उज्ज्वला रानडे

कमळी सुनेशी तासभरसुद्धा गप्पा मारायची पण आजींनी, ‘‘जरा बस की गं माझ्याशी बोलत’’ म्हटलं की, ‘‘मी काय तुमच्यावानी रिकामटेकडी हाय का?’’ म्हणत पसार होई. अशा वेळी त्या स्वत:शीच बोलून आपलं मन मोकळं करत. त्यांच्यासाठी कोणालाच वेळ नव्हता म्हणून आपलं एकटीचंच जग त्यांनी निर्माण केलं होतं, तर त्याचाही इतरांना त्रास का होतोय हे त्यांच्या कळण्यापलीकडचं होतं.

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Young girl harassed foreign tourist for a reel dancing in public place video viral on social media
रीलसाठी ओलांडली मर्यादा! तरुणीने डान्स करता करता परदेशी व्यक्तीबरोबर केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकरी संतापले
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Maharashtra kunbi vidhan sabha
कुणबी समाजाला डावलल्याची खंत, यवतमाळात तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न

आज सकाळपासून आजींच्या अंगात अगदी उत्साहाचं वारं संचारलं होतं! आज सुनेच्या मैत्रिणी घरी जेवायला येणार आहेत हे त्यांना समजलं होतं, म्हणजे तसं सुनेनं सांगितलं नव्हतं; ती त्यांच्याशी एवढं मोकळं बोलतच नसे. पण त्यांना आंघोळ घालायला येणाऱ्या कमलनं ही बातमी त्यांना काल दिली होती. तेव्हापासून त्या अगदी आसुसून पाहुण्यांची वाट पाहात होत्या. मनातला ओसांडून वाहणारा आनंद सुनेला न दाखवण्याची अवघड कसरत करताना मात्र त्यांची दमछाक होत होती.

तो आनंद तिला दिसला असता तर, ‘‘मैत्रिणी येणार माझ्या आणि तुम्ही कशाला एवढय़ा नाचताय,’’ म्हणून ती फिस्कारली असती. ‘‘अगं तुम्ही नाटक, सिनेमाला, भिशी आणि त्या काय त्या किटी पाटर्य़ाना जाता; जीमला, मॉलमध्ये जाता, वॉकला जाता. मला कुठे जाता येत नाही. कुणी घरात येतं-जातं तेवढीच मला करमणूक असते. म्हणून मला आनंद वाटतो तर तुझं काय जातं!’’ असं तिला सुनवावं, असं अनेकदा मनात येत असे आणि मनातच जिरून जात असे. एवढं सुनेपुढे बोलायची त्यांची हिम्मतच होत नसे.

गेल्या वेळी या मैत्रिणी आल्या होत्या तो दिवस आजींना आठवला. सकाळपासून आजी आजच्यासारख्याच उत्साहात होत्या. त्यांनी आंघोळ झाल्यावर नेसवायला कमलला नवी कोरी साडी दिली तर ती टवळी फिदीफिदी हसत म्हणाली, ‘‘आजी, मैतरणी ताईंच्या येणार आणि ताई आजून बी घरच्या मॅक्शीतच हाये आणि तुमी कशापायी कोऱ्या साडीची घडी मोडतायसा?’’ सुनेसमोर एक शब्दही बोलू न शकणाऱ्या आजींनी तिला मात्र ठासून सांगितलं की, ‘‘मी आता कुठेच जात नाही त्यामुळे माझ्या या साडय़ांना ऊन कधी लागणार? तुला काय करायचंय; नेसव म्हटलं की नेसवायची!’’

त्या दिवशी आलेल्या प्रत्येक मैत्रिणीने आजींची, त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. या वयातही त्यांचा खणखणीत असलेला आवाज, उत्तम स्मरणशक्ती यांचं कौतुक केलं आणि ‘‘आजी, तुम्ही शंभरी सहज गाठणार बरं का!’’ अशा शुभेच्छा दिल्या. आजी अगदी मनातून खुलल्या. आपण किती जेवतोय याकडे त्यांचं लक्षच नव्हतं. दुसऱ्या दिवशी पोट प्रचंड बिघडलं आणि जोरदार जुलाब सुरू झाले. एरवी फडाफडा बोलणाऱ्या सुनेनं मुकाटय़ानं घाण साफ केली तेव्हा आजी अगदी कानकोंडय़ा झाल्या. नंतर सून लेकाला म्हणताना त्यांनी ऐकलं की, ‘‘कोणी आलं की अगदी अंगातच येतं यांच्या. त्यांना काय कोणी येणार म्हणून काही काम थोडंच करायला लागणारेय? उलट चांगलंचुंगलं खायला मिळतं, तोंडाचा चिकटा जाईपर्यंत गप्पा मारायला, ऐकायला मिळतात. आधीच या वयातही माझ्या पेक्षा जास्त आहार आहे आणि कोणी आलं की खाण्यावर धरबंधच राहात नाही. मी त्यांना जास्त वाढतंच नाही. पण काल मी किचनमध्ये बिझी असताना या मैत्रिणींनी त्यांना सांगतील तेवढं वाढलं. त्यांना फुकटचं कौतुक करायला काय जातंय! म्हणे तुझ्या सासूबाई नव्वदी ओलांडलेल्या वाटत नाहीत. आता पोट बिघडल्यावर निस्तरायला मलाच लागतं!’’

‘‘या वेळी तोंडावर अगदी ताबा ठेवायचा’’, असं आजींनी स्वत:ला बजावलं. आपण हे वाक्य फार मोठय़ानं उच्चारलं की काय या शंकेनं त्या धास्तावल्या. अलीकडे आपल्याला स्वत:शीच मोठय़ानं बोलण्याची सवय लागली आहे हे त्यांच्या लक्षात आलं होतं. सूनपण एकदा परदेशातल्या नातवाला फोनवर सांगत होती, ‘‘तुझी आजी हल्ली भ्रमिष्ट झाल्येय, स्वत:शी एकटीच बडबडत बसलेली असते!’’ खरं तर घरात फक्त इनमिनतीन माणसं, त्यात मुलगा आणि सून आजींशी फक्त कामापुरते बोलत, मग आजींना जेव्हा मनातली गोष्ट कोणाशी बोलावीशी वाटे तेव्हा ऐकायला कोणीच नसे. स्वत:च्या हाताने आंघोळ करता येत असूनही कमलला आंघोळ घालायला ठेवण्यामागे हाच उद्देश होता की आपलं बोलणं ऐकायला हक्काचा श्रोता मिळावा. पण ती कमळी सुनेशी तासभरसुद्धा गप्पा मारायची पण आजींनी, ‘‘जरा बस की गं माझ्याशी बोलत’’, म्हटलं की, ‘‘मी काय तुमच्यावानी रिकामटेकडी हाय का? लई कामं पडल्यात’’, म्हणत पसार होई. अशा वेळी त्या स्वत:शीच बोलून आपलं मन मोकळं करत. त्यांच्यासाठी कोणालाच वेळ नव्हता म्हणून आपलं एकटीचंच जग त्यांनी निर्माण केलं होतं, तर त्याचाही इतरांना त्रास का होतोय हे त्यांच्या कळण्यापलीकडचं होतं.

आज सकाळी बेडवर आडवं पडल्यापडल्या आजी स्वयंपाकघरातील सुनेच्या हालचालींचा कानोसा घेत होत्या. त्यावरून मेनूचा अंदाज करण्याचा खेळ खेळत होत्या. आधी खोबरं खवण्याचा आवाज आला. मग भर्र भर्र मिक्सरचा आवाज आला. चटणी करणं चाललंय वाटतं, आजींनी अंदाज केला.    नारळाची चटणी कशासाठी बरं करत असेल? बटाटेवडे तर करणार नसेल? किती दिवसांत वडे खायला मिळाले नाहीत, आजींची जीभ आता अगदी खवळली. मग वाचायला घेतलेलं वर्तमानपत्र बाहेरच्या खोलीत नेऊन ठेवण्याचं निमित्त करून आजींनी दोन वेळा स्वयंपाकघरावरून फेऱ्या मारल्या. एका फेरीत सून टांगलेलं दही पातेल्यात रिकामं करताना तर दुसऱ्या फेरीत पुऱ्या तळताना दिसली. आजी मग मैत्रिणींपेक्षा जेवणाचीच आतुरतेने वाट पाहायला लागल्या. पेपर ठेवताना हॉलची ‘रेकी’ करून कोणत्या खुर्चीत बसल्यावर सगळ्यांचे चेहेरे नीट दिसतील आणि बोलणं नीट ऐकू येईल ते पाहून ठेवलं आणि पुन्हा येऊन बेडवर निजल्या.

फुस्सऽऽऽ आवाज करत मोठय़ाने कुकरची शिट्टी झाली आणि बेडरूममध्ये झोपलेल्या आजींना खडबडून जाग आली. कुकरची शिट्टी वाजणे म्हणजे नाटकाची तिसरी घंटा होण्यासारखंच आहे. कुकर झाला म्हणजे स्वयंपाक तयार झाला. आता सुनबाईच्या मैत्रिणी थोडय़ाच वेळात येतील. त्याआधीच आपल्याला मोक्याची खुर्ची पकडून बसायला हवं. हा विचार मनात येताच प्रत्येक हालचाली बरोबर दुखणाऱ्या गात्रांना न जुमानता आजी उठल्या. बाथरूममध्ये जाऊन आल्या. किंचित काळ आरशापुढे उभं राहून केस, पदर नीट केला. वॉकरचा घोडा घेऊन ठकाक् ठकाक् आवाज करत त्या हॉलमध्ये शिरल्या आणि तिथलं दृश्य पाहून थिजूनच गेल्या. आजींचा डोळा लागलेला असताना कधी तरी मैत्रिणी येऊन बसल्या होत्या. मोक्याचीच काय, हॉलमधल्या सगळ्याच खुच्र्या भरल्या होत्या. आजींना नाइलाजाने कोपऱ्यातल्या एकमेव रिकाम्या खुर्चीवर बसावं लागलं. पण इथून चेहरे नीट दिसेनात आणि बोलणं नीट ऐकूही येईना. ‘‘असा कसा मेला नको तेव्हा डोळा लागला!’’ आजी अगदी चुटपुटल्या. सगळ्यांचं कोणत्या विषयावर बोलणं चाललं होतं कोण जाणे. पण आजी आल्यावर सगळ्या एकदम गप्प झाल्या. काही तरी नजरेच्या खाणाखुणा झाल्या. मग एकीने आजींच्या तब्येतीची चौकशी केली, दोघींनी, ‘‘आजी, ओळखलंत का?’’ विचारलं. आजींनी त्यांची नावं बरोबर सांगितल्यावर आजींच्या स्मरणशक्तीचं नेहमीप्रमाणे कौतुक झालं आणि आजींना त्यांनी अगदी आपल्याला संभाषणात

सामील करून घेतलंय असं वाटून आनंद झाला. बहुतेक सगळ्याजणींना आता सुना, जावई आले होते. सुनांच्या तक्रारी आणि जावयाची कौतुकं करून झाली.

मग मध्येच पदार्थाच्या रेसिपीजची चर्चा सुरू झाली. ‘‘आजी, रव्याच्या लाडूचं तुमचं प्रमाण काय?’’ अचानक एकीने विचारले. ‘‘अगं, त्यांना काय विचारतेस! माझं लग्न झाल्यास गेल्या बेचाळीस वर्षांत त्या स्वयंपाकघरात शिरल्यासुद्धा नाहीयेत. माझ्या गैरहजेरीत कधी तरी वरणभाताचा कुकर लावला असेल तेवढाच.’’ सुनेने वाक्बाण सोडला. आजी गांगरून गेल्या. खरंच शेवटचे रव्याचे लाडू आपण कधी केले; काय असायचं आपलं प्रमाण? त्यांना काही म्हणता काही आठवेना. त्यांनी सगळ्या जणींवर एक केविलवाणी नजर टाकली. त्या उत्तराच्या अपेक्षेने आजींकडे बघत होत्या. आजींना काहीच सुचेना. त्या अगदी गांगरून गेल्या. शेवटी काही तरी सांगायचं म्हणून ‘एक भांड रव्याला सव्वा भांडं साखर’ असं त्यानी सांगून टाकलं. सगळ्या जणींनी एकमेकींकडे पाहून तोंडं वाकडी केली. ‘‘ती वडय़ांचं नाही, लाडूचं प्रमाण विचारते आहे, हल्ली वडय़ांनासुद्धा एवढी साखर कुणी घालत नाही; सव्वा भांडं म्हणे!’’ सून उपहासाने बोलली. मग आजींनी स्वत:ला अगदी मिटून घेतलं. त्या फक्त मुकाटय़ाने सगळ्यांच्या गप्पा ऐकत राहिल्या. थोडय़ा वेळाने जेवणाची ताटं आली. श्रीखंड, पुरी, बटाटेवडे आणि नारळाची चटणी, डाळ, भात असा अगदी सुग्रास बेत होता. त्यामुळे तोंडावर ताबा ठेवण्याचा निर्णय कुठल्या कुठे वाहून गेला.

जेवण झाल्यावर सगळ्या हात धुवायला, टेबल आवरायला उठल्या तेव्हा मात्र आजींनी चपळाई करून त्यांची ‘मोक्याची खुर्ची’ पटकावलीच. जेवणानंतर कुठेतरी ट्रीपला जायचे बेत सुरू झाले. कुठल्या कुठल्या गावांची नावं त्या घेत होत्या ती आजींनी कधी ऐकली पण नव्हती. जायच्या ठिकाणावर एकमत झाल्यावर त्यांच्यातली एक गोरटेली, बॉबकटवाली उठली आणि कोपऱ्यातल्या कॉम्प्युटरसमोर बसली आणि बघता बघता तिने त्यांच्या प्रवासाची तिकिटं आणि हॉटेलचं बुकिंग केलंसुद्धा! मनात विचार आला काय आणि लगेच ट्रीपचा बेत झालासुद्धा! एकजणही ‘घरी विचारून सांगते’ असं म्हणाली नाही. आजींना त्यांच्या स्वातंत्र्याचं, बिनधास्तपणाचं कौतुक आणि हेवासुद्धा वाटला. आजी कुठे गेल्या असतील त्या यजमानांबरोबरच! तेही नातेवाईकांच्या लग्नाला नाही तर मुंजीला! ते पण शेवटचं कधी गेलो होतो त्यांना आठवेना. खरंच यांचं जगच किती वेगळं होतं! त्यानंतर चहा झाला आणि मग सगळ्याजणींची जाण्याची धांदल उडाली. त्या गडबडीत आजींचा निरोप घेण्याचं कोणाच्या लक्षातच आलं नाही. ‘मी यांना जरा गेटपर्यंत सोडून येते’ असं म्हणून सुनेने आपल्या मागे दरवाजा ओढून घेतला. आता घरात आजी एकटय़ाच उरल्या. त्यांनी हॉलमध्ये नजर फिरवली. सगळीकडे चहाचे रिकामे कप विखुरले होते. ते उचलून सिंकमध्ये नेऊन ठेवावे असा विचार एकदा मनात आला, पण एखादा कप पडून फुटला असता तर सुनेच्या रोषाला कारण व्हावे लागले असते म्हणून त्यांनी तो विचार सोडून दिला. आता काय बरं करावं? बाल्कनीत जाऊन त्यांना सगळ्यांना हात हलवून निरोप द्यावा असं त्यांच्या मनात आलं.

लगेच आपली ब्याण्णव वर्षांची हाडांची मोळी वॉकरच्या आधारे सावरत त्या शक्य तिवढय़ा चपळाईने बाल्कनीत पोहोचल्या. सगळ्या जणी नुकत्याच विंगच्या बाहेर पडून सोसायटीच्या गेटकडे चालायला लागल्या होत्या. आजींनी जोरजोरात हात हलवून त्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सुनेला आणि ज्या दोघींची नावं त्यांनी मगाशी बरोबर सांगितली होती त्यांना घसा खरवडून हाका मारल्या, पण व्यर्थ! कुणाचंही लक्ष त्यांच्याकडे गेलं नाही. शेवटी ओरडून घसा आणि हलवून हात दुखायला लागल्यावर त्या थांबल्या. खरंच, सून आणि कमल म्हणाली तश्या त्या सुनेच्या मैत्रिणी होत्या; त्या येणार म्हणून आपण उगाचच नाचलो, त्यांचं आणि आपलं जगच वेगळं आहे याची जाणीव आजींना पुन्हा एकदा झाली. त्यांनी आपल्याला त्यांच्या संभाषणात सामील करून घेतलं हा त्यांच्या सौजन्याचा भाग होता; निव्वळ उपचार होता. आपण ते सगळं खरं समजलो हे कळल्याने,  उपेक्षेने आजींचे डोळे भरून आले. त्या अश्रूंच्या पडद्याने आजींना त्यांच्या जगापासून वेगळं केलं आणि पुन्हा त्यांच्या एकटीच्या जगात आणलं.

write2ujwala@yahoo.co.in

chaturang@expressindia.com