आपल्याला भेटायला येणाऱ्याच्या हातावर काहीतरी ठेवण्याची प्रत्येकाची इच्छा असते. तो घराचा एक संस्कार असतो. आयुष्याच्या संध्याकाळी तर ही भावना जास्तच तीव्र होते. येथील व्यवस्थापनाने नेमकं हे मर्म ओळखलं आहे. आणि इथे राहणाऱ्या व्यक्तीच्या भावना जपल्या आहेत. साहजिकच ‘हे आपलं घर आहे’ ही भावना सर्वाच्या मनांत ‘घर’ करून राहिली आहे.
‘एतू माझ्या सासूबाईंना भेटायला जाणार होतीस ना गं? मग एक काम करशील, आजच जा. मी ‘आज येते’ म्हणून सांगून आले होते. पण नेमकं व्हिसाच्या कामासाठी बोलावलंय. त्यामुळे मला येणं कठीणच आहे. त्या वाट बघत असतील. तू गेलीस की त्यांना जरा बरं वाटेल.’’
सकाळी सकाळी असा मीनाचा फोन आला आणि मी पटापट स्वयंपाकपाणी उरकून जायच्या तयारीला लागले. मीना, माझी बालमैत्रीण आणि सख्खी शेजारीणसुद्धा. पहिलीपासून पदवीधर होईपर्यंत अगदी गळ्यात गळे घालूनच वाढलो. शेजारीपाजारी, नातेवाईक नेहमी चिडवत, ‘कसं होणार या दोघींचं लग्न झाल्यावर कोण जाणे?’ पण लग्न झालं अन् उत्तर-दक्षिण अशा विरुद्ध दिशेला हसत खेळत पांगलो. पुढे योगायोगाने एकाच सरकारी कार्यालयात नोकरी लागली आणि मैत्रीचा झरा झुळझुळत राहिला. इतकंच नाही तर आमच्या जिव्हाळ्याच्या परिघात आणखीन दोघेजण सहज सामावले गेले. यथावकाश दोघींच्याही संसारवेली अंकुरल्या. मीनाला पुत्ररत्न तर मला कन्याप्राप्तीचा भाग्ययोग जुळून आला. नेमकं एका बेसावध क्षणी दुधात मिठाचा खडा पडावा तसं झालं आणि मीनाच्या यजमानांचं अपघाती निधन झालं. परिस्थितीशी दोन हात करत स्वत:च्या नोकरीच्या जोरावर मीनाने लेकाला वाढवला. पंखात बळ आल्यावर इंजिनीयर लेकाने आकाशात झेप घेतली आणि तो परदेशी स्थिरावला. एका शुभमुहूर्तावर दोनाचे चार हात झाले. या सर्व लढाईत मीनाच्या सासूबाई तिच्यासोबत होत्या. आपल्या लेकाच्या मृत्यूचं दु:ख पापण्यांच्या आड दडवून त्यांनी सुनेला भक्कम आधार आणि प्रेम दिलं. मीनाची ‘सासू’ होण्यापेक्षा ‘आई’ होऊन सदैव मायेचं छत्रच त्यांनी तिच्या डोक्यावर धरलं. मीनानेही लेकीच्या कर्तव्यात कसूर ठेवली नाही.
मीनाच्या लेकाचा परदेशात जम बसताच थोडे दिवस तरी आईने यावं म्हणून त्याने तिच्यामागे लकडा लावला. परंतु मीनाचं तळ्यातमळ्यात चाललेले होते. सासूबाईंचा प्रश्न होता. आजकाल संधिवाताने त्या ग्रासून गेल्या होत्या. मीनाने परदेशी लेकाकडे जाऊन चार दिवस सुखाचे अनुभवावे, असं त्यांनाही वाटत होतं. पण कसं? हा प्रश्न ‘आ’ वासून पुढे उभा होता. सुनेच्या गोड बातमीने दोघीही हूरळून गेल्या. विहीणबाईंनी जाऊन बाळंतपणाची जबाबदारी पार पाडली. पुत्ररत्नाची गोड बातमी ऐकून कान तृप्त झाले. कॉम्प्युटरवर बाळाने ‘दूर’दर्शन दिले. पण तेवढय़ाने आता मीनाचे समाधान होईना. लेकही हट्टाला पेटला. राहून राहून सासूबाईंना कुठे ठेवायचं ही चिंता मनाला भेडसावू लागली. सख्खे नातेवाईक कुणी नव्हतेच. त्यामुळे कोणाच्या घरी ठेवण्याचा किंवा कोणाला घरी बोलावण्याचा प्रश्नच नव्हता. वृद्धाश्रमाचा किंवा एखाद्या संस्थेचा पर्याय समोर यायचा. पण मीनाला त्या विचाराने स्वत:चीच लाज वाटायची. सासूबाईंनी मायेने पाठीवर ठेवलेला हात आठवायचा. अपराधीपणाची जाणीव मन कुरतडून टाकायची. असा स्वार्थी विचार आपल्या मनांत कसा येऊ शकतो याची खंत वाटायची. सासूबाईंजवळ हा विषय काढण्यासाठी जीभ रेटलीच जायची नाही. ओठांच्या कवाडातून शब्द फुटायचेच नाहीत. सासूबाईंनी मात्र मीनाच्या मनातले ओळखून आपणहूनच एखाद्या संस्थेत काही महिन्यासाठी राहण्याचा प्रस्ताव बोलून दाखवला, नव्हे आग्रहच धरला. त्याबद्दल स्वत:च्या मनाची पूर्ण तयारी झाली असल्याचे सांगितले. ‘माझी काही काळजी करू नकोस. तू बेलाशक नातवाला भेटून ये. मी आनंदाने राहीन.’ सासूबाईंचा निर्णय ऐकून मीनाचा बांध फुटला. त्यांच्याबद्दलचा आदर आणखीन दुणावला.
मीनाने जड अंत:करणाने त्या दिशेने हालचाल करण्यास सुरवात केली. मी या सर्व वाटचालीची साक्षीदार होतेच. सुरवातीला परिचितांशी, कार्यालयातील सहकाऱ्यांशी आडून आडून, सहज बोलता बोलता, चाचपडत संस्थांची माहिती काढण्याचा सिलसिला सुरू झाला. योगायोगाने ही शोधमोहीम माझ्याच गावातल्या ‘अपंगालयां’शी येऊन थांबली. मीनाच्या अनुपस्थितीत तिच्या सासूबाईंना भेटायला जायचं माझं काम सोपं होणार होतं. जे होतं ते चांगल्यासाठीच, याचा प्रत्यय आला. वाजवी दर, रुग्णांच्या देखभालीची उत्तम सोय, डॉक्टरांची जातीने देखरेख, परिचितांचे तिथल्या वास्तव्याबद्दलचे अनुभव, या जमेच्या बाजू विचारात घेऊन मीनाने सासूबाईंना इथे ठेवण्याचा निर्णय घेतला. औपचारिक कागदपत्रांची पूर्तता, आवश्यक गोष्टी, औषधे, कपडे यांची सोय करून मीना टॅक्सीने सासूबाईंना अपंगालयात घेऊन आली. अर्थात मी सोबत होतेच. टॅक्सी थांबताच तिथल्या मदतनीस हसतमुखाने सामोऱ्या आल्या. नावानिशी ओळख होऊन सर्वजणींनी सासूबाईंचा ताबा घेतला. त्यांच्या खोलीत पलंगावर त्यांना स्थानापन्न करताच मीनाने बॅगेतल्या सगळ्या वस्तू बाहेर जागेवर ठेवल्या. त्यांना समजावून दिल्या आणि झटकन् आम्ही ‘पीछेमूड’ केलं. मीनाचा पाय निघतच नव्हता. लग्न झाल्यापासूनचा सहवास, पहिल्यांदाच झालेली, नव्हे केलेली ही ताटातूट दोघींच्या डोळ्यातून पाझरत होती. ती रात्र माझ्याच घरी जागवत, मीना दुसऱ्या दिवशीपासून परदेशगमनाच्या तयारीला लागली.
रोज अपंगालयात तिचा फोन असायचाच. ‘सासूबाईंनी कधी बाहेरचं खाल्ल नव्हतं. त्यांना जेवण जात असेल का?’ या विचाराने ‘घास रोज अडतो ओठी’ अशी तिची अवस्था व्हायची. ‘मी इथे आहे तोपर्यंत आठवडय़ातून एकदा भेटायला येईन’ असं संस्थाचालकांच्या कानावर मीनाने घातलेलेच होते. एकदा येऊन भेटूनही गेली आणि आज तिला अचानक जमत नव्हते म्हणून मला जायला सांगण्यासाठी फोन खणखणला होता.
त्याबरहुकूम अपंगालयात जाण्यासाठी म्हणून मी दहा वाजता घराबाहेर पडले (पान ५ पाहा)
(पान ३ वरून ) आणि रिक्षाने दहापंधरा मिनिटातच मीनाच्या सासूबाईंसमोर हजर झाले. मीना येणार नाही म्हटल्यावर सुरवातीला त्या हिरमुसल्या. पण दोन मिनिटात त्यांची गाडी रुळावर आली. ‘काय म्हणता? कशा आहात? अगदी घरी होतात तशाच फ्रेश वाटताय!’, मी हळूच वातावरणाचा अंदाज घेण्यासाठी विचारले. नाही म्हटलं तरी दोन आठवडे घरापासून लांब राहिल्या होत्या, रुळायला थोडा वेळ लागणारच होता.
‘जेवण जातंय का? चवीत, करण्याच्या पद्धतीत थोडा फरक असतो म्हणून विचारते,’
‘नाही, बरं असतं. मुख्य म्हणजे गरम असतं आणि वाढणाऱ्या घाईघाई न करता, पुन्हा पुन्हा विचारून हवं नको बघतात. आवर्जून आवडी लक्षात ठेवतात. आग्रह करून खायला घालतात आणि गप्पाही मारतात.’ प्रेमाचा मार्ग पोटातून जातो, हे तत्त्व संस्थाचालकांनी अनुसरल्याचे बघून दिलासा वाटला.
‘आणि मला दोनदा नहायलाही घातलं हं या मुलींनी’, हे सांगताना मीनाच्या सासूबाईंचा चेहरा खुलला होता.
इतक्यात काम करणारी एकजण मला विचारायला आली. ‘ताई, चहा घेणार की कॉफी.’ मी नको नको म्हणत असताना कॉफीचा कप व बेसनाचा लाडू माझ्या हातात सरकवून ती पुढच्या कामाला धावली. खोलीतल्या उरलेल्या दोन पलंगापैकी एका पलंगावरील आजींची डोक्याभोवती स्कार्फ गुंडाळून ब्रह्मानंदी टाळी लागली होती. दुसरी पत्त्याचा कॅट घेऊन काहीतरी पानं लावत बसलेली होती. त्यांची भाषा कळत नव्हती. पण मला कळो न कळो काहीतरी हसत बोलत होत्या. मीनाची धावपळ, जायची तयारी, खरेदी या विषयी गप्पा झाल्या. रोजच्या दिनक्रमाची उजळणी झाली. शेजारणींमध्ये शाब्दिक देवाणघेवाण झाल्याची माहिती दिली गेली. एकूण एकंदरीत आशेचा सूर आळवला जात होता. मी ताजं वर्तमानपत्र त्यांना वाचून दाखवलं. इथली जेवायची वेळ होण्याआधी निघावं या विचाराने मी उठणार इतक्यात मगाचीच मुलगी ‘जेवल्याशिवाय जायचं नाही हं’ असं प्रेमळ दम देऊन गेली. मधेच येऊन डॉक्टरीणबाईंनी सुहास्य वदनाने सर्वाची खुशाली विचारली. प्रेमाने, जिव्हाळ्याने थोपटल्यासारखे करून आपली भावना स्पर्शाकित केली.
‘आजींच्या पाहुण्या त्या आमच्याही पाहुण्या. मग पाहुण्या आमच्या घरी आल्यावर आम्ही त्यांना जेवायला घातल्याशिवाय पाठवू का? बरोबर आहे ना आजी.’ एकीकडे पानांची मांडामांड करत, मीनाच्या सासूबाईंनाही आपल्या गटात सामील करून घेत मला आग्रह केला गेला. इतकंच नाही तर स्वयंपाकघरात पानही मांडले.
अतिथीधर्माला जागणारी अपंगालयाच्या व्यवस्थापनाची ही कृती खरंच कौतुकास्पद होती. आपल्याला भेटायला येणाऱ्याच्या हातावर काहीतरी ठेवण्याची प्रत्येकाची इच्छा असते. तो घराचा एक संस्कार असतो. आयुष्याच्या संध्याकाळी तर ही भावना जास्तच तीव्र होते. व्यवस्थापनाने नेमकं हे मर्म ओळखलं आहे. आणि इथे राहणाऱ्या व्यक्तीच्या भावना जपल्या आहेत. साहजिकच ‘हे आपलं घर आहे’ ही भावना सर्वाच्या मनांत ‘घर’ करून राहिली आहे. त्यामुळे त्यांचं येथील वास्तव्य, जगणं नक्कीच सुखावह झालं आहे. या गोष्टीचं अप्रूप वाटून मी सर्वाना मनापासून धन्यवाद दिले.
‘घरी आलीस की जेवूनच जायचं हा तुझा पायंडा, आहे तसाच राहिला, म्हणून मला खूप बरं वाटलं, ‘अगदी घरच्यासारखं’ वाटलं. मीनाला सांग अगदी शांतपणाने लेकाकडे जा. उगीच तडतड करत भेटायला येऊ नको. मी आनंदात आहे.’
मीनाच्या सासूबाईंचा उजळलेला चेहरा न्याहाळताना मनांत विचार आला, काळाची गरज म्हणून निर्माण झालेल्या सगळ्या संस्थांमध्ये असंच ‘घरपण’ जपलं जात असेल, नाही का?
‘घर’पण
आपल्याला भेटायला येणाऱ्याच्या हातावर काहीतरी ठेवण्याची प्रत्येकाची इच्छा असते.
आणखी वाचा
First published on: 16-11-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi blog gharpan