माझ्या वयाचे होऊन माझ्या फुलपाखरी विश्वाला अलगदपणे जपणाऱ्या बाबुकाकांना आम्हा तीन भावंडात माझ्याबद्दलच इतके प्रेम का वाटत असेल? हा खाऊ त्यांनी नक्की कधी ठेवला असेल? त्यावेळी त्यांच्या काय भावना असतील? सर्व जाणून घ्यायची तीव्र इच्छा झाली. त्यांना साफ विसरल्याबद्दल तीव्र टोचणी लागली. मनाशी ठरवले की कुठे असतील तिथे त्यांना भेटून सर्व आठवणींची उजळणी करायची. मनाने त्यांच्यापाशी पोचलेही. दादाची तीव्रतेने वाट बघू लागले..
आज दादा सकाळी माझ्याकडे फक्त सामान ठेवण्यापुरता आला. त्याला एका सेमिनारला जायचे होते. फ्रेश होऊन जेमतेम चहा घेऊन निघणार तोच काहीसे आठवून त्याने बॅग उघडून त्यातील एक लिफाफा माझ्या हाती देत म्हणाला, ‘हे तुझ्यासाठी. बाकी सर्व संध्याकाळी बोलू. बाय.’ म्हणत दार उघडून गेलासुद्धा. मी गोंधळून हातातील पिवळट पडलेल्या, चुरगळलेल्या लिफाफ्यावरील नाव वाचले –  मनुताईचा खाऊ. काहीच अर्थबोध होईना. लिफाफा उघडला. त्यात १०० रुपयांची नोट होती. लिफाफ्याचे गूढ कळत नव्हते. अचानक बाबुकाकांची वामनमूर्ती डोळ्यांपुढे आली. ३०-३२ वर्षांपूर्वीच्या माझ्या बालपणातील काही आठवणींची मालिका मनासमोर उलगडू लागली.
मी बहुतेक चार-पाच वर्षांची असेन. ताई मला न घेताच खेळायला गेली आणि वाडय़ात माझ्या वयाचे कुणीच खेळायला नव्हते म्हणून मी ओटय़ावर मुसमुसत बसले होते. इतक्यात ‘कशाला रडतेस बाळ’ असे विचारत गांधी टोपी घातलेले कुणी आजोबा समोर आले. आधी मी दुर्लक्षच केले, पण पुन्हा मायेने विचारल्यावर मी ताईची तक्रार सांगितली. त्यावर  ‘इतकेच नं. ताई कशाला? आपण दोघे खेळू की’ म्हणताना त्यांनी ओटय़ावरचे पत्ते पिसायला घेतले. भिकार-सावकारशिवाय कुठलाच खेळ मला येत नव्हता. ‘अहो, बाबुकाका तुम्हाला पकडले का मोनाने खेळायला. आत या. चहा गार होतोय.’ आईच्या बोलण्याने आजोबांचे नाव कळले. ते त्यांच्या मित्राला म्हणजे माझ्या पुण्याच्या आजोबांना (आईच्या वडिलांना) भेटायला आले होते. आजोबा पुण्याला परतल्यानंतरही बाबुकाका आमच्याकडे येत राहिले. ते आमच्याकडे आले की ‘सुमे’ अशी आईला हाक मारत येत, पण नजर बरेचदा मला शोधीत असे. मी दिसले नाही की मनुताईची चौकशी प्रथम होई. नावावरून आठवण झाली. माझे खरे नाव मोनिका असले तरी सर्व मला मोनाच म्हणतात असे मी त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘अगं, मोना, मोनी म्हणजे मुकी. इतके गोड बोलणाऱ्या मुलीला मोना कसे म्हणायचे आपण बुवा तुला मनू म्हणणार’ त्यावर मी फणकारून म्हटले, ‘हट, मला नाही आवडत मनू-बिनू.’ त्यावर ‘मेरी झॉंसी नही दुंगी’ म्हणणाऱ्या झाशीच्या राणीलासुद्धा लहानपणी मनूच म्हणत. तूसुद्धा मोठेपणी पराक्रमी होशील बघ. असे त्यांनी समजावल्यावर किंवा राणीच्या उदाहरणामुळे असेल कदाचित मी त्यांच्या मनू या हाकेला ओ देऊ लागले. दादा-ताई माझ्यापेक्षा अनुक्रमे पाच आणि तीन वर्षांनी मोठे. त्यांना मी दादा-ताई हाक मारायचे, पण ताईपाशी खास करून भांडण झाले की हट्ट करायची की तिनेही मला ताई म्हटले पाहिजे, नाही तर मला ताई कोण म्हणणार? या प्रश्नावर ‘हात्तिच्च्या, मी म्हणेन की तुला मनुताई. तुझ्या आज्याच्या वयाचा असलो तरी..’, अशी समजूत बाबुकाकांनी घातली आणि माझी कळी खुलली. बाबुकाका आले की स्वयंपाकखोलीतील टेबलाशी बसून आईशी गप्पा मारताना तिचा चहा होईपर्यत शेंगा, भाजी निवडत. पुढय़ात चहा आला की मला खुणेने बोलावीत. मोठय़ांसारखा आपणही रुबाबात चहा प्यावासा मला वाटे. पण तो मिळत नसे. माझी हौस पुरवण्यासाठी ते आईची पाठ वळली की स्वत:साठी चहा बशीत ओतून उरलेला कप मला देत. मी टेबलाखाली मान घालून एका दमात तो फस्त करी. माझ्या ओठाला लागलेला चहा ते धोतराच्या सोग्याने पुसून अंगणात पिटाळीत. आणि हो, त्याकाळी पाल्रे कंपनीच्या पांढऱ्या किंवा गुलाबी रंगाच्या चौकोनी पेपरिमटच्या चार -पाच गोळ्यांचे पाकीट मिळे. त्या खाऊचा माझा रतीब त्यांनी कधीच चुकवला नाही आणि मीसुद्धा हक्काने तो वसूल करी. मी तेव्हा म्हणे टणाटण उडय़ा मारत चालायची म्हणून दादा-ताई मित्रांबरोबर जाताना मला न्यायचे टाळत. मी अर्थातच हिरमुसून जाई. बाबुकाकांना कळले तेव्हा आनंदाने ते मला गोदाकाठी नेऊ लागले. माझ्या उडय़ा मारण्याचा त्यांनी त्रास मानला नाही. एकदा मात्र या उडय़ांमुळे माझा पाय मुरगळला. चालता येईना. तेव्हा ते बिचारे मला कडेवर घेऊन आले. वास्तविक त्यांची शरीरयष्टी किरकोळ, उंचीही बेताची. मी मात्र चांगलीच गुटगुटीत होते असे सर्व म्हणत. आई बहुतेक स्वयंपाकाच्या गडबडीत होती. मी पलंगावर आक्रस्ताळ्यासारखी ओरडत असताना बाबुकाकांनी आईकडून सहाण घेऊन बहुदा तुरटी, हळकुंड उगाळून त्याचा लेप माझ्या पायाला लावला. त्यांना पाहून, ‘इश्श, बाबुकाका असे सेवकासारखे तिच्या पायाशी काय बसलात? उठा,उठा’ म्हणून आईने त्यांना खुर्चीवर बसायला सांगून मला गप्प केले. पाय बरा होईपर्यंत ते सलग दोन-चार दिवस माझ्याशी खेळायला येत. ते आले की मी जरा जास्तच लाडात येते, असे दादा-ताईचे म्हणणे असायचे..
बेलच्या आवाजाने माझ्या आठवणींची साखळी तुटली. कुरीअर घेऊन झाल्यावर पुन्हा ती जोडू लागले. बाबुकाका मला शेवटचे केव्हा भेटले?  काही केल्या आठवेना. शाळा, जोडीने अनेक क्लास, तिथल्या समवयीन मित्रमत्रिणींत, अनेक व्यापात इतकी गुंतत गेले की घरात पाय ठरत नाही अशी आईची तक्रार असे. हां. पहिला नंबर मिळालेले पाचवी किंवा सहावीचे प्रगतीपुस्तक बाबुकाकांना दाखवल्याचे आठवतंय. त्यांचे पेपरिमटच्या गोळ्यांचे बक्षीसही आठवतंय, पण पुढे पुढे मुंबईला अॅडमिशन, हॉस्टेलवर मुक्काम, नाशिकला जाणे फक्त सुट्टीपुरते. नंतर अचानक ठरलेले लग्न आणि परदेशी प्रयाण.. या सर्वात बाबुकाकांच्या आठवणींचा ठिपका अंधुकच होत गेला. दोन वर्षांपूर्वी मुंबईत आल्यावर एक-दोन वेळा नाशिकला फेऱ्या झाल्या. पण तिथल्या भेटीगाठींच्या यादीत बाबुकाकांचे नाव कुठेच नव्हते. आज मात्र मनुताईच्या खाऊमुळे त्यांची आठवण ठळकपणे पुढे आली. माझ्याशी खेळणारी एक हक्काची व्यक्ती इतकीच मला त्यांची माहिती होती. त्यांचे कुटुंब, आíथक स्थिती कळण्याचे माझे वयही नव्हते. माझ्या वयाचे होऊन माझ्या फुलपाखरी विश्वाला अलगदपणे जपणाऱ्या बाबुकाकांना आम्हा तीन भावंडात माझ्याबद्दलच इतके प्रेम का वाटत असेल?  हा खाऊ त्यांनी नक्की कधी ठेवला असेल? त्यावेळी त्यांच्या काय भावना असतील? सर्व जाणून घ्यायची मला तीव्र इच्छा झाली. त्यांना साफ विसरल्याबद्दल तीव्र टोचणी लागली. मनाशी ठरवले की कुठे असतील तिथे त्यांना भेटून सर्व आठवणींची उजळणी करायची. आपल्याकडे येण्यासाठी पूर्वीसारखाच हट्ट करायचा. मनाने त्यांच्यापाशी पोचलेही. दादाची डोळ्यांत प्राण आणून वाट बघू लागले..
संध्याकाळी दादाला बाबुकाकांचे शंभर रुपये असलेले पाकीट दाखवून त्यांची चौकशी केली. त्यावर, ‘अगं, बाबुकाका निवृत्त झाल्यावर लवकरच त्यांची पत्नी वारली. पुढे शरीर थकल्यावर मूलबाळ नसल्याने पुतण्याकडे गेले. पण नंतर त्याची बदली कुठे आसामात झाली तेव्हा त्याने बाबुकाकांना कुठल्याशा वृद्धाश्रमात ठेवले. गेल्या वर्षी त्यांचे तिथेच निधन झाले. आश्रमातील लोकांनी बाबुकाकांच्या वैयक्तिक वस्तू पुतण्याच्या स्वाधीन केल्या. त्यात त्याला आपल्या पत्त्याचा हा लिफाफा सापडला. गेल्या महिन्यात तो नाशिकला आला तेव्हा आपल्याकडे देऊन गेला.’ दादा आणखीही काही सांगत होता, पण माझ्या आठवणीतील पेपरिमटच्या वडीची चव कडुशार झाली होती आणि घशात अडकलेल्या हुंदक्यामुळे असेल कदाचित, पण पेपरिमटचा थंडावा घशाला झोंबू लागला, टोचू लागला.   
alaknanda263@yahoo.com