातवंडे शिक्षणासाठी बाहेर पडली की रिकामे घर तिला खायला उठे.
हळूहळू तिने विणकामाला वेळ द्यायला सुरुवात केली. नात्यागोत्यातल्या लहान मुलांना तिने विणलेले स्वेटर व मोजे भेट म्हणून मिळू लागले. कॉलेजला जाणाऱ्या तरुण मुली आजीकडे पर्स विणून देण्याचा हट्ट धरू लागल्या. लग्न ठरलेल्या मुलीही आजीकडून रुखवतासाठी विणलेले काहीबाही घेण्यासाठी लकडा लावू लागल्या. क्रोशाच्या विणकामातला आईचा आनंद दिवसागणिक वाढतच चाललाय! आईची करमणूकही तीच अन् भक्तीही तीच! एखाद्या नुकत्याच लग्न झालेल्या मुलीला आजीनं विश्वासात घेऊन ‘काय बातमी आहे का?’ असं विचारावं आणि तिनं लाजून दूर पळाल्यावर आजीनं झबली, टोपरी, मोजे विणायला घ्यावेत हा तिचा शिरस्ता! गृहप्रवेशाच्या पूजेचं आमंत्रण कुणी घेऊन आला की आईने ठेवलंच त्याच्या हातात दाराचं विणलेले तोरण! दूरदेशी शिक्षण घ्यायला जाणाऱ्या तरुण मुलानं आशीर्वाद घेण्यासाठी पायावर स्पर्श केला की त्याला मिळतो उबदार स्वेटर! आईच्या या उद्योगानं तिला म्हातारपणी आनंद घ्यायला व द्यायलाही संधी मिळवून दिली. तिच्या मायेच्या बदल्यात तिला मिळू लागलं लहान-थोरांचं प्रेम व शुभेच्छा!
पिटूची आई आज हयात नाही, पण जाताना आनंद वाटण्याचा व मिळवण्याचा वसा माझ्या आईला देऊन गेली. क्रोशाचे स्वेटर, मोजे, झबली व टोपडी आणि तोरणे आता झाली आहेत माया, ममता, प्रेम, आस्था, आशीर्वाद असं बरंच काही..!
ajitsawant11@yahoo.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा