मुलांमधील बंडखोरपणा हे नैराश्याचे एक कारण असू शकते पण केवळ तेवढेच नाही तर अशावेळी इतर लक्षणेही तपासायला हवीत. अति रागीटपणा, हिंसक वृत्तीच नव्हे तर कार्यशक्ती आणि उत्साहाची कमतरता या गोष्टीसुद्धा नैराश्याची चिन्हे असू शकतात अशावेळी तातडीने औषधोपचार करणे गरजेचे असते.
चौदा वर्षांचा अक्षय जेव्हा अचानक शाळेत जाण्यास नकार देऊ लागला तेव्हा त्याच्या पालकांना काहीच कळेना. शाळेत न जाण्यामागचे तसे कोणतेही ठोस कारण दिसत नव्हते. अक्षय उघडपणे काही सांगतही नव्हता. पालकांनी त्याला गोड शब्दात सांगितले, ऐकत नाही म्हटल्यावर रागावून पाहिले आणि शेवटी फटकेही दिले पण काहीच फरक पडला नाही. तो नेहमीप्रमाणे खेळायला जायचा, शिकवणीला जायचा पण शाळेत जायला काही केल्या तयार होईना. घरात किंवा शाळेत अशी कुठलीही अप्रिय घटना घडलेली नसतानाही हा शाळेत का जात नाही, या विचारांनी पालक अस्वस्थ झाले. ‘तुझ्या या सलग अनुपस्थितीमुळे तुला दहावीच्या परीक्षेला बसता येणार नाही.’ अशी धमकी शाळेच्या प्राचार्यानी घरी दूरध्वनीद्वारे दिली पण काहीच उपयोग होईना. त्याच्या या वागण्यामागे एक प्रकारची मानसिक अस्वस्थता असावी हे मात्र कुणाच्याच लक्षात येत नव्हते.
जेव्हा मुलं आपल्या घरच्यांपासून (इथे पालकांपासून) दूर जायला नकार देतात, एकटे राहायला घाबरतात तेव्हा त्यांच्यात विभक्त होण्याची भीती घर करून बसलेली असते हे लक्षात घ्यायला हवे. मग अशावेळी मुलं पोट/ डोकं दुखत असल्याचे बहाणे करून घरच्यांपासून दूर जाणे किंवा बाहेर जाणे टाळतात. एकटेपणाविषयी किंवा विभक्त होण्याच्या कल्पनेने उद्भवणाऱ्या या भीतीला ‘सेपरेशन एन्झायटी डीसऑर्डर’ म्हणतात.
अक्षयला भेटल्यावर मला त्याच्या मनातील भीती स्पष्टपणे जाणवली. त्याच्या शाळेच्या प्राचार्याना या आजाराविषयी सांगितले तेव्हा ते मान्यच करायला तयार नव्हते. त्याचे मानसिक आरोग्य बिघडले असल्याची कारणे मी जेव्हा त्यांना स्पष्टीकरणासह कागदावर लिहून दिली तेव्हा त्यांना या विषयाचा उलगडा झाला पण तोपर्यंत मुलांमध्ये मानसिक अस्वस्थता किंवा ‘सेपरेशन एन्झायटी डीसऑर्डर’ असू शकते यावर त्यांचा विश्वासच नव्हता. अखेर त्यांना हे पटले आणि त्यांनी सहकार्य करण्याची तयारी दाखवली.
आम्ही एक आलेख तयार केला आणि त्यानुसार सुरुवातीला त्याला ‘तू फक्त शाळेच्या आजूबाजूला फिरून ये’ असे सांगितले. त्यानंतर शाळेच्या परिसरात फेरफटका मारायला सांगितले. फेरफटका मारताना एक दिवस तो स्वत:च शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेला आणि तळमजल्यावरील भिंतींवर लावलेली पत्रके पाहून पुन्हा बाहेर आला. त्या पुढच्या आठवडय़ात शाळेच्या ग्रंथालयात गेला आणि तिथे साधारणपणे अर्धा तास पुस्तके चाळत बसला. चौथ्या आठवडय़ात वर्गात जाऊन बसण्यापर्यंत त्याची भीड चेपली. तो पहिल्या तासाला वर्गात जाऊन बसला. यावेळी त्याची आई त्याच्या बरोबर होती. म्हणजे तो वर्गात जाऊन बसेपर्यंत त्याच्या दृष्टिपथात होती. पण यावेळी नेमकी त्याच्या आईने चूक केली आणि आता तो वर्गात दिवसभर बसेल अशी अपेक्षा ठेऊन ती घरी निघून गेली. अक्षय गळा काढून रडू लागला. बरेचवेळा पालक उपचारांची एक पायरी गाळून पुढच्या पायरीवर उडी मारण्याची घाई करतात आणि ती चूक ठरते. हळू हळू सहा महिन्यानंतर अक्षय शाळेत पूर्णवेळ बसू लागला. त्याला समुपदेशनाची जोड होतीच. त्याच्या स्वभावातील अतिसंवेदनशीलताआणि त्यामुळे शाळेकडून मिळणारे शेरे यांची तीव्रता कमी करण्यासाठी समुपदेशनाचा उपयोग झाला.कालांतराने त्याची सहनशीलताही सकारात्मकतेत बदलली.
त्याच्या वर्गशिक्षिकेने त्याच्यावर विशेष लक्ष ठेवायला सुरुवात केली. वर्गातील दोन मित्रांचीही त्याला सोबत मिळाल्यावर अक्षय सावरला. थोडय़ाशा औषधोपचाराने त्याच्या मनातील भीती आणि चिंता दूर झाली. या अस्वस्थतेतून बाहेर येण्यासाठी दिवस, आठवडे तर काहींना महिने सुद्धा लागू शकतात. अर्थात या प्रयत्नांना शाळेकडूनही सहकार्य मिळावे लागते. मानसिक विस्कळीतपणाच्या या प्रकाराला १९९५ च्या डीसअॅबीलीटी कायद्यात समाविष्ट करण्यात आलेले आहे हे लक्षात घेतले पाहिजे. पण याची माहिती नसल्यामुळे अनेक शाळा मानसिक दुर्बलतेची शिकार झालेल्या मुलांना त्यांच्या कमी उपस्थितीवरून धमकावतात. असे न करता त्या अनुपस्थितीमागची कारणे जाणून घेणे गरजेचे आहे. अशा मुलांना नापास करण्याची भीती दाखविणे म्हणजे बाल हक्क कायद्याचे उल्लंघन करण्यासारखे आहे. अचानक शाळा सोडणाऱ्या मुलांमध्ये हीच ‘सेपरेशन एन्झायटी डीसऑर्डर’ असू शकते.
पालक कधी शाळा, कधी शहर तर कधी बोर्डसुद्धा बदलतात पण त्याने समस्या सुटत नाही कारण आपण त्याच्या मुळाशी पोहचलेलेच नसतो. बरेचवेळा पालक ‘सेपरेशन एन्झायटी डीसऑर्डर’ आहे हेच अमान्य करतात आणि मुलंचं ढोंगीपणा किंवा कामचुकारपणा करीत असल्याचा दोष देत राहतात. मुलांमध्ये ही समस्या निर्माण व्हायला काही वेळेस अपमानास्पद वागणूक देणारे
शिक्षक, अतिशिक्षा करणारे पालक, शाळेत सतत मिळणारा चुकीचा शेरा किंवा लैंगिक शोषण या गोष्टीसुद्धा कारणीभूत असतात. अशावेळी धार्मिक विधी, मंत्र-तंत्र या मुलांच्या मदतीला येत नाहीत तर समुपदेशन आणि औषधोपचार गरजेचे असतात.
वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या एका डॉक्टरांच्या १७ वर्षांच्या मुलीला रुग्णालयात दाखल केले तेव्हा नैराश्य असह्य़ झाल्यामुळे ती मरणासन्न अवस्थेला पोहचली होती. निराश होण्यासारखे कोणतेही कारण घरात घडलेले नसताना तिची अशी अवस्था झालेली पाहून पालक दुखी झाले. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की मन दुभंगायला ठरावीक कारणच असावे लागते असे नाही तर प्रत्यक्षात न दिसणारे असेही एखादे कारण असू शकते. एखादी व्यक्ती नक्की कोणत्या कारणामुळे निराश झाली आहे हे एका झटक्यात सांगण्याइतके विज्ञान अजून पुढे गेलेले नाही. इतरांसाठी साधी, सोपी वाटणारी गोष्टसुद्धा एखाद्याच्या नैराश्याचे कारण असू शकते. त्या मुलीच्या डॉक्टर वडिलांनी पाच मानसोपचारतज्ज्ञांना आणि तीन मानसशास्त्रज्ञांकडे मुलीला दाखवले पण कुणाचाही सल्ला ते मनावर घ्यायला तयार नव्हते. मुलीला ते गावाला घेऊन गेले आणि तिथे धार्मिक विधी करीत बसले पण दरम्यान मुलीने आत्महत्या केली. हृदयविकाराचा झटका आल्यावर ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया करून घेणारे ते डॉक्टर मुलीच्या बाबतीत जागरूक का नव्हते ? स्वत:च्या आजारपणात त्यांनी धार्मिक विधींची मदत न घेता थेट तज्ज्ञ डॉक्टरांना गाठून विज्ञानाचीच मदत घेतली मग मुलीच्या वेळी का नाही ? दुभंगलेली हाडं जोडायला जसे अस्थिविकार तज्ज्ञ लागतात तसेच दुभंगलेली मन जोडायलाही मनोविकार तज्ज्ञच लागतात. अशा वेळी धार्मिक विधी उपयोगाचे नाहीत. आत्महत्या हे धाडसाचे परिमाण नाही की भ्याडपणाचे लक्षणसुद्धा नाही तर ती एक मनाची अस्वस्थता आहे ज्या अस्वस्थतेची तातडीने दखल घेतली गेली पाहिजे.
राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोने दिलेल्या अहवालानुसार, मागील वर्षी अठरा वर्षांखालील ५,५८१ मुलांनी तर ५,३६९ मुलींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली होती. आत्महत्या करणाऱ्या गृहिणींची टक्केवारी ४७.४ टक्के एवढी होती तर आत्महत्या करणाऱ्या एकूण महिलांची आकडेवारी ४२,५२१ एवढी होती. कल्पना करा की मुलांवर, तरुणांवर किती मानसिक दबाव येत असेल! मुलांमधील बंडखोरपणा हे नैराश्याचे एक कारण असू शकते पण केवळ तेवढेच नाही तर अशावेळी इतर लक्षणेही तपासायला हवीत. अति रागीटपणा, हिंसक वृत्ती किंवा कार्यशक्ती, उत्साहाची कमतरता या गोष्टी नैराश्याची चिन्हे असतात अशावेळी तातडीने औषधोपचार करणे गरजेचे असते. काहीवेळेस रक्त तपासणी, क्ष-किरणे, सीटी स्कॅन किंवा एम.आर.आय.स्कॅनमध्ये ही विकृती दिसून येत नाही. त्यासाठी मुलांच्या मुलाखती आणि त्यांच्यात दिसणाऱ्या लक्षणांचे निरीक्षण करावे लागते आणि त्यातून नैराश्याचे निदान होऊ शकते.
सुयश परीक्षेत नापास झाला होता. त्याचा बुद्ध्यांक (आयक्यू) सामान्य होता पण तो परीक्षेत कधीच चांगले गुण मिळवू शकत नव्हता. नवव्या इयत्तेत नापास झाल्यावर शाळेने त्याला शाळा सोडण्यास सांगितले. वर्गात तो कायम शून्यात हरवल्यासारखा बसून राहायचा, अभ्यासात साध्या साध्या चुका करायचा आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात त्याला अडचणी येत होत्या. तो वर्गात उत्साही नसायचा आणि परीक्षेत त्याला गुणही कमी पडू लागले होते. त्याच्या पहिलीतल्या शिक्षिकेला आम्ही भेटलो तेव्हा तिने हीच लक्षणे तिला नऊ वर्षांपूर्वी म्हणजेच सुयश पहिलीत असतानाही दिसली असल्याचे सांगितले. सुयश ‘अटेन्शन डीफिसीट डीसऑर्डर’ या मानसिक विकाराने त्रस्त होता. मुलाकडे लक्ष द्या या प्राचार्याच्या सूचनेचे पालकांनी मनावर घेतले नव्हते पण जेव्हा शाळेने मुलाला शाळेतून काढून टाकल्याचा दाखला दिला तेव्हा पालकांनी शाळेकडे धाव घेतली. मानसोपचारतज्ज्ञांची मेहनत आणि थोडय़ाश्या औषधोपचारांच्या सहाय्याने सुयशची एकाग्रता वाढीस लावण्यात यश आले. दहावी, बारावीचा टप्पा तर ओलांडलाच पण त्यानंतर त्याने हॉटेल व्यवस्थापनाची पदवीसुद्धा मिळवली. त्याची शैक्षणिक आणि बौद्धिक पातळी उंचावली. जर वेळेवर त्याच्यातील कमतरता लक्षात आली नसती आणि मानसोपचारतज्ज्ञांच्या सहवासात आलाच नसता तर आजही तो आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर अडखळत राहिला असता. म्हणूनच वेळीच उपाय करणे खूप गरजेचे आहे.
डॉ. हरिश श़ेट्टी -harish139@yahoo.com
शब्दांकन :- मनीषा नित्सुरे-जोशी
मंत्र, ध्यानधारणा की औषधोपचार?
मुलांमधील बंडखोरपणा हे नैराश्याचे एक कारण असू शकते पण केवळ तेवढेच नाही तर अशावेळी इतर लक्षणेही तपासायला हवीत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-08-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व कुमारसंभव बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mantra meditation or medication