कुमार कधी कधी आपल्या मुलांना त्या वाडय़ाच्या गमतीजमती सांगत असे. मात्र बोलताना तो अचानक गप्प व्हायचा. त्या काळात जायचा. आठवणीत रमायचा. एकदा हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे निमित्त साधून कुमार मुलाला पेणला घेऊन गेला. शाळेचा कार्यक्रम संपला आणि कुमार मुलाला घेऊन वाडय़ाकडे निघाला. वाडय़ाच्या जवळ आला तसा त्याला धक्काच बसला..
कुमारला आपल्या घराबद्दल प्रचंड प्रेम होते, अगदी लहानपणापासूनच. अर्थात त्याला कारणही तसेच होते. त्याचे घर म्हणजे खऱ्या अर्थाने चौसोपी वाडा होता. त्यांचा तो दोन खणी चौसोपी वाडा हे त्या काळी पेणचे आकर्षण होते. कुमारचा जन्म त्याच वाडय़ात झालेला. त्यांच्या घरात माणसांचा राबता खूप होता. इनामदारांचे घर त्यामुळे नोकरचाकर मंडळीही भरपूर होतीच, पण बारा बलुतेदार म्हणजे काय असते आणि त्यांच्यावर इनामदारांचा वचक काय असतो हेही कुमारने त्याच्या लहान वयात अनुभवले होते. लहानपण त्याने खऱ्या अर्थाने उपभोगलं होतं त्या वाडय़ात. त्या वाडय़ाशी त्याचं नातं घट्ट करणाऱ्या अनेक आठवणी त्याच्याकडे होत्या. तो वाडा म्हणजे त्याचं पूर्ण बालपण होतं.
 कुमारचे बाबा, काका सगळेच जण त्यात एकत्र राहात. त्यामुळे कुमारची चुलत भावंडेही त्याच्या या बालपणाचा हिस्सा होती. गावातील माणसेही सतत काही ना काही कामानिमित्त वाडय़ावर येत असत. पाठच्या बाजूला गोठा, परसदार, पुढे अंगण आणि वाडय़ाच्या दोन्ही बाजूला असलेली मोठी पडवी. जवळपास अडीच ते तीन एकरावर तो वाडा इनामदारांची शान म्हणून मोठय़ा तोऱ्यात उभा होता. वाडय़ात मुलांचे खेळ सुरू झाले की लपायला बक्कळ जागा असे. कोण कुठे लपला हे शोधणं म्हणजे अनेकदा परीक्षाच असायची. त्या काळी म्हणजेच १९५० च्या दरम्यान पेणमध्ये जंगल भरपूर होते. जंगली प्राणी अनेकदा वस्तीत येऊनही जात. कुमारच्या वाडय़ातही अनेकदा बिबटय़ाने मुक्काम ठोकला होता, मात्र त्याने कधीही गोठय़ात आपले तोंड घातले नाही आणि घाबरून कुमारच्या वडिलांनीही त्याच्यावर कधी बंदूक चालवली नाही.
पुढे कुमार मोठा झाला. महाविद्यालयीन शिक्षणासाठी कुमारला चुलत्यांकडे मुंबईला यावे लागले आणि त्याचा वाडय़ाशी असलेला संबंधच दुरावला. कुमारच्या वडिलांनी घराच्या वाटणीमध्ये तो वाडा आपल्या धाकटय़ा भावाच्या हवाली केला आणि त्याचे वडील, आई, बहीण, भाऊ नाशिकला रवाना झाले आणि पेणशी असलेले त्याचे नाते लौकिकार्थाने संपुष्टात आले. ते नंतर कधीच पेणला आले नाहीत. मात्र कुमार वाडय़ापासून मनाने दुरावला नव्हता. कामानिमित्ताने कधी कधी पेणला जाणे झाले तर तो हमखास त्या वाडय़ावरून फेरी मारत असे. गावातील मित्रांकडून त्याला वाडय़ाची खबरबात कळत असे.
मुंबईत आल्यावर कुमारला आपल्या काकांकडेच राहावे लागले. नोकरी मिळाली तरी त्याचे स्वत:चे घर मुंबईत नव्हते. त्याचे लग्न झाले तेव्हा त्याला आपल्या सावत्र भावाकडे मुक्काम करावा लागला होता. आपण एका मोठय़ा वाडय़ाचे मालक होतो, पण आता आपल्याला आपल्या भावांकडेच आश्रितासारखे राहावे लागते आहे, याची त्याला सतत खंत होती. लग्नानंतर विंचवाच्या बिऱ्हाडासारखे सतत अकरा महिन्यांच्या मुदतीवर त्याने मुंबईत अनेक ठिकाणी मुक्काम केला. याच काळात म्हाडाच्या काही ठिकाणी असलेल्या वसाहतींमध्ये असलेल्या सदनिकांची लॉटरी निघाली. कुमारच्या नोकरीच्या पगारामध्ये या जागेसाठी अनामत भरायलाही पैसे नव्हते. अखेर त्याच्या एका मित्राने त्याला म्हाडाच्या अर्जासोबत भरायच्या अनामत रकमेसाठी एकरकमी १० हजार रुपये दिले. कुमारने अर्ज भरला आणि त्याला सुदैवाने लगेच घर मिळाले. तो आता आपल्या हक्काच्या घरात राहायला गेला.
कुमारने घर घेतले. त्याच दरम्यान त्याच्या धाकटय़ा बहिणीचे लग्न ठरले होते. कुमारने लग्नाचा खर्च करावा म्हणून वडिलांनी त्याला पत्र लिहिले, पण आपल्या पगारात जेमतेम घरखर्च निघत असल्याने कुमारने लग्नासाठी पैसे पाठवणे शक्य नसल्याचे सांगितले. बहिणीच्या लग्नाच्या खर्चाला पैसे देता येत नाहीत आणि स्वत:ला घर घेता येते म्हणत त्याच्या वडिलांनी त्याचे नाव टाकले. तर लाडक्या बहिणीने आणि आईने त्याच्या घरी जाऊन कुमारच्या पत्नीला ‘तूच आमच्या मुलाला/भावाला घरापासून तोडलेस,’ म्हणत बोल लावला. कुमारच्या बहिणीच्या लग्नपत्रिकेत सावत्र भावासहित चुलत भावांचीही नावे होती, पण कुमारचे – तिच्या सख्ख्या भावाचे – नाव नव्हते.
कुमारच्या वडिलांनी वाडा ज्या भावाच्या हवाली केला होता, त्या भावाची पत्नी काही वर्षांनी एका असाध्य आजाराने वारली आणि कुमारचे काका सैरभैर झाले. त्याच मनस्थितीत त्यांनी तो वाडा अल्पशा किमतीत विकून टाकला. आता तो वाडा कुमारच्याच एका मित्राचा झाला. आणि कुमारचा वाडय़ाशी असलेला संबंध खऱ्या अर्थाने संपला.
  कुमार कधी कधी आपल्या मुलांना त्या वाडय़ाच्या गमतीजमती सांगत असे. मात्र बोलताना तो अचानक गप्प व्हायचा. आठवणीत रमायचा. त्याच्या मुलांना कळायचे नाही की आपले बाबा इतक्या मोठय़ा घराबद्दल
सांगतात मग कधी पाहायला का नेत नाहीत. ‘जाऊ कधीतरी’ म्हणत कुमार विषय बदलत असे. पेणच्या प्रायव्हेट हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
होता. त्याचे निमित्त साधून कुमार मुलाला पेणला
घेऊन गेला. एका बऱ्यापैकी असलेल्या हॉटेलवर
त्याने मुक्काम ठोकला. ‘आपण वाडा बघायला
सकाळी जाऊ’ म्हणत त्याने रात्री त्या आळीमध्ये जाण्याचेही टाळले. सकाळ झाली. मुलगा वडिलोपार्जित घर पाहायचे म्हणून अगदी सज्ज झाला. शाळेचा
कार्यक्रम संपला आणि कुमार मुलाला घेऊन वाडय़ाकडे निघाला. वाडय़ाच्या जवळ आला तसा त्याला
धक्काच बसला.
 वाडा विकत घेतलेला त्याचा मित्र रस्त्याच्या बाजूला खुर्ची टाकून बसला होता. कुमारला पाहताच त्याने आवाज दिला, ‘अरे ये, ये. बरं झालं आलास. आताच पूजा आटोपली. वाडा पाडतोय मी. मुलाच्या हॉस्पिटलसाठी इमारत बांधतोय. घे पेढा घे’ म्हणत त्याने बळेच कुमारच्या आणि त्याच्या मुलाच्या हातात पेढा ठेवला. कुमारचे लक्ष वाडय़ाकडे गेले. वाडय़ाचा वरचा भाग पाडून झाला होता. कुमारचा मित्र मोठय़ा उत्साहात इस्पितळाच्या इमारतीचे आराखडे कुमारला दाखवत होता, पण कुमार नि:शब्द झाला होता. आपल्या मुलाला आता कोणता वाडा दाखवणार होता तो? कुमारचा पेणशी असलेला संबंध सर्वार्थाने संपला होता. एक ऋणानुबंध खऱ्या अर्थाने संपला होता. त्याच्या बालपणाशी जोडलेल्या त्या वाडय़ाबरोबर त्या आठवणीही आता जमीनदोस्त कराव्या लागणार होत्या. कुमार त्यानंतर पेणला परत कधी गेलाच नाही. आणि आता तर कुमारही नाही आणि त्याचा वाडाही नाही.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा