प्रतिभा वाघ – plwagh55@gmail.com
‘मांडणा’ म्हणजे बोली भाषेत, ‘चित्र काढणं’. राजस्थानमधल्या ‘मीणा’ या जमातीची ही कला. मीणा स्त्रिया रंगीबेरंगी वस्त्रं परिधान करून, खेळीमेळीच्या आणि जल्लोषी वातावरणात भिंतीवर आणि जमिनीवर ही कथाचित्रं काढतात. गेरूच्या लाल रंगावर खडूच्या पांढऱ्या रंगानं काढलेल्या या चित्रांची ख्याती आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. सुनीता प्रभात, रजनी मीणा यांसारख्या गावातल्या चित्रकर्तींनी ‘मांडणा’ चित्रांमध्ये स्वत:ची अशी एक शैली विकसित केली आहे. त्यांनी ही कला तर टिकवली आहेच, पण या कलेनंही त्यांना एक स्वतंत्र ओळख आणि आत्मविश्वास दिला आहे.
स्त्रीकडे उच्च प्रतीची सर्जनशील शक्ती असू शकते आणि ती दिसण्यासाठी ती कु ठे राहते याने काहीही फरक पडत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘मीणा मांडणा’. ‘मीणा’ या राजस्थानमधील जमातीची ‘भित्तीचित्र कला’. ‘मांडणा’ चित्र भिंतीवर जसं काढलं जातं तसंच जमिनीवरही काढलं जातं.
राजस्थानातल्या सवाई माधोपूर जिल्ह्य़ातलं रामसिंगापूर गाव चाळीस वर्षांंपूर्वी फक्त दहा ते पंधरा कच्ची घरं असलेलं होतं. आता वस्ती थोडीशी वाढली आहे. याच गावात आपल्या मामाच्या घरी सुनीता राहायला आली. तिचं मूळ गाव दातासुता. तिच्या आईला घरच्या कामांपुढे तिच्याकडे पुरेसं लक्ष देता येत नव्हतं. म्हणून ती मामाकडे राहायला आली. तिला शाळेत जायचा कंटाळा असल्यानं मामानं तिला उशिराच शाळेत घातलं. तिथे मारकुटे मास्तर भेटले आणि त्यांच्या दंडुक्याच्या धाकानं तिच्या शाळेबद्दलच्या रागाला आणखीनच खतपाणी घातलं गेलं. मामा प्रेमळ होता, मामेभावंडं होती. पण सुनीता कंटाळा करतच शाळेत जात होती. पास-नापास होत होत अखेर ती विसाव्या वर्षी दहावी उत्तीर्ण झाली. लहान असल्यापासून दिवाळीच्या आधी दोन महिने घरातलं दुरुस्तीकाम, रंगकाम आणि नंतर भिंतीवरील ‘मांडणा’ हे सारं पहात मोठी होत होती. उन्हाळ्यात गावातल्या तळ्यातलं पाणी आटलं की तलावातली माती घरोघरी जमवून ठेवली जाई. बंजारा लोक डोंगरात मिळणारी पाच किलो पांढरी माती एक किलो गव्हाच्या बदल्यात विकत असत. गावात काही ठिकाणी खणल्यावर काळी मातीही मिळत असे. या दोन्ही प्रकारच्या माती ‘मांडणा’साठी वापरतात. गवताच्या छपराच्या झोपडीला तिथल्या भाषेत ‘छान’ असं म्हणतात. इथले लोक या ‘छान’चं अंगण, भिंती ‘मांडणा’नं भरून टाकत.
एक विशिष्ट प्रकारचा, गवताचा, हातात मावेल एवढा चपटा गोळा बनवून कुंचला (त्यांच्या भाषेत ‘बोतनी’) बनवत. कापसाचा बोळा, कपडय़ाचा बोळा अगदी केसांचा गुंताही ‘बोतनी’ बनवण्यासाठी वापरतात. भिंत रंगवण्यासाठी ‘बोतनी’ आणि ‘मांडणा’ रंगवण्यासाठी खजुराच्या झावळीची दांडी. या दांडीच्या पुढच्या भागाला दगडानं चेचून वेगवेगळ्या आकाराचे ब्रश बनविले जात. घराच्या भिंती गुळगुळीत करून झाल्यावर ‘मांडणा’ करणं सुरू होई. ‘मांडण’ या शब्दापासून ‘मांडणा’ हे नाव पडलं. ‘मांडणा’ म्हणजे अलंकरण, सौंदर्यीकरण आणि बोली भाषेत ‘चित्र काढणं’ असा या शब्दाचा अर्थ आहे. यात दोन प्रकारचे आकार असतात. एक म्हणजे निसर्गातील पानं, फुलं, पक्षी, प्राणी यांचे आकार आणि दुसरे म्हणजे वास्तुकलेच्या प्रभावातून निर्माण झालेले आकार. ‘शुभ’ आणि ‘मांगालेक’ असं शास्त्रशुद्ध नाव या आकारांना आहे.
सण, उत्सव, धार्मिक समारंभ, व्रताची सांगता, उद्यापन, जन्म, विवाह अशा दिवशी ‘मांडणा’ काढतात. त्यांचा उद्देश देवतेला जागृत करणं, दुष्ट प्रवृत्तींना आळा घालणं, घरात देवाचं आगमन व्हावं, असा असतो. भिंतीवर आणि जमिनीवर ‘मांडणा’ करण्यापूर्वी चिकणमातीनं भिंत वा जमीन सपाट करणं हे फार कसबाचं काम असतं. लाल रंगाच्या- गेरूच्या रंगाच्या पाश्र्वभूमीवर खडूपासून केलेल्या पांढऱ्या रंगानं- ‘खडीया’नं चित्र रंगवलं जातं. ‘मांडणा’ चित्रं म्हणजे जणू ‘ग्राफिक्स’. अतिशय ठसठशीत, अलंकारिक, वास्तवता आणि कल्पकता यांचं अपूर्व मीलन असलेल्या या आकारांत यथार्थदर्शनाला- छाया-प्रकाश, प्रमाण, साधम्र्य यांना महत्त्व नाही. पण त्यातलं वैशिष्टय़ जपल्यामुळे चित्रातले प्राणी, पक्षी सहज ओळखता येतात. ही चित्रं म्हणजे दैनंदिन जीवनातला उल्हासपूर्ण जल्लोष असतो. याचा चित्रकार एक व्यक्ती नसते. अनेक जण मिळून ते चित्र काढतात. एकाच रंगातली ही चित्रं अनेक रंगांचा आनंद देऊन जातात. चित्रकलेतल्या रचनेच्या दृष्टीनं विचार केला, तर ‘धन आणि
ऋ ण’ अवकाशाचा खेळ या चित्रकारांना कुठल्याही कलासंस्थेत औपचारिक शिक्षण न घेता कसा जमतो हे एक आश्चर्यच आहे.
भिंती आणि अंगण दोहोंवर चित्रं असतात. भिंतीवरच्या आकारांचं रेखाटन वेगळ्या पद्धतीचं असतं. प्राणी, पक्षी, मानवाकृती, फुलांच्या आकृती, इत्यादी त्यात रेखाटले जातात. जमिनीवर बऱ्याच वेळा भौमितिक आकार, समअंग आकार काढले जातात. पण ही चित्रं एकत्रित पाहताना भिंत आणि जमीन एकरूप झालेली दिसते. ही कलात्मक दृष्टी निसर्गाकडून, त्याच्या सहवासात, जीवन व्यतीत केल्यामुळे येत असेल का? निसर्गाची प्रत्येक निर्मिती कलेच्या मूलतत्त्वांवर आधारित आहे. तिथूनच नकळत या लोककलाकारांची दृष्टी तयार होत असावी असं मनात येतं. सुनीताचं आणि रजनीचं काम प्रत्यक्ष पाहिल्यावर तर याची खात्रीच पटते.
सुनीता प्रभात आणि रजनी मीणा या नव्या पिढीतल्या दोन चित्रकर्ती आहेत. आज्या, मावश्या, आत्या, मोठय़ा बहिणी, शेजारपाजारच्या बायका यांच्याकडून पिढय़ान्पिढय़ा ही कला पुढे जात राहिली. परंतु आता मात्र बऱ्याच ठिकाणी मातीची घरं जाऊन पक्की घरं आल्यामुळे ही कला लयाला जात आहे. रजनी ही कला शिकली आहे. मात्र ती कागदावर चित्रं काढण्यातच समाधान मानते, कारण ती पत्र्याच्या घरात राहते. कलेसाठी त्यांना कोणत्याही प्रकारचं उत्तेजन मिळत नाही. इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, तो मुंबईच्या ‘आर्ट बँड’ या चित्रकारांच्या संस्थेचा. कलाविषयक कार्यक्रम, प्रदर्शनं, व्याख्यानं, कार्यशाळा आयोजित करणाऱ्या ‘आर्ट बँड’ या संस्थेनं डिसेंबर २०१८ मध्ये जयपूर येथील ‘जवाहर कला केंद्र मध्ये एक कलाप्रदर्शन भरवलं होतं. त्या निमित्तानं त्यांनी सवाई माधोपूरमधल्या ‘मीणा’ जमातीच्या चित्रकार स्त्रियांना आमंत्रित केलं होतं. त्यांच्या प्रात्यक्षिकांची कार्यशाळा आयोजित केली होती, तसंच त्यांना मानधन देऊन त्यांचा सत्कारही केला. हा आपल्या आयुष्यातला असा पहिला अनुभव असल्याचं या स्त्रियांनी सांगितलं. यातली रजनी हिंदी बोलू शकत होती. स्तन्यपान करणाऱ्या आपल्या बाळाला बरोबर घेऊनच तिनं या सुंदर कलाकृती तयार केल्या.
दहावीपर्यंत शिकलेली ही मुलगी रोजगारासाठी रोज बाहेर पडते. सध्या मजुरांना पाणी प्यायला द्यायचं काम करते आहे. नवरा मुलांना दिवसभर सांभाळतो आणि संध्याकाळी ती घरी आल्यावर एका रिसॉर्टवर कामाला जातो. घराला पत्रे आहेत, मातीच्या भिंती नाहीत, त्यामुळे हातात कला असूनही घर सजवता येत नाही, याची खंत तिला आहे. कारण ‘मांडणा’ मातीच्या भिंतीवर काढला जाताना रंग शोषून घेतला जातो. त्यामुळे एक विशिष्ट प्रकारचा पोत मिळतो. तेच ‘मांडणा’चं वैशिष्टय़ समजलं जातं. काढलेले आकार पूर्णपणे विविध पोतांनी (‘टेक्स्चर’) भरायचे, हे महत्त्वाचं. प्राणी, पक्षी, माणसं, हे सर्व आकार समोरून दिसतात तसे चित्रित न करता बाजूनं चित्रित केले जातात. ‘तपकी का मांडणा’ मध्ये वेगवेगळे ठिपके जोडून, त्रिकोण, चौकोन, चौरस, आयत असे द्विमिती पद्धतीचे आकार आणि जाळीदार नक्षी (भारतीय वास्तुकलेमध्ये अनेकदा दिसणारी जाळी) दिसते. भूमितीतले आणि वास्तुकलेतले आकार जसेच्या तसे ‘तपकी का मांडणा’ या प्रकारात दिसतात. हे ‘मांडणा’ जमिनीवर काढले जातात आणि त्यात पांढऱ्या रंगाबरोबरच काळ्या आणि लाल रेषाही असतात.
अलीकडे राजस्थानमध्ये पूर्वीइतके घराच्या भिंतीवरील ‘मांडणा’ दिसत नाहीत. याचं कारण सिमेंटची घरं हे आहे. सवाई माधोपूर, टोन्क इथल्या मीणा जमातींनी अजूनही हा कलाप्रकार जपून ठेवला आहे. पण हा फारच वेळखाऊ, किचकट प्रकार असल्यामुळे तरुण मुली आपल्याइतक्या आवडीनं करत नाहीत, असं जेष्ठ स्त्रिया सांगतात. चित्रासाठी या स्त्रियांचा आवडता पक्षी म्हणजे मोर. यात त्या निष्णात आहेत. विविध प्रकारच्या मोराचे आकार रेखाटून त्या स्वत:ची सर्जनशीलता पटवून देतात. अगदी ३० ते ४० फूट लांबीच्या भिंतीवरही मोठमोठे मोराचे आकार काढायला त्या मागेपुढे पाहत नाहीत. शिडी आणि साध्या स्टूलवर उभं राहून लयदार,अखंडीत रेषांचं रेखांकन या कसं करतात याचं खरंच आश्चर्य वाटतं. मोर काढताना तो केवळ एक पक्षी म्हणून न काढता स्वत:चा मोराविषयीचा अनुभव त्यात आलेला दिसतो. अलीकडच्या काळात बैलगाडी, ट्रॅक्टरसुद्धा भिंतीवर दिसतात. ‘पगल्या’ म्हणजे लक्ष्मीची पाऊलं, तर ‘छोटय़ा आकाराचे पगल्या’ म्हणजे लहान मुलाची पाऊलं. घरात लक्ष्मीचा अधिवास असावा, अंगणात लहान मूल खेळावं म्हणून हे भिंतीवर काढतात. ‘कंगी’ (कंगवा) हे घरात स्त्रीचं वास्तव्य असावं याचं सूचक चिन्ह. ‘गोपडा’ (गायीचं खूर), ‘खरचनी’चं (दूध मातीच्या भांडय़ात तापवलं, की साय खरडून काढण्यासाठी हा लोखंडी पत्रा लोहाराकडून बनवून घेतात) चित्र घरात दूधदुभतं असावं याचं प्रतीक म्हणून चित्रित करतात. घरात आनंदी वातावरण, सुबत्ता असावी, दुष्ट शक्तींचा प्रवेश होऊ नये, याकरता हे ‘मांडणा’ चित्रित केले जातात.
रामसिंगापूरची सुनीता लहान होती तेव्हा मुख्य भिंतीवर तिला ‘मांडणा’ काढायला देत नसत. तिला ‘मांडणा’ काढण्यासाठी तिचा मामा गोठय़ाच्या भिंतीची खास व्यवस्था करत असे. ही सुनीता आता सवाई माधोपूर येथे राहते. सुनीताची कथाचित्रं असलेल्या, ‘मांडणा’ शैलीतली चाळीस चित्रं असलेल्या ‘गॉबल यू अप’ या पुस्तकाची सर्वाधिक खपाच्या पुस्तकांमध्ये निवड झाली आहे. ‘तारा बुक्स’नं प्रकाशित केलेलं हे पुस्तक इंग्रजी, फ्रेंच, कोरियन भाषांमध्ये भाषांतरित झालं आहे. सुनिताने लग्नानंतरही आपली कला कायम ठेवली आहे. ‘मांडणा’पासून प्रेरणा घेतलेली तिची स्वत:ची खास शैली आहे. तिचे पती प्रभात मीणा उत्तम कवी आहेत. बालसाहित्याकरता त्यांना पुरस्कारही मिळाला आहे. त्यांनी सुनीताला तिला माहीत असलेल्या लोककथा लिहून त्यावर कथाचित्रं काढायला सांगितली. ती उत्तम झाल्यामुळे सुनीताला ‘चित्रकर्ती’ म्हणून ओळख मिळाली. आता ती अधूनमधून पुस्तकांकरता कथाचित्रांचं काम करते, शिवाय ‘कॅनव्हास पेंटिंग’ करते. मध्यंतरी तिची निवड कथाचित्र कार्यशाळेकरता झाली होती. या कार्यशाळेतून तिला अनेक नवीन गोष्टी शिकता आल्या. विशेषत: ‘तारा बुक्स’च्या आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धीस आलेल्या पुस्तकातील चित्रं तिनं बोटांनी रंगवली आहेत. ब्रशपेक्षा बोटाची रेषा मुलायम येते, ब्रशची रेषा करकरीत वाटते, असं ती म्हणते. दोन मुलांना सांभाळून, घरची कामं सांभाळून, ‘मांडणा’ चित्रांपासून स्वत:ची शैली निर्माण केलेली सुनीता आपल्या चित्रकलेचं श्रेय लहानपणी मामानं दिलेल्या प्रोत्साहनाला देते. मामाच्या आठवणींवर तिनं ‘बबूला का पेड’ हे पुस्तक लिहिलं आहे आणि त्यात कथाचित्रं काढली आहेत. ‘राई और चौरी’, ‘गॉबल यू अप’, ‘मिट्टी की दीवार’ अशा विविध पुस्तकांमध्ये तिची कथाचित्रं आहेत. माधोपूरच्या मीणा जमातीच्या स्त्रिया ज्या वेळी रंगीबेरंगी वेषात वावरत, गेरूनं रंगवलेल्या भिंतींवर पांढऱ्या रंगात ‘मांडणा’ करतात, ते दृश्य म्हणजे एक मूर्त स्वरूपातलं चित्रच वाटतं.
आपण रंगवलेल्या या भिंतींचं सौंदर्य ऊन, पाऊस, वारा, घरातली ऊठबस, यामुळे टिकणार नाही, हे माहीत असूनही खूप जीव ओतून, रात्र-रात्र जागून, एकमेकींना मदत करत, गाणी गात, मीणा स्त्रिया ‘मांडणा’ काढतात. या चित्रांकडून त्या जीवनाचं मोठं तत्त्वज्ञानच शिकतात जणू. हे जीवन संपणार आहे हे माहीत असूनही येणारा प्रत्येक क्षण आनंदानं जगायला हवा, हे ही कालांतरानं नष्ट होणारी चित्रं शिकवतात. दरवर्षी रंगीबेरंगी, आनंदी रंगांची वस्त्र परिधान करून या स्त्रिया नव्या उत्साहानं दोन रंगातला ‘मांडणा’ रंगवून भिंतींना गायला लावतात.
विशेष आभार-
चित्रकार पवनकुमार कुमावत – राजस्थान
भारती शेखर गिरीधर – आर्ट बँड – मुंबई</p>