काकू म्हणाल्या, ‘‘दोन दिवसांनी अगदी शांतपणे विचार करून मालिकांमधल्या भावनाळू आईला मी पार हद्दपार केलं. मुळात लहानपणीच अमोलची बुद्धीची चमक जाणवल्यावर इथल्यापेक्षा अमेरिकेतच त्याच्या हुशारीला वाव मिळेल ही आयडिया त्याच्या डोक्यात कुणी रुजवली? आम्हीच ना? त्याच्या प्रत्येक यशानं आम्ही हुरळून जात होतो. खरं तर तेव्हाच त्याची आपल्या देशात येण्याची हळूहळू बंद होत जाणारी दारं आणि पर्यायानं उतारवयातलं आमचं एकाकीपण ही वस्तुस्थिती आम्हाला जाणवलीच नव्हती असं कसं म्हणता येईल?’’ काकू काही क्षण विचारात बुडल्या..
जवळपास ८-९ महिन्यांनी मी आज आशाकाकूंकडे चालले होते. काकांचं अचानक निधन झाल्यावर अमोल म्हणजे त्यांचा एकुलता एक मुलगा आणि आमचा वर्गमित्र तातडीनं अमेरिकेहून इथे आला होता. तेव्हा लागोपाठ २-३ वेळा फेऱ्या झाल्या होत्या, पण त्यानंतर मात्र काही ना काही कारणानं जाणं लांबतच गेलं. परवा काकूंनी बाजारात हटकलं तेव्हा नजर चुकवतच त्यांची खुशाली विचारली. काकू मात्र मधल्या काळात काही घडलंच नाही असंच बोलत होत्या. साहजिकच माझ्याही बोलण्यात थोडा मोकळेपणा आला. तेव्हा लगेच, ‘‘नुसतं येते येते म्हणू नकोस. या शनिवारी जमेल का यायला? तुझ्यासाठी एक कामगिरी ठेवते. टेंशन घेऊ नकोस तुझ्यासाठी सोप्पं आहे ते काम..’’ काकू म्हणाल्या आणि निघाल्यासुद्धा.
त्यांना कबूल केल्यानुसार मी त्यांच्या दारी हजर झाले होते. ‘‘ये, मी पडले रिकामटेकडी. त्या दिवशी हक्कानं बोलावलं खरं तुला, पण मग वाटलं तुम्ही सगळी बिझी मंडळी. तुझ्या कामाचा खोळंबा तर नाही ना होणार माझ्यामुळे?’’ दार उघडता उघडता काकूंनी हसत विचारलं.
‘‘नाही काकू मी खरंच एकदा तुम्हाला भेटायला येणार होते.. पण..’’ माझी सारवासारवी..
‘‘तुम्ही कशा आहात?’’
‘‘छान.. म्हणजे आता माझं रूटीन छान अॅडजस्ट केलंय मी.’’
‘‘अमोल कसा आहे? काकांचे दिवस झाल्यावर तुम्हाला तिकडे न्यायचं म्हणत होता, पण नंतर कळले एकटाच गेला. जातेवेळी आमची प्रत्यक्ष भेट झालीच नाही.’’
‘‘हो निघताना खूपच धावपळ झाली त्याची. माझ्यासाठी पाय अडत होता. पण तिकडे जाण्यावाचून गत्यंतरच नव्हतं ना..’’ बोलता बोलता काकू भूतकाळात शिरल्या.
‘‘यांच्या जाण्यानंतर त्यानंच तर सर्व सावरलं. माझी अगदी आईच्या मायेनं काळजी घेत होता आणि एक दिवस तिकडे जाण्याचं सूतोवाच केल्याबरोबर पायाखलची जमीनच सरकली माझ्या. त्याक्षणी काय बरं म्हणता तुम्ही.. हं. निगेटिव्ह.. तसल्या विचारांनी ताबा घेतला मनाचा. वाटलं, या मुलासाठी किती खस्ता खाल्ल्या दोघांनी. किती मेहनत करून याची सगळी हौस पुरवली आणि हा मात्र बायको पोरीच्या ओढीनं म्हणा किंवा तिथल्या वैभवाला भुलून माझ्या अशा अवस्थेत सोडून बिनदिक्कत चाललाय. आता आठवलं तरी हसू येतंय. त्या टी.व्ही. सीरिअलमधल्या म्हताऱ्या आया किंवा आज्या टोकाचं वागतात ना तस्से विचार माझ्या मनात आले सुरुवातीला..’’ आपल्या कल्पनेवर खूष होऊन काकू हसल्या.
‘‘मग, पुढे काय झालं.’’
‘‘पुढे काय होणार? दोन दिवसांनी अगदी शांतपणे विचार करून मालिकांमधल्या भावनाळू आईला पार हद्दपार केलं. मुळात लहानपणीच अमोलची बुद्धीची चमक जाणवल्यावर इथल्यापेक्षा अमेरिकेतच त्याच्या हुशारीला वाव मिळेल ही आयडिया त्याच्या डोक्यात कुणी रुजवली? आम्हीच ना? त्यानंही नंतर प्रत्येक टप्प्यावर हुशारी सिद्ध करत घवघवीत यश मिळवले. इथंही आणि तिथंही. पुढे त्याला भलंभक्कम पॅकेज मिळालं. सुविद्य पत्नी मिळाली. त्याच्या प्रत्येक यशानं आम्ही हुरळून जात होतो. त्यानंही आमच्या कष्टांची जाण ठेवली. डॉलरची ऊब अनुभवायला दिली २-३ वेळा कौतुकानं तिथे बोलावून आमची ‘जिवाची अमेरिका’ करवली. खरं तर तेव्हाच त्याची आपल्या देशात येण्याची हळूहळू बंद होत जाणारी दारे आणि पर्यायाने उतारवयातले आमचं एकाकीपण ही वस्तुस्थिती आम्हाला जाणवलीच नव्हती असं कसं म्हणता येईल? की जाणूनबुजून आम्ही तो अप्रिय विषय नजरेआड करत होतो?’’ काकू काही क्षण विचारात बुडल्या..
पुढच्या क्षणी काहीसं आठवून म्हणाल्या, ‘‘तू लहान मुलांचं रिमोटवर चालणारे विमान पाहिलेयस ना? इच्छा झाली की रिमोटचं बटण दाबून विमानाला उंच उडवतात आणि मनात आलं की बटण दाबून त्या उडणाऱ्या विमानाला अचानक जमिनीवर आणतात. आम्ही आई-वडीलसुद्धा आपल्या मुलांना रिमोटवरचं विमान समजतो का गं?’’ काकूंचा ओलावलेला स्वर.
मी काही बोलणार तोच त्याच म्हणाल्या, ‘‘तुला सांगते, दोन दिवसांनी डोकं शांत झाल्यावर आपल्या ज्ञानेश्वर आणि रामदासांचा विवेकवाद आठवला. व्यावहारिक विचार केला तर केवळ माझ्या सोबतीसाठी अमोलनं तिथली घडी विस्कटून इकडे येणं अशक्य आणि माझी मूळं यापुढे तिथल्या मातीत रुजणं तर त्याहूनही अशक्य. आता हा तिढा इतर कुणी नाही तर मीच सोडवायचा ना? विचार करत गेले तशी जाणवलं की आपला दृष्टिकोनच बरेचदा आपल्याला दु:खी किंवा आनंदी ठेवू शकतो. प्रत्येक गोष्ट माझ्या मनाप्रमाणेच घडावी ही अपेक्षाच मुळात अयोग्य नाही का आणि मनासारखे घडले नाही म्हणून इतरांना किवा नशिबाला जबाबदार धरण्यात काय अर्थ आहे? तेव्हा वास्तव स्वीकारून दोन्ही पर्यायांचा विचार करत अखेर इथं एकटीनं राहण्याचा निर्णय घेतला आणि अमोलला अगदी मनापासून निरोप दिला. आम्ही नाही का कोकणात राहणाऱ्या आमच्या आईवडिलांना सोडून नोकरी शिक्षणासाठी इथे शहरात आलो? त्यामुळे आमच्या प्रेमात कधी दुरावा आला का? मुळीच नाही. आता तुमची पिढी आमच्या पुढे एक पाऊल थेट परदेशात निघाली तेव्हा उगीच एकटेपणाचं दु:ख कशाला कुरवाळायचं? आणि एकटी राहणारी म्हातारी मी काही साऱ्या जगात एकमेव नाही ना? आमच्या ज्येष्ठ नागरिक मंडळात असे एकटय़ानं आयुष्य जगणारे खूप वृद्ध स्त्री-पुरुष येतात. कुणाची मूलं दूरदेशी तर काही जण इतर काही कारणाने एकटी आहेत तुला सांगते. तिथेच आमच्यासाठी खास संगणकाचे वर्ग चालतात. यांना तेव्हा खूप वाटे मी तिथं शिकावं, पण तेव्हा आळस केला मी. पण अमोल गेल्यानंतर लवकरच तिथे शिकायला गेले. घरात संगणक होताच हळूहळू इंटरनेट, ई-मेल करायला आणि मुख्य म्हणजे स्काइप वापरायला शिकले. आता दर २-४ दिवसांनी सगळ्यांशी आमनेसामने गप्पा होता. अपूर्वानं म्हणजे नातीनं तर दर आठवडय़ाला २ गोष्टी सांगायचं काँट्रॅक्टच केलेय माझ्याबरोबर. खूप छान वेळ जातो या सगळ्यात. या इंटरनेटमुळे जग किती जवळ आलंय ना. नवलच वाटतं बघ. थोडं थोडं जमतंय मला आणि मजाही वाटतेय त्यात..’’
बोलता बोलता काकूंनी ट्रेमधून कॉफी आणि फराळ पुढय़ात आणून ठेवला.
‘‘काकू.. तुम्ही माझ्यासाठी काही काम ठेवलंय ना..?’’ मी हळूच कामाची आठवण करून दिली.
‘‘अरे हो.. खूप दिवसांनी भेटलीस तर माझेच चऱ्हाट लावत बसले बघ.’’ म्हणत काकूंनी ड्रॉवरमधून स्मार्टफोन काढून माझ्यासमोर ठेवला. तो पाहून, ‘‘अरे वा म्हणजे तुम्ही आता आमच्या स्मार्ट काकू होणार तर..’’ मी चेष्टेत म्हटलं.
‘‘व्हायलाच पाहिजे ना? गेल्या आठवडय़ात अमोलनंच पाठवला. आता दुनिया काही आपल्यासाठी थांबणार नाही म्हटल्यावर जगाबरोबर चालायला. आपणच चार पावलं पुढे टाकायला हवीत ना. माझा हा साधा मोबाइल मला पुरेसा होता पण त्या तिघांचा हट्ट मानलाच पाहिजे ना? एकेकाळी साऱ्या घरासाठी लॅण्डलाइन घेणंसुद्धा गरज नाही तर आम्हाला चैन वाटायची आणि आता? घरातल्या प्रत्येकाकडे मोबाइल असणे ही चैन नाही तर गरज बनलेय. बदल हा सृष्टीचा नियमच आहे ना! तेव्हा तो स्वीकारणंच योग्य. अर्थात या नव्या साधनांच्या किती आहारी जायचे ते ज्याचं त्यानं ठरवावं. आता तू नं या फोनमध्ये एकमेकांना गाणी, फोटो मेसेज वगैरे पाठवतात त्याला काय बरं म्हणतात?’’ काकू अडखळल्या.
‘‘व्हॉट्सअॅप’’
‘‘हां.. तेच ते.. ते या फोनमध्ये घालून दे आणि ते कसं वापरायचं मला नीट सांग. शिकायची तयारी आहे माझी. आहे ना तुझ्याजोगते काम? काकूंनी हसत विचारलं.
काकूंची शिकवणी संपवून मी घरी परतले, पण येताना वाटलं की मी त्यांना काही शिकवण्यापेक्षा मीच खूप काही शिकले होते..
– अलकनंदा पाध्ये
alaknanda263@yahoo.com