४ डिसेंबर १८२९ रोजी भारतात सतीबंदी कायदा अस्तित्वात आला आणि एक अघोरी प्रथा बंद पडली. त्याला यंदा ८४ वर्षे पूर्ण होत आहेत. इतिहासाच्या पानात डोकावून या प्रथेच्या काळात स्त्रीला सोसाव्या लागलेल्या अन्यायाचा हा धावता आलेख.
गतवर्षी कोकणात गेले अन् एका गावातील प्रतिष्ठित घराण्यात घडलेल्या घटनेचा मागोवा घेणं झालं. हकीकत अशी होती की २६ ऑक्टोबर १८२० रोजी त्या घरातील तरुण सून रखमाबाई स्वेच्छेने सती गेली. त्या घरातील कोणीही स्त्री यापूर्वी किंवा त्यानंतर सती गेली नाही. शेताडीत चिऱ्यांनी बांधलेलं ते स्थान मी आवर्जून पाहिलं. आजही त्या घरातील व गावातील नवविवाहिता या स्थळी जाऊन ओटी भरतात. समजलेल्या माहितीनुसार रखमाबाई अतिशय शांतपणे सती गेल्या. त्यांच्या पतिनिष्ठेपुढे मी नतमस्तक झाले अन् ‘सती’ शब्दाचा मागोवा घेत थेट वैदिक काळात जाऊन पोहोचले.
स्त्रीशिक्षण व स्वातंत्र्याबाबतीत वेदकाल सर्वार्थाने संपन्न होता. उपनिषदात स्त्री-विचारवंतांचा उल्लेख आढळतो. गुरुकुलांमध्ये स्त्री-आचार्याची नियुक्ती होत असे. समाजात स्त्रीला अत्यंत मानाचं स्थान होतं त्यामुळे सती ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. संस्कृतमध्ये सती शब्दाचा अर्थ पवित्र स्त्री (सहगमन करणारी नव्हे.) रामायण काळात दशरथाच्या मृत्यूनंतर कौसल्यादी स्त्रिया सती गेल्या नाहीत. प्रकांडपंडित मेधा तिथी व हर्षकालातील बाण यांच्या मतानुसार सती म्हणजे आत्महत्या असून ती संकल्पना तद्दन मूर्खपणाची आहे.
गुप्तकाळात अनुकरण पद्धत रूढ होती, पण त्यामध्ये मृत व्यक्तीचा दास, दासी किंवा जवळचा नातलग सहगमन करीत असे. जपानमध्ये खानदानी स्त्रिया शत्रूच्या हाती लागू नये म्हणून टॅन्टो, कैकेन किंवा जिगाकी करून मृत्यू पत्करायच्या. काँगो, मेक्सिको, चीन, इजिप्त या देशांमध्येसुद्धा वेगवेगळय़ा पद्धती अस्तित्वात होत्या. काँगोमध्ये राजाच्या निधनानंतर बारा सुस्वरूप तरुणी राजाच्या शवाबरोबर जिवंत पुरण्याची पद्धत होती.
आपल्याकडे गुप्तकाळानंतर परकीय आक्रमणं वाढली अन् पहिला घाला स्त्री-स्वातंत्र्यावर पडला. पराशर स्मृतीनुसार रजस्वला, गरोदर व लहान अपत्य असलेल्या स्त्रीला सती जाण्यास संमती नसली तरी मुघल काळात सती जाणं राजरोस सुरू झालं. विशेष बाब अशी की, मुघल बादशाहांनी म्हणजे हुमायुँ, अकबर, शहाजहाँ अन् औरंगजेबाने सुद्धा सतीच्या प्रथेला कडाडून विरोध केला. अकबराने सती जाणाऱ्या स्त्रीला परावृत्त करण्यासाठी निर्वाह वेतन व बक्षिसांची खरात करण्याच्या सूचना दरोगांना देऊन ठेवल्या होत्या. औरंगजेबाने डिसेंबर १६६३ मध्ये सतीविरोधी फतवाच जारी केला होता. मुघल काळात म्हणजे सन १३३३-३४ मध्ये भारतभेटीला आलेला जगप्रवासी इब्न बतुताने आयुष्यात प्रथमच सतीचा भयंकर प्रकार बघितला आणि तो तिथेच बेशुद्ध पडला. त्यानंतर मात्र बतुताने अशा प्रसंगी जाणं जाणीवपूर्वक टाळलं.
मुघल शहजादा दारा शुकोह याचा खास हकीम फ्रास्नवा बर्ने यांने ४ ऑक्टोबर १६६७ रोजी पर्शियातील मुझेर चॅपलेन यास धाडलेल्या पत्रात नमूद केलंय की त्याने सुरत व आसपासच्या भागात सतीच्या अनेक घटना बघितल्या. त्यापैकी बऱ्याच वेळा या स्त्रिया चितेबाहेर पडण्याचा प्रयत्न करत, पण जमलेले नातलग त्यांना बळजबरीने पुन्हा आत ढकलत असत. हे पाहणेही क्रूर वाटे.
बर्नेने लाहोर येथे पाहिलेला प्रसंग फारच हृदयद्रावक आहे. सती जाणारी ही स्त्री केवळ बारा वर्षांची अजाण पोर होती. अत्यंत सुंदर, गोरीपान व नाजूक कांतीच्या या मुलीला तिच्या आजीने कडेवर घेतलं होतं. ती पोर खूप घाबरली होती. आईच्या नावाने आकांत करीत होती, पण तिच्या रडण्याकडे लक्ष न देता तिचे हात-पाय बांधून तिला चितेवर चढवण्यात आलं. चिता पेटली अन ते अश्राप सौंदर्य कापरागत भुरूभुरू जळताना पाहणं बर्नेला असह्य़ झालं. स्वत:च्या नाकर्तेपणाला दोष देत, डोळे टिपत तो तिथून बाहेर पडला.
फॅनी पर्कस ही ब्रिटिश गृहिणी ७ नोव्हेंबर १८२३ रोजी उत्तर प्रदेश येथे घडलेल्या घटनेचा उल्लेख करते. एका श्रीमंत बनियाची तरुण पत्नी कुटुंबीयांच्या दबावाखाली सती जाण्यास तयार झाली. पण चिता पेटताच वेदना असह्य़ होऊन तिने चितेबाहेर उडी मारली अन् तीरासारखी गंगेच्या दिशेने धावत सुटली. घटाघटा पाणी पिऊन तिने गंगेच्या थंडगार पाण्यात लोळण घेतली. एवढय़ात तिला पकडण्यासाठी नातलग मंडळी धावली. पण तिथे हजर असलेल्या एका ब्रिटिश मॅजिस्ट्रेटने त्यांना अटकाव केला व त्या स्त्रीला पालखीत घालून इस्पितळात नेलं. एका ब्रिटिश अधिकाऱ्यामुळे त्या अभागिनीचे प्राण वाचले.
वरील घटनांना छेद देणारी एक सकारात्मक घटना सन १७६९-७०मध्ये घडली. रामजी मल्हार जोशी हे कोकणातील तळेगावचे कुलकर्णी. त्यांचा मुलगा नारोबा यास प्रथम पत्नीपासून दोन मुली झाल्या. वंशास पुत्र हवा म्हणून नारोबाने पुनर्विवाह केला, पण त्यानंतर काहीच दिवसांत त्याचं निधन झालं. पत्नी चिमाबाई सती जाण्यास सिद्ध झाली. रामजी मल्हार व त्याच्या नातेवाईकांनी लाख समजावलं, पण चिमाबाई हेका सोडेना. अखेर सोयरे आप्पाजी सदाशिव यांच्या चार मुलांपैकी एकास दत्तक घेण्याचं ठरलं. बऱ्याच प्रयत्नांती सदाशिवची पत्नी मनुबाई पुत्र देण्यास तयार झाली. चिमाबाईला पांडुरंग हा दत्तक-पुत्र मिळाला व त्या आनंदात तिने सती जाणं रहित केलं.
त्यावेळच्या कर्मठ पाश्र्वभूमीवर रामजी व त्याच्या नातेवाईकांच्या पुरोगामी वर्तनाचं कौतुक करावं तेवढं थोडंच, पण अशी घटना एखादीच. एरव्ही खानदान व प्रतिष्ठेच्या नावाखाली अनेक चिता जळत होत्या. सन १८१२! बंगालमधील जगमोहन रॉय यांचं निधन झालं व त्यांची रूपवती पत्नी अलकमंजिरीचं सती जाणं निश्चित झालं. सौभाग्यलंकार घातलेली अलकमंजिरी भीतीने थरथरत होती. राममोहननी आपल्या कुटुंबीयांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. हातपाय बांधलेल्या अलकमंजिरीला चितेने स्वाहा केलं. घटना घडली. राख झाली, पण राजा राममोहन मात्र पेटून उठले. त्यांच्या डोक्यात आग भडकली. सतीची प्रथा बंद करण्याचा निश्चय त्यांनी केला अन् वेद, पुराण व श्रुतींचं वाचन व मनन सुरू झालं. निष्कर्ष निघाला. वैदिक संस्कृतीत सतीला थारा नाही. सतीची संकल्पनाच मान्य नाही. राममोहनजींचा उत्साह द्विगुणित झाला. त्यांनी लॉर्ड बेंटिंक व इतर विधिज्ञांशी चर्चा केली. हिंदू धर्मीयांच्या भावनांना हात घालण्यास ब्रिटिश सरकार कचरत होतं, पण राजाजी ठाम राहिले. अखेर ४ डिसेंबर १८२९ रोजी लॉर्ड बेंटिंकने सतीबंदी कायदा आणला. राममोहनजींची प्रतिज्ञा पूर्ण झाली. सतीला न्याय मिळाला.
ब्रिटिश गेले. देश स्वतंत्र झाला, पण रूढींचं ंजोखड अद्याप उतरलं नव्हतं. १९५४ रोजी जोधपूर येथे सिसोदीया घराण्यातील सगुणकुंवरबा, १९८७ रोजी राजस्थान, देवराळाची रूपकुंवर व १९९९ मध्ये उत्तर प्रदेशची चरण शाह सती गेली. या तिन्ही स्थानांची आजही पूजा-अर्चा केली जाते.
आपल्याकडे अनेकदा प्रशासकीय व पोलीस यंत्रणा निष्क्रीय राहते. ब्रिटिश काळात मात्र १८२९ च्या सतीबंदी कायदा अंमलबजावणीसाठी एक जिल्हाधिकारी किती कष्ट घेतो हे पाहण्याजोगं आहे. कर्नल विल्यम स्लीमन हा जबलपूरचा जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना गोपालपूर गावातील उमेदसिंग उपाध्यायची ६० वर्षीय वृद्ध पत्नी सती जाणार असल्याची खबर त्याला मिळाली. खबर मिळताच स्लीमन बेराघाटपर्यंत सात मैल घोडय़ावरून व नंतर तीन मैल पायी गोपालपूरला आला. त्या स्त्रीला समजावण्याचा त्याने आटोकाट प्रयत्न केला. पण तिने अन्न त्यागाची धमकी दिली. नाइलाजास्तव स्लीमनने परवानगी दिली. नवलाची बाब म्हणजे ती वृद्धा अत्यंत आनंदाने व शांतपणे चितेवर चढली.
..अखेर सती प्रथा गेली. गती आली. स्त्री शिकू लागली. शिक्षण, अर्थार्जन अशा पायऱ्या चढत तिने चक्क अंतराळात झेप घेतली. सारं कसं मनाजोगं झालं. पण तिचं जळणं, सोसणं अन् तोंड दाबून मुकाट बसणं थांबलं का? अजिबात नाही. वृत्तपत्रातील बलात्कार, अ‍ॅसिड हल्ले, हुंडाबळी अन् मारहाणीच्या बातम्या ओरडून, किंचाळून सांगताहेत की स्त्रीचं जळणं अद्याप सुरू आहे. उच्चविद्याविभूषित व गलेलठ्ठ पगार घेणारी स्त्रीसुद्धा कधी कधी सासुरवासाच्या नरकात अशी पिळवटली जाते की, मानहानी सहन न होऊन आत्महत्येचं पाऊल उचलते. स्वत:ला मॉडर्न समजणाऱ्या मॉडेल्स अन् प्रथितयश अभिनेत्रींनासुद्धा स्त्रीदेहाचं प्रदर्शन अन् कधी कधी शोषण करू दिल्याशिवाय पर्याय उरत नाही. हे सारं पाहिलं की वाटतं आजही स्त्रीचं ‘सती’ जाणं सुरू आहे फक्त त्याचं स्वरूप, संदर्भ व परिस्थिती बदललीय.
स्त्री खरंच मुक्त झालीय का?     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा